(आदेश पारित द्वारा मा. अध्यक्ष, श्री. अतुल दि. आळशी)
- आदेश -
तक्रारकर्तीने विरूध्द पक्ष यांच्याकडून घेतलेल्या गोदरेज कंपनीच्या रेफ्रीजरेटरचे कॉम्प्रेसर विरूध्द पक्ष यांनी बदलून न दिल्यामुळे तसेच सदरच्या रेफ्रीजरेटरमध्ये सततचा बिघाड होत असल्यामुळे तो बदलून मिळावा या तक्रारकर्तीच्या विनंतीची दखल विरूध्द पक्ष यांनी न घेतल्यामुळे तक्रारकर्तीने नुकसानभरपाई मिळण्यासाठी सदरहू तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारकर्तीच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणेः-
2. तक्रारकर्तीने विरूध्द पक्ष 1 कंपनी यांचे अधिकृत वितरक विरूध्द पक्ष 2 यांच्याकडून दिनांक 31/10/2008 रोजी गोदरेज रेफ्रीजरेटर Model No. 3002, S.N. 220367 रू. 19,000/- मध्ये विकत घेतला. विरूध्द पक्ष 1 ही गोदरेज रेफ्रीजरेटरची उत्पादक कंपनी असून विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी सदर रेफ्रीजरेटरवर 5 वर्षाची Comprehensive Warranty दिलेली होती.
3. तक्रारकर्तीने गोदरेज रेफ्रीजरेटर विकत घेतल्यानंतर लगेचच 3 महिन्यात त्यात तांत्रिक बिघाड निर्माण झाला. विरूध्द पक्ष 2 यांनी दुरूस्त करून दिल्यानंतर सुध्दा तो व्यवस्थित दुरूस्त झालेला नव्हता.
4. मे-2012 मध्ये तक्रारकर्तीच्या रेफ्रीजरेटरने काम करणे बंद केले. विरूध्द पक्ष 2 यांच्याकडे वारंवार तक्रारी केल्यानंतर विरूध्द पक्ष 2 यांनी सदर रेफ्रीजरेटर दिनांक 24/05/2012 रोजी दुरूस्त करून दिला व रू. 1,720/- दुरूस्ती खर्च तक्रारकर्तीकडून वॉरन्टी कालावधीमध्ये सुध्दा वसूल केला.
5. जानेवारी 2013 मध्ये तक्रारकर्तीच्या रेफ्रीजरेटरने काम करणे बंद केले. तक्रारकर्तीने पुन्हा विरूध्द पक्ष 3 यांच्याकडे दुरूस्तीककरिता विनंती केली व विरूद पक्ष 3 यांनी दिनांक 15/01/2013 रोजी सदर रेफ्रीजरेटर दुरूस्त करून दिला व रू. 786/- चे बिल तक्रारकर्तीकडून वसूल केले.
6. सदर रेफ्रीजरेटर दुरूस्त केल्यानंतर 2-3 महिन्याने पुन्हा तक्रारकर्तीच्या रेफ्रीजरेटरने अचानक काम करणे बंद केले. त्यामुळे तक्रारकर्तीने विरूध्द पक्ष 1 व 2 यांच्याकडे रेफ्रीजरेटर दुरूस्तीबाबतची तक्रार नोंदविली. विरूध्द पक्ष 1 व 2 यांच्या निर्देशाप्रमाणे तक्रारकर्तीने तिचा रेफ्रीजरेटर दिनांक 15/05/2013 रोजी विरूध्द पक्ष 3 यांच्याकडे दुरूस्तीकरिता ठेवला व तो आजतागायत विरूध्द पक्ष 3 यांच्याच ताब्यात असून दुरूस्त करून तक्रारकर्तीस दिलेला नाही. गोदरेज कंपनीच्या सदरहू रेफ्रीजरेटरमध्ये उत्पादन दोष असून तो दुरूस्त केल्या जाऊ शकत नाही असे विरूध्द पक्ष 3 यांनी तक्रारकर्तीला सांगितल्याचे तक्रारकर्तीने तक्रारीत नमूद केले आहे.
7. तक्रारकर्तीच्या रेफ्रीजरेटरमध्ये विकत घेतल्यापासून उत्पादन दोष असल्यामुळे विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी तो बदलून नवीन द्यावा याकरिता तक्रारकर्तीने विरूध्द पक्ष 1 व 2 यांच्याकडे वारंवार विनंती करूनही विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्तीस कुठलीही दाद न दिल्यामुळे तक्रारकर्तीने सदरहू तक्रार Cause of action दिनांक 15/05/2013 रोजी निर्माण झाल्यापासून मुदतीचे आंत नुकसानभरपाई मिळण्यासाठी दाखल केली आहे.
8. तक्रारकर्तीची तक्रार दिनांक 25/07/2014 रोजी मंचात दाखल करून घेतल्यानंतर विरूध्द पक्ष यांना दिनांक 28/07/2014 रोजी मंचामार्फत नोटीसेस बजावण्यात आल्या.
9. विरूध्द पक्ष 1 ते 3 यांना नोटीस मिळूनही सदरहू प्रकरणात ते मंचासमक्ष हजर झाले नाहीत अथवा त्यांचा लेखी जबाब सुध्दा त्यांनी सदरहू प्रकरणात दाखल केला नाही. त्यामुळे त्यांच्याविरूध्द प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश दिनांक 20/10/2014 रोजी मंचाद्वारे पारित करण्यात आला.
10. तक्रारकर्तीने तक्रारीसोबत विरूध्द पक्ष 2 यांनी दिनांक 31/10/2008 रोजी दिलेले बिल पृष्ठ क्र. 15 वर दाखल केले असून विरूध्द पक्ष 2 यांचे Delivery Challan पृष्ठ क्र. 16 वर दाखल केले आहे. तसेच विरूध्द पक्ष 3 यांचे दिनांक 15/01/2013 रोजीचे रेफ्रीजरेटर दुरूस्तीचे बिल पृष्ठ क्र. 17 वर, विरूध्द पक्ष 3 यांचा दिनांक 13/05/2013 रोजीचा मेमो पृष्ठ क्र. 18 वर, तक्रारकर्तीने विरूध्द पक्ष यांना दिलेली नोटीस पृष्ठ क्र. 19 वर, पोस्टाच्या पोचपावत्या पृष्ठ क्र. 21 वर, विरूध्द पक्ष यांना वकिलामार्फत पाठविलेली कायदेशीर नोटीस पृष्ठ क्र. 22 वर, पोस्टाच्या पावत्या पृष्ठ 24 वर याप्रमाणे कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
11. तक्रारकर्तीचे वकील ऍडृ एस. बी. राजनकर यांनी असा युक्तिवाद केला की, तक्रारकर्तीच्या रेफ्रीजरेटरमध्ये उत्पादन दोष असल्यामुळे तो दर 2-3 महिन्यानंतर बंद पडत होता. विरूध्द पक्ष यांनी वारंवार प्रयत्न करून सुध्दा त्यातील दोष दूर न होऊ शकल्यामुळे विरूध्द पक्ष 1 यांच्या सांगण्यावरून सदरहू रेफ्रीजरेटर विरूध्द पक्ष 3 यांच्याकडे दुरूस्तीकरिता ठेवण्यात आला. तथापि तो दुरूस्त न होऊ शकल्यामुळे तक्रारकर्तीने विरूध्द पक्ष यांना तो बदलून त्याऐवजी नवीन रेफ्रीजरेटर देण्याची वेळोवेळी विनंती केली. परंतु विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्तीच्या विनंतीची कुठलीही दखल न घेतल्यामुळे तक्रारकर्तीला मानसिक त्रास सहन करावा लागला.
12. तक्रारकर्तीचा तक्रारअर्ज, तक्रारीसोबत दाखल केलेली कागदपत्रे व तक्रारकर्तीच्या वकिलांचा तोंडी युक्तिवाद यावरून खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दे | निर्णय |
1. | तक्रारकर्तीची तक्रार मंजूर होण्यास पात्र आहे काय? | होय |
2. | या तक्रारीचा अंतिम आदेश काय? | कारणमिमांसेप्रमाणे |
- कारणमिमांसा –
13. तक्रारकर्तीने विरूध्द पक्ष 2 यांचेकडून गोदरेज रेफ्रीजरेटर Model No. 3002 दिनांक 31/10/2008 रोजी बिल क्रमांक 78 नुसार विकत घेतल्याबद्दलचा कॅश मेमो विरूध्द पक्ष 2 यांच्या सहीनिशी सदरहू प्रकरणात पृष्ठ क्र. 15 वर दाखल केलेला असल्यामुळे तक्रारकर्तीने विरूध्द पक्ष 2 यांच्याकडून रेफ्रीजरेटर खरेदी केला हे सिध्द होते.
14. तक्रारकर्तीचा रेफ्रीजरेटर खरेदी केल्यापासून दर 2-3 महिन्याने बंद स्थितीत राहात असल्यामुळे दिनांक 24/05/2012 रोजी व दिनांक 15/01/2013 रोजी तक्रारकर्तीने दुरूस्त करून घेतल्यानंतरही तो सतत बंद राहात होता. तक्रारकर्तीने दिनांक 24/05/2012 व दिनांक 15/01/2013 रोजीची बिले ज्याचा क्रमांक 24 व 589 आहे, ती सदरहू प्रकरणात दाखल केलेली आहेत. तक्रारकर्तीचा रेफ्रीजरेटर दिनांक 13/05/2013 रोजी विरूध्द पक्ष 3 यांच्याकडे दुरूस्तीकरिता देण्यात आला व तो विरूध्द पक्ष 3 यांच्या ताब्यात असल्याबद्दलचा मेमो क्रमांक 157 सदरहू प्रकरणात दाखल केलेला आहे. तक्रारकर्तीने विरूध्द पक्ष यांना दिनांक 13/04/2013 ला पाठविलेली नोटीस दिनांक 17/04/2013 ला विरूध्द पक्ष यांना मिळाल्याबद्दलची पोचपावती सदरहू प्रकरणात पृष्ठ क्र. 21 वर दाखल केलेली आहे. तसेच तक्रारकर्तीने दिनांक 16/07/2013 रोजी वकिलामार्फत पाठविलेली कायदेशीर नोटीस विरूध्द पक्ष यांना दिनांक 20/07/2013 रोजी मिळाल्याबाबतची पोचपावती तक्रारकर्तीने सदरहू प्रकरणात पृष्ठ क्र. 24 वर दाखल केलेली आहे.
15. तक्रारकर्तीने वेळोवेळी रेफ्रीजरेटर दुरूस्तीसंबंधी केलेल्या तक्रारीचे निराकरण करण्यात विरूध्द पक्ष असमर्थ ठरल्यामुळे तक्रारकर्तीच्या रेफ्रीजरेटरमध्ये उत्पादन दोष आहे हे सिध्द होते. तक्रारकर्तीच्या रेफ्रीजरेटरमधील दोष हा Continuous, Unremovable असल्यामुळे व तो रेफ्रीजरेटर तक्रारकर्तीच्या वापरण्यायोग्य न होऊ शकल्यामुळे तक्रारकर्तीच्या रेफ्रीजरेटरमध्ये उत्पादन दोष आहे हे तक्रारकर्तीचे म्हणणे तक्रारकर्तीने दाखल केलेली रेफ्रीजरेटर दुरूस्तीची बिले व वेळावेळी केलेली तोंडी व लेखी तक्रार यावरून दूर न होऊ शकणारा दोष असल्यामुळे आणि विरूध्द पक्ष यांनी त्याची दखल न घेतल्यामुळे विरूध्द पक्ष यांची कृती ही निश्चितच सेवेतील त्रुटी या सदराखाली मोडत असल्यामुळे तक्रारकर्तीची तक्रार मंजूर होण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे.
करिता खालील आदेश.
-// अंतिम आदेश //-
1. तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. विरूध्द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्तीला विकलेला सदोष रेफ्रीजरेटर बदलून त्याऐवजी गोदरेज कंपनीचा त्याच क्षमतेचा नवीन रेफ्रीजरेटर द्यावा.
3. विरूध्द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्तीला झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई म्हणून रू. 5,000/- तक्रारकर्तीला द्यावे.
4. विरूध्द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, या तक्रारीचा खर्च म्हणून त्यांनी तक्रारकर्तीला रू. 5,000/- द्यावे.
5. विरूध्द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी या आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसांचे आंत करावे.
6. विरूध्द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी उपरोक्त आदेश क्र. 2, 3, 4 चे पालन संयुक्तिक किंवा वैयक्तिकरित्या करावे.
7. विरूध्द पक्ष 3 यांचेविरूध्द कुठलाही आदेश नाही.