निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 28/02/2013
तक्रार नोदणी दिनांकः- 05/03/2013
तक्रार निकाल दिनांकः- 14/02/2014
कालावधी 11 महिने. 09 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्या
सौ.अनिता ओस्तवाल. M.Sc.LLB.
---------------------------------------------------------------------------------------------------------
साळुबाई भ्र.कोंडिबाराव भोसले. अर्जदार
वय 90 वर्षे. धंदा.शेती. अॅड.डि.यु.दराडे.
तर्फे सर्वअधिकारपत्र धारक.
डिगांबर कोंडिबा भोसले,
वय 65 वर्ष.धंदा शेती.
रा.इसाद ता.गंगाखेड जि.परभणी.
विरुध्द
गोदरेज अॅग्रोव्हेट लिमीटेड, गैरअर्जदार.
तर्फे व्यवस्थापक, अॅड.अजय व्यास.
फिरोजशहा नगर, पश्चिम दुतगती मार्ग,
विक्रोळी, पूर्व मुंबई 400079.
______________________________________________________________________
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटुरकर.अध्यक्ष.)
गैरअर्जदाराने अर्जदारास सदोष केळीच्या रोपाची विक्री करुन अर्जदारास झालेल्या नुकसान भरपाई गैरअर्जदाराकडून मिळणे बाबतची सदरची तक्रार आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, ती मौजे इसाद ता.गंगाखेड जि.परभणी येथील रहिवाशी असून तिला तिच्या मालकीचे सन 154 मध्ये शेती आहे. व सदरची शेती विहीरीच्या व कॅनेलच्या पाण्याने सिंचीत आहे. अर्जदाराचे म्हणणे की, ती वयोवृध्द आहे तिचा व्यवहार व शेती तिचा मुलगा डिगांबर भोसले करतो, ती वयोवृध्द असले कारणाने न्यायालयात येवु शकत नाही, म्हणून सर्वाधिकार पत्राव्दारे सदरची तक्रार दाखल करण्याचे अधिकार डिगांबर भोसले यास देण्यात आले आहेत.
अर्जदाराचे म्हणणे की, तिच्या मालकीच्या सदर शेतामध्ये केळीचे पीक घेण्यासाठी सन 2011 ते 2012 या वर्षात शेतीमध्ये सर्व तयारी केली. अर्जदार ही प्रगतशील शेतकरी असले कारणाने उतिसंवर्धीत केळीचे लागवड करण्याचे ठरविले व सदरच्या शेतामधील 3 ½ एकर जमीनीची निवड केली. व त्या प्रमाणे गैरअर्जदार कंपनीची शाखा मौजे कामठा ता. अर्धापूर जि.नांदेड यांचेकडून उतिसंवंर्धीत केळीची 4500 रोपटी ग्रँड 9 या वाणाची विकत घेतली व त्यासाठी अर्जदारास 49,500/- रु. खर्च आला व त्याची रितसर पावती गैरअर्जदाराच्या सदर शाखेकडून दिनांक 04/08/2011 रोजी घेतली. व सदरचे रोपटे अर्जदारास दिनांक 26/08/2011 रोजी मिळाले.
अर्जदाराचे म्हणणे की, सदरची रोपटी खरेदी केल्यानंतर अर्जदाराने तिच्या सदरच्या शेतात 4500 रोपटयाची लागवड प्रस्तावित अंतर ठेवुन केली व त्यास खताची व्यवस्थीत मात्रा व पाण्याचा पाळया दिल्या.
अर्जदाराचे म्हणणे की, केळीची रोपटी लागवड केल्यानंतर साधारणः 7 ते 8 महिन्यानंतर तिच्या असे लक्षात आले की, गैरअर्जदाराने पुरवीलेल्या केळीच्या वाणात उतिसंवर्धीत केळीची लक्षणे दिसत नव्हती, कांही झाडांची उंची जास्त व कांही झाडांची उंची कमी दिसत होती व झाडे निसवण्याचे प्रमाण हे अत्यंत मागास होते व घडयाचा आकार हा कमी जास्त होता.
अर्जदाराचे म्हणणे की, उतीसंवंर्धीत केळीच्या वाणाचे वैशिष्टये म्हणजे सर्व झाडाची समान वाढ होते, व पिकाचा कालावधी हा 10 ते 12 महिन्याचा असतो, सर्व केळी एकाच वेळा निसवतात व सर्व घडाचे आकार व वजन सारखे असते, परंतु अर्जदाराच्या शेतात गैरअर्जदारांनी पुरविलेल्या वाणामध्ये 60 टक्के झाडांमध्ये वरील वैशिष्टये आढळून आले नाही.
अर्जदाराचे म्हणणे की, सदरच्या केळीच्या रोपामधील फरक आढळल्यानंतर त्याने गैरअर्जदाराचे प्रतिनिधी श्री.घुगे यांनी दिनांक 5 सप्टेंबर 2012 रोजी अर्जदाराच्या शेतात येवुन पहाणी केली व पिकामध्ये भेसळ असल्याचे कबुल केले व त्यांच्या वरिष्ठ कार्यालयास कळवितो असे श्री.घुगे यांनी अर्जदारास म्हंटले, परंतु त्यानंतर गैरअर्जदाराकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, अर्जदाराचे म्हणणे की, सदर घटनेच्या माहिती बाबत त्यांनी दिनांक 01 ऑक्टोबर 2012 रोजी वकिला मार्फत गैरअर्जदारास नोटीस पाठवुन नुकसान भरपाईची मागणी केली व सदरची नोटीस गैरअर्जदारास प्राप्त झाल्यानंतर त्यांनी दिनांक 11/10/2012 रोजी अर्जदारास नोटीसीचे उत्तर दिले व नोटीसी मधील मजकूर खोटे आहेत असे लिहिले.
त्यानंतर अर्जदाराने दिनांक 19/10/2012 रोजी तालुका कृषी अधिकारी गंगाखेड यांचेकडे रितसर तक्रार दाखल केली, त्यानुसार दिनरांक 16/11/2012 रोजी तालुका कृषी अधिकारी गंगाखेड कृषी अधिकारी पंचायत समिती गंगाखेड व क्षेत्र अधिकारी महाबीज यांनी अर्जदाराच्या शेतामध्ये येवुन प्रत्यक्ष पहाणी पंचनामा केला व त्याबाबतचा अहवाल अर्जदारास दिला. सदरच्या अहवाला मध्ये 60 टक्के पेक्षा अधीक झाडामध्ये भेसळ असून उतीसंवर्धीत वाणाची वैशिष्टये आढळून येत नसल्याची माहिती अहवाला मध्ये दिली.
अर्जदाराचे म्हणणे की, सदर शेतामध्ये एका घडाचे 35 किलो वजन या प्रमाणे 4500 झाडाचे मिळून 1,57,500 किलोग्रॅम म्हणजे 1575 क्विंटल उत्पन्न मिळाले असते, परंतु सदोष रोपामुळे अर्जदाराचे 60 टक्के नुकसान झाले. म्हणजेच अर्जदाराचे 945 क्विंटल उत्पन्न नुकसान झाले, त्यामुळे अर्जदारास 17 महिन्यापर्यंत अडकुन रहावे लागले. अर्जदाराचे म्हणणे की, त्याचे खालील प्रमाणे नुकसान झाले आहे.
1) रोपांची किंमत 49,500/-
2) वाहतुक खर्च 10,000/-
3) लागवड खर्च 10,000/-
4) खत खर्च 50,000/-
5) मजुरी 10,000/-
6) 945 क्विंटल कमी उत्पन्न
निघाल्यामुळे 600/- रु.क्विंटल प्रमाणे 5,67,000/-
7) 1 वर्ष शेतात गुंतून राहिल्यामुळे नुकसान 4,00,000/-
-------------------------------
10,96,500/-
-------------------------------
अर्जदाराचे म्हणणे की, त्याचे सदोष केळीच्या रोपामुळे अर्जदारास अपेक्षीत उत्पन्न मिळाले नाही व अर्जदारास मानसिकत्रास झाला व दावा लावणचे कारण तिच्या शेतात झाला म्हणून सदरची तक्रार मंचास चालविण्याचा अधिकार आहे व तक्रार दाखल केली आहे व मंचास विनंती केली की, सदरची तक्रार मंजूर करावी व गैरअर्जदारांना आदेश करावा की, त्याने अर्जदारास सदोष केळीच्या बेण्यामुळे झालेले नुकसान भरपाई रु. 10,96,500/- दिनांक 19/10/2012 पासून 12 टक्के व्याजासह अर्जदारास द्यावेत व तसेच मानसिक त्रासापोटी 20,000/- व तक्रार अर्ज खर्चापोटी रु. 10,000/- गैरअर्जदाराने अर्जदारास देण्याचा आदेश व्हावा.
तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 2 वर अर्जदाराने आपले शपथपत्र दाखल केले आहे.
अर्जदाराने पुराव्याबाबत नि.क्रमांक 4 वर 6 कागदपत्रे दाखल केले आहेत. ज्यामध्ये अधिकारपत्र, पावती, डिलीवरी चालन, तपासणी अहवाल, नोटीस नोटीसीचे उत्तर कागदपत्रे दाखल केली आहेत.
तक्रार अर्जास लेखी निवेदन सादर करण्यासाठी मंचातर्फे गैरअर्जदारास नोटीस काढण्यात आली, गैरअर्जदार वकिला मार्फत मंचासमोर हजर, व नि.क्रमांक 8 वर आपला लेखी जबाब सादर केला. त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, सदरची तक्रार ही खोटी व बनावटी आहे व ती खारीज होणे योग्य आहे. व तसेच गैरअर्जदाराचे म्हंणणे आहे की, सदरची तक्रार मंचास चालवण्याचा अधिकार नाही व अर्जदारास सदरची तक्रार दाखल करण्याचे कारण मंचाच्या अधिकार क्षेत्रात घडले नाही व तसेच अर्जदार वा गैरअर्जदारा मध्ये कोणताही वाद निर्माण झाल्यास हैद्राबाद येथे तक्रार दाखल करण्याचा अधिकार आहे. अर्जदाराने प्रस्तुत तक्रारी मध्ये आमच्यावर जे कांही आरोप केलेले आहे ते खोटे आहेत, गैरअर्जदाराचे म्हणणे की, टिश्यू कल्चर बनाना प्लँट (G-9) हे युनीट सध्या कंडलाकोई आर आर जिल्हा हैद्राबाद येथे आहे व आमची कंपनी या कामाकरीता सुप्रसिध्द आहे व तसेच आमची कंपनीने निर्मीत केलेले सदरचे केळीचे रोपटे आंध्रप्रदेश, कर्नाटक, गुजरात व महाराष्ट्र येथे निर्यात करते.
गैरअर्जदाराने मान्य केले आहे की, त्यांनी निर्मीत केलेले टिश्यूकल्चर केळीचे ( G-9) हे रोपटे अर्जदाराने खरेदी केले होते व त्याबद्दल खरेदी केलेली पावती आमच्या कंपनीने अर्जदारास केलेली आहे व तसेच त्यांचे म्हणणे की, त्यांनी अर्जदारास विक्री केलेले केळीचे रोपे त्याच्या शेतात लावली या बद्दल अर्जदारांनी सिध्द करावे.
गैरअर्जदाराचे म्हणणे की, त्याने अर्जदारास केळीचे रोपे ऑगस्ट 2011 मध्ये विक्री केले व सदरचे केळीचे उत्तम प्रतीचे होते व सदरच्या रोपाबाबत गैरअर्जदाराने NRCB त्रिची येथे सतत 20/02/2010, 11/03/2010, 19/03/2011, 05/05/2011 व 11/10/2011 ला टेस्ट केलेले आहेत. व ते एकदम चांगल्या प्रतीचे केळीचे रोपे होती.
गैरअर्जदाराचे म्हणणे की, अर्जदाराने आपल्या तक्रारी मध्ये म्हंटले की, सदर केळीची लागवड केल्यानंतर 7/8 महिन्यानंतर त्यास कळाले की, सदरची रोपटे योग्य नाहीत व कांही रोपटीची वाढ चांगली व कांही रोपटीची वाढ नाही, अर्जदाराचे हे म्हणणे खोटे आहे. कदाचित अर्जदाराने सदर रोपट्यामध्ये दुसरे रोपटे भेसळकरुन लावले असतील त्यामुळे सर्व रोपटे समान वाढली नसतील व तसेच अर्जदाराने सदरची रोपटी योग्य पध्दतीने लावली नसतील व काळजी घेतली नसले व खत मात्रा योग्य पध्दीने दिले नसतील सदरच्या केळीच्या रोपाच्या तक्रारी बाबत अर्जदाराने केव्हाही गैरअर्जदार वा त्यांच्या एजंटास अर्जदाराने माहिती दिली नाही व सदरचे घटनेची माहिती गैरअर्जदारास अर्जदाराने कायदेशिर नोटीस पाठविल्या नंतरच कळाली.
गैरअर्जदाराचे म्हणणे की, सदरच्या रोपाबाबत अर्जदाराने पहिल्यांदा शेतकी अधिका-यास का कळविले नाही ? व तसेच अर्जदाराने शेतकी अधिका-या समोर सदर केळीबाबत तक्रार केव्हा दाखल केली ? व तसेच अर्जदाराने व शेतकी अधिका-याने पंचनामा करते वेळी गैरअर्जदारास का कळविले नाही ? शेतकी अधिका-याने सदर केळीच्या रोपाची तक्रार प्राप्त झाल्यानंतर पहाणी पंचनामा करते वेळी मातीचे सँपल का घेतले नाही व लॅब कडे टेस्टींगकरीता का पाठविले नाही व तसेच शेतकी अधिका-याने सदर केळीच्या रोपाचे सँपल घेवुन टेस्टींग करीता लॅबकडे का पाठविले नाही व तसेच शेतकी अधिका-यांने पंचनामा करते वेळी कोणत्या आधारे त्यांनी तर्क काढला की सदर रोपे भेसळ होती या सर्व गोष्टींचा अर्जदाराने आपल्या तक्रारी मध्ये उल्लेख केलेला नाही.
गैरअर्जदाराचे म्हणणे की, अर्जदारास विक्री केलेल्या सदर केळीच्या रोपामध्ये कसलाही दोष नव्हता केवळ अर्जदाराने सदरची तक्रार खोटी दाखल केली आहे. शेतकी अधिका-याला मॅनेज करुन खोटा अहवाल तयार करुन घेतला जो की, कायद्याने ग्राहय धरता येत नाही.
अर्जदाराने सदरच्या केळीच्या रोपास योग्य पाणी दिली नसेल त्यामुळे झाडांची उगवण व वाढ कमी जास्त झाली असेल गैरअर्जदाराचे म्हणणे की, अर्जदाराने पाठवलेली कायदेशिर नोटीस त्याना 01/10/2012 रोजी प्राप्त झाली व नोटीसी मधील सर्व आरोप खोटे आहेत, म्हणून दिनांक 11/10/2012 रोजी अर्जदाराच्या नोटीसीस उत्तर दिले.
गैरअर्जदाराचे म्हणणे की, अर्जदाराने त्याच्या तक्रारीमध्ये एका घडाचे वजन 35 किलोग्रॅम होते हे म्हणणे योग्य नाही. गैरअर्जदाराने सदरच्या कालावधीत त्यांनी निर्मित केलेल्या सदर केळीच्या रोपाची 2 लाख केळीची रोपे विक्री केलेली आहेत, पण एकही तक्रार त्यांचेकडे आलेली नाही अर्जदाराने आपल्या केळीची रोपे योग्य प्रकारे लागवड केली नसेल वा काळजी घेतली नसेल व तसेच अर्जदाराच्या जमीनीची माती उच्च प्रतीची नसेल व तसेच केळीच्या रोपाला योग्य पध्दतीने पाणी दिले नसेल, अर्जदारास आम्ही विक्री केलेली केळीचे रोपे योग्यच होती, अर्जदाराने सदरची तक्रार खोटी दाखल केली आहे. म्हणून मंचास विनंती केली आहे की, सदरची तक्रार खारीज करण्यात यावी.
गैरअर्जदाराने लेखी जबाबाच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 9 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे.
गैरअर्जदाराने पुराव्याबाबत नि.क्रमांक 11 वर 10 कागदपत्रे दाखल
केली आहेत, ज्यामध्ये दिनांक 04/08/2011 ची पावती, 20/02/2012 चा टेस्ट रिझल्टची प्रत, 11/03/2010 चा जेनेटीक टेस्ट रिपोर्ट, 11/03/2010 चा टेस्ट रिपोर्ट, 11/03//2010 चा टेस्ट रिपोर्ट, 20/08/2011 चा टेस्टींग रिपोर्ट, 11/10/2011 चा Virus Test report, रिसर्च आर्टीकल प्रत दाखल केले आहे.
दोन्ही बाजुंच्या कैफियतीवरुन निर्णयास उपस्थित होणारे मुद्दे.
मुद्दे. उत्तर.
1 अर्जदार आपली सदरची तक्रार सिध्द करु शकतो काय ? नाही.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1.
अर्जदाराने सदरची तक्रार दाखल करण्यास त्यांच्या मुलाच्या नामे डिगांबर भोसले यांच्या हक्कात सर्वअधिकार पत्र दिले होती ही बाबत नि.क्रमांक 4/1 वर दाखल केलेल्या मुख्यत्यारनामाच्या प्रतीवरुन सिध्द होते.
अर्जदाराने गैरअर्जदाराकडून त्याच्या मौजे ईसाद ता.गंगाखेड जि. परभणी येथील शेती मध्ये लागवडीसाठी गैरअर्जदाराने निर्मीत केलेले ग्रॅंड –G-9 या वाणाची केळीचे 4500 रोपे 4 ऑगस्ट 2011 मध्ये विकत घेतली होती, ही बाब अॅडमिटेड फॅक्ट आहे. फक्त वादाचा मुद्दा हा आहे की, सदरच्या अर्जदाराने गैरअर्जदाराकडून विकत घेतलेले ग्रँड- 9 या जातीच्या 4500 रोपामध्ये भेसळ होती का नाही ?
अर्जदाराचे प्रस्तुत तक्रारी मध्ये म्हंणणे की, त्याने गैरअर्जदाराकडून घेतलेल्या 4500 केळीच्या रोपामध्ये भेसळ होती व सदरची तक्रार सिध्द करण्यासाठी पुराव्याबाबत अर्जदाराने नि.क्रमांक 4/4 वर तालुका कृषी अधिकारी गंगाखेड यानी पहाणी केलेला पंचनामा अहवाल दाखल केला आहे.
सदर अहवालाचे मंचाने अवलोकन केले असता तालुका कृषी अधिकारी गंगाखेड, कृषी अधिकारी पंचायत समिती गंगाखेड व महाबीजचे प्रतिनिधी या तिघाने दिनांक 16/11/2012 रोजी अर्जदाराचा 19/10/2012 रोजीच्या अर्जावरुन अर्जदाराच्या शेतीचे म्हणजेच स.न. 154 मधील अर्जदाराने लागवण केलेल्या केळीच्या बागेची पहाणी केली दिसून येते. सदर अहवालात त्यांने असे म्हंटले आहे की, अर्जदारास गैरअर्जदाराने पुरविलेल्या रोपामध्ये 60 टक्के पेक्षा अधीक भेसळ आहे. उतिसंवर्धीत रोपाचे जे वैशिष्टये असते उदाः रोपाची वाढ सारखी होणे, सर्व झाडे एकाच महिन्यात निसवुन येणे, केळीचे घड एकसारखे वजनाचे भरणे व सर्व बाग एका महिन्यात विक्रीस तयार होणे इ. गोष्टी अर्जदाराच्या बागे मध्ये आढळून आले नाहीत, झाडांची उंची लहान मोठे आहे. कांही झाडे निसवलेली आहेत तर कांही झाडे अद्यापही निसवलेली नाहीत, काही झाडांचे घड मध्यम स्वरुपाची आहेत, तर कांही झाडांचे घड अतिशय लहान आहेत, यावरुन अर्जदाराच्या बागेमध्ये भेसळ असल्याचे सिध्द होते, त्यामुळे आपल्या स.न. 154 मध्ये 60 टक्के पेक्षा अधिक भेसळ आहे. हे सिध्द होते. असा अहवाल तयार करुन कृषी अधिका-याने अर्जदारास दिला.
सदर अहवाला बाबत गैरअर्जदाराने आपल्या युक्तीवादात विरोध केला आहे. गैरअर्जदाराचे म्हणणे की, रोपांच्या गुणवत्ता किंवा भेसळी बाबतच्या तक्रारी असतील तर तालुका कृषी अधिकारी यांना चौकशी करण्याचा व अहवाल देण्याचा अधिकार नाही, रोपाच्या भेसळी बाबत चौकशी करण्याचा अधिकार फक्त जिल्हा परिषदेच्या जिल्हा कृषी अधिकारीच्या अध्यक्षते खालील जिल्हा बियाणे तक्रार निवारण समितीलाच आहे. सदर समिती शासन निर्णयानुसार आहे व त्या समिती मध्ये शास्त्रज्ञांचा समावेश आहे. याबाबत गैरअर्जदाराने नि.क्रमांक 14/1 वर शासन परिपत्रक दाखल केले आहे.सदर शासन परिपत्रक खालील प्रमाणे आहे.
विषयः बियाण्यात उगवणशक्ती कमी असणे किंवा पीक पेरणीनंतर भेसळ निघाल्याच्या
तक्रारींची चौकशी करणेबाबत.
संदर्भः आयुक्तालयाचे परिपत्रक जा.क्र. गुनियो/बियाणे/स्थ.त्र/5/92 का.66 दिनांक 27-3-
1992
वरील विषयांबाबतचे संदर्भाकिंत परिपत्रकाचे कृपया अवलोकन करावे. सदर परिपत्रकानुसार पेरलेल्या बियाण्याची उगवणशक्ती कमी आढळल्यास अथवा पीक पेरणीनंतर भेसळ निघाल्याची तक्रार प्राप्त होताच करावयाच्या कार्यवाहीबाबत सविस्तर मार्गदर्शन केलेले आहे.
दि. 1 जुलै 1998 पासून महाराष्ट्र राज्यात एक खिडकी योजना लागु करण्यात आली आहे. एक खिडकी योजनेमध्ये झालेल्या बदलानुसार सदर जिल्हास्तरीय चौकशी समितीचे पुनर्गठन करण्यात येत आहे. पुनर्गठित समितीमध्ये खालील प्रमाणे सभासद असतील.
1) कृषी विकास अधिकारी ( जि.प. )
2) तालुका कृषी अधिकारी.
3) “महाबीज” यांचे प्रतिनिधी.
4) जिल्हा बीज प्रमाणिकरण अधिकारी.
5) कृषी विद्यापीठाचे प्रतिनिधी.
6) जिल्हा परिषद सदस्य.
7) कृषी विकास अधिकारी (जि.प.) यांचे कार्यालयातील मोहीम अधिकारी
सदर चौकशी समिती उपरोलिखित नमूद केल्याप्रमाणे आपले कामकाज करतील ज्या कंपनीचे बियाणे बाबत तक्रार प्राप्त झालेली आहे, त्या बियाणे कंपनीचे प्रतिनीधी व विक्रेता यांना सदर तपासणी दौ-याचे वेळी उपस्थित रहाण्याचा सुचना देण्यात याव्यात. तपासणीनंतर साक्ष घेणेही बंधनकारक राहील. चौकशी समिती अहवाला सोबत सदर साक्षीच्या प्रती आयुक्तालयास सादर कराव्यात.
संदर्भात नमूद केलेल्या परिपत्रकातील कार्यवाहीच्या मुद्यानुसार नियुक्त
केल्या समितीने कार्यवाही करावी.
जा.क्र.गुनियो/बियाणे/1498/940/गुनि 7
दिनांकः 26/10/1998
सदरच्या परिपत्रकानुसार तालुका कृषी अधिकारी गंगाखेड यांनी अर्जदाराच्या केळीच्या शेताची पहाणी करत असतांना गैरअर्जदार कंपनीना प्रत्यक्ष पहाणी पंचनामा स्थळी हजर राहवे, अशी नोटीस दिली होती, याबाबतचा कोणताही पुरावा अर्जदाराने मंचासमोर आणला नाही व नियमा प्रमाणे पहाणीच्या वेळी समितीचे सर्व सदस्य उपस्थीत रहाणे आवश्यक आहे ते सदर पहाणी पंचनाम्याच्या वेळी दिसून येत नाही.
तसेच अर्जदाराने दाखल केलेल्या नि.क्रमांक 4/4 वरील पहाणी अहवाल योग्य वाटत नाही, कारण नि.क्रमांक 14/2 वरील शासन परिपत्रकामध्ये 6,7, 8 मध्ये खालील प्रमाणे म्हंटले आहे.
6) भेटीचा अहवाल लिहिणेबाबत.
ज्यावेळी समितीची भेट संबंधीत शेतक-यांच्या शेतास होते, त्यावेळी
सोबतच्या परिपत्रकात पूर्वी दिलेल्या सूचनांप्रमाणे आवश्यक असलेली संपूर्ण माहिती शेतक-यास विचारुन व्हावी व शेत परिस्थितीप्रमाणे अहवाल तयार करावा.
अ) शेतक-यांनी किती क्षेत्रात संबंधित जातीचे/लॉटचे बियाणे पेरले आहे.
आ) समितीने स्वैरनिवड पध्दतीने संबंधीत शेतात किती प्लॉट निवडलेली आहे
इत्यादी माहिती नकाशासह अहवालात व्यवस्थित नमूद करावी.
इ) भेसळीचे प्रमाण किती आहे व भेसळ असलेल्या झाडांची/ताटांची संख्या
किती आहे. टक्केवारी किती येते हे नमूद करावे.
ई) भेसळ असलेल्या झाडांचे/ताटांचे गुणधर्म घ्यावेत व गुणधर्माप्रमाणे
विभागणी करता येत असेल तर तशी विभागणी द्यावी.
उ) भेसळ त्याच पिकाच्या दुस-या अधिसूचित जातीची आहे किंवा ओळखू न
येणा-या इतर जातींची आहे. इत्यादी तपशील आकडेवारीसह देण्यात यावा
ऊ) किडी रोगांचा प्रादुर्भाव झालेला असल्यास कोणत्या कीड/रोगाचा किती
प्रादुर्भाव आहे ते नमूद करावे.
8) सोबतच्या परिपत्रकात नमूद केल्याप्रमाणे खालील मुद्यावर सुध्दा माहिती
घेऊन ती अहवालात नमूद करावी.
क) बियाणे खरेदीची तारीख.
ख) बियाणे पेरणीची तारीख.
ग) बियाणे परेणीची पध्दत शिफारशीप्रमाणे प्रति हेक्टरी किती बियाणे वापरणे
आवश्यक होते व प्रत्यक्षात किती बियाणे वापरले त्यामुळे अपेक्षित हेक्टरी
झाडांची संख्या तसेच बियाणेची वैध मुदत काय होती व वैध मुदतीत
नंतरसुध्दा बियाणे वापरले आहे काय ?
घ) उगवण कमी झाली असल्यास ती बियाणाच्या दोषामुळे झाली की, पेरणीच्या
पध्दतीमुळे, जमिनीच्या परिस्थितीमुळे ही कारणे नमूद करावीत.
च) पेरणीपूर्वी पाऊस, प्रत्येक दिवसाचे पावसाचे प्रमाण काय होते झालेला
पाऊस भीज पाऊस होता की, जोराचा पाऊस असल्यामुळे उगवणीवर
विपरीत परिणाम झाला ही कारणे नमूद करावीत.
छ) अनुवंशिक शुध्दते बाबत तक्रारी असल्यास शेतक-यांनी त्याच जातीचे दुसरे
लॉटचे किंवा इतर जातीचे बियाणे पिकात नांगे भरण्यासाठी टोकण केले
आहे काय, असल्यास त्याचे प्रमाण काय होते. हे प्रमाण शेतात
पडलेल्या/नांग्याच्या प्रमाणाशी जुळते आहे काय हेही पडताळून पहावे. तसेच
सदरचे बियाणे कोणत्या ठिाकणाहून केव्हा खरेदी केले याचा तपशिल
देण्यात यावा.
ज) या व्यतिरिक्त इतर आवश्यक असलेल्या सर्व मुद्यांवरची सविस्तर
माहिती अहवालात नमूद करावी.
8) समितीची भेट होऊन अहवाल तयार करण्यासाठी आवश्यक असलेली
माहिती घेतल्यानंतर अहवाल तयार करतांना समितीचे अंतिम निष्कर्ष
शेवटी देण्यात यावा.
क) निष्कर्ष स्वयंस्पष्ट असावे. उदाः बियाणाच्या दोषामुळे उगवण कमी झाली
किंवा शेत परिस्थिती जोराचा पाऊस किंवा जमीन जास्त भुसभुशीत
असल्यामुळे बियाणे खोल पेरणी केली असल्यामुळे उगवण कमी झाली.
ख) उगवणीचे टक्केवारी किती आहे या निर्धारित प्रमाणकापेक्षा किती टक्क्याने
कमी आहे किंवा प्रत्यक्षात किती टक्के आहे.
ग) अनुवंशिक शुध्दतेची तक्रार असेल तर, मूळ जातीची झाडे/ताटे किंती आहेत
व इतर (भेसळ असलेल्या ) जातींची झाडे किती आहे त्यांची टक्केवारी
किती येते. बियाणांत भेसळ असल्यामुळेच असे झाले आहे काय? हे
स्पष्टपणे नमुद करावे.
कृषी अधिका-याने अर्जदाराच्या शेतामध्ये सदरची पहाणी करते वेळी वरील शासन परिपत्रकाच्या नियमाचे पालन केल्याचे दिसून येत नाही, केवळ मोघमपणे 60 टक्के पेक्षा जास्त भेसळ असल्याचे आढळून येते असे म्हंटले आहे. त्याने एकूण किती रोपाची पहाणी केली ? एकुण किती रोपे मोठे आढळली किती रोपे लहान व किती रोपे मध्यम आढळले यांचा स्पष्टपणे अहवाला मध्ये उल्लेख केलेला दिसून येत नाही व सर्वात महत्वाची बाब म्हणजे कृषी अधिका-याने मोघमपणे स.न. 154 मध्ये पहाणी केली असे म्हंटले आहे. अर्जदाराची केळीचे रोपे किती एकर मध्ये लागवड केली व जमीन कशा प्रकारची होती याचा देखील स्प्ष्टपणे उल्लेख केलेला नाही. अर्जदाराने सदर केळीच्या रोपास खताची मात्रा किती प्रमाणात दिलेली होती, याचा देखील उल्लेख केलेला नाही, मोघमपणे 60 टक्के पेक्षा जास्त भेसळ आढळल्याचे अहवालात म्हंटले आहे, जे कायद्यान्वये सदरचा अहवाल पुराव्यात ग्राहय धरणे योग्य नाही. असे मंचास वाटते.
अर्जदाराचे म्हणणे की, गैरअर्जदाराने विक्री केलेल्या केळीच्या भेसळ रोपामुळे अर्जदारास 10,96,500/- रु. चे नुकसान झाले असे तक्रारीत परिच्छेद क्रमांक 8 मध्ये नमुद केला आहे. याबाबत अर्जदाराने त्यास वाहतुक खर्च 10,000/- लागवड खर्च 10,000/- व खतासाठी खर्च 50,000/- व मजुराचा खर्च 10,000/- झाले असे म्हंटले आहे. याबाबत अर्जदाराने कागदोपत्री ठोस पुरावा मंचासमोर आणला नाही, व तसेच त्याचे 945 क्विंटल उत्पन्न कमी निघाले व त्यामुळे त्याचे 5,67,000/- रु. चे नुकसान झाले हे म्हणणे मंचास योग्य वाटत नाही, कारण अर्जदाराने त्याच्या चांगल्या झाडांपासून एवढे उत्पन्न निघाले होते, हा देखील कागदोपत्री पुरावा मंचासमोर आणला नाही व तसेच त्याचे 1 वर्ष शेतीमध्ये गुंतवुन राहिल्यामुळे 4,00,000/- रु. चे नुकसान झाले हे म्हणणे देखील मंचास योग्य वाटत नाही, कारण सदर शेता पासून अर्जदाराचे वर्षाकाठी 4 लाख रु. चे उत्पन्न होते, याबाबत कोणताही कागदोपत्री पुरावा अर्जदाराने मंचासमोर आणला नाही.
अर्जदाराने त्याच्या शेतामध्ये लावलेल्या केळीच्या रोपात भेसळ आढळल्यामुळे नुकसान झाले व नुकसान भरपाई मिळावी म्हणून वकीला मार्फत गैरअर्जदारास नोटीस पाठविली होती, ही बाब नि.क्रमांक 4/5 वर दाखल केलेल्या नोटीसीच्या प्रतवरुन दिसून येते. सदर नोटीसीचे अवलोकन केले असता अर्जदाराने त्याचे 5 ते 6 लाख रु. चे नुकसान झाले व ते द्या असे म्हंटल्याचे दिसून येते व सदर नोटीसीस गैरअर्जदाराने आरोपाचे खंडन करुन दिनांक 11/10/2012 रोजी अर्जदारास उत्तर दिले ही बाब नि.क्रमांक 4/6 वर दाखल केलेल्या कागदपत्रावरुन दिसून येते.
अर्जदार आपली सदरची तक्रार सिध्द करण्यास पूर्णपणे असमर्थ ठरला आहे, केवळ कृषी अधिकारीच्या पहाणी अहवालावर ठाम राहून अर्जदाराने सदरची तक्रार दाखल केल्याचे दिसून येते. जे की, अयोग्य आहे. अर्जदाराने सदरच्या केळीच्या रोपामध्ये भेसळ आढळल्यानंतर त्याने Lab मध्ये तपासून घेणे आवश्यक होते, ते केले नाही.या बाबत मा.राष्ट्रीय आयोग दिल्ली III (2011) CPJ 99 (NC) रिव्हीजन पिटीशन नं. 2046/07 महिको सिडस् विरुध्द जी वैकटा सुब्बा मध्ये थोडक्यात असे म्हंटले आहे की, Consumer Protection Act, 1986 - Sections 2(1)(g), 13(1), 14(1)(d), 21(b) – Agriculture — Seeds — Defective — No laboratory test done —heavy growth of plants but no buds and flowers — Agricultural Officers visited and noticed that due to genetically failed seeds resulted in failure of crop — Alleged deficiency in service — District Forum allowed complaint — State Commission dismissed appeal — Hence revision — Investigation done after harvesting of crop which is not possible — Defects cannot be detected through visual inspections, need to be tested in laboratory —Complainant did not inform OP about failure — Onus to prove defects in seeds on complainant which he failed. सदरचा निकाल प्रस्तुत प्रकरणास लागु पडतो. तसेच मा.राष्ट्रीय आयोग दिल्ली 2013 (4) CPR 219 (NC) शमशेर सिंग विरुध्द बाजरी बिज भंडार रिव्हीजन पिटीशन नं. 2597/12 मध्ये असे म्हंटले आहे की, Based on report of one officer of Agriculture Department, it can not be stated that version of complaint is true.
सदरचा निकाल प्रस्तुत प्रकरणास तंतोतंत लागु पडतो. व तसेच मा.राष्ट्रीय आयोग दिल्ली याने 2013 (2) CPR 703 (NC) रिव्हीजन पिटीशन नं. 506/2013 बंटाराम विरुध्द जयभारत बिज कंपनी मध्ये असे म्हंटले आहे की, Low germination may be due to reasons totally external to quality of seeds. सदरचा निकाल देखील प्रस्तुत प्रकरणास लागु पडतो.
अर्जदाराने गैरअर्जदाराकडून खरेदी केलेल्या केळीच्या रोपामध्ये भेसळ होती, व त्यास 10,96,500/- रु. चे नुकसान झाले, ही बाब सिध्द करु शकला नाही.
असे मंचाचे ठाम मत आहे. म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे नकारार्थी उत्तर देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज फेटाळण्यात येत आहे.
2 तक्रारीचा खर्च ज्याचा त्यांनी सोसावा.
3 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
सौ.अनिता ओस्तवाल. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्या. मा.अध्यक्ष.