निकालपत्र :- (दि. 24-03-2015) (द्वारा-श्री. संजय पी. बोरवाल, अध्यक्ष)
प्रस्तुतची तक्रार तक्रारदारांनी ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 कलम 12 अन्वये गोदरेज रेफ्रिजरेटरची नुकसानभरपाई मिळण्यासाठी दाखल केलेली आहे.
1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन वि.प. 1 व 2 यांचेविरुध्द नोटीसचा आदेश झाला. वि.प. 1 व 2 यांना नोटीसा लागू होऊन गैरहजर राहिलेने वि.प. 2 विरुध्द दि. 14-08-2013 रोजी ‘एकतर्फा’ चे आदेश पारीत केले. वि.प. 1 विरुध्द दि. 22-01-2015 रोजी ‘एकतर्फा’ चे आदेश पारीत केले. तक्रारदार तर्फे वकिलांनी युक्तिवाद केला. वि.पक्ष गैरहजर. प्रस्तुतचे प्रकरण गुणदोषांवर निकाली करणेत येत आहे.
2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी की,
वि.प. हे गोदरेज कंपनीचे ब्रँडची विविध प्रकारची इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल्स मालांची उत्पादन करणारी कंपनी असुन वि.प. 2 हे वि.प. 1 यांच्या मालाचे अधिकृत विक्रेते आहेत. तक्रारदार यांची त्यांचे घरगुती वापराकरिता गोदरेज कंपनीचा रेफ्रिजरेटर घेण्याचे ठरवून दि. 15-02-2007 रोजी भेट दिली असता वि.प. 2 यांनी गोदरेज कंपनीच्या मालाचा दर्जा व विक्री पश्चात विनाविलंब सेवा यांची माहिती देऊन तक्रारदार यांना गोदरेज कंपनीचा रेफ्रिजरेटर खरेदी करणेस भाग पाडले. तक्रारदार यांनी वि.प. नं. 2 कडून दि. 15-02-2007 रोजी गोदरेज कंपनीचा रेफ्रिजरेटर मॉडेल नं. GDP-215-ZOP Unit Sr. No. 00007692 रक्कम रु.11,000/- ला खरेदी केला होता व त्यावेळी वि.प. नं. 2 यांनी वि.प. नं. 1 यांचे वतीने रेफ्रिजरेटरची पुढील 10 वर्षाचे कालावधीकरिता रस्ट प्रोटेक्शन सह विविध प्रकारच्या तक्रारीची गॅरंटी/वॉरंटी दिलेली होती. सदर रेफ्रिजरेटरचा मुख्य दरवाजाच्या दर्शनी भागाकडील खालील भाग हा रस्ट होऊन दरवाजा सुस्थितीत लागू शकत नव्हता त्यामुळे रेफ्रिजरेटरच्या कुलींगवर परिणाम होत होता. त्याबाबत तक्रारदार यांनी वि.प. 2 कडे सी.एस.एन. 944 ने दि. 28-03-2012 रोजी तक्रार नोंद केली होती. त्यानुसार वि.प.नं. 2 तर्फे तंत्रज्ञ तक्रारदार यांचे घरी येऊन रेफ्रीजरेटरची पाहणी करुन रेफ्रिजरेटरचा दरवाजा रस्ट झाल्याचा निष्कर्ष काढून रेफ्रिजरेटरच्या खरेदीपासून 10 वर्षाच्या वॉरंटी/गॅरंटी कालावधीतील असलेने सदर खराब झालेला दरवाजा पुर्णत: बदलून देण्याची हमी वि.प. नं. 2 यांनी दिली होती. परंतु वि.प. नं. 2 हे रेफ्रिजरेटरचा रस्ट झालेला दरवाजा बदलून देणेस टाळाटाळ करुन लागले होते. तक्रारदार यांनी चौकशी केली असता वि.प. नं. 1 यांचेकडे आपली तक्रार पाठविली असलेचे सांगितले व वि.प. 1 कडून दरवाजा आलेनंतर बघू असे उत्तर देऊन तक्रारदार यांना विक्रीपश्चात सेवा देण्यास वि.प. 2 हे चालढकल करु लागले होते. त्यानंतर तक्रारदार यांनी दि. 31-07-2012 रोजी वकिलामार्फत रजि.ए.डी. नोटीस पाठवून रेफ्रिजरेटरचा रष्ट झालेला दरवाजा बदलून देण्याची मागणी केली. वि.प. नोटीस मिळून वि.प. 1 यांनी तक्रारदार यांची तक्रारीची दखल घेऊन त्वरीत कार्यवाही करीत असलेचे दि. 21-08-2012 रोजी पत्राने कळविले. परंतु त्यानंतर वि.प. 1 यांनी आजअखेर काहीही कार्यवाही केलेली नाही. वि.प. 2 यांनी नोटीसीस उत्तरही दिलेले नाही. तक्रारदारांना वि.प. 1 व 2 यांनी रेफ्रिजरेटरच्या विक्री पश्चात सेवा देणेत त्रुटी ठेवून अनुचित व्यापारी पध्दतीचा अवलंब करुन तक्रारदार यांना मानसिक व आर्थिक त्रास देऊन तक्रार करणेस भाग पडले आहे. सबब, तक्रारदार यांनी रेफ्रिजरेटरचा रष्ट झालेला दरवाजा विना खर्च व विना विलंब बदलून देणेचा आदेश व्हावा तसेच नुकसानीची व खर्चाची रक्कम देणेत यावी. तक्रारदार यांना जुना रेफ्रिजरेटर बदलून नवीन रेफ्रिजरेटर देणेचा वि.प. यांना आदेश व्हावेत. तक्रारदारांनी तक्रारीसोबत शपथपत्र दाखल केले आहे.
3) तक्रारदारांनी तक्रारीसोबत एकूण 4 कागदपत्रे दाखल केली आहेत. अ.क्र. 1 कडे सुरभि इलेक्ट्रॉनिक्स यांनी तक्रारदारांना दिलेले वॉरंटी कार्ड दि. 15-2-2007, अ.क्र. 2 कडे जाबदार नं. 1 यांनी तक्रारदार यांना पाठविलेले पत्र दि. 21-08-2012, अ.क्र. 3 कडे तक्रारदार यांनी वि.प. नं. 1 व 2 यांना पाठविलेली नोटीस दि. 31-07-2012, अ. क्र. 4 कडे दि. 31-07-2012 रोजीच्या तक्रारदार यांनी पाठविलेल्या नोटीसीची पोहच पावती इत्यादी कागदपत्रे व तक्रारीसोबत शपथपत्र दाखल केलेले आहे. तसेच दि. 19-03-2015 रोजी तक्रारदार यांनी पुराव्याचे शपथपत्र दाखल केले आहे.
4) तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्रे, शपथपत्र व तक्रारदार यांचे वकिलांचा युक्तीवाद यांचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी मंचापुढे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
1. वि.प. यांनी तक्रारदारांना द्यावयाच्या सेवेत त्रुटी
ठेवेली आहे काय ? होय
2. तक्रारदार मानसिक व शारिरीक त्रासापोटी
रक्कम मिळणेस पात्र आहेत ? होय
3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
वि वे च न
मुद्दा क्र. 1:
तक्रारदार यांनी दि. 15-02-2007 रोजी गोदरेज कंपनीचा वि.प. नं. 1 यांनी उत्पादित वि.प. नं. 2 यांचेकडून रेफ्रिजरेटर मॉडेल नं. GDP-215-ZOP Unit Sr. No. 00007692 रक्कम रु.11,000/- इतक्या किंमतीला खरेदी केला होता व त्यावेळी वि.प. नं. 2 यांनी वि.प. नं. 1 यांचे वतीने रेफ्रिजरेटरची पुढील 10 वर्षाचे कालावधीकरिता रस्ट प्रोटेक्शन सह विविध प्रकारच्या तक्रारीची वॉरंटी दिलेली होती. सदर वॉरंटी कस्टमर कॉपी अ.क्र. 1 कडे दाखल आहे. सदर कागदपत्राचे अवलोकन केले असता तक्रारदाराने दि. 15-02-2007 रोजी सदर रेफ्रिजरेटर वर नमूद कंपनी व मॉडेलचा खरेदी केला आहे. काही वर्षानंतर रेफ्रिजरेटरचा मुख्य दरवाजाच्या दर्शनी भागाकडील खालील भाग रस्ट होऊन दरवाजा सुस्थितीत लागत नव्हता त्यामुळे रेफ्रिजरेटरच्या कुलींगवर परिणाम होत होता. त्याबाबत तक्रारदारांनी वि.प. 2 कडे दि. 28-03-2012 रोजी तक्रार नोंदविली. वि.प.नं. 2 तर्फे तंत्रज्ञ तक्रारदार यांचे घरी येऊन रेफ्रीजरेटरची पाहणी करुन रेफ्रिजरेटरचा दरवाजा रस्ट झाला आहे असे तक्रारदारास कळविले. सदरचा रेफ्रिजरेटर वॉरंटी कालावधीत असलेमुळे खराब झालेला दरवाजा बदलून देण्याची हमी दिली. परंतु वि.प. नं. 2 यांनी रेफ्रिजरेटरचा रस्ट झालेला दरवाजा बदलून दिलेला नाही व देणेस टाळाटाळ केली. वि.प. नं. 2 यांनी वि.प. नं. 1 उत्पादित कंपनी यांचेकडे तक्रार पाठविलेचे सांगून तक्रारदार यांना विक्रीपश्चात सेवा दिली नाही. त्यानंतर तक्रारदार यांनी दि. 31-07-2012 रोजी वकिलामार्फत रजि.ए.डी. नोटीस पाठवून रेफ्रिजरेटरचा रष्ट झालेला दरवाजा बदलून देण्याची मागणी केली. वि.प. 1 यांना नोटीस मिळून देखील नोटीसीप्रमाणे मागणी पुर्ण करुन दिलेली नाही. वि.प. 2 यांनी तक्रारदार यांची तक्रारीची दखल घेऊन त्वरीत कार्यवाही करीत असलेचे दि. 21-08-2012 रोजी पत्राने कळविले. सदर पत्राची प्रत या कामी अ.क्र. 2 कडे दाखल आहे. वि.प. नं. 2 यांनी त्यांचे सर्व्हिस मॅनेजर, पुणे ब्रँच यांनी कळविले. सदर पत्रामध्ये नमूद केले की, “We acknowledge receiving your above referred notice at Mumbai and regret the incontinence caused to you on account of Refrigerator performance. We are endorsing copy of this letter to Mr Shailesh Nainani Service Manager, Pune Branch with necessary instructions to verify the facts and take steps to get the matter resolved at the earliest. You will hear from him soon in the matter.” परंतु वि.प. यांनी तक्रारदारांना रेफ्रिजरेटरचा दरवाजा बदलून दिलेला नाही असे दिसून येते. वरील सर्व बाबींचा विचार करता वि. प. यांनी तक्रारदारांना विक्री पश्यात द्यावयाच्या सेवेत त्रुटी ठेवली आहे असे या मंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र. 1 चे उत्तर होकारार्थी देत आहोत.
मुद्दा क्र. 2 :
वर नमूद मुद्दा क्र. 1 मधील विवेचनाचा विचार करता वि.प. यांनी तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत त्रुटी ठेवलेमुळे तक्रारदारांना मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रास सहन करावा लागला व तक्रार अर्जही दाखल करावा लागला. त्यामुळे मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु. 1,000/- व तक्रारीचा खर्च रक्कम रु. 500/- मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे, म्हणून मुद्दा क्र. 2 चे उत्तर होकारार्थी देत आहोत.
मुद्दा क्र. 3- सबब, मंच या प्रकरणी पुढीलप्रमाणे आदेश देत आहोत.
आ दे श
1. तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करणेत येते.
2. वि.प. 1 व 2 यांनी तक्रारदारास रेफ्रिजरेटर मॉडेल नं. GDP-215-ZOP Unit Sr. No. 00007692 चा रस्ट झालेला दरवाजा बदलून द्यावा.
3. वि.प. 1 व 2 यांनी तक्रारदारास मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु. 1,000/- (अक्षरी रुपये एक हजार फक्त) व तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रु. 500/-(अक्षरी रुपये पाचशे फक्त) अदा करावेत.
4. सदर आदेशाची पुर्तता आदेशाची प्रत मिळालेपासून 30 दिवसांत करावी.
5. सदर निकालपत्राच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात याव्यात.