:: नि का ल प ञ::: (मंचाचे निर्णयान्वये, मा. सौ. किर्ती वैदय (गाडगीळ) मा.सदस्या) (पारीत दिनांक :-10/04/2019) |
| | | |
|
1. अर्जदाराने ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारांविरूध्द प्रस्तूत तक्रार दाखल केली आहे. अर्जदार हा गडचिरोली येथील रहिवासी असून गैर अर्जदार क्र.1 हे चंद्रपूर येथे गोपाल ट्रेडिंग या नावाने मोबाईल विकण्याचा व्यवसाय करतात. गैरअर्जदार क्र.2 हे ग्राहकांनी विकत घेतलेल्या मोबाईलचा विमा काढून त्याच्या मोबाईलला सुरक्षा पुरविण्याचे काम करतात. अर्जदाराने गैरअर्जदार क्र.1 कडून दिनांक 25/1/2016 रोजी बिल नंबर/3599 अन्वये आय.एम.इ.आय. नंबर 8 6 8 3 4 7 0 2 9 0 1 5 6 5 4 असलेला ओप्पो कंपनीचा मोबाईल रू.9700/- किमतीस विकत घेतला. त्यावेळी गैरअर्जदार क्र.1 यांनी व त्यांचे परवानगीने त्यांचे दुकानात उपस्थीत असलेले गैरहजर क्र. 2 चे अधिकारी यांनी मोबाईलचा विमा काढल्यांस मोबाईल ला काहीही झाले, हरविला, चोरी गेला किंवा फुटला तर गैरअर्जदार क्र.2 कडून पूर्ण नुकसान भरपाईची हमी घेतली. त्यानुसार अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 2 ला रू.799/- देऊन मोबाइलचा इन्शुरन्स काढला. त्यावेळेस अर्जदारास नंबर.3c82acEEvL.Itimation D-ATN_271016_197801683 देण्यात आला. त्यानंतर अर्जदाराचा मोबाईल दिनांक 27/11/2016 रोजी चोरी गेला. याबाबत सिटी पोलीस स्टेशन, चंद्रपूरला रिपोर्ट देण्यात आला. परंतु अर्जदाराचा मोबाईल परत मिळाला नाही, म्हणून अर्जदाराने गैरअर्जदार क्र.1 कडे विमा बद्दल चौकशी केली तेव्हा गैरअर्जदार क्र. 1 यांनी क्र.2 यांच्याकडे अर्जदारास पाठवले. गैरअर्जदार क्र.2 यांनी पुन्हा अर्जदाराकडून दिनांक 2.11.2016 रोजी रू.2425/- घेतले व दहा दिवसात नवीन मोबाईल देऊ असे आश्वासन दिले, परंतु आजपर्यंत नवीन मोबाईल दिला नाही. गैरअर्जदार क्र.1 व 2 अर्जदारास त्यानंतर उडवाउडवीचे उत्तर देऊन मानसिक त्रास देऊ लागले. मोबाईलचा विमा असूनसुद्धा त्याची पूर्तता न करणे ही गैरअर्जदार यांची कृती न्यूनतापूर्ण व अनुचित व्यापारी पद्धती आहे. सबब अर्जदाराने वकिलांमार्फत गैरअर्जदार यांना नोटीस पाठवला. परंतू नोटीस प्राप्त होऊन सुद्धा गैरअर्जदार यांनी त्याची दखल घेतली नाही सबब अर्जदारानी प्रस्तूत तक्रार मंचासमक्ष दाखल केलेली आहे.
2. अर्जदारांची मागणी अशी आहे की गैरअर्जदार यांनी अर्जदाराला विमा सुरक्षेचा लाभ न देणे व आश्वासित नवीन मोबाईल न देण्याची कृती ही अनुचित वापर पद्धती आहे असे घोषित करण्यात यावे तसेच अर्जदाराच्या चोरी गेलेल्या ओप्पो कंपनीच्या मोबाईलऐवजी त्याच कंपनीचा नवीनमोबाईल विमा सुरक्षेअंतर्गत देण्याचा आदेश देण्यात यावा तसेच अर्जदाराला झालेल्या शारीरिक मानसिक त्रासापोटी रू.50,000/- व तक्रारीचा खर्च रू.10,000/- अर्जदाराला देण्याबाबत गैरअर्जदारांविरुद्ध आदेश पारित करण्यात यावा.
3. अर्जदाराची तक्रार करून गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना नोटीस काढण्यात आली. गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदाराचे म्हणणे खोडून काढत लेखी जबाबत नमूद केले की अर्जदाराने गैरअर्जदार क्र.1 यांच्या दुकानातून मोबाईल खरेदी केला ह्यात वाद नाही, परंतु गैरअर्जदार क्र.1 च्या दुकानामध्ये अर्जदाराने गैरअर्जदार क्र.2 कडून मोबाइल विमाकृत केला होता हे म्हणणे चुकीचे आहे. गैरअर्जदार क्र.1 पुढे नमूद करतात की गैरअर्जदार क्र.1 हे फक्त मोबाईल विक्रेता आहेत, ते आपल्या दुकानात विविध नामांकित कंपनीचे फोन विक्री करतात व त्यांचे मोबाईल फोन निर्माता कंपनीसोबत करार किंवा नातेसंबंध नाही. अर्जदाराने गैरअर्जदार क्र.1 चा दुकानात येऊन मोबाईल खरेदी करून घेतल्यानंतर त्याला विमासंरक्षण मिळवून देण्याची जबाबदारी गैरअर्जदार क्र.1 ने कधीही घेतलेली नव्हती व त्यामुळे त्याची जबाबदारी गैरहजर क्र.1 वर लावता येत नाही. अर्जदाराने आपल्या स्वतःच्या मर्जीने विमा कंपनी बाबत योग्य शहानिशा करून अटी व शर्ती ला अनुसरून फोनचा विमा गैरअर्जदार क्र.2 यांच्याकडे काढला होता. इतकेच नव्हे तर ज्या कंपनीचा फोन अर्जदाराने खरेदी केला होता त्या कंपनीसोबत देखील गैरअर्जदार क्र.1 चे कोणतेही नाते संबंध नाहीत. अर्जदाराने ज्यावेळेस मोबाईल खरेदी केला त्यावेळेस अर्जदाराने गैरअर्जदार क्र.2 कंपनीचा एक्सप्रेस कार्ड सुद्धा खरेदी केले होते व सदर कार्डचे पैसे त्याने गैरअर्जदार क्र.2 यांना दिले होते. यात दुकानदाराचा कोणताही संबंध राहत नाही, अशी माहिती त्या वेळेस गैरअर्जदार क्र.1 ने अर्जदारांस दिली होती. मोबाईलचा विमा करणारे हे त्रयस्थ लोक आहेत व त्यांचा दुकानदाराशी कोणताही संबंध येत नाही. अर्जदाराचा मोबाईल जेव्हा चोरीला गेला तेव्हा त्याने गैरअर्जदार क्र.1 यांना लेखी स्वरुपात कळविले नव्हते. त्यांनी स्वतः ही बाब कबूल केलेली आहे की त्यांनी फक्त पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट नोंदवून आणि गैरअर्जदार क्र.2 यांना याबाबत अवगत करून आपल्या मर्जीने गैरअर्जदार क्र.2 सोबत लेखी पत्र व्यवहार केला होता. त्यामुळे त्याला जर कोणतीही न्युनतापूर्ण सेवा मिळाली असेल तर त्याकरिता गैरअर्जदार क्र.1 नाही तर गैरअर्जदार क्र.2 हे जबाबदार आहेत हे स्वयंसिद्ध आहे. अर्जदाराने गैरअर्जदार क्र.1 ला विनाकारण त्रास देण्यासाठी गैरअर्जदार क्र.1 विरुद्ध तक्रार दाखल केलेली आहे, सबब ती खारीज करण्यांत यावी अशी त्याने विनंती केली आहे.
4. गैरअर्जदार क्र.2 यांना मंचातर्फे काढलेला नोटीस निशाणी क्र. 10 अनुसार त्यांना प्राप्त होऊन सुद्धा ते मंचासमक्ष उपस्थित न झाल्यामुळे गैरअर्जदार क्र.2 विरुद्ध तक्रार एकतर्फा चालवण्याचे आदेश दिनांक 6 /9/ 2018 रोजी करण्यात आले.
5. अर्जदाराची तक्रार, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तिवाद, गैरअर्जदार क्र. 1 यांचे लेखी म्हणणे, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तिवाद तसेच उभय पक्षांच्या तोंडी युक्तिवादावरून तक्रार निकाली कामी खालील मुद्दे कायम करण्यात येत आले.
मुद्दे निष्कर्ष
1. गैरअर्जदार क्र. 1 ने सेवा पुरवण्यात कसूर केल्याची बाब
तक्रारकर्ते सिद्ध करतात काय ? नाही
2. गैरअर्जदार क्र. 2 ने सेवा पुरवण्यात कसूर केल्याची बाब
तक्रारकर्ते सिद्ध करतात काय ? होय
3. आदेश काय ? अंशतः मंजूर
कारण मिमांसा
मुद्दा क्र.1 बाबत ः-
6. अर्जदार ह्यांनी गैरअर्जदार क्र.1 यांचे कडून तक्रारीत नमूद मोबाईल रू. 9700/- ला विकत घेतला ही बाब गैरअर्जदार क्र.1 ह्याना मान्य असून त्या बद्दलची पावती तक्रारीत नि क्र.4 वर दाखल आहे. सदर पावतीचे अवलोकन केले असला त्यात गैरअर्जदार क्र.1 ने मोबाईलच्या विमा सुरक्षेबद्दल कुठेही उल्लेख नाही व प्रकरणात विमा सेवा गैरअर्जदार क्र.1 ह्यांनी अर्जदाराला दिलेली आहे ही बाब अर्जदारही तक्रारीत सिध्द करू शकले नसल्यामुळे गैरअर्जदार क्र.1 ह्यांनी अर्जदाराला कोणतीही न्युनतापूर्ण सेवा दिली नाही हि बाब सिद्ध होत असून मुद्दा क्र.1 चे उत्तर नकारार्थी देण्यात येत आहे.
मुद्दा क्र.2 बाबत ः-
7. अर्जदाराने गैरअर्जदार क्र.1 ह्यांचे कडून मोबाईल विकत घेऊन अर्जदाराने मोबाईलचा विमा गैरअर्जदार क्र.2 ह्यांचे कडून काढला होता ही बाब अर्जदाराने दाखल दस्तावेज वरून सिध्द होत आहे. अर्जदाराचा मोबाईल दि 2/11/2016 रोजी चोरीला गेल्यानंतर पोलीस स्टेशनला FIR दाखल करून अर्जदाराने मोबाईलचे विमाकर्ता गैरअर्जदार क्र.2 हयांना मोबाईलचोरीबाबत कळविले. त्यावर गैरअर्जदार क्र.2 ने दस्त क्र. 6,7,8,9,10 नुसार, अर्जदाराच्या दाव्याबद्दल कार्यवाही चालू असून लवकरात लवकर त्याची पूर्तता करण्यात येईल असे अर्जदास कळविले. परंतु त्यानुसार गैरअर्जदार क्र.2 ह्यांनी अर्जदाराला मोबाईलची कराराप्रमाणे विमा सुरक्षा दिली नाही हि बाब दस्तेवाजानुसार सिद्ध होत आहे. शिवाय गैरअर्जदार क्र.2 ह्यांनी प्रकरणात मंचाचा नोटीस प्राप्त होऊन सुद्धा प्रकरणात उपस्थित होऊन अर्जदाराचे म्हणणे खोडून काढले नसल्यामुळे याबाबत अर्जदाराचे म्हणणे ग्राहय आहे असे मंचाचे मत आहे. सबब मुद्दा क्र. 2 चे उत्तर होकारार्थी देण्यात येत आहे.
मुद्दा क्र.3 बाबत ः-
8. वरील मुद्दयांवरील मंचाचे निष्कर्षानुसार खालील आदेश पारित करीत आहे.
आदेश
1. तक्रार क्र.cc/17/201 अंशत मंजूर करण्यात येत आहे.
2 गैर अर्जदार क्र.2 ह्यांनी अर्जदाराला विवादीत मोबाईलच्या विमा सुरक्षा
लाभापोटी किमतीची रक्कम रू.9700/- द्यावी.
3. अर्जदाराला झालेल्या शारिरीक व मानसीक त्रासापोटी नुकसानभरपाई
तसेच प्रकरणाच्या खर्चापोटी गैरअर्जदार क्र. 2 ह्यांनी अर्जदाराला
एकत्रीत रु.3,000/- द्यावे.
4. गैरअर्जदार क्र. 1 विरुद्ध कोणतेही आदेश नाहीत
5. उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी .
चंद्रपूर
दिनांक – 10/04/2019
(श्रीमती.कल्पना जांगडे(कुटे)) (श्रीमती. किर्ती वैदय (गाडगीळ))(श्री. श्री.अतुल डी. आळशी)
सदस्या सदस्या अध्यक्ष