निकालपत्रः- श्रीमती सुमन प्र.महाजन, अध्यक्षा ठिकाणः बांद्रा न्यायनिर्णय तक्रारीचे संक्षिप्त स्वरुप खालीलप्रमाणेः- तक्रारदाराची स्थिति सामान्य असताना सामनेवाले –रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना अकारण थेट अतिदक्षता कक्षात दाखल केले ही तक्रारदाराची मुख्य तक्रार असून त्यावेळी त्यांना जे परिणाम भोगावे लागले त्याची नुकसान भरपाई मिळण्यासाठी तक्रारदाराने सदरची तक्रार दाखल केली. 2 तक्रारदाराचे म्हणणे की, दि.29.12.2009 रोजी दिवसभर त्यांना झोप आल्यासारखे वाटत होते आणि चक्कर आल्यासारखे वाटत होते. म्हणून त्यांना सामनेवाले रुग्णालयात औषधोपचारासाठी नेले. तातडीचे उपचार करण्याच्या विभागातील डॉक्टरांनी त्यांचा रक्तदाब तपासला, ईसीजी काढला, दहा मिनीटं वाफेतून औषधं (Nebuliazer) दिले व औषधं लिहून दिली आणि दुस-या दिवशी सकाळी बाहयरुग्ण विभागात येण्यास सांगितले. त्यावेळी तेथे दुस-या डॉक्टरांनी त्यांच्या वरीष्ठांना निरोप सांगितला असावा म्हणून Casualty च्या डॉक्टरांनी त्यांच्या मुलाला सांगितले की, तुमच्या वडीलांचे वय लक्षात घेता, त्यांना अतिदक्षता विभागात भरती करावे लागले. त्यावेळी तक्रारदाराच्या मुलाने त्यांना विचारले की, वडीलांची स्थिति सामान्य असताना त्यांना अतिदक्षता विभागात का भरती करता ? परंतु त्यांनी उत्तर दिले नाही. त्यांनी त्याला थोडावेळ बाहेर थांबायला सांगितले व नंतर बोलावून त्याला “जर रुग्ण दाखल न झाल्यामुळे मृत्यु पावला तर त्याची जबाबदारी ही रुग्णालयावर नाही”, अशा आशयाच्या छापील कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यास सांगितले. मात्र, विचारुनही तक्रारदाराचा आजार काय आहे याबद्दल सांगितले नाही. फक्त त्याच्या वयाकडे बघून त्यांची अतिदक्षता विभागात भरती करीत आहोत असे सांगितले. याप्रमाणे, दि.29.12.2009 ते दि.31.12.2009 च्या सकाळपर्यंत तक्रारदाराला आवश्यक नसताना पैसे उकळण्याच्या हेतुने अतिदक्षता विभागात डांबून ठेवले, त्यामुळे अनावश्यक तणाव निर्माण झाला, अनावश्यक वेळ वाया गेला आणि विविध अनावश्यक, ज्याचे दुष्परिणाम होऊ शकतील अशा औषधांचा मारा तक्रारदारावर झाला. तसेच औषधांसाठी रक्कम रु.24,340.78पैसे इतका खर्च झाला. 3 तक्रारदाराची अशीही तक्रार आहे की, त्यांना अतिदक्षता विभागात भरती केले त्यावेळी त्यांना खोकला नव्हता. अतिदक्षता विभागातील अतिथंड वातावरणामुळे त्यांना थंडी वाजत होती. तेथील परिचारीकांना सांगून एखादे जास्तीचे पांघरुण देण्यास सांगितले. तथापि त्या कक्षात पुरेसे पांघरुण नसल्यामुळे पंधरा मिनीटं परिचारिकेने जास्तीचे पांघरुण दिले नाही. त्यामुळे त्यांना हुडहुडी भरली व नंतर खोकला सुरु झाला. गादीवरची चादरही फाटलेली होती. Casualty मधील हृदयस्पंदनआलेख (ईसीजी) काढणारे मशीन अकार्यक्षम होते. सामनेवाले यांनी तक्रारदाराचा ईसीजी त्याला दिला नाही. एकंदरीत रुग्णालयाचा कारभार अकार्यक्षम होता. 4 तक्रारदाराची अशीही तक्रार आहे की, त्यांचा ईसीजी सामान्य आहे असे त्यांना सांगितले होते. असे असूनही अतिदक्षता विभागातील डॉक्टर-श्री.मंदार आरेकर यांनी त्यांचा हृदयस्पंदनआलेख (ईसीजी),“व्दिमितहृदयस्पंदनआलेख (टुडायमेनशनल एको कार्डिओग्राम), क्ष किरण (एक्सरे), रक्ताच्या विविध तपासण्यां करण्याच्या हेतुने संमती घेण्यासाठी त्याच्या मुलाच्या स्वाक्ष-या घेण्यात आल्या”. विविध तपासण्यां झाल्यानंतरही डॉक्टरांना रोगाचे निदान झाले नाही. त्यांनी तक्रारदाराच्या हृदयाची सुशिरीकरण तपासणी (एजिओग्राफी) करण्याचे सुचविले. तक्रारदाराचा खोकला उपचार करुनही कमी होत नव्हता. म्हणून तक्रारदाराच्या मुलाने त्यांना रुग्णालयातून सुट्टी द्यावी असे सांगितले. त्यावेळी “वैद्यकीय सल्ल्याच्या विरोधात जाऊन स्वतःच्या जबाबदारीवर रुग्णालयातून सुट्टी घेत आहोत” असे तक्रारदाराचे मुलाकडून लिहून घेतले. त्याला रुग्णालयातील तपासणीचे अहवाल देतांना छातीची एक्स-रे प्लेट अन्य रुग्णांची दिली होती. कॅझ्युल्टीमधील ईसीजी व त्याचा निदान अहवाल, तसेच एक्स-रे प्लेटचा निदान अहवालही दिला नाही. रुग्णालयातून सुट्टी झाल्यानंतरही त्यांचा खोकला चालूच होता, म्हणून त्यांनी केईएम रुग्णालयात औषधोपचार घेतला. 5 याप्रमाणे, तक्रारदाराची तक्रार आहे की, सामनेवाले यांची सेवेत न्यूनता आहे व त्यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला आहे, जसे की, त्यांची स्थिती सामान्य असताना त्यांना अतिदक्षता विभागात भरती केले, तेथे सामान्य सोयींचाही अभाव होता, रोग निदान न करता शरिराला नुकसान पोहचू शकणारी औषधं दिली, रुग्णालय सोडतांना अनावश्यक औषधोपचारांचा सल्ला दिला, तपासणी अहवाल दिला नाही, इत्यादी. तक्रारदाराने सदरची तक्रार करुन त्याला झालेल्या खर्चाची रक्कम रु.24,340.78पैसे ची प्रतिपूर्ती सामनेवाले यांचेकडून व्हावी, त्यांना जो मानसिक त्रास झाला व वेळ वाया गेला तसेच अनावश्यक औषधांचा त्यांचेवर भडीमार झाला, याबद्दल सामनेवाले यांचेकडून नुकसानभरपाई मिळावी यासाठी सदरची तक्रार दाखल केली आहे. 6 सामनेवाले–रुग्णालयाने कैफियत देऊन तक्रारदाराचे आरोप नाकारले. त्यांचे म्हणणे की, सदरच्या तक्रारीत तक्रारदाराने आवश्यक पक्षकारांचा समावेश केला नाही. सामनेवाले यांनी त्याला चुकीची व हानी पोहचवू शकणारी औषधं दिली, याबद्दल तज्ञांचे मत दाखल केले नाही, म्हणून सदरची तक्रार रद्द होण्यास पात्र आहे. 7 सामनेवाले म्हणतात की, सदरचे रुग्णालय लोक कल्याणासाठी चालविले जाते, नफा कमविण्यासाठी नाही. ते सर्व सुख-सोयींनी युक्त आहे. या रुग्णालयात प्रशिक्षित व तज्ञ डॉक्टर्स आहेत, येथे सर्व प्रकारांच्या आजारांवर औषधोपचार केला जातो. तक्रारदाराला अतिदक्षता विभागात भरती केल्यानंतर तक्रारदाराच्या मुलाला खर्चाचा अंदाज व औषधांची कल्पना दिली होती आणि त्यासाठी त्याची संमती घेतली होती. तक्रारदाराला त्या दिवशी अस्वस्थ वाटत होते. ते आपणहून त्या रुग्णालयात आले होते. दि.30.12.2009 रोजी संध्याकाळी ते रुग्णालयातून जाऊ इच्छितात असे सांगितल्यानंतर त्यांची एकही चाचणी घेतली नाही. त्यांना पैसे उकळायचे असते तर तक्रारदाराच्या त्यानंतरही चाचण्या घेतल्या असत्या. तक्रारदाराचा ईसीजी घेतल्यानंतर त्याच्या डाव्या जवनिकेचा आकार वाढलेला आहे असे लक्षात आले. (Left Ventricular Hypertrophy (LVH) i.e.Enlargement of Left Lower Chembur of Heart) दाखवत होते. त्यामुळे C.M.O. ने आयसीयुच्या रजिस्ट्रारचे मार्गदर्शन घेतले व त्यांनी सामनेवाले यांचे कंस्टल्टंट फिझीशियन –श्री.मंदार आरेकर यांचा सल्ला घेतला. त्यांनी तक्रारदाराला अतिदक्षता विभागात भरती करुन घेण्यास सांगितले. 8 तक्रारदाराला बाहयरुग्ण म्हणून औषधोपचार करुन घ्यावयाचे होते म्हणून त्याला औषधं लिहून दिली व दुस-या दिवशी बाहयरुग्ण विभागात येण्यास सांगितले. परंतु सावधगिरी म्हणून अतिदक्षता विभागात भरती न केल्यामुळे होणा-या परिणामांना सामनेवाले-रुग्णालय किंवा त्यांचे डॉक्टर व कर्मचारी जबाबदार राहणार नाहीत अशा आशयाच्या पेपरवर स्वाक्षरी करण्यास सांगितले. तक्रारदाराचे वय 84 वर्षे, त्यांची चक्कर येण्याबाबतची तक्रार, त्यांचे असामान्य ईसीजी, फुप्फुसातील करकर आवाज, (Rhonchi Inlung) ही हृदयासंबंधी आणिबाणीची स्थिती होण्यापूर्वीची लक्षणं होती म्हणून तक्रारदाराच्या मुलाला तक्रारदाराला अतिदक्षता विभागात भरती करण्यास सांगितले होते. त्यांनी त्यांचेकडून आगाऊ पैसेपण घेतले नाही. त्यांनी तक्रारदाराला अतिदक्षता विभागात भरती करण्याची बळजबरी केली नाही किंवा त्यांचेकडून पैसे उकळले नाही. कामाच्या सामान्य वेळेनंतर आलेल्या रुग्णाच्याबाबत तात्काळ व परिणामकारक उपाय जे इतर रुग्ण्यालयात केले जातात तशीच काळजी तक्रारदाराच्या बाबतीत घेण्यात आली. अतिदक्षता विभागात तक्रारदाराला लगेच तेथील चिकित्सक (फिजीशियन)–डॉ.मंदार आरेकर यांनी रात्री 11.30 वाजता तपासले व दि.30.12.2009 रोजी दोन वेळा तपासले. अतिदक्षता विभागात त्यांचा COPD (Chronic Obstructive Pulmonary Disease ) चा पुर्वेतिहास घेण्यात आला. त्यांना सकाळपासून चक्कर येत होती, खोकला होता, अशक्तपणा आलेला होता व उच्च रक्तदाबाचे निदान नुकतेच झालेले होते. कॅझ्युलटिमध्ये तपासले असता फुप्फुसात करकर आवाज येत होता, पल्स् वाढलेली होती, प्राणवायुचे रक्तातील प्रमाण सामान्य प्रमाणपेक्षा कमी होते, पांढ-या पेशींचे प्रमाण वाढलेले होते, थुंकी तपासली असता Pus cells व बॅक्टेरीया आढळून आले ही फुप्फुसात रोगजंतूंचा संसर्ग झाल्याची लक्षणं होती, रक्तातील पोटॅशिअचे प्रमाण कमी होते, ब्लड गॅस अनॅलिसीस प्राणवायुचा दाब कमी [PO2(Partial Pressure of Oxygen)] दाखवत होते, ईसीजीवरुन दोन्हीं जवनिकांचे आकार वाढलेले दिसत होते, ही सर्व लक्षणे फुप्फुसामध्ये संसर्ग झालेला आहे व हृदयाची समस्या आहे असे दर्शवित होते, म्हणून तक्रारदाराला हृदयरोग तज्ञ–डॉ.अनिल पोतदार यांनी तपासले होते. अतिदक्षता विभागात तक्रारदाराची 2D Echo ही चाचणी घेण्यात आली, नव्याने ईसीजी काढण्यात आला. दि.31.12.2009 रोजी तक्रारदाराला औषधोपचारांविषयी सविस्तर सांगून डॉ.मंदार आरेकर यांचेकडे पुन्हा तपासणीसाठी बोलाविले होते. तक्रारदाराला केईएम रुग्णालयात तपासल्यानंतर तेथील रोगनिदान व सामनेवाले–रुग्णालयातील रोगनिदान सारखेच होते. सामनेवाले यांचे म्हणणे की, त्यांची सेवेत न्युनता नाही, तक्रार रद्द करण्यात यावी. 9 आम्हीं तक्रारदारातर्फे त्याचे प्रतिनिधी–श्री.सदाशिव शरु श्री.लिमये व सामनेवाले यांचेतर्फे त्यांचे प्रतिनिधी–डॉ.चुलानी यांचा युक्तीवाद ऐकला व कागदपत्रं वाचली. 10 तक्रारदाराचा मुख्य आरोप आहे की, दि.29.12.2009 रोजी त्याला सामनेवाले यांच्या दवाखान्यात नेले त्यावेळी त्याची स्थिती अतिदक्षता विभागात भरती करण्यासारखी नसताना केवळ पैसे उकळण्याच्या हेतूने सामनेवाले–रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला अतिदक्षता विभागात भरती केले, हा आरोप तक्रारदारांनी सिध्द केला आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी तक्रारदारांची त्यावेळची स्थिती काय होती हे पाहणे आवश्यक आहे. मेडिकल कागदपत्रांवरुन तक्रारदाराची त्यावेळची स्थिती खालीलप्रमाणे होती असे दिसून येते. अ तक्रारदाराचे वय 84 वर्षे होते. आ त्याला रात्री 9.30 वाजता कामाच्या सामान्य वेळेनंतर दवाखान्यात नेले होते. इ त्या दिवशी त्याला सकाळपासून झोपण्यासारखे वाटत होते व चक्कर आल्यासारखे वाटत होते. ई कॅझ्युलटीमध्ये त्याचा ईसीजी काढण्यात आला तो सामान्य नव्हता. उ त्याच्या हृदयाच्या डाव्या जवनिकेचा आकार वाढलेला होता. ऊ त्याचा रक्तदाब 140-80 म्हणजे वाढलेला होता. ए परिश्रवणयंत्र (स्टेथोस्कोप) ने तपासले त्यावेळी त्यांच्या छातीच्या उजव्या भागातून करकर आवाज येत होता. [RS/AEBE Mild Rhonchi R ] ऐ Cardio Vascular System S1, S2 + ओ त्यांची Pulse वाढलेली होती औ 10 मिनिटे Nebulizer मधून औषधं देऊनही सुधारणा झाली नव्हती. अं शरीरात ऑक्सीजन कमी जात होते व रक्तात ऑक्सीजनचे प्रमाण कमी होते. 11 वरील सर्व स्थिती लक्षात घेवून सावधगिरी म्हणून सामनेवाले यांच्या डॉक्टरांनी त्यांना अतिदक्षता विभागात दाखल केले. तक्रारदाराचे म्हणणे की, कॅझ्युअल्टी मधील ईसीजीचे मशीन बरोबर काम करीत नव्हते. परंतु अतिदक्षता विभागात तक्रारदाराचा ईसीजी काढला त्यावेळी सुध्दा तो सामान्य नव्हता, त्यामुळे कॅझ्युअल्टी मधील ईसीजीचे मशीन काम करीत नव्हते असे म्हणता येत नाही. 12 सामनेवाले यांनी कॅझ्युअल्टीचे डॉ.स्वप्नील यांचे शपथपत्रं दाखल केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, त्यांनी तक्रारदाराचा ईसीजी काढला होता. त्यात डाव्या जवनिकेचा आकार वाढलेला होता [Left Ventricular Hypertrophy (LVH)] असे दिसून आले म्हणून त्यांनी अतिदक्षता विभागात ज्युनिअर असलेले रजिस्ट्रार, डॉ.गडवे यांना फोनवरुन तक्रारदाराच्या त्यावेळच्या स्थितीबद्दल व ईसीजीबद्दल सांगितले. त्यांनी तक्रारदाराला डॉ.मंदार आरेकर यांचे निरीक्षणाखाली अतिदक्षता विभागात भरती करावयास सांगितले. 13 सामनेवाले यांनी अतिदक्षता विभागातील रजिस्ट्रार डॉ.रमेश गडवे यांचेही शपथपत्रं दाखल केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, दि.29.12.2009 रोजी रात्री 10 वाजता त्यांना डॉ.स्वप्नील पवार यांचा फोन आला होता. त्यांनी श्री.रिसबुड, वय 84 वर्षे यांच्या ईसीजीबद्दल व त्यावेळच्या स्थितीबद्दल त्यांना सांगितले होते. त्यांच्या डाव्या जवनिकेचाआकार वाढलेला होता (Left Ventricular Hypertrophy ), त्यांना चक्कर येत होते व छातीमध्ये करकर आवाज येत होता (Mild Rhonchi) म्हणून त्यांनी डॉ.मंदार आरेकर, कन्सल्टंट फिजीशियन यांना त्याबद्दल सांगितले व डॉ.मंदार आरेकर यांना सुचित करुन श्री.रिसबुड यांना अतिदक्षता विभागात दाखल करुन घेण्यास सांगितले, त्यांनी त्या रुग्णाकडे डॉ.मंदार आरेकर येईपर्यंत स्वतः लक्ष दिले. 14 सामनेवाले यांनी डॉ.मंदार आरेकर यांचेही शपथपत्रं दाखल केले. त्यांनी सांगितले की, दि.29.12.2009 रोजी रात्री 10.30 वाजता डॉ.रमेश गडवे यांचा फोन आला होता. त्यांनी श्री.बाळकृष्ण रिसबुड यांचे वय, त्यांची त्या वेळची शारिरीक स्थिती व ईसीजीचा रिपोर्टबद्दल सांगितले होते. त्यांनी श्री.रिसबुडला त्यांचे निरीक्षणाखाली भरती करुन घ्यावे असे सांगितले होते व ते स्वतः रुग्णाकडे जातील तोपर्यंत त्यांना औषधोपचार करण्यास सांगितले. ते जवळजवळ रात्री 11.30 वाजता रुग्णालयात गेले, रुग्णाला तपासले. त्यांच्या काही चाचण्यां घेण्यास सांगितल्या व कोणता औषधोपचार करावा तेही सांगितले. दि.30.12.2009 रोजी सुध्दा त्यांनी दोनवेळा त्या रुग्णाला तपासले. तक्रारदाराने दि.29.12.2009 रोजी त्याची परिस्थिती अतिदक्षता विभागात दाखल करण्यासारखी नव्हती याबद्दल तज्ञ डॉक्टरांचे मत दाखल केले नाही. सामनेवाले यांनी पैसे उकळण्याच्या हेतुने आयसीयु मध्ये दाखल केले व सेवेत न्युनता केली असे म्हणता येत नाही. कारण त्यावेळी त्याच्या परिस्थितीवरुन त्यांना आयसीयुमध्ये दाखल करणे आवश्यक होते. तक्रारदाराला त्यावेळी अतिदक्षता विभागात भरती केले नसते व त्याला हृदयाचा काही प्राब्लेम उदभवला असता तर पुन्हा डॉक्टराच्या विरुध्द त्यांनी त्याला औषधोपचार करण्यात निष्काळजीपणा केला अशी केस दाखल करण्यास तक्रारदाराला कारण घडले असते. सामनेवाले यांच्या डॉक्टरांनी आयसीयुमध्ये भरती करुन घेतले त्यात काही चुक केली असे मंचाला वाटत नाही. 15 तक्रारदाराला अतिदक्षता विभागात भरती केल्यानंतर पुन्हा डॉ.मंदार आरेकर यांनी तक्रारदाराचा COPD चा पुर्वेतिहास घेतला. त्यांना पुष्कळ वर्षोंपासून खोकला येत होता व कफ पडत होता. त्यामुळे तक्रारदाराचा आरोप की, अतिदक्षता विभागातील थंड वातावरणामुळे त्यांना खोकला झाला हे मान्य करता येत नाही. 16 दि.30.12.2009 चे प्रोग्रेस नोटवरुन असे दिसून येते की, त्यादिवशी तक्रारदाराचा 2D Echo करुन घेतले होते. त्यावेळी Diastolic Dys functioning आढळून आलेहोते. ब्लड रिपोर्टवरुन असे दिसून येते की, WBC सामान्य दरापेक्षा जास्त होत्या, ते शरिरात Infection चे झाले आहे हे सुचित करीत होते. शरीरातील रक्तात पोटॅशिअमचे व प्राणवायुचेही प्रमाणही कमी होते. ते हृदयाची समस्या असावी असे सूचित करीत होते. कॅझ्युअल्टीमधील डॉ.स्वप्नील यांना तक्रारदाराची जी स्थिती आढळून आली त्याला पूरक असेच रिपोर्ट आयसीयूमध्ये आढळून आले. 17 तक्रारदाराला दि.14.01.2010 रोजी केईएम रुग्णालयात नेले होते. त्याचे केसपेपर्स सामनेवाले यांनी दाखल केले आहे. त्यावरुन, असे दिसते की, तक्रारदारांनी त्या रुग्णालयात त्यांचा पूर्वेतिहास असा सांगितला होता की, त्यांना सहा महिन्यापासून खोकला व कफ पडतो. पंधरा दिवसांपासून त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होता. 30 वर्षापासून अस्थमाचा त्रास होता. मात्र त्यासाठी त्यांनी औषधोपचार करुन घेतला आहे. केईएमला तक्रारदाराला तपासले त्यावेळी खालील लक्षणं आढळून आली होती. अ बी.पी.150/96 आहे. ब RS- AEBE mild Rhonchi R Cvs S1S2 केईएम रुग्णालयातही, तक्रारदाराला हृदयाची काही समस्या नाही याची खात्री करण्यासाठी हृदयासंबंधी बाहयरुग्ण विभागात जाण्यास सांगितले होते. कारण त्यांना रात्री खोकला यायचा व रात्री झोपतांना श्वास गुदमरायचा. तक्रारदार त्या विभागाला गेले किंवा नाही याबद्दल त्यांना काही सांगितले नाही. केईएम रुग्णालयातील केसपेपर्सवरुन असे दिसते की, सामनेवाले-रुग्णालयातील डॉक्टरांना जी लक्षणं आढळून आली तशीच लक्षणं केईएमच्या रुग्णालयातही आढळून आली. यावरुन ही सामनेवाले यांची सेवेत न्युनता आहे असे म्हणता येणार नाही. विशेष म्हणजे तक्रारदाराने तज्ञांचे मत देऊन सामनेवाले यांची सेवेत न्यूनता होती असे सिध्द केलेले नाही. सदर तक्रार रद्द होण्यास पात्र आहे, म्हणून मंच खालीलप्रमाणे आदेश करीत आहे. आदेश (1) तक्रार क्र.281/2011 रद्द करण्यात येते. (2) उभय पक्षकारांनी आपापला खर्च सोसावा. (3) आदेशाच्या प्रमाणित प्रतीं दोन्हीं पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्या.
| [HONABLE MR. G L Chavan] Member[HONABLE MRS. S P Mahajan] PRESIDENT | |