निकालपत्रः- श्रीमती सुमन प्र.महाजन, अध्यक्षा ठिकाणः बांद्रा निकालपत्र तक्रारीचे संक्षिप्त स्वरुप खालीलप्रमाणेः- सामनेवाले कंपनीकडे फ्रीजची नोंदणी करुन व त्यांना थोडी आगाऊ रक्कम देवूनही त्यांनी तक्रारदाराला फ्रीज दिले नाही म्हणून झालेली नुकसान भरपाई मिळावी याकरिता सदरची तक्रार दाखल झाली आहे. 2 सामनेवाले विजेची उपकरणं तयार करतात व त्याचा व्यवसाय करतात. तक्रारदाराचे म्हणणे की, दि.24.04.2008 रोजी सामनेवाले यांचे प्रतिनिधी –श्री.प्रशांत सिन्हा त्यांचेकडे आले होते. त्यांच्या सांगण्यावरुन त्यांनी सामनेवाले यांच्या मॉडेल क्र.जीएफई28डी या फ्रीजची नोंदणी केली, त्याची किंमत रु.15,580/- होती. त्या रक्कमेपैकी त्यांनी सामनेवाले यांचे प्रतिनिधीला रु.1,000/- आगाऊ दिले. त्याबद्दलचा अर्ज प्रतिनिधींना दिला. सामनेवाले यांचे प्रतिनिधी यांनी दि.29.04.2008 रोजी फ्रीज देण्याचे आश्वासन दिले. परंतु सामनेवाले यांनी त्याला फ्रीज दिले नाही. त्याने त्यासाठी सामनेवाले यांचेकडे बराच पाठपुरावा केला. त्यांना ब-याच वेळा फोन केला. त्यांच्या विक्रोळी येथील ऑफीसमध्येही जाऊन आला. अशा प्रकारे पाठपुराव्यात बराच पैसा व वेळ वाया घालवला. परंतु सामनेवाले यांचेकडून समाधानकारक उत्तर आले नाही. त्यांनी सामनेवाले यांचेकडून फ्रीजची नोंदणी केलेली असल्यामुळे दुसरीकडून तो फ्रीज घेऊ शकला नाही व एक वर्षे फ्रीजशिवाय काढले. त्याच्याकडे फ्रीज नसल्यामुळे सोसायटीमध्ये त्याची प्रतिष्ठा कमी झाली. त्याला त्याच्या कुटूंबीयांचेही बोलणे ऐकावे लागले, याप्रमाणे त्याला शारिरीक व मानसिक त्रास झाला. त्याने दि.23.11.2009 रोजी सामनेवाले यांना वकीलामार्फत नोटीस पाठविली व नुकसानभरपाईची मागणी केली. ती नोटीस मिळूनही सामनेवाले यांनी नुकसानभरपाई दिली नाही व फ्रीजही दिला नाही. फक्त रु.1,000/- चा आगाऊ रक्कमेचा धनादेश पाठविला तो त्याने डिपॉझिट केला नाही. तक्रारदाराने सदरची तक्रार दाखल करुन सामनेवाले यांचेकडून त्याला झालेल्या खर्चाबद्दल नुकसानभरपाई रु.53,000/- व मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु.47,000/- नुकसानभरपाईची मागणी केली आहे तसेच त्यावर द.सा.द.शे.18 दराने व्याज, कायदेशीर बाबींवरील खर्च रु.5,000/- व या तक्रारीच्या खर्चाची मागणी केली आहे. 3 सामनेवाले यांनी तक्रारीला उत्तर दिले. त्यांचे म्हणणे की, त्यांची कंपनी चांगला नावलौकिक असलेली कंपनी आहे. श्री.प्रशांत सिन्हा, हे तक्रारदाराकडे गेले होते व त्यांना फ्रीज विकत घेण्याच्याबाबतीत प्रतिनिधीत्व केले हे त्यांनी नाकारले. सामनेवाले यांचे म्हणणे की, ते वेगवेगळया शहरात व राज्यात त्यांच्या मालाच्या दर्जाबद्दल व टिकाऊपणाबद्दल लोकांना जाहिरात करण्यासाठी एजन्सी नेमतात. त्यापैकी Team Lease Pvt. Ltd., ही एक होती. त्या कंपनीचा सेल्समन श्री.जितेंद्र कांबळे, हा तक्रारदाराकडे फ्रीज विकण्याच्या बाबतीत गेला होता. तक्रारदाराने दिलेल्या अर्जावर त्याची सही आहे. तक्रारदाराने फ्रीजची किंमत रु.15,580/- पैकी रु.1,000/- त्याला आगाऊ दिले होते. मात्र, त्या रक्कमेची वेगळी पावती दिलेली नव्हती. सामनेवाले यांचे म्हणणे की, Team Lease Pvt. Ltd. यांच्या सेल्समनला उपकरणं उपलब्ध आहेत किंवा नाहीत याची माहिती नसते. म्हणून ते अर्जावर उपकरण देण्याची तारीख अंदाजे लिहून टाकतात. एजन्सीने सामनेवाले यांना ऑर्डरबद्दल कळवायला काही अवधी लागतो, त्यानंतरच मालाची डिलेव्हरी होते. Team Lease Pvt. Ltd. एजन्सीने तक्रारदाराच्या ऑर्डरबद्दल त्यांना लवकर कळविले नाही. ज्यावेळी त्यांना कळविले, त्यावेळी तक्रारदाराने नोंदणी केलेल्या मॉडेलचे फ्रीज उपलब्ध नव्हते तसेच त्याचे उत्पादनही बंद झाले होते. म्हणून त्यांनी रु.1,000/- आगाऊ रक्कमेचा दि.22.05.2008 चा धनादेश क्र.14566 तक्रारदाराला कुरिअरने पाठविला. परंतु तक्रारदाराकडे चौकशी केल्यानंतर असे कळाले की, त्याला तो मिळालेला नाही. म्हणून त्यांनी दि.12.12.2009 चा तेवढयाच रक्कमेचा धनादेश क्र.26079 तक्रारदाराला पाठविला. त्यांची सेवेत न्यूनता नाही. तक्रारदार त्यांच्या कार्यालयात कधीही आला नव्हता. तक्रारदाराने पाठविलेली तथाकथित नोटीस त्यांना मिळाली नव्हती. सदरची तक्रार खोटी आहे ती रद्द करण्यात यावी. 4 आम्हीं तक्रारदारातर्फे वकील- श्री.प्रदीप गवळी व सामनेवाले यांचेतर्फे वकील – श्रीमती बोरगांवकर यांचा युक्तीवाद ऐकला व कागदपत्रं वाचली. 5 सामनेवाले यांच्या एजन्सीच्या माणसाने तक्रारदाराशी सामनेवाले यांचे उत्पादित फ्रीज विकत देण्याचा करार केला होता व रु.1,000/- आगाऊ घेतले होते हे सामनेवाले यांनी नाकारलेले नाही. तक्रारदाराने तक्रारीसोबत Application Form दाखल केला आहे, त्यावर Team Lease Pvt. Ltd. च्या सेल्समन (Canvasser) ची सही आहे तसेच त्यावर फ्रीज देण्याची दि.29.04.2008 दिलेली आहे, हे सुध्दा सामनेवाले यांना मान्य आहे. 6 सामनेवाले यांचे म्हणणे की, त्यांच्या एजन्सीने तक्रारदाराच्या ऑर्डरबद्दल त्यांना लवकर कळविले नाही व जेव्हा कळविले त्यावेळी त्या मॉडेलचे फ्रीज उपलब्ध नव्हते तसेच त्याचे उत्पादन बंद झाले होते. मात्र सामनेवाले यांनी त्यांना तक्रारदाराच्या ऑर्डरबद्दल कधी कळविण्यात आले याबद्दल मौन राखले आहे. सामनेवाले यांना लवकर न कळविणे ही त्यांच्या एजन्सीची चुक आहे. ज्यावेळी एजन्सीने दि.29.04.2010 रोजी फ्रीज देण्याचे आश्वासन दिले होते, त्यानुसार, सामनेवाले यांना त्याबद्दल लवकर कळवून त्यादिवशी फ्रीज देण्याची व्यवस्था करायला पाहिजे होते. परंतु त्या तारखेलाच काय जवळजवळ सात महिने झाले तरी तक्रारदाराला फ्रीज दिला नाही. तक्रारदाराने त्यांना बरेच फोन केले, त्यांच्या कार्यालयात जाऊन आला परंतु काही उपयोग झाला नाही. शेवटी कंटाळून दि.24.11.2009 रोजी त्याने सामनेवाले यांना वकीलामार्फत नोटीस पाठविली व नुकसानभरपाईची मागणी केली. त्यावेळी जाग येऊन सामनेवाले यांनी तक्रारदाराला दि.12.12.2009 रोजीचा रु.1,000/- चा आगाऊ रक्कमेचा धनादेश पाठविला. सामनेवाले यांचे म्हणणे की, त्यांनी दि.22.05.2008 रोजीचा आगाऊ रक्कमेचा धनादेश तक्रारदाराला पाठविला होता. सामनेवाले यांनी त्या तथाकथित धनादेशाची छायांकित प्रत दाखल केली आहे परंतु तो धनादेश तक्रारदाराला पाठविल्याबद्दलचा काही लेखी पुरावा सामनेवाले यांनी दाखल केला नाही. वरील परिस्थिती पाहता, आगाऊ रक्कम घेऊन तक्रारदाराला फ्रीज न देणे ही सामनेवाले यांची सेवेत न्युनता आहे. जरी हे गृहीत धरले की, त्यांच्या एजन्सीने तक्रारदाराच्या ऑर्डरबाबत त्यांना लवकर कळविले नाही, म्हणून फ्रीज देता आला नाही यात तक्रारदाराची काहीही चूक नाही. त्यांच्या एजन्सीच्या निष्काळजीपणाबद्दल सामनेवाले जबाबदार आहेत. सामनेवाले यांचेकडून फ्रीजची नोंदणी केलेली असल्यामुळे तक्रारदार दुसरीकडून फ्रीज देऊ शकला नाही व जवळजवळ एक वर्षे फ्रीजशिवाय काढले. त्याला सामनेवाले यांना बरेच फोन करावे लागले, त्यांच्या कार्यालयात जावे लागले, त्यात त्याचा पैसा व वेळ वाया गेला व त्याला मानसिक त्रास झाला, त्याला सामनेवाले जबाबदार आहेत, म्हणून वाजवी नुकसान भरपाई देण्यास सामनेवाले जबाबदार आहेत. मात्र तक्रारदाराने मागितलेली नुकसान भरपाई अवास्तव वाटते. मंचाच्या मते, खालील मते न्यायाच्या हिताच्या दृष्टीने योग्य आहे. आदेश (1) तक्रार क्र.54/2011 अंशतः मंजूर करण्यात येते. (2) सामनेवाले यांनी तक्रारदाराला त्याचेकडून आगाऊ घेतलेली रक्कम रु.1,000/- द्यावी व त्यावर द.सा.द.शे.9 दराने दि.29.04.2008 पासून ते दि.12.12.2009 पर्यंत व्याज द्यावे. (3) सामनेवाले यांनी तक्रारदाराला रु.3,000/- नुकसानभरपाई व या तक्रारीचा खर्च रु.3,000/- द्यावा व स्वतःचा खर्च सोसावा. (4) आदेशाच्या प्रमाणित प्रतीं दोन्हीं पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.
| [HONABLE MR. G L Chavan] Member[HONABLE MRS. S P Mahajan] PRESIDENT | |