द्वारा - श्री.शि.भि.धुमाळ : मा.अध्यक्ष
1) ग्राहक वाद संक्षिप्त स्वरुपात खालील प्रमाणे -
तक्रारदार हे शेडयूल कमर्शिअल बँक असून तिच्या शाखा महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा व गुजरात राज्यात आहेत. तक्रारदारांनी सुरुवातीला सदरचा तक्रारअर्ज फक्त गोल्ड स्टोन टेक्नॉलॉजीज् प्रा.लि. यांचेविरुध्द दाखल केला होता. सामनेवाला गोल्ड स्टोन टेक्नॉलॉजीज् प्रा.लि. कंपनी ही ‘बँकमेट’ सॉफ्टवेअर सर्व्हिसेस बँकींग व्यवसायासाठी पुरवण्याचा व्यवसाय करतात. तक्रारदारांनी सामनेवाला यांचेकडे बँकमेट सॉफ्टवेअर ऑन विंन्डोज् एनटी आणि एमएस – एसक्यूएल बसविण्यासाठी सामनेवाला यांचे पूर्वीचे मालक यांचेकडे दि.02/02/99 च्या पत्राने विनंती केली व त्याप्रमाणे सामनेवाला यांनी बॅकेत बँकमेट सॉफ्टवेअर बसवून दिले व त्यासाठी 12 महिन्यांची वॉरंटी दिली. तक्रारदार बँकेने त्यांच्या वेगवेगळया शाखेत वरील सॉफ्टवेअर सामनेवाला यांचेकडून बसवून घेतले व त्यासाठी आवश्यक ती रक्कम सामनेवाला यांना दिली.
2) तक्रारदारांच्या म्हणण्याप्रमाणे सॉफ्टवेअर बसविल्यानंतर त्या सॉफ्टवेअरमधील अनेक दोष तक्रारदारांच्या निदर्शनास आले. तक्रारदारांनी सामनेवाला यांना विनंती करुन सदरचे दोष दुरुस्त करावेत असे कळविले परंतु सामनेवाला यांना सदर सॉफ्टवेअरमधील दोष दुरुस्त करता आले नाहीत. सामनेवाला यांनी तक्रारदारांना सदोष बँकमेट सॉफ्टवेअर पूरवून नंतर योग्य ती सेवा पुरविली नाही त्यामुळे सदरचे सॉफ्टवेअर वेळोवेळी बंद पडत होते. तक्रारदार व सामनेवाला यांचेमध्ये दि.07/01/01 रोजी झालेल्या बैठकीत सामनेवाला यांनी सॉफ्टवेअरमधील दोष दुर करण्याचे मान्य केले परंतु प्रत्यक्षात मात्र सॉफ्टवेअरमधील दोष सामनेवाला यांनी दुरुस्त केले नाहीत. तक्रारदार बँकेचे व्यवहार कोटयावधी रुपयांचे असतात. तक्रारदार बँकेने त्यांचे व्यवहार अचुकपणे व जलदगतीने होण्यासाठी सदर सॉफ्टवेअर बसवले. परंतु सदर सॉफ्टवेअरमध्ये दोष असल्यामुळे व त्यामध्ये वारंवार बिघाड निर्माण होवू लागल्यामुळे सदरचे सॉफ्टवेअर चालणार नाही अशा निष्कर्षाप्रत तक्रारदार आले व त्यांनी सामनेवाला यांना वकीलामार्फत नोटीस पाठविली. सॉफ्टवेअरमधील दोष दुर करण्यासाठी तक्रारदारांनी यापूर्वी सामनेवाला यांचेबरोबर अनेक बैठका घेतल्या व लेखी पत्रेही पाठविली होती. परंतु त्यास सामनेवाला यांनी प्रतिसाद दिला नाही. सदोष सॉफ्टवेअर पुरवून सामनेवाला यांनी अनुचित व्यापारी पध्दतीचा अवलंब केला आहे तसेच तक्रारदारांना सदोष बँकमेट सॉफ्टवेअर पुरविले नंतर त्याच्या दुरुस्तीसाठी योग्य ती सेवा पुरविली नाही ही सामनेवाला यांचे सेवेतील कमतरता आहे. तक्रारदारांनी दि.17/02/2001 च्या नोटीसीने सामनेवाला यांना त्यांनी बँकमेट सॉफ्टवेअर बसविण्यासाठी दिलेली संपूर्ण रक्कम व तक्रारदारांना झालेल्या त्रासापोटी नुकसानभरपार्इ म्हणून रक्कम रु.1 लाख द्यावेत अशी मागणी केली परंतु सामनेवाला यांनी वरील नोटीसीप्रमाणे कोणतीही कार्यवाही केली नाही म्हणून तक्रारदारांनी सदरचा तक्रारअर्ज या मंचासमोर दाखल केला आहे.
3) सामनेवाला यांनी तक्रारदार बँकेने सॉफ्टवेअर बसविण्यासाठी दिलेली रक्कम रु.2,17,500/- सामनेवाला यांनी तक्रारदारांना द्यावी असा आदेश करावा अशी विनंती केली आहे. तक्रारदारांनी त्यांना व त्यांच्या ग्राहकांना झालेल्या मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई म्हणून रक्कम रु.1,00,000/-, नोटीसीचा खर्च रु.1,100/- अशी एकूण रु.3,18,600/- ची मागणी सामनेवाला यांचेकडून केली आहे. तसेच सदर रक्कम रु.3,18,600/- यावर 24 टक्के व्याजाची मागणी करुन या अर्जाच्या खर्चापोटी रु.10,000/-ची मागणी सामनेवाला यांचेकडून केली आहे. तक्रारदारांनी तक्रारअर्जासोबत यादीप्रमाणे कागदपत्रे दाखल केली आहेत.
4) सामनेवाला क्र.1 यांनी कैफीयत दाखल करुन तक्रारदारांची मागणी अमान्य केली. तक्रारअर्जात केलेले आरोप बिनबुडाचे व खोटे आहेत. सामनेवाला ही कंपनी इंन्डियन कंपनीज् अॅक्ट,1956 प्रमाणे नोंदणीकृत असून त्यांचे नोंदणीकृत कार्यालय सिकंदराबाद येथे आहे. सामनेवाला क्र.1 यांचे म्हणण्याप्रमाणे त्यांनी बँकमेट सॉफ्टवेअर तक्रारदारांचे बँकेमध्ये बसविलेले नाही. मे.नॅशनल टेक्नॉलॉजीज् प्रा.लि. यांनी सदरचे सॉफ्टवेअर तक्रारदार बँकेत बसविलेले आहे. त्याचा इन्व्हॉईस नं.1/99-2000 दि.24/06/1999 असा आहे. तक्रारदारांनी बँकमेट सॉफ्टवेअर त्यांच्या बँकींग व्यवसायासाठी बसविले असल्यामुळे तक्रारदार ग्राहक संरक्षण कायदयाच्या तरतुदीप्रमाणे ‘ग्राहक’ होत नाही. तक्रारदारांनी दि.24/06/99 रोजी वरील संगणक यंत्रणा बसविण्यासाठी सामनेवाला क्र.2 बरोबर करार केला व ती बसवून घेतली परंतु सदरचा अर्ज त्यानंतर वॉरंटीचा कालावधी संपल्यानंतर ब-याच दिवसानंतर दाखल केला आहे.
5) सामनेवाला क्र.1 यांचे दि.22/03/2000 रोजी त्यांनी मे.नॅचरल टेक्नॉलॉजीज् प्रा.लि. बरोबर बँकमेट सॉफ्टवेअर घेण्यासाठी करार केला होता व त्याप्रमाणे दि.07/02/02 रोजी सदरचे सॉफ्टवेअर विकण्याचा करार पुन्हा मे.नॅचरल टेक्नॉलॉजीज् प्रा.लि. बरोबर केला. दि.07/02/02 नंतर त्यांनी वरील व्यवहाराची माहिती त्यांच्या ग्राहकांना दिली होती. असे असताना तक्रारदारांनी मे.नॅचरल टेक्नॉलॉजी यांना पार्टी न करता सदरचा अर्ज दाखल केला असल्यामुळे तो खर्चासहित रद्द करण्यात यावा.
6) या कामी तक्रारदारांनी मे.नॅचरल टेक्नॉलॉजीज् प्रा.लि. यांना पक्षकार करण्यासाठी तक्रार दुरुस्तीअर्ज दाखल केला होता. दि.10/04/03 रोजी तक्रारदारांचा दुरुस्तीअर्ज मंजूर करुन मे.नॅचरल टेक्नॉलॉजीज् प्रा.लि. यांना पक्षकार सामनेवाला क्र.2 म्हणून सामिल करण्यात आले.
7) सामनेवाला क्र.2 यांनी कैफीयत दाखल करुन तक्रारदारांची मागणी नाकारली. सामनेवाला क्र.2 यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांचे कार्यालय व कार्यशाळा जयपूर-राजस्थान येथे आहे. मुंबई येथे त्यांची कोणतीही शाखा नाही. तक्रारदार बँकेने सॉफ्टवेअर बसविण्याची ऑर्डर त्यांना जयपूर येथे दिली होती व पैसेही जयपूर येथे दिले होते. त्यामुळे सदरचा तक्रारअर्ज या ग्राहक मंचास चालविण्याचा अधिकार नाही.
8) सामनेवाला क्र.2 यांच्या म्हणण्याप्रमाणे सदर सॉफ्टवेअर फेब्रुवारी,1999 मध्ये तक्रारदार बँकेने विकत घेतला. परंतु सदरचा तक्रारअर्ज मार्च, 03 मध्ये म्हणजे तक्रारअर्जास कारण घडल्यानंतर 2 वर्षापेक्षा जास्त कालावधीनंतर दाखल केला आहे सबब तक्रारअर्ज रद्द होणेस पात्र आहे. सामनेवाला क्र.2 यांचे म्हणण्याप्रमाणे सदरचे सॉफ्टवेअर तक्रारदार बँकेने बँकेच्या व्यवसायासाठी घेतले होते. त्यामुळे ग्राहक संरक्षण कायादयातील तरतूदीनुसार तक्रारदार बँक ग्राहक नसल्यामुळे या मंचास सदरचा तक्रारअर्ज चालविता येणार नाही.
9) तक्रारदार बँकेने सॉफ्टवेअरमध्ये दोष आहेत हा आरोप सिध्द करण्यासाठी संगणक क्षेत्रातील तज्ञांचे मत दाखल केलेले नाही. सबब तक्रारदारांनी केलेल्या आरोपात तथ्य नाही. सामनेवाला क्र.2 यांच्या म्हणण्याप्रमाणे तक्रारदारांनी केलेले आरोपांचे निकाल देण्यासाठी सविस्तर पुराव्याची गरज आहे. उपस्थित केलेले मुद्दे गुंतागुंतीचे आहेत. सबब या मंचास या तक्रारअर्जाचा निकाल करता येणार नाही.
10) सामनेवाला क्र.2 यांच्या म्हणण्याप्रमाणे तक्रारदार बँकेने वसुल करुन मागितलेल्या रक्कम रु.3,18,600/- ची मागणी सिध्द करण्यासाठी कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. तक्रारदारांनी नुकसानभरपाईसाठी केलेली मागणी अवास्तव जादा आहे.
11) सामनेवाला क्र.2 यांच्या म्हणण्याप्रमाणे तक्रारदार बँकेकडे सॉफ्टवेअर चालविण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी वर्ग नाही. तक्रारदारांच्या कर्मचा-यांना त्यांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे बॅंकमेट सॉफ्टवेअर वापरला नाही त्यामुळे सदरच्या सॉफ्टवेअरमध्ये बिघाड झाला ही बाब तक्रारदारांनी या मंचापासून लपवून ठेवली.
12) सामनेवाला क्र.2 यांनी असा आरोप केला आहे की, तक्रारदार बँकेने फक्त्ा 75 टक्के रक्कम त्यांना दिलेली आहे. सॉफ्टवेअरची संपूर्ण रक्कम तक्रारदार बँकेने सामनेवाला यांना दिलेली नसली तरीसुध्दा तक्रारदार सामनेवाला क्र.2 यांची सेवा घेऊ इच्छित होते. सामनेवाला क्र.2 यांनी ब-याच वेळा वरील सॉफ्टवेअरमधील समस्यांचे निरसन केले, परंतु तक्रारदार बँकेच्या अप्रशिक्षित कर्मचा-यांनी सदरचे सॉफ्टवेअर चुकीच्या पध्दतीने हाताळल्याने त्यात वारंवार बिघाड होत गेले. सबब सदर तक्रारअर्ज खर्चासह रद्द करणेत यावा. या कामी तक्रारदारांनी पुराव्याचे शपथपत्र दाखल केले व लेखी युक्तीवाद दाखल केला आहे. सामनेवाला क्र.1 व 2 यांनीही लेखी युक्तीवाद दाखल केला आहे.
13) दि.26/02/2011 पासून तक्रारदार व सामनेवाला या मंचासमोर हजर राहिले नाहीत. उभयपक्षकारांनी लेखी युक्तीवाद दाखल केलेला असल्यामुळे सामनेवाला क्र.2 यांचे वकील कु.रश्मी मन्ने यांचा तोंडी युक्तीवाद ऐकण्यात आला व सदर प्रकरण निकालासाठी ठेवण्यात आले.
14) निकालासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात -
मुद्दा क्र.1 - तक्रारदार हे सामनेवाला क्र. 1 व 2 यांचे सेवेत कमतरता आहे हे सिध्द करतात काय ?
उत्तर - तक्रारदारांनी सामनेवाला क्र.2 यांचे सेवेतील कमतरता सिध्द केली आहे.
मुद्दा क्र.2 - तक्रारदार यांना सामनेवाला यांचेकडून रक्कम रु.2,17,500/- व त्यावर व्याज, नुकसानभरपाई इत्यादी वसुल करता येईल काय ?
उत्तर - अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिमांसा -
मुद्दा क्र.1 - या कामी उभपक्षकारांनी दाखल केलेल्या पुराव्यावरुन तक्रारदारांनी त्यांच्या बँकेत सन् 1999 साली बँकमेट सॉफ्टवेअर सामनेवाला क्र.2 यांचेकडून बसवून घेतले असे दिसन येते. सामनेवाला क्र.1 व 2 यांच्या म्हणण्याप्रमाणे तक्रारदारांनी वर नमूद केलेला सॉफ्टवेअर बँकींग व्यवसायावसाठी बसवून घेतलेला असल्यामुळे तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायदयातील सुधारीत तरतुदीनुसार ‘ग्राहक’ नाहीत. ग्राहक संरक्षण कायदा, 1986 मध्ये अमेंडेड अॅक्ट, 62/2002, कलम 2(1)(d)(ii) मध्ये दुरुस्ती करण्यात आली असून सदर दुरुस्तीचा अंमल दि.15/03/2003 पासून सुरु झाला आहे. वरील दुरुस्तीप्रमाणे जर एखादयाने व्यवसायासाठी सेवा घेतली असल्यास तो ग्राहक संरक्षण कायदयातील कलम 2(1)(d)(ii) प्रमाणे ग्राहक होत नाही. दि.15/03/2003 पूर्वी म्हणजेच कलम 2(1)(d) मध्ये दुरुस्ती करण्यात आली त्यापूर्वी कलम 2(1)(d)(ii) मध्ये व्यापारी कारणासाठी सेवा घेतली असल्यास ग्राहक होत नाही असे नमूद केले नव्हते. तक्रारदार बँकेने सामनेवाला यांचेकडून संगणकीय प्रणाली सेवा सन् 1999 मध्ये घेतली असल्यामुळे तक्रारदार त्यावेळी प्रचलित असणा-या कलम 2(1)(d)(ii) प्रमाणे ग्राहक होते. सबब सामनेवाला यांनी तक्रारदार हे ग्राहक नाहीत या उपस्थित केलेल्या मुद्दयात तथ्य नाही. सामनेवाला क्र.2 यांनी या मंचाला सदरचा तक्रारअर्ज चालविण्याचा अधिकार नाही असे म्हटले आहे कारण सामनेवाला क्र.2 यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांचे नोंदणीकृत कार्यालय जयपूर-राजस्थान येथे असल्यामुळे तक्रारदारांनी सॉफ्टवेअर बसविण्याची विनंती त्यांच्या जयपूर येथील कार्यालयाला केली होती, तसेच त्यासाठी पैसेही जयपूर येथील कार्यालयास भरले होते. सामनेवाला क्र.2 यांची मुंबईत कोणतीही शाखा नाही सबब या मंचास सदरचा तक्रारअर्ज चालविण्याचा अधिकार नाही असे म्हटले आहे. सामनेवाला क्र.2 यांनी बँकमेट सॉफ्टवेअर तक्रारदारांच्या मुंबई येथील फोर्ट शाखेत बसविले आहे ही बाब सामनेवाला यांना मान्य आहे त्यामुळे तक्रारअर्जास कारण या मंचाच्या कार्यक्षेत्रात घडले आहे. सबब सामनेवाला क्र.2 यांच्या वरील मुद्दयात तथ्य नाही. सामनेवाला यांनी तक्रारदारांच्या बँकेत सन् 1999 मध्ये बँकमेट संगणकीय यंत्रणा बसविली असली तरीही त्यात होत असणा-या सतत बिघाडामुळे तक्रारदार व सामनेवाला यांचेमध्ये दि.07/01/01 रोजी बैठक झाली व सामनेवाला यांनी तक्रारदारांच्या संगणक प्रणालीतील दोष दुर करण्याचे मान्य केल्याचे दिसते. त्यामुळे तक्रारअर्जास कारण घडल्यापासून तक्रारअर्ज मुदतबाहय आहे हा सामनेवाला यांचा आरोप मान्य करता येणार नाही.
तक्रारदारांनी त्यांच्या व सामनेवाला क्र.2 यांच्यामध्ये वेळोवेळी झालेल्या कराराच्या प्रती दाखल केल्या आहेत. त्यावरुन सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदार बँकेत बसविलेले बँकमेट सॉफ्टवेअरमध्ये वारंवार बिघाड होत होते असे दिसून येते. तक्रारदार व सामनेवाला यांच्यातील पत्रव्यवहारावरुन सामनेवाला यांनी तक्रारदारांच्या मुंबई शाखेत बसविलेले बँकमेट सॉफ्टवेअरमध्ये खालील दोष होते असे दिसते.
1) Interest calculation is not correct in –
a) Cash Credit b) Current O.D. c) Term Deposit d) Recurring Deposit
2) Clearing module is not working as per our system and procedure.
3) Pass book module is not working properly.
सामनेवाला क्र.2 यांच्या म्हणण्याप्रमाणे तक्रारदारांच्या बँकेत संगणक प्रशिक्षीत कर्मचारी नसल्यामुळे त्यांना सॉफ्टवेअर निटपणे हाताळता येत नव्हते. ज्या ज्यावेळी तक्रारदार बँकेनेसॉफ्टवेअरमधील बिघाडासंबंधी तक्रारी केल्या त्यावेळी सामनेवाला यांनी तुमच्याकडे प्रशिक्षीत कर्मचारी नाही ही बाब निदर्शनास आणता आली असती परंतु सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदार यांच्या कर्मचा-यांना संगणक हाताळता येत नाही अशी लेखी तक्रार तक्रारदार बँकेकडे केली नाही. बँकमेट सॉफ्टवेअरमध्ये सतत होणा-या बिघाडामुळे तक्रारदार बँकेला नवीन संगणक यंत्रणा बसवावी लागली असे दिसते. सबब तक्रारदारांनी सामनेवाला क्र.2 यांच्या सेवेत कमतरता आहे हे सिध्द केले आहे असे दिसते. सबब मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी देणेत येते.
मुद्दा क्र.2 - तक्रारदार बँकेने सामनेवाला क्र.2 यांचेकडून बँकमेट सॉफ्टवेअर बसविण्यासाठी झालेला खर्च रक्कम रु.2,17,500/- वसुल करुन मागितला आहे. वर नमूद केलेल्या कारणास्तव तक्रारदार बँकेत सामनेवाला क्र.2 यांनी बसविलेली सॉफ्टवेअर यंत्रणा सदोष असल्यामुळे तक्रारदार बँकेस त्यांचा उपयोग झाला नाही त्यामुळे तक्रारदारांना वरील रक्कम रु.2,17,500/- सामनेवाला क्र.2 यांनी द्यावेत असा आदेश करणे योग्य होईल.
तक्रारदारांनी वरील रकमेवर द.सा.द.शे. 24 टक्के दराने व्याजाची मागणी केली आहे. तक्रारदारांनी केलेली व्याजाची मागणी अवास्तव जादा आहे. सामनेवाला यांनी तक्रारदारांना रक्कम रु.2,17,500/- यावर दि.07/01/2001 पासून द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज द्यावे असा आदेश करणे योग्य होईल. तक्रारदारांनी त्यांना झालेल्या मानसिक त्रासापोटी व गैरसोयीपोटी सामनेवाला यांचेकडून रक्कम रु.1,00,000/- नुकसानभरपाई म्हणून मागितली आहे. तक्रारदारांनी मानसिक त्रासापोटी व गैरसोयीपोटी मागितलेली नुकसानभरपाई रु.1,00,000/- जादा आहे. या प्रकरणातील वस्तुस्थितीचा विचार करता सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदारांना नुकसानभरपाई दाखल रक्कम रु.5,000/- व या अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु.2,000/- द्यावेत असा आदेश करणे योग्य होईल.
या कामी सामनेवाला क्र.2 यांनी बँकमेट संगणकीय प्रणालीबाबत तक्रारदार बँकेबरोबर करार करुन सदरची संगणक प्रणाली तक्रारदार बँकेत बसविली होती. सामनेवाला क्र.1 यांचा वरील व्यवहाराशी कोणताही संबंधी दिसून येत नाही. तक्रारदार बँकेला सामनेवाला क्र.1 विरुध्द कमतरता सिध्द करता आली नाही म्हणून तक्रारदार बँकेस सामनेवाला क्र.1 यांचेकडून कोणतीही रक्कम वसुल करुन मागता येणार नाही. सबब मुद्दा क्र.2 चे उत्तर त्याप्रमाणे देण्यात येते. सबब सदरचा तक्रारअर्ज सामनेवाला क्र.2 विरुध्द अंशतः मंजूर करण्यात येवून खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करणेत येत आहे.
अं ति म आ दे श
1. तक्रार क्रमांक 119/2002 अंशतः मंजूर करणेत येतो.
2. सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदारांना रक्कम रु.2,17,500/- (रु.दोन लाख सतरा हजार पाचशे मात्र) यावर दि.07/01/2001 पासून द.सा.द.शे.9 टक्के दराने व्याज संपूर्ण रक्कम तक्रारदारांना मिळेपर्यंत द्यावेत.
3. सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई म्हणून रक्कम रु.5,000/-(रु.पाच हजार मात्र) व या अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु.2,000/-(रु.दोन हजार मात्र) द्यावेत.
4. सदरचा तक्रारअर्ज सामनेवाला क्र.1 विरुध्द खर्चासहित रद्द करणेत येत आहे.
5. सामनेवाला क्र.1 यांनी वरील आदेशाची अंमलबजावणी प्रस्तुत आदेशाची प्रत त्यांना मिळाल्यापासून 30 दिवसांचे आत करावी.
6. सदर आदेशाची प्रमाणित प्रत उभय पक्षकारांना देणेत यावी.