::: आ दे श :::
( पारित दिनांक : 27/02/2017 )
माननिय सदस्य श्री. कैलास वानखडे, यांचे अनुसार : -
1. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये दाखल केलेल्या या तक्रारीचा सारांश थोडक्यात खालीलप्रमाणे -
तक्रारकर्ता हा मंगरुळपीर जि. वाशिम येथील कायमचा रहिवासी आहे. विरुध्द पक्ष क्र. 2 हे ऑटोबॅट बॅटरीचे उत्पादन करतात तर विरुध्द पक्ष क्र. 1 हे इलेक्ट्रीकल्स वस्तु, बॅटरीचे विक्रेता आहेत. तक्रारकर्त्याने मागीतलेली बॅटरी न देता, विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी त्यांचेजवळ असलेली ऑटोबॅट बॅटरी घेण्यास तक्रारकर्त्यास बाध्य केले. तसेच गॅरंटी, वारंटी पीरेडमध्ये सर्व सेवा घरी येवून पुरविण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार तक्रारकर्त्याने, विरुध्द पक्ष क्र. 1 कडून ऑटोबॅट बॅटरी 200 Amp व मायक्रोटेक इन्व्हर्टर दिनांक 1/12/2013 रोजी पावती क्र. 85 नुसार एकूण 18,200/- रुपयास, विकत घेतले.
त्यानंतर गॅरंटी संपायच्या आतच दिनांक 10/10/2015 रोजी बॅटरीमध्ये दोष उद्भवला, त्याबाबतची तक्रार दि. 25/10/2015 पर्यंत विरुध्द पक्ष क्र. 1 कडे केली. तक्रारकर्त्याने दिनांक 26/10/2015 रोजी विरुध्द पक्ष क्र. 1 चे दुकानात बॅटरी परत केली व नविन बॅटरीची मागणी केली. परंतु दिनांक 26/11/2015 रोजी बॅटरी दुरुस्ती झाल्याचे सांगण्यात आल्याने, ती तक्रारकर्त्याने घरी नेली, परंतु त्यामध्ये पुर्वीप्रमाणेच तक्रार कायम होती. शेवटी तक्रारकर्त्याने, विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांना नोटीस दिली व बॅटरी बदलून देण्याची तसेच नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.
विरुध्द पक्षाने दिनांक 14/01/2015 रोजी बॅटरी व गॅरंटी कार्ड परत घेवून दिनांक 30/01/2016 ला नविन ऑटोबॅट बॅटरीचा पुरवठा केला. परंतु विरुध्द पक्षाने बॅटरी पुरवठा तिन महिणे न केल्यामुळे मुलांचे अभ्यासाचे नुकसान झाले. विरुध्द पक्षाने नुकसान भरपाई व नोटीसचे ऊत्तर दिले नाही.
म्हणून तक्रारकर्त्याने ही तक्रार दाखल केली व मागणी केली की, तक्रारकर्त्याची तक्रार मंजूर व्हावी, विरुध्द पक्षाकडून रुपये 21,000/- नुकसान भरपाई दयावी व त्या रक्कमेवर दिनांक 05/01/2016 पासुन दरसाल, दरशेकडा 18% व्याज देण्याचे आदेश व्हावे, तसेच कागदपत्रे प्रवासखर्च व कायदेशीर सल्ला याकरिता रुपये 10,000/-, तक्रारकर्त्याचे मुलांचे शैक्षणीक नुकसानीपोटी रुपये 10,000/-, मुलांचे मानसिक, शारिरिक नुकसानीपोटी रुपये 10,000/-, असे एकूण रुपये 51,000/- देण्याचा विरुध्द पक्ष यांना आदेश व्हावा.
2) विरुध्द पक्ष क्र. 1 चा लेखी जबाब -
विरुध्द पक्ष क्र. 1 ने निशाणी क्र. 6 नुसार त्यांचा लेखी जबाब मंचासमोर दाखल करुन, थोडक्यात नमूद केले की, ते व्दारकामाई इलेक्ट्रीकल्स या मंगरुळपीर येथील प्रतिष्ठाणाचे मालक आहेत व इलेक्ट्रीकल्स चा व्यवसाय करतात. तक्रारकर्त्याला ऑटोबॅट बॅटरी 200 AMD दिनांक 1/12/2013 मागणीनुसार रुपये 13,700/- व मायक्रोटेक इन्व्हर्टर (875) रुपये 4,500/- असे एकूण 18,200/- रुपयास दिले. तक्रारकर्त्याने सदर बॅटरीची तक्रार बॅटरीमध्ये पाणी कमी जास्त असून चार्जींग होत नसल्याचे सुमारे दोन वर्षानंतर सांगितले. सदर बाब वारंटी काळ यामध्ये बसत असल्याने, त्यांनी आणलेली बॅटरी दुरुस्तीसाठी घेतली. यामध्ये विरुध्द पक्षाचा सेवेतील दोष अथवा निष्काळजीपणा, अनुचित व्यवहार नाही. तक्रारकर्ता दिनांक 26/10/2015 ला दुकानात बॅटरी दुरुस्तीकरिता आले. सदर बॅटरीची पाहणी केली असता नादुरुस्त बॅटरी पूर्णपणे बंद असल्याने तिला चार्जींग करुन दिनांक 26/11/2015 ला परत केली. या दरम्यान कोणतीही तक्रार तक्रारकर्त्याने दिली नाही. तक्रारकर्त्याने दिनांक 5/1/2016 ला सरळपणे बॅटरीबाबत त्यांना कल्पना न देता विरुध्द पक्ष क्र. 2 यांना नोटीस दिली व बॅटरी ( पीस टू पीस ) बदलून मागीतली. दुरुस्तीबाबत कोणतीही तक्रार त्यांच्यापर्यंत न येता, सेवेचा भाग म्हणून दिनांक 30/1/2016 ला ( पीस टू पीस ) परत करीत तक्रारकर्त्याच्या घरी जावून सेवा पूर्ण केली. विरुध्द पक्षाची सेवा बॅटरी बदलून दिल्यानंतर शिल्लक राहत नाही. तक्रारकर्त्याची मुळ मागणी बॅटरी बदलून देण्याबाबत असल्याने दिनांक 5/1/2016 ला दिलेल्या नोटीसनुसार 25 दिवसांच्या आत ग्राहकाच्या घरी जावून बसून दिली. त्यामुळे तक्रारकर्त्याची प्रार्थना अमान्य करुन योग्य निर्णय देण्यात यावा.
3) विरुध्द पक्ष क्र. 2 चा लेखी जबाब -
त्यानंतर निशाणी 07 प्रमाणे विरुध्द पक्ष क्र. 2 ने त्यांचे लेखी म्हणणे पोष्टाव्दारे मंचासमोर दाखल करुन, थोडक्यात नमूद केले की, तक्रारकर्ता यांची नोटीस कंपनीस दिनांक 16/01/2016 रोजी मिळाली. त्यांनी तात्काळ त्यांचे डिलर विरुध्द पक्ष क्र. 1 यांच्याशी संपर्क केला व त्यांना बॅटरी चेक करण्यास सांगीतले. विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी दिलेल्या माहिती नुसार त्यांना बॅटरी रिप्लेसमेंट दयावी, असे कळविले. त्यानंतर दिनांक 30/01/2016 रोजी तक्रारकर्ता यांना बॅटरी रिप्लेसमेंट दिली. कंपनीच्या नियमानुसार ग्राहकाला वॉरंटी काळातील बॅटरी बदलून मिळाली. त्यामुळे या विरुध्द पक्षाने आपली जबाबदारी पार पाडली आहे व त्यांची कुठल्याही अतिरीक्त नुकसार भरपाईबद्दल जबाबदारी येत नाही.
4) कारणे व निष्कर्ष ::
सदर प्रकरणातील तक्रारकर्ता यांची तक्रार, दाखल केलेले दस्तऐवज, विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 चे स्वतंत्र लेखी जबाब व दाखल दस्त, तक्रारकर्ता व विरुध्द पक्ष क्र. 1 यांचा तोंडी युक्तीवाद, यांचे मंचाने काळजीपूर्वक अवलोकन करुन खालील निष्कर्ष कारणे देवून नमुद केला, तो येणेप्रमाणे.
तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष क्र. 1 यांच्याकडून ऑटोबॅट बॅटरी 200 AMP रुपये 13,700/- ला दिनांक 1/12/2013 ला विकत घेतली. त्याची पावती सदर प्रकरणात दाखल केली आहे, त्यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे, हे सिध्द होते.
तक्रारकर्त्याच्या म्हणण्यानुसार, तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष क्र. 1 कडून दिनांक 1/12/2013 रोजी ऑटोबॅट बॅटरी 200 Amp विकत घेतली. सदर बॅटरीमध्ये दिनांक 10/10/2015 रोजी दोष उद्भवला, त्यामुळे तक्रारकर्त्याने दिनांक 26/10/2015 रोजी विरुध्द पक्ष क्र. 1 चे दुकानात बॅटरी परत केली. सदर बॅटरीमध्ये काहीही दुरुस्ती न करता दिनांक 26/11/2015 ला परत केली. त्यामुळे विरुध्द पक्ष क्र. 1 कडे दिनांक 28/11/2015 ते 04/1/2016 पर्यंत तक्रारी करुन प्रतिसाद न मिळाल्याने दिनांक 05/01/2016 ला विरुध्द पक्ष क्र. 2 ला नोटीस पाठविली. नोटीस मिळाल्यानंतर विरुध्द पक्ष क्र. 1 हे सदर बॅटरी परत घेवून गेले व दिनांक 30/01/2016 रोजी पिस टू पिस बॅटरी बदलून दिली. बॅटरी बदलून देण्यास विलंब केल्यामुळे नोटीसमध्ये मागीतलेले 21,000/- रुपये परत केले नाही, म्हणून नुकसान भरपाईबाबत सदर प्रकरण मंचात दाखल करावे लागले.
विरुध्द पक्ष क्र. 1 च्या म्हणण्यानुसार, तक्रारकर्ता यांनी सदर बॅटरीमध्ये पाणी कमी जास्त असून चार्जींग होत नसल्याचे, सुमारे दोन वर्षानंतर सांगितले. सदर बॅटरी वारंटी मध्ये असल्याने, दिनांक 26/10/2015 ला दुरुस्तीसाठी घेतली. तक्रारकर्त्यास एका महिन्यानंतर बोलावले व सदर बॅटरी दिनांक 26/11/2015 ला चार्जींग करुन परत दिली. तक्रारकर्त्याने दिनांक 5/1/2016 ला विरुध्द पक्ष क्र. 1 ला माहिती न देता विरुध्द पक्ष क्र. 2 यांना सदर बॅटरी बदलून ( पीस टू पीस ) देण्याबाबात नोटीस दिली. त्यामुळे तक्रारकर्त्याच्या घरी जावून दिनांक 30/1/2016 ला ( पीस टू पीस ) बॅटरी बदलून दिली. सदर बॅटरी बदलून दिल्यामुळे दिनांक 05/01/2016 च्या नोटीसमध्ये केलेली रुपये 21,000/- ची मागणी अमान्य असून बॅटरी बदलून दिल्यानंतर विरुध्द पक्षाची सेवा शिल्लक राहत नाही.
उभय पक्षाचा युक्तीवाद एैकल्यानंतर, सदर मंच या निष्कर्षाप्रत पोहचले आहे की, तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष क्र. 1 कडून दिनांक 01/12/2013 ला बॅटरी विकत घेतली व सदर बॅटरी, दिनांक 26/10/2015 रोजी विरुध्द पक्ष क्र. 1 यांच्याकडे दुरुस्तीला घेवून गेले. म्हणजे जवळपास 23 महिन्यानंतर सदर बॅटरी विरुध्द पक्ष क्र. 1 यांच्याकडे दुरुस्तीला नेली. विरुध्द पक्ष क्र. 1 यांनीसुध्दा दिनांक 26/11/2015 ला म्हणजे एका महिन्यात बॅटरी चार्जींग करुन परत दिली. परंतु तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष क्र. 2 ला दिनांक 05/01/2016 ला पिस टू पिस बॅटरी बदलून मागीतली त्यानुसार विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी 30/01/2016 ला सदर बॅटरी पिस टू पिस बदलून दिली. हे तक्रारकर्त्याने कबूल केले आहे. तक्रारकर्त्याने सदर प्रकरण मंचात दाखल करण्याच्या अगोदर बॅटरी विरुध्द पक्षाने पिस टू पिस बदलून दिलेली आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याने केलेली रुपये 21,000/- अतिरीक्त नुकसान भरपाईची मागणी देण्यास विरुध्द पक्ष जबाबदार नाही. विरुध्द पक्षाने वेळोवेळी तक्रारकर्त्याच्या तक्रारीची दखल घेतलेली आहे. त्यामुळे विरुध्द पक्षाने कुठलाही निष्काळजीपणा केलेला दिसून येत नाही. त्यामुळे सदर तक्रार खारिज करण्यायोग्य आहे, असे मंचाचे मत आहे. सबब, अंतिम आदेश पारित केला तो पुढीलप्रमाणे.
अंतिम आदेश
- तक्रारकर्ता यांची तक्रार खारिज करण्यांत येते.
- न्यायिक खर्चाबाबत कोणताही आदेश पारित करण्यात येत नाही.
- उभय पक्षांना या आदेशाच्या प्रती निशुल्क पुरवाव्या.
(श्री. कैलास वानखडे ) ( सौ. एस.एम. उंटवाले )
सदस्य. अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, वाशिम.
svGiri