तक्रारदार ः- स्वतः
सामनेवाले ः- एकतर्फा.
(युक्तीवादाच्या वेळेस)
न्यायनिर्णय - मा. एम.वाय.मानकर, अध्यक्ष, ठिकाणः बांद्रा (पू )
न्यायनिर्णय
(दि.20/02/2018 रोजी घोषीत)
1. तक्रारदार यांनी, सामनेवाले यांनी सेवा देण्यात कसुर केल्यामूळे ही तक्रार दाखल केली. सामनेवाले यांना नोटीस पाठविण्यात आली. सामनेवाले यांना पोस्टखात्यानी नोटीसबाबत सूचना दिली. परंतू, सामनेवाले यांनी ती नोटीस स्विकारली नाही. तक्रारदार यांनी त्यानंतर चौकशी करून, सामनेवाले त्याच पत्यावर राहतात/व्यवसाय करतात याबाबत शपथपत्र सादर केले. सबब, सामनेवाले यांचेविरूध्द दि. 21/12/2016 ला प्रकरण एकतर्फा चालविण्याबाबत आदेश पारीत करण्यात आला.
2. तक्रारदारानूसार सामनेवाले ही प्रवास व यात्रेसंबधी सुविधा देणारी कंपनी आहे. त्यांनी सामनेवाले यांची सदस्यता घेतली होती. त्याकरीता तक्रारदारानी रू. 60,000/-,अदा केले होते. सामनेवाले यांनी सदस्याला एलर्इडी 22 इंचाचा व्हिडीयोकॉन टिव्ही व पाच वर्षामध्ये 30 रात्रीसाठी मोफत राहण्याची व्यवस्था पुरविण्यात आली असे भासविले होते. तसेच सामनेवाले यांचे तिनशे हून अधिक व्यवस्थापनाशी संबध आहे असे सांगीतले होते. तक्रारदारानी सामनेवाले यांच्याशी सुविधा बाबत वारंवार संपर्क केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. तक्रारदारानी त्यांना सुट्टी कालीन मुक्कामाकरीता विनंती केली. परंतू, सामनेवाले यांनी त्याचा जबाब दिला नाही. तक्रारदार यांनी जेव्हा जेव्हा सुविधेकरीता सामनेवाले यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, तो संपर्क होऊ शकला नाही व पत्रव्यवहाराला उत्तर प्राप्त झाले नाही. सामनेवाले यांच्या योजनेमध्ये सुट्टीकालीन राहण्याची व्यवस्था हॉटेलमध्ये करण्याबाबत मुख्य बाब होती व ती सुविधा सामनेवाले देण्याकरीता टाळाटाळ करीत होते व नाकारीत होते. तक्रारदारानी सामनेवाले यांच्या सूचनेप्रमाणे 15 दिवस आधी गोवा येथे सुट्टीकालीन राहण्याकरीता व्यवस्था करण्याकरीता कळविले. परंतू, सतत पाठपुरावा करून सुध्दा एक महिन्यानंतर ती व्यवस्था नाकारण्यात आली. तक्रारदारानी शिमला मनाली येथे आरक्षणा करीता विनंती केली व त्या व्यवस्थेबाबत सामनेवाले यांनी तक्रारदारांची विनंती मंजूर केली. तक्रारदार दि. 23/12/2013 ला मनाली व शिमला येथे गेले असता, त्यांच्याकरीता सामनेवाले यांनी हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था आरक्षीत केली नव्हती. सामनेवाले यांचे अधिकार श्री. कुलदिप सिंग यांना तसे कळविण्यात आले. तेव्हा श्री. कुलदिप सिंग यांनी दिलगीरी व्यक्त केली व तक्रारदार यांनी स्वतः रूम बुक करून, रक्कम अदा करण्याकरीता कळविले व ती रक्कम त्यांना परत करण्यात येईल असे सांगीतले. नाईलाजाने तक्रारदाराना रूम करिता रक्कम अदा करावी लागली. ती रक्कम सामनेवाले यांनी ब-याच दिरंगाईने व सतत पाठपुरावा केल्यानंतर परत केली. तक्रारदार यांना सामनेवाले यांच्या व्यवहारामूळे त्यांच्या कुटूंबाच्या समक्ष मानहानी सहन करावी लागली. तक्रारदारानी ही तक्रार दाखल करून भरलेली रक्कम व मानिसक त्रासासाठी रू.30,000//-,व्याजासह व इतर मागणी केली आहे.
3. तक्रारदार यांनी पुराव्याचे शपथपत्र व लेखीयुक्तीवाद सादर केला. तक्रारीसोबत आवश्यक कागदपत्रे सादर केली. तक्रारदार यांनी सामनेवाले यांना अदा केलेली रक्कम सदस्यता बाबत अटी व शर्ती व सुविधेकरीता केलेला पत्रव्यवहार दाखल केलेला आहे. तक्रारदार यांचा पुरावा अबाधीत आहे. तक्रारदार यांच्या पुराव्यावरून हे सिध्द होते की, तक्रारदार यांना सभासदत्वाबाबत प्रस्ताव देतांना हॉटेलमध्ये व्यवस्था करण्यात येईल याबाबत स्पष्टपणे नमूद केलेले आहे. तसेच दि. 12/01/2013 च्या पत्रामध्ये 22 इंची एलसीडी व्हिडीओकॉन कंपनीचा टिव्ही गिफ्ट म्हणून मिळणार आहे याबाबत नमूद आहे. परंतू, सामनेवाले यांनी ही गिफ्ट तक्रारदार यांना दिली नाही. एकाप्रकारे सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सदस्य करण्याकरीता अनुचित व्यापार पध्दत अवलंबिली असे म्हणता येईल. तसेच, ज्या सुविधा देण्याचे मान्य केले होते त्या सुविधा दिल्या नाहीत व अशा प्रकारे सेवा देण्यात कसुर केला हे स्पष्ट होते. तक्रारदारानी नमूद केलेल्या बाबीवरून त्यांना मनस्ताप व मानहानी झाल्याचे दिसून येते व ते त्याकरीता नुकसान भरपाई मिळण्यास पात्र ठरतात. सामनेवाले यांनी सेवा देण्यात कमालीची निष्क्रीयता व निष्काळजीपणा दाखविला. सबब, आमच्या मते त्यांना तक्रारदारानी भरलेली रक्कम स्वतःकडे ठेवण्याचा कोणताही अधिकार प्राप्त होत नाही.
4. वरील चर्चेनुरूप व निष्कर्षावरून आम्ही खालील आदेश पारीत करीत आहोत.
5. या मंचाचा कार्यभार पाहता व इतर प्रशासकीय कारणांमुळे ही तक्रार यापूर्वी निकालात काढता येऊ शकली नाही. सबब खालीलः-
आदेश
1. तक्रार क्र 337/2014 अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाले यांनी सेवा देण्यात कसुर केला तसेच अनुचित व्यापार पध्दत अवलंबिली असे जाहीर करण्यात येते.
3. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सभासदत्वाची रक्कम रू. 60,000/-, (साठ हजार), तसेच मानसिक व शारीरीक त्रासाकरीता रू. 20,000/-,(रूपये वीस हजार) व तक्रारीचा खर्च म्हणून रू. 5,000/-,(पाच हजार), अदा करावे. ही रक्कम दि. 31/03/2018 पर्यंत अदा करावी तसे न केल्यास दि. 01/04/2018 पासून उपरोक्त रकमेवर द.सा.द.शे 10 टक्के व्याज रक्कम अदा करे पर्यंत लागु राहील.
4.आदेशाच्या प्रती उभयपक्षांना विनामुल्य पाठविण्यात याव्या.
5. अतिरीक्त संच तक्रारदार यांना परत करण्यात यावे.
npk/-