निकालपत्रः- श्रीमती सुमन प्र.महाजन, अध्यक्षा ठिकाणः बांद्रा निकालपत्र तक्रारीचे संक्षिप्त स्वरुप खालीलप्रमाणेः- सामनेवाले हे विद्युत उपकरणांचे निर्माते असून ते त्यांचा व्यवसाय करतात. फ्रीजचे स्टॅबीलायझर हे सामनेवाले यांचे एक उत्पादन आहे. दि.30.05.2008 रोजी सामनेवाले यांचे सेल्समन तक्रारदाराचे घरी आले. त्यांनी तक्रारदाराला सांगितले की, स्टॅबीलायझरमुळे फ्रीजचे आयुष्य वाढते व फ्रीजला वीज कमी लागते. म्हणून तक्रारदाने दि.30.05.2008 रोजी सामनेवाले यांचेकडून रु.1,700/- चे फ्रीजचे स्टॅबीलायझर विकत घेतले. ते फ्रीजला बसविल्यानंतर तक्रारदाराच्या लक्षात आले की, फ्रीजचे काम्प्रेसर तास-न्-तास बंद पडते. त्यामुळे फ्रीजचे तापमान वाढून त्यातील अन्नपदार्थ, खराब होतात. 2 म्हणून तक्रारदाराने सामनेवाले यांचे सेल्समन-श्री.इम्रान यांना फोन केला. त्यांनी येतो असे तक्रारदाराला आश्वासन दिले. तक्रारदाराने वारंवार फोन केल्यामुळे त्यांनी कळविले की, फ्रीजचे स्टॅबीलायझर आपोआप सुरु होईल. म्हणून तक्रारदाराने फ्रीजमधील किंमती अन्नपदार्थ त्यातच ठेवले व ते खराब झाले, त्यामुळे त्यांचे रु.2,000/- चे नुकसान झाले. 3 दि.01.06.2008 रोजी सामनेवाले यांचा सेल्समन येऊन स्टॅबीलायझर बदलून दिले. परंतु त्या स्टॅबीलायझरमध्येही तोच प्रॉब्लेम होता. म्हणून त्याने श्री.इम्रान यांना फोन केला. तसेच सामनेवाले यांच्या इतर सेवाकेंद्रांवरही फोन केला. परंतु सामनेवाले यांनी प्रतिसाद दिला नाही. तक्रारदाराने ते स्टॅबीलायझर काढून टाकले व स्टॅबीलायझरशिवाय फ्रीज चालू ठेवले. 4 तीन महिने तक्रारदाराने सामनेवाले यांची वाट पाहिली व शेवटी दि.02.09.2008 रोजी सामनेवाले यांना वकीलामार्फत नोटीस पाठविली. त्याला सामनेवाले यांनी दि.18.09.2008 रोजी उत्तर पाठविले व आरोप केला की, तक्रारदाराने त्यांच्या सर्व्हिस सेंटरला तक्रार केली नाही. सामनेवाले यांनी टेक्निशिअन पाठविला नाही. त्यानंतर, दि.03.10.2008 रोजी तक्रारदाराने त्यांना पत्र पाठविले. त्याला सामनेवाले यांनी दि.22.10.2008 व दि.31.10.2008 रोजी उत्तरं पाठविली. त्यांनी स्टॅबीलायझर बदलून देण्याची तयारी दाखविली. मात्र तक्रारदाराचे झालेले नुकसान व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई देण्याबद्दल तयारी दाखविली नाही. म्हणून सदरची तक्रार दाखल केली आहे. तक्रारदाराची मागणी आहे की, सामनेवाले यांनी स्टॅबीलायझरचे पैसे परत करावेत, मानसिक त्रासाबद्दल रु.25,000/- व अन्न पदार्थांचे नुकसान झाल्याबद्दल रु.2,000/- नुकसानभरपाई द्यावी. 5 सामनेवाले यांनी कैफियत देऊन तक्रारदाराचे आरोप नाकारले. त्यांचे म्हणणे की, स्टॅबीलायझर सदोष नाही. तक्रारदाराचे स्टॅबीलायझर 48 तासांच्या आत बदलून दिले. म्हणजेच तक्रारदाराने ते वापरलेच नव्हते. तक्रारदाराने त्यांच्या सर्व्हिस सेंटरला कळविलेच नाही अन्यथा तक्रारदाराला ताबडतोब सेवा दिली गेली असती. तक्रारदाराने सर्व्हिस सेंटरला फोन केल्याबद्दल काही लेखी पुरावा दाखल केला नाही, जसे की, टेलीफोन बिल, मोबाईल कॉल प्रिंट आऊट, इत्यादी. 6 सप्टेंबर, 2008 मध्ये जेव्हा तक्रारदाराने स्टॅबीलायझर विषयी तक्रार केली, त्यावेळी त्यांनी त्याला समाधान देण्यासाठी सर्व प्रयत्न केले. परंतु तो समाधानी झाला नाही. स्टॅबीलायझर सदोष नसातानाही व्यवसायाच्या दृष्टीने संबंध चांगले रहावे म्हणून ते बदलून दिलेले स्टॅबीलायझरही पुन्हा बदलून देण्यास तयार होते. कारण स्टॅबीलायझर हमी कालावधी होते. त्यांनी त्याला स्टॅबीलायझरची किंमत परत करण्याचीही तयारी दाखविली. त्यासाठी त्यांचा ऑफीसर-श्री.हर्षल दि.25.10.2008 रोजी रु.1,700/- चा धनादेश घेऊन तक्रारदाराच्या घरी गेला. परंतु तक्रारदाराने तो स्विकारला नाही. कारण तक्रारदाराने त्यांचे विरुध्द तक्रार दाखल करण्याचे ठरविलेले होते. दि.08.10.2010 रोजी त्यांचा टेक्निशियन–श्री.कांबळे तक्रारदाराच्या घरी जाऊन स्टॅबीलायझरची तपासणी करुन आला. मात्र सर्व्हिस कॉल रेकॉर्डवर तक्रारदाराने सही देण्याचे नाकारले. तक्रारदाराने स्टॅबीलायझर सदोष असल्याबद्दल काही लेखी पुरावा दाखल केला नाही स्टॅबीलायझर चांगल्या चालू स्थितीत आहे. सामनेवाले यांनी तक्रारदाराचे रु.2,000/- किंमतीचे अन्न पदार्थ खराब झाले हे नाकारले आहेत. त्यांचे म्हणणे की, त्यांची सेवेत न्यूनता नाही, तक्रार रद्द होण्यास पात्र आहे. ती खर्चासह रद्द करण्यात यावी. 7 आम्हीं तक्रारदारातर्फे प्रतिनिधी-श्री.प्रकाश आगटे यांचा व सामनेवाले यांचे तर्फे वकील–श्रीमती अंबा सालेकर यांचा युक्तीवाद ऐकला व कागदपत्रं वाचली. तक्रारदार व सामनेवाले यांनी त्यांच्यात झालेल्या पत्रव्यवहाराच्या प्रतीं दाखल केलेल्या आहेत. 8 पहिले स्टॅबीलायझर हे सामनेवाले यांनी 48 तासांत बदलून दिले आहे. दुसरे स्टॅबीलायझरही सदोष आहे असे तक्रारदाराचे म्हणणे आहे. मात्र त्याबाबत तक्रारदाराने तज्ञांचा अहवाल दाखल केलेला नाही. कागदपत्रं वाचल्यानंतर असे दिसून येते की, मंचाने दि.23.07.2009 रोजी कोर्ट कमिशनर नेमण्याचा आदेश केला होता व स्टॅबीलायझर “Micro, Small and Medium Enterprises Testing Centre,(MSME-TC), Ministry of Micro, Small and Medium Enterprises, Kurla-Andheri Road, MSME-DI Campus, Sakinaka, Mumbai-400 072”या शासकीय प्रयोगशाळेत पाठविण्यास सांगितले होते परंतु नंतर तक्रारदाराने अर्ज देऊन सांगितले की, तेथील तपासणी फी रु.11,000/- आहे. रु.1,700/- किंमतीचे स्टॅबीलायझर तपासण्यासाठी रु.11,000/- फी द्यावी हे योग्य नव्हते. म्हणून ती ऑर्डर तक्रारदाराच्या विनंतीवरुन मागे घेतली व स्टॅबीलायझर खाजगी टेक्निशिअनकडून तपासणी करुन घ्यावे असे मंच आदेश करणार होते. परंतु उभय पक्षकारांमध्ये एकमत झाले नाही. म्हणून आहे त्या पुराव्यावरुन निकाल देण्याचे ठरले. याबद्दल मंचाने दि.23.07.2009 रोजी आदेश केलेला आहे. 9 बदलून दिलेले स्टॅबीलायझर हे सदोष आहे किंवा नाही याबद्दल ठोस असा लेखी पुरावा नाही. सामनेवाले यांची सेवेत न्यूनता आहे किंवा नाही यासाठी उभय पक्षकारांत झालेला पत्रव्यवहार पुरेसा आहे. 10 नविन स्टॅबीलायझर दि.01.06.2008 रोजी बसवून दिल्यानंतर दि.02.09.2008 पर्यंत म्हणजे तक्रारदाराची नोटीस जाईपर्यंत तक्रारदाराने सामनेवाले यांच्या सर्व्हिस सेंटरला स्टॅबीलायझरबद्दल तक्रार केली होती, याबद्दल लेखी पुरावा नाही. दि.02.09.2008 च्या नोटीसीव्दारे तक्रारदाराने सामनेवाले यांचेकडून स्टॅबीलायझरची किंमत परत मागितली, अन्न पदार्थ खराब झाल्यापोटी रु.4,000/- नुकसान भरपाई व मानसिक त्रासापोटी रु.25,000/- ची मागणी केली व सात दिवसांत याची पूर्तता झाली नाहीतर भारतीय दंड संहिता कलम-420 खाली सामनेवाले यांचे विरुध्द तक्रार दाखल करण्यात येईल असे सांगितले. त्याला सामनेवाले यांनी दि.08.09.2008 रोजी उत्तर देऊन कळविले की, ते स्टॅबीलायझर केव्हाही बदलून देण्यास तयार आहेत. त्यासाठी टेक्नीशियन केंव्हा पाठवावा अशी त्यांनी विचारणा केली. परंतु तक्रादाराने स्टॅबीलायझर बदलून देण्याचा प्रस्ताव स्विकारला नाही व सामनेवाले यांचे विरुध्द त्यांना तक्रार करावयाची आहे असे कळविले. त्यानंतर, सामनेवाले यांनी तक्रारदाराला दि.22.10.2008 व दि.31.10.2008 अशी दोनं पत्रं पाठविली व स्टॅबीलायझर परत घेऊन त्याची किंमत परत करण्याचाही तयारी दाखविली. त्यांचे ऑफीसर –श्री.हर्षल दि.25.10.2008 रोजी रु.1,700/- चा धनादेश तक्रारदाराचे घरी घेऊन गेले परंतु तक्रारदाराने तो स्विकारला नाही. तक्रारदाराने दि.18.11.2008 रोजी पत्र पाठवून सामनेवाले यांना कळविले की, नुकसानभरपाईसाठी व खर्चासाठी तक्रार दाखल करण्याशिवाय त्यांना पर्याय नाही. वरील पत्रव्यवहारांवरुन असे स्पष्ट दिसून येते की, दुसरे बसवून दिलेले स्टॅबीलायझर सामनेवाले बदलून देण्यास केव्हांही तयार होते किंवा त्याचे पैसेही परत करण्यास तयार होते. त्यासाठी त्यांनी त्या रक्कमेचा धनादेशही तक्रारदाराला पाठविला परंतु तक्रारदार त्यांची नुकसानभरपाईची रु.29,000/- ची मागणी मागे घेण्यास तयार नव्हते व सामनेवाले यांनी ती पूर्ण केली नाही, म्हणून त्यांनी सदरची तक्रार दाखल झाली आहे. मंचाच्या मते, दुसरे स्टॅबीलायझर हे सदोष आहे किंवा नाही हे तक्रारदाराने सिध्द केलेले नाही. केवळ सामनेवाले ते बदलून द्यायला तयार आहेत व त्याची किंमत परत करायला तयार आहेत म्हणून ते सदोष आहे असे गृहीत धरता येत नाही. पहिल्या स्टॅबीलायझरमुळे तक्रारदाराच्या किंमती अन्नपदार्थांचे नुकसान झाले याबद्दल तक्रारदाराने सविस्तर काही दिलेले नाही. वरील परिस्थिती लक्षात घेता, सामनेवाले यांची सेवेत न्यूनता आहे हे तक्रारदाराने सिध्द केलेले नाही. तक्रार रद्द होण्यास पात्र आहे, म्हणून मंच खालील आदेश करीत आहे. आदेश (1) तक्रार क्र.70/2011(181/2009) रद्द करण्यात येते. (2) उभय पक्षकारांनी आपापला खर्च सोसावा. (3) आदेशाच्या प्रमाणित प्रतीं दोन्हीं पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्या.
| [HONABLE MR. G L Chavan] Member[HONABLE MRS. S P Mahajan] PRESIDENT | |