अर्जदार स्वतः गैर अर्जदार एकतर्फा. मा.अध्यक्षानुसार दिलेले निकालपत्र. तक्रारदाराची थोडक्यात तक्रार खालील प्रमाणे. 1. तक्रारदाराने त्यांच्या धुलाई मशिनची दुरुस्ती करुन मिळण्याबाबतचा सा.वाले यांचेशी एक वर्षासाठी लेखी करार केला होता, व त्यासाठी सा.वाले यांना रुपये 1092/- दिले. त्या कराराचा कालावधी दिनांक 23.11.2009 ते 22.11.2010 असा होता. तक्रारदाराचे म्हणणे की, या करारानुसार सा.वाले यांनी वर्षातुन तिन वेळा धुलाई मशिनची साफसफाई करुन द्यावयाची होती. तसेच यंत्राचा कोणताही भाग खराब झाल्यास किंवा बिघडल्यास तो पैसे न घेता बदलून देण्याचा करार होता. 2. तक्रारदाराचे म्हणणे की, दिनांक 26/09/2010 रोजी त्यांच्या धुलाई मशिनमध्ये बिघाड झाला, म्हणून सा.वाले यांना फोन करुन कळविले. त्या बद्दलची तक्रार क्रमांक 132302 अशी आहे. दिनांक 30.09.2010 रोजी सा.वाले यांनी त्यांचा तंत्रज्ञ पाठविला. त्यांनी धुलाई मशिनची पहाणी करुन मशिनच्या बटनामध्ये बिघाड झाला आहे असे सांगीतले. जुने बटन काढून नविन बटनाचे रु.400/- मागीतले. त्याला करारनामा दाखविला तरी त्यांनी त्याची दखल घेतली नाही. म्हणून तक्रारदाराने सा.वाले यांचे साहेब एस.टी.गुप्ता यांना फोन वरुन त्याबाबत कळविले. त्यांनीही त्यांचे काही ऐकुन घेतले नाही व रु.400/- द्यावे लागतील असे सांगीतले. " तुम्ही भरणार नसाल तर तुम्हाला काय करावयाचे असेल ते करा " असे उदगार त्यांनी फोनवरुन बोलून दाखविले. 3. सा.वाले यांच्या या कृत्यामुळे तक्रारदाराने दिनांक 06.10.2010 रोजी सा.वाले यांचेकडे लेखी तक्रार केली. सा.वाले यांनी त्याचे उत्तर दिले नाही. तक्रारदाराचे म्हणणे की, त्यांची मशिन बिघडल्यामुळे त्यांना खुप त्रास सहन करावा लागला, व कपडे लॉन्ड्रीमध्ये द्यावे लागत आहे. म्हणून त्यांनी सदरहू तक्रार केली. तक्रारदाराचे म्हणणे की, सा.वाले यांनी त्यांची धुलाई मशिन दुरुस्त करुन द्यावी किंवा त्याच्या दुरुस्तीला लागणारा खर्च द्यावा, तसेच यापुढे एक वर्षाचा मोफत दुरुस्तीचा करारनामा करुन द्यावा, आणि त्यांना लॉन्ड्रीमार्फत कपडे धुण्याचा जो खर्च आला व या तक्रारीसाठी जो खर्च आला त्याची व्याजासहीत नुकसान भरपाई द्यावी. 4. सा.वाला यांना या तक्रारीची नोटीस बजावूनही ते हजर झाले नाहीत, म्हणून तक्रार त्यांचेविरुध्द एकतर्फा चालविण्यात आली. तक्रारदाराने पुरावा शपथपत्र, करारनाम्याची प्रत व सा.वाले यांना पाठविण्यात आलेल्या पत्राची पोच पावती दाखल केली आहे. आम्ही तक्रारदाराचे म्हणणे ऐकले व कागदपत्र वाचली. 5. तक्रारदाराने दाखल केलेल्या सेवेच्या करारनाम्यावरुन हे सिध्द होते की, त्यांनी त्यांच्या धुलाई मशिनसाठी दुरुस्तीचा करारनामा सा.वाले यांचेशी केलेला होता. तो एका वर्षासाठी असून त्याचा कालावधी 23.11.2009 ते 22.11.2010 असा होता. तक्रारदाराने त्यासाठी रु.1092/- सा.वाले यांना दिले होते. या करारनाम्याच्या अटी व शर्ती करारनाम्याच्या मागच्या बाजूला नमुद केलेल्या आहेत. त्या कराराच्या अट क्र. ए(2) प्रमाणे धुलाई मशिनच्या यंत्राच्या बटनाची किंमत न घेता ते बदलून देणे हे सा.वाले यांचे कर्तव्य होते. परंतु त्यासाठी रु.400/- ची मागणी केली ही सा.वाले यांच्या सेवेत न्यूनता आहे. सा.वाले यांनी कराराचा भंग केलेला आहे. तक्रारदाराने सा.वाले यांना दिनांक 04.10.2010 रोजीचे पत्र दिनांक 6.10.2010 रोजी पाठविल्याचे दिसते. सदरहू पत्र मिळूनही सा.वाले यांनी प्रतिसाद दिला नाही. तक्रारदाराने सा.वाले यांच्या सेवेत न्यूनता असल्याचे सिध्द केलेले आहे. तक्रारदाराने त्यांची मशिन दुरुस्त करुन मिळावी अशी मागणी केली आहे. तसेच एक वर्षाचा मोफत दुरुस्तीचा करार सा.वाले यांनी करुन द्यावा अशी मागणी केलेली आहे. सा.वाले यांनी मशीनची बिघडलेली बटनं बदलून द्यावीत त्याची किंमत घेवू नये तसेच सर्व्हिस चार्जेस घेवू नये. तसेच इतर काही इतर दुरुस्ती करावयाची असल्यास कराराच्या अटी व शर्ती नुसार तक्रारदाराच्या धुलाई मशिनची दुरुस्ती करुन द्यावी असा आदेश करणे योग्य आहे. तसेच तक्रारदाराला झालेल्या गैरसोईबद्दल नुकसान भरपाई देणे ही सा.वाले यांची जबाबदारी आहे. मंचाचे मते खालील आदेश न्यायाचे हिताचे दृष्टीने योग्य वाटतो. म्हणून मंच खालील प्रमाणे आदेश करीत आहे. आदेश 1. तक्रार क्र. 161/2010(जुना क्र.595/2010) अंशतः मंजूर करण्यात येते. 2. सामनेवाले यांनी करारात नमुद केलेल्या तक्रारदाराच्या धुलाई यंत्राची बिघडलेली बटनं बदलून द्यावीत व त्यासाठी नवीन बटनांचा चार्ज व सर्व्हिस चार्लेस लावू नये. तसेच मशीनमध्ये इतर काही दुरुस्त्यांची आवश्यकता असल्यास कराराच्या अटी व शर्तीनुसार मशीन दुरुस्त करुन चालू करुन द्यावे. 3. सामनेवाले यांनी तक्रारदाराला रकम रु.2000/- नुकसान भरपाई द्यावी व रुपये 1000/- तक्रारीच्या खर्चापोटी द्यावेत व स्वतःचा खर्च सोसावा. 4. आदेशाच्या प्रमाणित प्रती दोन्ही पक्षकारांना विनामूल्य पाठविण्यात याव्या.
| [HONORABLE G L Chavan] Member[HONABLE MRS. S P Mahajan] PRESIDENT | |