(पारित दिनांक-26 फेब्रुवारी, 2020)
(पारित व्दारा श्री नितीन मा.घरडे, मा.सदस्य)
01. तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम 12 खाली त्याने विरुध्दपक्ष क्रं 1 विक्रेता आणि विरुध्दपक्ष क्रं 2 निर्माता कंपनीचा खरेदी केलेला मोटरपंप त्यामध्ये उत्पादकीय दोष असल्याने त्याचे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विरुध्द ग्राहक मंचा समोर दाखल केली.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय असा आहे की-
तक्रारकर्त्याचे मालकीची 05 एकर शेती असून या व्यतिरिक्त तो गावा लगतची 03 एकर शेती बटाईने करतो. त्याचे शेतात बोअरवेल असून त्यामधील पाणी शेतातील पिकाला देण्यासाठी त्याने मोटरपंप विकत घेण्याचे ठरविले. त्याने विरुध्दपक्ष क्रं 1 विक्रेत्या कडून, विरुध्दपक्ष क्रं 2 निर्मित कंपनीचा 03 अश्वशक्तीचा सबमर्सीबल मोटर पंप दिनांक-14 जुलै, 2014 रोजी एकूण किम्मत रुपये-24,500/- मध्ये नगदीने खरेदी केला. सदर मोटर पंप हा जून-2014 मध्ये निर्मित केलेला असून त्याचा क्रमांक-59130072607 असा आहे. सदर मोटर पंपावर दोन वर्षाची वॉरन्टी होती.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, त्याने खरेदी केलेला मोटर पंप शेतातील बोअरवेलवर स्थापित केल्या नंतर तो दिनांक-15 सप्टेंबर, 2014 पर्यंत व्यवस्थित चालला परंतु त्यानंतर त्यामध्ये वॉरन्टी कालावधीतच दोष निर्माण झाल्याने त्याने त्या बाबतची तक्रार विरुध्दपक्ष क्रं 1 विक्रेत्याकडे नोंदविली. विरुध्दपक्ष क्रं 1 विक्रेत्याने सदर नादुरुस्त मोटरपंप स्वतः जवळ एक महिन्या पर्यंत दुरुस्तीसाठी ठेऊन घेतला व त्यानंतर तो विरुध्दपक्ष क्रं 1 विक्रेत्याने त्याचे मजूराच्या सहाय्याने दिनांक-01 ऑक्टोंबर, 2014 रोजी बोअरवेल वर बसवून दिला परंतु त्यानंतर काही दिवसातच मोटर पंपा मध्ये बिघाड निर्माण झाला असता त्याने त्या बाबतची तक्रार वि.प.क्रं 1 विक्रेत्याकडे केली असता सदर मोटरपंप दुरुस्त करुन देण्यास टाळाटाळ केली. वस्तुतः मोटर पंपावर 02 वर्षाची वॉरन्टी असताना व तो हमी कालावधीत नादुरुस्त झालेला असताना विरुध्दपक्ष क्रं 1 विक्रेत्याने तो दुरुस्त करुन द्दावयास हवा होता अथवा तो विरुध्दपक्ष क्रं 2 निर्माता कंपनीकडे पाठवून बदलवून त्याऐवजी नविन मोटर पंप द्दावयास हवा होता परंतु तसे काहीही वि.प.क्रं 1 विक्रेत्याने केले नाही. त्यानंतर तक्रारकर्त्याने अधिक चौकशी केली असता विरुध्दपक्ष क्रं 1 विक्रेता हा विरुध्दपक्ष क्रं 2 निर्माता कंपनीचा अधिकृत विक्रेता नसल्याचे त्याला माहित पडले. त्याने या संबधात वेळोवेळी दोन्ही विरुध्दपक्षांकडे तक्रारी केल्यात परंतु कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अशाप्रकारे तक्रारकर्ता हा दोन्ही विरुध्दपक्षांचा ग्राहक असताना देखील त्यास दोषपूर्ण सेवा देण्यात आली. नादुरुस्त मोटर पंपा मुळे त्याला आपल्या शेतात उभ्या असलेल्या धानाचे पिकाला पाणी देता आले नाही आणि त्यामुळे त्याचे रुपये-2,00,000/- एवढे पिकाचे आर्थिक नुकसान झालेले आहे. विरुध्दपक्षाचे दोषपूर्ण सेवेमुळे त्याला शारीरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. त्याने दोन्ही विरुध्दपक्षांना रजिस्टर पोस्टाने दिनांक-03.11.2014 रोजी नोटीस पाठविली असता ती दोन्ही विरुध्दपक्षांना मिळाली. विरुध्दपक्ष क्रं 1 विक्रेत्याने वकीलांचे मार्फतीने सदर नोटीसला खोटे उत्तर पाठविले परंतु विरुध्दपक्ष क्रं 2 निर्माता कंपनीने नोटीसला कोणतेही उत्तर दिले नाही म्हणून शेवटी त्याने प्रस्तुत ग्राहक तक्रार दोनही विरुध्दपक्षा विरुध्द ग्राहक मंचा समोर दाखल करुन त्याव्दारे खालील प्रमाणे मागण्या केल्यात-
(01) विरुध्दपक्ष क्रं 1 विक्रेत्या कडून, विरुध्दपक्ष क्रं 2 निर्माता कंपनीची उपरोक्त नमुद वर्णनातीत मोटर खराब असल्याने ती नविन देण्यात यावी तसेच त्याचे झालेल्या आर्थिक नुकसानी संबधात रुपये-2,00,000/- भरपाई मिळावी.
(02) विरुध्दपक्षांच्या दोषपूर्ण सेवेमुळे त्याला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-20,000/- विरुध्दपक्षां कडून देण्याचे आदेशित व्हावे. तसेच तक्रारीचा खर्च विरुध्दपक्षां कडून मिळावा.
(03) या शिवाय योग्य ती दाद त्याचे बाजूने मंजूर करण्यात यावी.
03 विरुध्दपक्ष क्रं 1 मोटर पंप विक्रेत्याने ग्राहक मंचा समोर उपस्थित होऊन लेखी उत्तर पान क्रं 37 ते 40 वर दाखल केले. त्याने आपले लेखी उत्तरात तक्रारकर्त्याची तक्रार खोटी व बिनबुडाची आहे. हे म्हणणे बरोबर आहे की, त्याने विरुध्दपक्ष क्रं 2 निर्माता कंपनीव्दारे निर्मित मोटर पंप तक्रारकर्त्याला दिनांक-14 जुलै, 2014 रोजी विकला. पहिल्यांदा जेंव्हा सदर मोटर पंप बंद पडल्या बाबतची सुचना त्याला तक्रारकर्त्या कडून मिळाल्या नंतर सदर मोटर पंपाची तपासणी केली असता, सदरचा मोटरपंप ज्या विद्दुत कनेक्शवरुन जोडण्यात आला होता, त्या विद्दुत कनेक्शनच्या विद्दुत दाबा मध्ये कमी-जास्त चढ-उतार होत होता आणि सदर कनेक्शन मध्ये दोष असल्याचे दिसून आले होते, त्याने ही बाब तक्रारकर्त्याला समजावून सांगितली होती.तरी सुध्दा त्याने तक्रारकर्त्या कडील नादुरुस्त मोटर पंप हा दिनांक-15 सप्टेंबर, 2014 रोजी दुरुस्त करुन दिला होता आणि त्याला मोटर पंपास विद्दुत कनेक्शन वरुन योग्य दाबाचा विज पुरवठा होईल याकडे लक्ष देण्यास सुचित केले होते. असे सुचित केल्या नंतरही तक्रारकर्त्याने निष्काळजीपणाने व लापरवाहीने त्याकडे दुर्लक्ष्य करुन सदरचा मोटरपंप चालविला आणि त्यामुळे त्यात पुन्हा दोष निर्माण झाला, त्यामुळे त्याने तक्रारकर्त्यास कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही. प्रस्तुत तक्रार ही मनगढत व खोटी असून ग्राहक मंचाची दिशाभूल करणारी आहे व तक्रारकर्त्याने दुषीत हेतूने विरुध्दपक्षांना बदनाम करण्या करीता ग्राहक मंचा समोर दाखल केलेली असल्याने ती खारीज करण्याची विनंती केली.
04 विरुध्दपक्ष क्रं 2 मोटर पंप निर्माता कंपनीने आपले लेखी उत्तर ग्राहक मंचा समोर पान क्रं 41 ते 46 वर दाखल केले. विरुध्दपक्ष क्रं 2 निर्माता याने आपले लेखी उत्तरात विरुध्दपक्ष क्रं 1 हा त्याचा अधिकृत विक्रेता नसून मे.साईनाथ मशीनरी भंडारा हे विरुध्दपक्ष क्रं 2 निर्माता यांचे अधिकृत विक्रेता आहेत. त्याचेव्दारा निर्मित सदरचा मोटरपंपसेट त्याने अधिकृत विक्रेता मे.साईनाथ मशीनरी भंडारा याला दिनांक-08 जुलै, 2014 रोजी विक्री केला होता व तोच मोटरपंप सेट दिनांक-14 जुलै, 2014 रोजी तक्रारकर्त्याला विक्री करण्यात आला. सदरच्या मोटर पंप सेट मध्ये कुठल्याही प्रकारचा उत्पादकीय दोष नाही. सुरुवातीला तक्रारकर्त्याचे स्वतःचे निषकाळजीपणामुळेच मोटर पंप सेट बंद पडला होता. सदरचा मोटर पंप सेट हा 03 अश्वशक्ती दाबाचा असल्याने त्याला योग्य त्या दाबाचा विद्दुत पुरवठा मिळणे गरजेचे असते परंतु तक्रारकर्त्याने सदरचा मोटर पंप हा सिंगल फेज कनेक्शन वरुन जोडलेला होता व विद्दुतदाबातील कमी-जास्त दाबामुळे सदरचा मोटर पंप खराब झाला. तक्रारकर्त्याने खरेदी केलेला मोटर पंप हा योग्य त्या दाबाच्या विज पुरवठयावर लावला असता तर तो मोटरपंप खराब होण्याचे प्रयोजनच उदभवले नसते. त्यांचे व्दारा निर्मित मोटर पंप मध्ये उत्पादकीय दोष नसून तक्रारकर्त्याचे स्वतःचे निषकाळजीपणामुळे मोटर पंप खराब झालेला आहे.
विरुध्दपक्ष क्रं 2 निर्माता कंपनीने पुढे असे नमुद केले की, जेंव्हा पहिल्यांदा मोटर पंप नादुरुस्त झाला होता त्यावेळी तो वॉरन्टी कालावधीत असल्याने सदर मोटर पंप विरुध्दपक्ष क्रं 2 यांचे कडे दुरुस्तीसाठी दिनांक-26 सप्टेंबर, 2014 रोजी आणला होता. सदर मोटरपंपास योग्य दाबाचा विज पुरवठा न मिळाल्याने त्याची वायरींग जळाली होती, तो मोटर पंप विरुध्दपक्ष क्रं 2 ने दुरुस्त करुन दिनांक-30 सप्टेंबर, 2014 रोजी विरुध्दपक्ष क्रं 1 विक्रेत्याकडे पाठविला होता. अशाप्रकारे विरुध्दपक्ष क्रं 2 निर्माता कंपनीने तक्रारकर्त्यास सेवा देण्यास कोणतीही कसूर केलेली नाही. तक्रारकर्त्याचे तक्रारीत नमुद मजकूरा प्रमाणे त्याने दुस-यांदा विरुध्दपक्ष क्रं 1 विक्रेता अथवा वि.प.क्रं 2 निर्माता यांचेकडे कोणतीही लेखी व मौखीक तक्रार केलेली नाही वा तो दुरुस्तीसाठी पुन्हा वि.प.क्रं 2 कडे आलेला नाही. जो पर्यंत विरुध्दपक्ष क्रं 2 निर्माता यांचेकडे तक्रार येणार नाही तो पर्यंत ते सेवा देऊ शकत नाही. विरुध्दपक्ष क्रं 2 निर्मित मोटर पंपा मध्ये कोणताही उत्पादकीय दोष नाही. विरुध्दपक्ष क्रं 2 ने तक्रारकर्त्याचे नोटीसला उत्तर दिलेले आहे. वि.प.क्रं 2 ला या तक्रारीमध्ये विनाकारण गोवण्यात आलेले आहे करीता त्याचे विरुध्दची तक्रार खारीज करण्याची विनंती वि.प.क्रं 2 मोटरपंप निर्मात्याने केली.
05 तक्रारकर्त्याने पान क्रं 13 वरील दस्तऐवज यादी नुसार गोखले ऑटोमोबाईल्सचे बिल, विरुध्दपक्ष क्रं 2 निर्माता कंपनीचे दोन वर्षाचे वॉरन्टी कार्ड, तक्रारकर्त्याने वि.प.क्रं 1 व 2 यांना पाठविलेल्या कायदेशीर नोटीसची प्रत, विरुध्दपक्ष क्रं 1 विक्रेत्याने सदर नोटीसला दिलेले उत्तर, तक्रारकर्त्याने दोन्ही वि.प.नां पाठविलेली दुरुस्त नोटीसची प्रत अशा दस्तऐवजाच्या प्रतीचा समावेश आहे. तसेच पान क्रं 47 ते 50 वर स्वतःचे शपथपत्र दाखल केले.
06 वि.प.क्रं 1 विक्रेत्याने लेखी उत्तर पान क्रं 37 ते 40 वर दाखल केले. या शिवाय कोणतेही दसतऐवज दाखल केले नाहीत.
07 वि.प.क्रं 2 निर्मात्याने लेखी उत्तर पान क्रं 41 ते 46 वर दाखल केले. वि.प.क्रं 2 निर्माता कंपनी तर्फे सेल्स मॅनेजर श्री गिरीष वसंत देशपांडे यांनी पान क्रं 51 ते 53 वर पुराव्याचे शपथपत्र दाखल केले. तसेच पान क्रं 55 ते 57 वर लेखी युक्तीवाद दाखल केला. वि.प.क्रं 2 निर्माता याने पान क्रं 59 वर दाखल दस्तऐवज यादी नुसार त्यांना ग्राहका कडून प्राप्त तक्रार नोंदीचे रजिस्टरची प्रत, डिलेव्हरी नोट, वि.प.क्रं 2 चे सर्व्हीस इंजिनियर एस.कार्तीक यांचा दिनांक-29.09.2014 रोजीचा तपासणी अहवाल, त.क.चे नोटीसला दिलेले उत्तर अशा दसतऐवजाच्या प्रतीचा समावेश आहे. तसेच लेखी युक्तीवाद पान क्रं 64 ते 67 वर दाखल केला.
08 तक्रारकर्त्याची तक्रार, दाखल दस्तऐवज व शपथे वरील पुरावा तसेच दोन्ही विरुध्दपक्षांची लेखी उत्तरे, वि.प.क्रं 2 तर्फे शपथेवरील पुरावा व लेखी युक्तीवाद आणि दाखल दस्तऐवज याचे ग्राहक मंचा तर्फे काळजीपूर्वक अवलोकन करण्यात आले तसेच उभय पक्षांचे वकीलांचा मौखीक युक्तीवाद यावरुन ग्राहक मंचाचा निष्कर्ष खालील प्रमाणे देण्यात येतो.
-निष्कर्ष-
09 तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं 2 टेक्समो कंपनी निर्मित 03 अश्वशक्तीचा मोटर पंप ज्याचा क्रमांक-59130072607 असा आहे, तो विरुध्दपक्ष क्रं 1 गोखले ऑटोमोबाईल्स साकोली या विक्रेत्या कडून पावती क्रं 1292 दिनांक-14.07.2014 रोजी एकूण किम्मत रुपये-24,500/- मध्ये विकत घेतला ही बाब पान क्रं 14 वर दाखल वि.प.क्रं 1 चे बिला वरुन सिध्द होते. तसेच वि.प.क्रं 2 निर्मित सदर मोटरपंपा वरती दोन वर्षाची वॉरन्टी ही खरेदी दिनांक 14 जुलै, 2014 पासून होती ही बाब पान क्रं 15 ते 18 वर दाखल वॉरन्टी कॉर्ड वरुन सिध्द होते. तक्रारकर्त्या कडील मोटर पंप हा वॉरन्टी कालावधीतच नादुरुस्त झाला होता ही बाब दोन्ही विरुध्दपक्षांना मान्य आहे, त्या बाबत कोणताही विवाद त्यांनी निर्माण केलेला नाही. विरुध्दपक्ष क्रं 1 विक्रत्याचे उत्तरा प्रमाणे पहिल्यांदा जेंव्हा वॉरन्टी कालावधीत मोटर पंपात दोष निर्माण होऊन तो नादुरुस्त झाला होता त्यावेळी तक्रारकर्त्याने त्याचे कडे दिनांक-15 सप्टेंबर,2014 रोजी तक्रार केली होती त्यानंतर त्याने नादुरुस्त मोटर पंप हा दुरुस्त करुन दिला होता.
10 तर विरुध्दपक्ष क्रं 2 निर्माता कंपनीने उत्तरात असे नमुद केले की,जेंव्हा पहिल्यांदा मोटर पंप नादुरुस्त झाला होता त्यावेळी तो वॉरन्टी कालावधीत असल्याने सदर मोटर पंप विरुध्दपक्ष क्रं 2 याचेकडे दुरुस्तीसाठी दिनांक-26 सप्टेंबर, 2014 रोजी आणला होता. सदर मोटरपंपास योग्य दाबाचा विज पुरवठा न मिळाल्याने त्याची वायरींग जळाली होती, तो मोटर पंप विरुध्दपक्ष क्रं 2 ने दुरुस्त करुन दिनांक-30 सप्टेंबर, 2014 रोजी विरुध्दपक्ष क्रं 1 विक्रेत्याकडे पाठविला होता.
11 वि.प.क्रं 1 विक्रेत्याने लेखी उत्तरात असा आक्षेप घेतला की, दिनांक-15 सप्टेंबर, 2014 रोजी पहिल्यांदा जेंव्हा सदर मोटर पंप बंद पडल्या बाबतची सुचना त्याला तक्रारकर्त्या कडून मिळाल्या नंतर सदर मोटर पंपाची तपासणी केली असता, सदरचा मोटरपंप ज्या विद्दुत कनेक्शवरुन जोडण्यात आला होता, त्या विद्दुत कनेक्शनच्या विद्दुत दाबा मध्ये कमी-जास्त चढ-उतार होत असून सदर कनेक्शन मध्ये दोष असल्याचे दिसून आले होते, त्याने ही बाब तक्रारकर्त्याला समजावून सांगितली होती. तरी सुध्दा त्याने तक्रारकर्त्या कडील नादुरुस्त मोटर पंप हा दुरुस्त करुन दिला होता आणि तक्रारकर्त्याला मोटर पंपास विद्दुत कनेक्शन वरुन योग्य दाबाचा विज पुरवठा होईल याकडे लक्ष देण्यास सुचित केले होते. असे सुचित केल्या नंतरही तक्रारकर्त्याने निष्काळजीपणाने व लापरवाहीने त्याकडे दुर्लक्ष्य करुन सदरचा मोटरपंप चालविला होता.
12 वि.प.क्रं 2 निर्मातयाने लेखी उत्तरात असा आक्षेप घेतला की, सुरुवातीला तक्रारकर्त्याचे स्वतःचे निषकाळजीपणामुळेच सदरचा मोटर पंप बंद पडला. सदरचा मोटर पंप हा 03 अश्वशक्ती दाबाचा असल्याने त्याला योग्य त्या दाबाचा विद्दुत पुरवठा मिळणे गरजेचे असते परंतु तक्रारकर्त्याचे सदरचा मोटर पंप हा सिंगल फेज कनेक्शन वरुन जोडलेला होता व विद्दुतदाबातील कमी-जास्त दाबामुळे सदरचा मोटर पंप खराब झाला होता. तक्रारकर्त्याने खरेदी केलेला मोटर पंप हा योग्य त्या दाबाच्या विज पुरवठयावर लावला असता तर तो मोटरपंप खराब होण्याचे प्रयोजनच उदभवले नसते. त्याचे व्दारा निर्मित मोटर पंप मध्ये उत्पादकीय दोष नसून त्याचे स्वतःचे निषकाळजीपणामुळे मोटर पंप खराब झालेला आहे. आपले म्हणण्याचे पुराव्यार्थ वि.प.क्रं 2 निर्मात्याने त्यांचे सेल्स मॅनेजर श्री गिरीष वसंत देशपांडे यांचे पान क्रं 51 ते 53 वर पुराव्याचे शपथपत्र दाखल केले. तसेच पान क्रं 60 वर त्यांचेकडे आलेल्या तक्रारीचे गोषवा-याची प्रत दाखल केली, ज्यामध्ये दिनांक-26 सप्टेंबर, 2014 रोजी विरुध्दपक्ष क्रं 1 गोखले ऑटोमोबाईल्स विक्रेत्या कडून आलेली तक्रार नोंद असून दिनांक-30 सप्टेंबर, 2014 रोजी निराकरण केल्याची नोंद आहे. तसेच पान क्रं 62 वर वि.प.क्रं 2 चे सर्व्हीस इंजिनियर नागपूर श्री एस. कार्तीक यांचा दिनांक-29 सप्टेंबर, 2014 रोजीचा अहवाल दाखल आहे, त्यामध्ये पुढील प्रमाणे नमुद आहे-
Root cause for the failure- Motor winding burned out due to running on two phase, as it is a three phase Motor and not advisable to run on two phase. Since the set was under warranty period, we had made new winding again and changed the bottom intermediate shell of motor and make it as per our company standards and given1st free of cost warranty service as per our company warranty policy.
Remarks- It must be ensured that three phase motor should not run/operate on two phases, three phase voltage also must be as per our company standard. If the set is again made to run on two phases (one phase down) same problem will be repeated leading to winding burn. It is advisable to use a single phase prevent to avoid this issue.
परंतु सदरचे अहवालावर वि.प.क्रं 1 विक्रेता आणि तक्रारकर्त्याची स्वाक्षरी नाही किंवा सदर अहवाल तक्रारकर्त्याला रजिस्टर पोस्टाने पाठविल्या बाबत कोणताही पुरावा नाही त्यामुळे तक्रारकर्त्याने सिंगल फेजवर सदर मोटरपंप चालविला होता आणि सदर मोटरपंपाची अश्वशक्ती 03 असल्याने विद्दुत दाबामध्ये कमी-जास्त चढ उतार होत असल्याने त्याचा मोटर पंप नादुरुस्त झाला होता या विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 यांनी घेतलेल्या आक्षेपा मध्ये योग्य त्या सक्षम पुराव्या अभावी ग्राहक मंचास कोणतेही तथ्य दिसून येत नाही. विरुध्दपक्ष क्रं 2 यांनी त्यांचे सर्व्हीस इंजिनियर श्री एस. कार्तीक यांचा मोटर पंप तपासणी संबधात शपथेवरील पुरावा दाखल केलेला नाही. तसेच तक्रारकर्त्याचे शेतातील बोअरवेल वरील विज जोडणी संचाचा स्थळ निरिक्षण अहवाल पुराव्या दाखल विरुध्दपक्षाने दाखल केलेला नाही. अशा परिस्थितीत तक्रारकर्त्याचे शेतात योग्य दाबाचे विद्दुत कनेक्शन उपलब्ध नव्हते ही बाब योग्य त्या पुराव्यानिशी सिध्द झालेली नाही. तक्रारकर्त्याने वि.प.क्रं 1 विक्रेत्या कडून विकत घेतलेला मोटर पंप हा विरुध्दपक्ष क्रं 2 निर्मित होता ही बाब उभय पक्षांना मान्य आहे.
13 दुसरी बाब अशी आहे की, तक्रारकर्त्या कडील मोटर पंपा मध्ये त्याचे हमी कालावधीतच दोष निर्माण झालेला आहे व आज पर्यंत सदरचा मोटर पंप त्याला दुरुस्त करुन दिलेला नाही ही बाब उघड आहे, यावरुन सदर मोटर पंपा मध्ये उत्पादकीय दोष असून तो नादुरुस्स्त होण्या पलीकडील असल्याची बाब सिध्द होते. अशाप्रकारे विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 यांनी तक्रारकर्त्याला उत्पादकीय दोष असलेल्या मोटरपंपाची विक्री करुन दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब सिध्द होते आणि त्यामुळे तो नविन मोटरपंप मिळण्यास पात्र आहे. विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 चे दोषपूर्ण् सेवेमुळे तक्रारकर्त्याला झालेल्या आर्थिक, शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-20,000/-आणि तक्रारीचे खर्चा बद्दल रुपये-5000/- विरुध्दपक्षां कडून मिळण्यास पात्र आहे असे ग्राहक मंचाचे मत आहे.
14 उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन, ग्राहक मंचाव्दारे प्रस्तुत तक्रारी मध्ये खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो-
-अंतिम आदेश-
(01) तक्रारकर्त्याची तक्रार विरुध्दपक्ष क्रं 1 मोटरपंप विक्रेता आणि विरुध्दपक्ष क्रं 2 मोटरपंप निर्माता याचे विरुध्द वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या खालील प्रमाणे अंशतः मंजूर करण्यात येते.
(02) विरुध्दपक्ष क्रं 1 विक्रेत्या व्दारे निर्गमित बिल क्रं 1292, दिनांक-14 जुलै, 2014 अनुसार वि.प.क्रं 2 व्दारा निर्मित उत्पादकीय दोष असलेला व तक्रारकर्त्यास विक्री केलेला मोटरपंप विरुध्दपक्ष क्रं 1 विक्रेता याला तक्रारकर्त्याने परत करावा व त्याऐवजी विरुध्दपक्ष क्रं 1 विक्रेत्याने वि.प.क्रं 2 निर्मित कंपनीचा त्याच मॉडलेचा नविन मोटर पंप तक्रारकर्त्याला परत करावा व नव्याने बिल देऊन नविन मोटर पंपावर नव्याने वॉरन्टीचा दस्तऐवज द्दावा, असे वि.प.क्रं 1 व 2 यांना वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या आदेशित करण्यात येते.
(03) मुद्दा क्रं-(02) मध्ये आदेशित केल्या प्रमाणे असा नविन मोटर पंप तक्रारकर्त्याला बदलवून देणे शक्य नसल्यास त्या परिस्थितीत तक्रारकर्त्या कडून उत्पादकीय दोष असलेल्या मोटर पंपाचे विक्रीव्दारे वि.प.क्रं 1 विक्रेत्याने स्विकारलेली एकूण रक्कम रुपये-24,500/- (अक्षरी रुपये चोवीस हजार पाचशे फक्त) वि.प.क्रं 1 व वि.प.क्रं 2 यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या परत करावी आणि सदर रकमेवर तक्रार दाखल दिनांक-30 जानेवारी, 2015 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो वार्षिक-12 टक्के दराने येणारे व्याज तक्रारकर्त्याला द्दावे. तक्रारकर्त्याला व्याजासह रक्कम प्राप्त झाल्या वर त्याने नादुरुस्त मोटर पंप वि.प.क्रं 1 विक्रेत्याचे ताब्यात द्दावा.
(04) तक्रारकर्त्याला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-20,000/- (अक्षरी रुपये विस हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-5000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्त) विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या तक्रारकर्त्याला द्दावेत.
(05) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांका पासून 45 दिवसांचे आत करावे.
(06) सदर निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत सर्व पक्षांना निःशुल्क उपलब्ध करुन द्दावी.
(07) तक्रारीचे ब व क संचाची प्रत तक्रारकर्त्याला परत करण्यात यावी.