नि का ल प त्र:- (श्री. दिनेश एस. गवळी, सदस्य) (दि . 15-03-2014)
(1) प्रस्तुतची तक्रार तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे वि. प. यांनी सेवेत त्रुटी ठेवलेमुळे नुकसान भरपाई मिळणेसाठी दाखल केली आहे.
प्रस्तुत तक्रार अर्ज स्विकृत करुन वि.प. यांना नोटीसीचा आदेश झाला. वि.प. हे त्यांचे वकिलांमार्फत हजर झाले. वि.प. नं. 1 यांनी लेखी म्हणणे दाखल केले. वि.प. नं. 2 यांनी पुरसीस दाखल करुन वि.प. नं. 1 यांनी दिलेले म्हणणे हेच वि.प. नं. 2 यांचे म्हणणे समजणेत यावे अशी अॅडॉप्शन पुरसीस दाखल केली. उभय वकिलांचा अंतिम युक्तीवाद ऐकला.
(2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की,
वि.प. नं. 1 घरगुती वापराच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची उत्पादक कंपनी असून वि.प. नं. 2 हे सदर कंपनीचे अधिकृत वितरक आहेत. तक्रारदार यांनी वि.प. नं. 2 यांचेकडून वि.प. नं. 1 कंपनीने उत्पादित केलेला गोदरेज रेफ्रीजरेटर मॉडेल नं. 2 GDE- 19 D 54 हा दि. 06-10-2011 रोजी खरेदी केला. रेफ्रीजरेटरच्या खरेदीबाबत तक्रारदारांना वि.प. नं. 2 यांनी बिल व वॉरंटी कार्ड भरुन दिलेले आहे. तक्रारदारांनी वि.प. कडून खरेदी केलेला रेफ्रीजरेटर सुरुवातीपासूनच व्यवस्थित काम करीत नव्हता. त्याबाबत तक्रारदारांनी वेळोवेळी तोंडी तक्रारी वि. प. क्र. 2 यांचेकडे दिलेल्या आहेत. दि. 06-02-2010 रोजीचे रात्री तक्रारदार व कुटूंबिय हे रात्रीचे जेवण करुन झोपी गेले असता म्हणजेच दि. 07-02-2012 रोजी 00.30 वाजता वि.प. कडून खरेदी केलेल्या फ्रीजमधून धूर येत असलेचे तक्रारदार यांचे मुलगा रोहनने पाहिले व रेफ्रीजरेटरमधून जोरात धूर येत होता. व रेफ्रीजरेटरला आग लागली म्हणून तक्रारदार व अन्य कुटूंबिय जीवितहानी होऊ नये म्हणून ते पळत घराबाहेर आले. रेफ्रीजरेटरच्या लागलेल्या आगीत तक्रारदार यांचे कौलारु घर, त्यामधील लाकडी बडोदे, कैच्च्या, इलेक्ट्रीक वस्तू, धान्य, कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू व घरगुती वापरातील भांडी, कपडे व रोख रक्कम इत्यादी वस्तू आगीत जळून खाक झाले. त्यामुळे तक्रारदारांचे दोन ते अडीच लाखाचे नुकसान झाले.
तक्रारदार त्यांचे तक्रारीत पुढे नमूद करतात, सदर जळीताबद्दल तक्रारदार यांचे गल्लीतील राजू मोरबाळे यांनी कोल्हापूर महानगरपालिकेचे अग्नीशामक दलाला वर्दी दिली. व सदर वर्दीप्रमाणे अग्नीशामक दलाचे कर्मचारी पाण्याचा अग्नीशामक घेऊन जळीताचे ठिकाणी आग विझवली. सदर घटनेची तक्रारदार यांनी दि. 08-02-2012 रोजी जुना राजवाडा पोलिस स्टेशनला वर्दी दिली. व त्यानंतर त्याचदिवशी घटना स्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर तक्रारदारांनी दि. 08-02-2012 रोजी वि.प. यांचेकडे तक्रार अर्ज दिला व वि.प. नं. 1 यांनी दि. 15-02-2012 रोजी उत्तर पाठवले व त्यामध्ये तक्रारदारांनी रेफ्रीजरेटर खरेदी केलेचे मान्य व कबूल केले आहे. व त्यानंतर दि. 02-03-2012 रोजी वि.प. यांचेकडे तक्रार केली असता वि.प. नं. 1 नी रेफ्रीजरेटर खरेदी केलेचे मान्य केले असून नुकसानभरपाई देणेचे नाकारलेले आहे. सदरची घटना ही रेफ्रीजरेटरमधील असलेल्या तांत्रिक बिघाडामुळे घडली असून त्यामुळे तक्रारदारांचे घर जळाले आहे. व वि.प. नुकसान भरपाई देणेचे टाळाटाळ करीत आहे. सबब, तक्रारदार यांचे घर, त्यातील लाकडी साहित्य, जीवनाश्यक वस्तू, इलेक्ट्रीक, इलेक्ट्रॉनिक वस्तू, भांडी, कपडे, रोख रक्कम, धान्य इत्यादी जळीत झालेमुळे रक्कम रु. 1,86,350/- व रेफ्रीजरेटरची किंमत रु. 11,800/- व तक्रारदार यांचे घर जळाले असलेमुळे त्यांना दुस-यांच्या घरी आश्रय घ्यावा लागला व दुरुस्त करणेसाठी रु. 50,000/- व तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रु. 25,000/- व तक्रारीचे खर्चापोटी रु. 15,000/- अशी एकूण रक्कम रु. 2,88,150/- वि.प. यांचेकडून मिळावेत अशी तक्रारदारांनी तक्रार अर्जात विनंती केली आहे.
(3) तक्रारदारांनी तक्रार अर्जासोबत दि. 13-04-2012 रोजी अ.क्र. 1 कडे दि. 6-10-2011 तक्रारदार यांनी नकाते एंटरप्राईजेस यांचेकडून फ्रीज घेतलेबाबत पावती, अ.क्र. 2 कडे दि. 6-10-2011 रोजीची फ्रीजचे वॉरंटी कार्ड, अ.क्र. 3 कडे अग्नी निवारण दल कोल्हापूर महानगरपालिका यांचा रिपोर्ट दि. 6-02-2012, अ.क्र. 4 व 5 कडे दि. 8-02-2012 रोजीचा वर्दी जबाब, व पंचनामा, अ.क्र. 6 कडे मिलिंद चव्हाण, इंजिनिअर यांचा रिपोर्ट दि. 7-02-2012, अ.क्र. 7,8, च 9 कडे तक्रारदारांनी गोदरेज कंपनीस पाठविलेले पत्र अनुक्रमे दि. 7-02-2012, 22-02-2012 व 2-03-2012, अ.क्र. 10 कडे गोदरेज कंपनीने तक्रारदार यांना दिलेले उत्तर दि. 15-02-2012 , अ.क्र. 11 कडे गोदरंज कंपनीने तक्रारदारांना दिलेले उत्तर, दि 15-03-2012 व अ. क्र. 12 ते 17 फोटो दि. 15-03-2012 इत्यादी कागदपत्रे तसेच तक्रारदारांचे शपथपत्र दाखल केलेले आहे.
(4) वि.प. 1 यांनी तक्रारदारांच्या तक्रारीस ता. 06-08-2012 रोजी म्हणणे दाखल केले आहे. त्यामध्ये यांनी प्रस्तुतची तक्रार खोटी व चुकीची असून कायद्याने चालणेस पात्र नाही. सदरच्या तक्रारीस मिसजॉईंडर ऑफ पार्टीज या तत्वाची बाधा येते. प्रस्तुतचे तक्रारदार हे मे. मंचासमोर स्वच्छ हाताने आलेले नाहीत. सबब, प्रस्तुतची तक्रार नामंजूर करावी.
वि.प. त्यांचे म्हणण्यामध्ये पुढे असे कथन करतात की, तक्रार अर्जातील परिच्छेद 1 व 2 मधील कथनाबाबत वाद नाही. तथापि, तक्रार अर्जातील कलम 3 मध्ये सुरुवातीस कथन केले आहे की, रेफ्रीजरेटर व्यवस्थित चालू नव्हता. तक्रारदारांनी वेळच्या वेळी तक्रार केली इत्यादी बाबतचा मजकूर यांतील वि.प. यांना मान्य व कबूल नाही. , प्रस्तुतच्या घटने पुर्वी सदरचा रेफ्रीजरेटर दि. 6-10-2011 रोजी पाच महिन्यापूर्वी तक्रारदारास विकला होता. सदरच्या पाच महिन्याच्या काळामध्ये तक्रारदारांनी प्रस्तुत रेफ्रीजरेटरबाबत कोणतीही तक्रार केली नाही. त्याचा अर्थ असा की, सदर रेफ्रीजरेटरमध्ये उत्पादित दोष नव्हता. किंवा त्याचे कार्याबाबत कोणताही दोष नव्हता. त्यामुळे मशिनमध्ये स्फोट होऊन आग लागली ते कल्पनेपलीकडील आहे त्यामुळे यातील वि.प. यांना जबाबदार धरता येणार नाही. वॉरंटी कार्डमधील अ.क्र. 4 ते 7 मधील अटी व शर्ती प्रमाणे सदरचे फ्रीज वापरताना ग्राहकाने योग्य ती काळजी घेतली पाहिजे. त्याअनुषंगाने वॉरंटी कार्डमध्ये सुचना नमुद केलेल्या आहेत.
प्रस्तुत तक्रार अर्जात नमूद रिफ्रीजरेटर यास बाहय बाबीमुळे म्हणजेच उच्च दाब (High Voltage) loose connection, शॉर्ट सर्कीट, हायजीन्स इत्यादीबाबतीत तक्रारदाराने योग्य ती काळजी न घेतलेने सदरची आग लागलेली असून मशिनमधील (mechanical fault) तांत्रिक दोषांमुळे अथवा वि.प. चे चुकीमुळे फ्रीजला आग लागलेली नाही. तक्रारदारांनी सदर कामी कोणती काळजी (precaution) घेतली अथवा त्याअनुषंगाने कोणत्याही तज्ञाचा पुरावा अगर वायरिंगचे वय, दाब, (Voltage) frequency इत्यादी बद्दलचा पुरावा दाखल केलेला नाही. सबब, तक्रारदाराने वॉरंटीमधील अटी व शर्तीचा भंग केलेला आहे. त्या कारणाने तक्रारदार यांना सदरची तक्रार दाखल करणेचा Locus Standee नाही.
वि.प. त्यांचे म्हणण्यात पुढे नमूद करतात की, तक्रारदाराच्या रेफ्रीजरेटरला दि. 6-02-2012 रोजी तक्रारदार व त्यांचे कुटूंबिय झोपी गेले असता दि. 7-02-2012 रोजीचे सकाळी 12.30 वाजता तक्रारदारांचे मुलाने रेफ्रीजरेटरमध्ये धूर येत होता हे पाहून सदरची बाब कुटूंबातील इतर व्यक्तीच्या लक्षात आणून दिली त्यावर उपाययोजना करण्यापूर्वीच सदरच्या फ्रीजला आग लागली त्यामुळे ते आपला जीव वाचविण्यासाठी घराबाहेर पळत सुटले इत्यादीबाबतचा मजकूर वि.प. यांनी नाकारला आहे. त्याचप्रमाणे तक्रारदाराच्या घराचे व घरातील साहित्याचे रक्कम रु. दोन ते अडीच लाखाचे नुकसान झालेले कथन, तसेच श्री. राजू मोरबाळे यांनी कोल्हापूर महानगरपालिकेचे अग्निशामकला बोलवले इत्यादीबाबतचे कथन त्याचप्रमाणे राजवाडा पोलिस स्टेशन कोल्हापूर यांचेकडे दि. 8-02-2012 रोजी केलेली तक्रार इत्यादी सर्व कथने नाकारलेली आहेत.
तक्रारदारानी तक्रार अर्जासोबत दाखल केलेली कागदपत्रे व त्यामध्ये कथन केलेली कथने ही खोटी व चुकीची आहेत. सदर कागदपत्रांवरुन तक्रारदारांनी तथाकथित आग ही फ्रीजमुळे लागली हे कारण न पटणारे असे आहे. सबब, तक्रारदार यांचेकडून वि.प. यांना कॉम्पेनसेटरी कॉस्ट रक्कम रु. 10,00,000/- मिळावी व तक्रारदाराची तक्रार खर्चासहीत नामंजूर करणेत यावी अशी विनंती केली आहे.
(5) वि. प. नं. 1 यांनी दि. 04-07-2013 रोजी यादीसोबत जनरल पॉवर्स ऑफ अॅर्टानी अलॉंगविथ रिझोल्युशन पास्ड बाय कंपनी ची कागदपत्र दाखल केले आहे.
(6) तक्रारदारांची तक्रार, तक्रारीसोबत दाखल केलेली कागदपत्रे, वि.प. यांचे म्हणणे, दाखल कागदपत्रे, व उभय पक्षकारांचे वकिलांचा युक्तीवादाचा विचार करता पुढील मुद्दे निष्कर्षासाठी उपस्थित होतात.
मुद्दे उत्तरे
1 वि.पक्ष विमा कंपनीने तक्रारदारांना द्यावयाच्या
सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ? --- होय.
2. तक्रारदार नुकसान भरपाई रक्कम मिळण्यास
पात्र आहे का ? ----होय
3. तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी
रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? -----होय.
4. आदेश काय ? ----- तक्रार अशंत: मंजूर.
कारणमीमांसा:-
मुद्दा क्र.1:
प्रस्तुत प्रकरणात तक्रारदारांनी वि.प. नं. 1 कंपनीचे उत्पादन केलेला व वि.प.नं. 2 यांचेमार्फत विक्री केलेला गोदरेज रेफ्रीजरेटर मॉडेल नं. 2 GDE- 19 D 54 हा दि. 06-10-2011 रोज खरेदी केलेला होता. सदरची बाब वि.प. यांना मान्य आहे. तक्रारदारांनी सदरचा घेतलेला रेफ्रीजरेलला दि. 7-02-2012 रोजी पहाटे 00.30 वाजता धुर येत असलेचे तक्रारदारांचे मुलगा रोहन यांनी पाहिले त्याने तक्रारदारांना बोलावून घेतले. यातील तक्रारदार यांनी त्याबाबत कांही उपाययोजना करणेपूर्वीच क्षणार्धात रेफ्रीजरेटला आग लागली म्हणून तक्रारदार व अन्य कुटूंबिय जीवितहानी होऊ नये म्हणून घरातून बाहे पळत आले. सदर लागलेल्या आगीमुळे तक्रारदाराचे घर, लाकडी साहित्य, जीवनावश्यक वस्तू, भांडी, कपडे, रोख रक्कम, धान्य जळून नुकसान झाले. करिता नुकसान भरपाई मिळणेसाठी सदरचा तक्रार अर्ज दाखल केला आहे. यातील वि.प. यांनी तक्रारदाराने सदरचा रेफ्रीजरेटर हा दि. 6-10-2011 रोजी घेतला असून सदरची आगीची घटना रेफ्रीजरेटर खरेदी केलेनंतर 5 महिनेने झालेली आहे. त्यामुळे सदरचे मशिनमध्ये कोणताही उत्पादित दोष नव्हता असे कथन केले आहे त्याचप्रमाणे सदरची आग ही तक्रारदाराचे घरी वायरिंगचे शॉर्ट सर्किट होऊन झाली असलेने तक्रारदार तक्रार अर्जात नमुद केलेले नुकसानीस वि.प. जबाबदार नाहीत असे म्हणणे वि.प. यांनी दिलेले आहे. सबब, प्रस्तुत कामी तक्रारदारांचे घरी दि. 7-02-2012 रोजी वि.प. यांचेकडून खरेदी केलेल्या रेफ्रीजरेट ला आग लागून तक्रारदारांचे घराचे वस्तु व रेफ्रीजरेटर चे नुकसान झाले का ? हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो. सदर मुद्दयांचे अनुषंगाने या मंचाने तक्रारदाराने दाखल केलेली अ.क्र. 1 ते 10 कडे सर्व कागदपत्रांचे बारकाईने अवलोकन केले असता त्यामधील अ.क्र. 4 कडील दि. 8-02-2012 रोजीचा वर्दी जबाब पाहिला असता सदची वर्दी यातील तक्रारदारांनी दिली असून त्यामध्ये त्यांनी दि. 7-02-2012 रोजी रोजी 12.30 वा. सुमारास मोठा मुलगा रोहन यांनी आम्ही झोपले ठिकाणी येऊन फ्रीज मधून धुर येत आहे असे सांगितले. आम्ही खाली आलेवर पाहिले असता फ्रीजमधून जोरात धूर येत होता त्यावेळी आमचेसमोरच फ्रीजला अचानक आग लागून मोठा भडका उडालेने आम्ही सर्वजण घरातून पळत बाहेर आलो. फायर ब्रिगेडला फोन करुन कळविले त्यांनी येवून आग विझवली त्यानंतर जावून पाहिले असता घरातील फ्रीज, दोन फॅन, लाकडी बडोदे, कपडे, अंथरुण, पांघरुण, प्रांपचिक भांडी, साहित्य, इलेक्ट्रीक वायरी जळून खाक झालेले दिसले. सदर कामी अंदाजे रु. 20,000/- चे नुकसान झालेले आहे इत्यादी स्वरुपाचा मजकूर आहे. अ.क्र. 5 कडील दि. 8-02-2012 रोजीचा पंचनामा पाहिला असता सदरचा पंचनामामध्ये देखील वर नमुद मजकूर नमुद आहे. त्यावरती दोन पंचाच्या सहया आहेत. सदरचा पंचनामा जुना राजवाडा पोलिस स्टेशन यांनी केलेचे दिसून येते. अ.क्र. 12 ते 17 कडील दाखल केलेले रंगीत फोटो पाहिले असता त्यामध्ये तक्रारदारांचे घरातील वस्तु जळालेचे दिसून येते. तथापि यातील वि.प. यांनी सदरची आग ही रेफ्रीजरेटर मध्ये दोष असल्याने लागलेली नाही असे कथन केलेले आहे. सदरची आग ही बाहयबाबीमुळे उच्च दाब, लुज वायरिंग, शॉर्ट सर्कीट इत्यादी कारणामुळे लागलेली असून तक्रारदारांनी वॉरंटी कार्ड मधील अटी व शर्तीप्रमाणे अथवा सुचनेप्रमाणे योग्य ती काळजी घेतलेली नाही हे वि.प. यांनी शाबीत केलेले नाही. किंवा त्याअनुषंगाने कोणताही निर्णायक पुरावा या कामी दाखल केलेला नाही. सबब, वर नमुद सर्व बाबीचा विचार करता यातील तक्रारदाराने दाखल केलेल्या कागदपत्रावरुन त्यांच्या घरातील रेफ्रीजरेटरला आग लागून भडका होऊन घराचे व घरातील साहित्याचे नुकसान झाले आहे हे स्पष्ट होते. सबब, वि.प. यांनी तक्रारदार यांना सदोष रेफ्रीजरेटर देवून सेवेत त्रुटी केली आहे या निष्कर्षास हे मंच येत आहे. सबब, मुद्दा क्र. 1 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.2:
वर कलम 1 मधील विस्तृत विवेचनाचा विचार करता वि. प. क्र. 1 यांनी सेवेत त्रुटी ठेवलेने तक्रारदार हे नुकसानभरपाई मिळणेस पात्र आहेत. तथापि, तक्रारदारांनी तक्रार अर्जात कलम 11 मधील दिलेला नुकसान भरपाईचा तपशिल पाहिला असता सदर तपशिलमध्ये नमूद केलेला तक्रारदारांची घर व इतर साहित्याकरिता मागितलेल्या नुकसानभरपाई याचा विचार करता सदर नुकसानभरपाईचे अनुषंगाने तक्रारदारांनी मिलिंद चव्हाण इंजिनिअर यांनी दि. 7-02-2012 रोजीचा जळीत साहित्याबाबतचा दाखला दाखल केलेला आहे. तथापि त्याअनुषंगाने त्यांचे पुराव्याचे शपथपत्र सदर कामी दाखल केलेले नाही. तक्रारदारांनी तक्रार अर्जासोबत दाखल केलेले वर्दी जबाब व पंचनाम्यामध्ये घरातील साहित्याचे नुकसान रु. 20,000/- नमुद केले आहे. यावरुन तक्रारदार सदर वर नमुद जळीत साहित्य, वस्तुबाबत रक्कम रु. 20,000/- मिळणेस तसेच रेफ्रीजरेटर ची किंमत रक्कम रु. 11,800/- अशी एकूण रक्कम रु. 31,800/- व सदर रक्कमेवर तक्रार दाखल तारखेपासून दि. 13-04-2012 पासून द.सा.द.शे. 9 % प्रमाणे नुकसानभरपाई रक्कम मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षास हे मंच येत आहे. सबब, मुद्दा क्र. 2 उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र. 3 :
वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेने तक्रारदारांना प्रस्तुतची तक्रार दाखल करावी लागली. त्यामुळे त्यांना मानसिक त्रास झाला तसेच त्यांना सदरची तक्रार दाखल करण्यासाठी खर्च करावा लागला आहे. त्यामुळे तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 3,000/- व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु. 2,000/- मिळण्यास पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, मुद्दा क्र. 3 उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र. 4 : सबब, मंच या प्रकरणी पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
1. तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करणेत येते.
2. वि. पक्ष क्र. 1 यांनी तक्रारदारांना नुकसानभरपाईची रक्कम रु. 31,800/- (अक्षरी रुपये एकतीस हजार आठशे फक्त) अदा करावी व सदर रक्कमेवर तक्रार दाखल तारीख दि. 13-04-2012 पासून ते संपूर्ण रक्कम मिळोपावेतो द.सा.द.शे. 9 % प्रमाणे व्याज द्यावे.
3वि.पक्ष क्र. 1 यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 3,000/-(अक्षरी रुपये तीन हजार फक्त) व तक्रारीचा खर्च रक्कम रु. 2,000/- (अक्षरी रुपये दोन हजार फक्त ) अदा करावेत.
4. वरील आदेशाची प्रमाणित प्रत मिळालेपासून वि.प. यांनी 30 दिवसांचे आत आदेशाची पूर्तता करावी.
5. सदर आदेशाच्या प्रमाणीत प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.