तक्रारदार : वकील श्री. प्रशांत चौहान हजर.
सामनेवाले : गैर हजर.
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-**-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
निकालपत्रः- श्री. स. व. कलाल , सदस्य, ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-**-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
न्यायनिर्णय
1. सा.वाले क्र. 1 हे गोदरेज आणि बॉईज मॅन्युफॅक्चरींग कंपनी लिमिटेड या नावाने इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे उत्पादित करणारी कंपनी असून सा.वाले क्र. 2 हे सा.वाले क्र. 1 यांचे कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत आहेत. सा.वाले क्र. 3 व 4 हे सा.वाले क्र. 1 यांचे पदाधिकारी आहेत. सा.वाले क्र. 1 ते 4 यांची कार्यालये तक्रारीत नमुद केलेल्या ठिकाणी आहेत. 2. तक्रारदार हे पवई मुंबई येथे राहात असून दिनांक 18.2.2014 रोजी सा.वाले क्र. 2 यांचे कडून त्यांनी डबल डोअर असेलेले लोखंडी कपाट रु.19.932/- येवढया किंमतीस विकत घेण्याचा करार केला. कपाटाचे सर्व मुल्य सा.वाले क्र. 2 यांना क्रेडीट कार्डने देण्यात आले. सा.वाले क्र. 2 यांनी तक्रारदार यांना सदर कपाट त्यांचे घरी आणून देण्याचे कबुल केले. तक्रारदार यांचे असे म्हणणे आहे की, सदर कपाटाचे दरवाजे हे स्वतंत्ररित्या आणण्यात आले व तक्रारदारांच्या घरी सदर दरवाजे कपाटास लावत असता तक्रारदारांना दरवाज्यांवर मोठाले ओरखडे आढळून आले. त्यामुळे तक्रारदारांनी सदर दोषीत कपाट स्विकारण्यास नकार दिला. त्यावेळी कपाट आणणा-या लोकांनी कपाट परत नेण्यास नकार दिल्यामुळे नाईलाजाने तक्रारदारास सदर कपाट घरात ठेवून घ्यावे लागले. तक्रारदारांना पुरविण्यात आलेल्या कपाटाच्या दरवाज्यावरील मोठाल्या ओरखडयांमुळे तक्रारदारांनी सा.वाले क्र. 2 यांचे बरोबर दूरध्वनीवर बोलणी करुन आपली तक्रार त्यांना सांगीतली. दिनांक 6.3.2014 रोजी तक्रारदार यांना पुरविण्यात आलेल्या नविन दरवाज्यावर सुरवातीस असलेल्या ओरखडयांपेक्षा जास्त ओरखडे तक्रारदारांना आढळून आले. तसेच सदर कपाटातील कुलपाची उघडझाप ही समाधानकारक होत नसल्यामुळे तक्रारदारांनी सदरची बाब सा.वाले यांच्या प्रतिनिधीस सांगीतली असता त्यावर खोबरेल तेल टाकून कुलूपाचे कार्य व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला. तसेच कपाटावर दिसून येणारे ओरखडे हे वर लावण्यात आलेल्या कव्हरमुळे दिसत आहेत असे देखील तक्रारदारांना सांगण्यात आले. परंतु प्रत्यक्षात सा.वाले यांनी बदलून दिलेल्या दरवाज्यांवर पहील्यापेक्षा मोठे ओरखडे असल्यामुळे तक्रारदार यांनी नाराज होऊन सदर कपाटात उत्पादित दोष असल्यामुळे कपाटाच्या किंमतीचा परतावा सा.वाले यांचेकडे मागीतला. सदर मागणीसाठी सा.वाले यांचेकडे बराचवेळा पत्र व्यवहार करुन देखील सा.वाले यांनी तक्रारदार यांना कपाटाचा परतावा देण्याची टाळाटाळ केली. कपाटात आढळून आलेल्या मुलभूत दोषामुळे तक्रारदार यांनी सदर कपाटाचा वापर करण्यास नकार दिला. तक्रारदार यांचे असे म्हणणे आहे की, वादातीत कपाटाची संपूर्ण रक्कम सा.वाले यांना देऊनसुध्दा उत्पादित दोष असलेले कपाट तक्रारदार यांना देण्याची सा.वाले यांची कृती सेवा सुविधा पुरविण्यात कसुर या कृतीत येते. त्यामुळे तक्रारदार यांनी सदरची तक्रार दाखल करुन सदर दोषीत कपाटाचा परतावा व त्यावर होणारे व्याज, तसेच तक्रारदार यांना झालेल्या मानसिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च याची मागणी केलेली आहे.
3. सा.वाले यांनी आपली कैफीयत दाखल करुन तक्रारदारांचे म्हणणे, मागणे व तक्रारीतील कथने नाकारली. सा.वाले यांचे असे म्हणणे आहे की, तक्रारदारांच्या तक्रारीतील कथने, म्हणणे व मागणे खोटे व लबाडपणाचे असून सा.वाले यांना त्रास देण्यासाठी सदरची विधाने केलेली आहेत. तसेच सा.वाले यांच्या म्हणण्याप्रमाणे प्रस्तुतच्या तक्रारीस कोणतेही कारण घडलेले नसताना सदरची तक्रार दाखल केली आहे. तक्रारदारांनी सा.वाले यांचे कडून रु.19,932/- येवढया किंमतीस गोदरेज कपाट विकत घेतल्या बाबत सा.वाले नाकारत नाहीत. परंतु सा.वाले यांचे असे म्हणणे आहे की, सदर कपाटाची पोच देताना तक्रारदार यांनी सदर कपाट स्वतःच्या जबाबदारीवर नेण्याचे कबुल करुन कपाटात झालेल्या नुकसानी बद्दल सा.वाले यांना जबाबदार धरणार नाही व सा.वाले यांचे कडून कोणतीही नुकसान भरपाई मागणार नाही अशा आशयाच्या करारावर सहया केल्या आहेत. सा.वाले यांचे असे देखील म्हणणे आहे की, तक्रारदार यांना त्यांच्या कपाटाचे दरवाजे दिनांक 6.3.2014 रोजी बदलून देण्यात आले होते. परंतु त्यावरसुध्दा ओरखडे असल्या बद्दलची तक्रार तक्रारदार यांचेतर्फे करण्यात आली. सा.वाले यांच्या म्हणण्याप्रमाणे एकदा विकलेल्या वस्तुचा परतावा
गि-हाईकास देण्याची कोणतीही अट बिलात नमुद नाही. तसेच परतावा देण्याची पध्दत अस्तीत्वात नाही. तक्रारदार यांना विकलेल्या कपाटात उत्पादित दोष होता ही बाब सा.वाले साफ नाकारतात. असे असुनसुध्दा तक्रारदार यांना नविन कपाट बदलून देण्यास सा.वाले तंयार होते. त्यास देखील तक्रारदार तंयार नसल्यामुळे व तक्रारदार केवळ परतावा मागत असल्यामुळे सा.वाले तक्रारदारांचे मागणे मान्य करु शकत नाही. सा.वाले यांच्या म्हणण्याप्रमाणे तक्रारदारांनी विकलेल्या कपाटात कोणत्याही प्रकारचा मुलभूत दोष नव्हता. त्यामुळे सदर कपाट तक्रारदारांना विकण्यात व झालेल्या व्यवहारात सा.वाले यांची कृती सेवा सुविधा पुरविण्यात कसुर ठरु शकत नाही. सबब तक्रार रद्द करण्यात यावी.
4. तक्रारदारांनी आपल्या तक्रारी सोबत पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद, कपाट विकत घेतल्या बाबतची व बिलाची रक्कम दिल्या बाबतची पावती. कपाटाची परिस्थिती दाखविणारे छायाचित्र, तसेच सा.वाले यांचे सोबत वादातीत कपाटा संबंधी झालेल्या ई-मेल पत्र व्यवहाराच्या प्रती दाखल केल्या.
5. या उलट सा.वाले यांनी आपल्या कैफीयती सोबत पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद दाखल केला आहे.
6. प्रस्तुत मंचाने तक्रार , कैफीयत, शपथपत्र, कागदपत्र व लेखी युक्तीवाद यांचे वाचन केले. तक्रारदारांचा तोंडी युक्तीवाद एैकण्यात आला. सा.वाले यांचेतर्फे तोंडी युक्तीवादास कुणीही हजर राहू शकले नाही. त्यानुसार तक्रारीचे निकालीकामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र. | मुद्दे | उत्तर |
1 | सा.वाले यांनी तक्रारदार यांना दिनांक 18.2.14 रोजी विकलेल्या गोदरेज कपाटाच्या व्यवहारा संबंधी सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय ? | होय. |
2 | तक्रारदार तक्रारीत मागीतलेल्या मागण्या मिळण्यास पात्र आहेत काय | होय. अंशतः |
3 | अंतीम आदेश ? | तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. |
कारण मिमांसा
मान्य मुद्देः तक्रारदारांनी सा.वाले यांचे कडून विकत घेतलेले गोदरेज कपाट व त्या बाबत दिलेले कपाटाचे मुल्य, सदर कपाटा बाबत तक्रारदार व सा.वाले यांच्यातील झालेल्या ई-मेल व्यवहाराच्या प्रती, उभय पक्षकार नाकारत नाहीत.
7. तक्रारदार यांना विकण्यात आलेले गोदरेजचे कपाट व त्या संबंधी सा.वाले यांनी तक्रारदार यांचे बाबत केलेला व्यवहार ही कृती सेवा सुविधा पुरविण्यात कसुर या कृतीत येते हे दाखविण्यासाठी तक्रारदार यांनी कपाटाची छायाचित्र अभिलेखात दाखल करुन त्यांनी विकत घेतलेल्या कपाटावर मोठाले ओरखडे असल्यामुळे सदरची बाब सा.वाले यांच्या निदर्शनास आणून देखील व सा.वाले यांनी कपाटाचे दरवाजे बदलून देऊन देखील नविन दरवाज्यावर पहील्यापेक्षा नविन दरवाज्यावर मोठे ओरखडे असल्यामूळे तक्रारदार यांना विकण्यात आलेले गोदरजचे कपाट यात उत्पादित दोष होता असे तक्रारदारांचे म्हणणे आहे. तसेच सा.वाले यांचे सोबत झालेल्या ई-मेल पत्रव्यवहाराच्या प्रती यावर भर देऊन वादातीत कपाटात असलेला उत्पादित दोष सा.वाले यांच्या नजरेस आणून देखील सा.वाले यांनी त्यात सुधारणा केली नाही. उलटपक्षी कपाट परत घेण्यास नकार दिला त्यामुळे सा.वाले यांनी उत्पादित केलेल्या कपाटाच्या गुणा बाबत साशंकता निर्माण होऊन तक्रारदारांनी कपाटाच्या मागणीचा परतावा मागीतलेला आहे असा युक्तीवाद तक्रारदार यांचेतर्फे करण्यात आला.
8. उलटपक्षी सा.वाले यांच्यातर्फे पुरावा शपथपत्रात असे नमुद करण्यात आले आहे की, तक्रारदार यांना त्यांच्या तक्रारी प्रमाणे कपाटाचे दरवाजे बदलवून देण्यात आले. परंतु त्यावर देखील ओरखडा असल्याची तक्रार करुन सा.वाले यांनी सदर कपाट स्विकारण्यास नकार दिला. त्यानंतर देखील दोन वेळा तक्रारदार यांना नविन कपाट बदलून देण्याची तंयारी दाखवून देखील तक्रारदार यांनी सदरची मागणी मान्य न केल्यामुळे तक्रारदारांची सदर तक्रार ही केवळ पैशाच्या परताव्यासाठी असून ती मंचासमोर चालु शकत नाही असा पुरावा सा.वाले यांचेतर्फे देण्यात आला. सा.वाले यांच्यातर्फे देण्यात आलेले पुरावा शपथपत्र हाच सा.वाले यांचा लेखी युक्तीवाद समजण्यात यावा अशी पुरसीस सा.वाले यांचेतर्फे देण्यात आली.
9. अभिलेखातील कागदपत्र व उभय पक्षकारांचा लेखी युक्तीवाद यांचे अवलोकन केल्यानंतर असे दिसून यते की, तक्रारदार यांचे म्हणणे म्हणजे त्यांना विकण्यात आलेला गोदरेज कपाटावर ओरखडे होते ही बाब सा.वाले नाकारत नाही. किंबहुना त्यामुळेच सा.वाले यांनी दोन वेळेला कपाट बदलून देण्याची तंयारी दर्शविली. तसेच तक्रारदार यांचे म्हणणे म्हणजे त्यांना विकण्यात आलेल्या कपाटातील कुलुपाची उघडझाप कार्यक्षमरित्या होत नव्हती, हे तक्रारदारांचे म्हणणे सा.वाले यांनी खेडुन काढले नाही. कपाटात दिसून येणारे वरील दोष हे हमीच्या कालावधीत असल्यामुळे व कपाटावरील ओरखडे हे कपाट बदलून देऊनसुध्दा दिसत असल्यामुळे सदर कपाटाची विक्री करणे निश्चितच आक्षेपार्ह आहे. सदर दोषा बाबत तक्रारदार यांनी विनंती करुन देखील सा.वाले यांनी त्या बाबतची दुरुस्ती करुन दिली नाही. त्यामुळे सा.वाले यांची सदर कृती निश्चितच सेवा सुविधा पुरविण्यात कसुर या कृतीत येते. परंतु असे असताना देखील सा.वाले हे दोषीत कपाटा एैवजी नविन कपाट देण्यास तंयार होते ही बाब नजरेआड करुन चालणार नाही. तक्रारदार यांचे म्हणणे म्हणजे त्यांना केवळ कपाटाच्या रक्कमेचा परतावा हवा ही मागणी हास्यास्पद वाटते. हमीच्या कालावधीत वस्तुत उत्पादित स्वरुपाचा दिसून येणारा दोष दिसून आल्यास कमीच्या कालावधीत विक्रेत्यास सदर वस्तु बदलून देणे बंधनकारक आहे. ग्राहकाची वस्तुचा परतावा मागण्याची कृती कायद्याच्या चौकडीत बसत नाही. त्यामुळे तक्रारदारांची वरील मागणी स्विकारता येत नाही. तक्रारदार यांना विकलेल्या दोषीत कपाटाच्या व्यवहारा संबंधी सा.वाले यांची कृती सेवा सुविधा पुरविण्यात कसुर दिसत असल्यामुळे तक्रारदार सदर कपाटा बद्दल नविन कपाट मिळण्यास पात्र आहेत असे मंचाचे मत आहे.
10. म्हणून मुद्दा क्रमांक 1 हा होकारार्थी ठरवून मुद्दा क्रमांक 2 निकालात नमुद केल्याप्रमाणे ठरविण्यात येतो. सबब मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रार क्रमांक 122/2014 अशतः मंजूर करण्यात येते.
2. सा.वाले यांनी एकत्रित अथवा संयुक्तीकरित्या तक्रारदार यांना दिनांक 18.2.14 रोजी विकलेल्या गोदरेज कपाटाच्या व्यवहारा संबंधी सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असे जाहीर करण्यात येते.
3. सा.वाले यांनी एकत्रित अथवा संयुक्तीकरित्या सदर आदेशाची प्रत मिळाल्यापासून एका महिन्याचे आत वादातीत कपाटा एैवजी त्याच किंमतीचे तक्रारदार यांच्या पसंतीचे नविन कपाट बदलवून द्यावे असे आदेश मंच पारीत करीत आहे. तसे न केल्यास कपाटाच्या किंमतीवर तक्रार दाखल तारखेपासून 10 टक्के दराने व्याज नविन कपाट मिळेपावेतो अदा करावे असा आदेश मंच पारीत करीत आहे.
4. सा.वाले यांनी एकत्रित अथवा संयुक्तीकरित्या तक्रारदार यांना मानसिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई रु.15,000/- व तक्रारीचा खर्च रु.3,000/- अदा करावा असा आदेश मंच पारीत करीत आहे.
5. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात
याव्यात.
ठिकाणः मुंबई.
दिनांकः 06/01/2016