न्या य नि र्ण य
व्दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्यक्षा
1. तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा 2019 चे कलम 34 व 35 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे—
तक्रारदार क्र.1 ही मयत दिपक बापू तगारे यांची विधवा पत्नी असून तक्रारदार क्र.2 व 3 ही मयताची अज्ञान मुले आहेत. तक्रारदार क्र.4 ही मयताची आई असून तक्रारदार क्र.5 हे वडील आहेत. मयत दिपक बापू तगारे यांचे मालकीची दुचाकी मोटरसायकल क्र. एमएच-09-एफआर-0673 होती. सदर मोटरसायकलचा विमा वि.प. यांचेकडे उतरविलेला हेाता. मयत दिपक बापू तगारे यांनी पी.ए. पॉलिसी रक्कम रु. 15,00,000/- ची वि.प. यांचेकडून जादा प्रिमियम रु. 330/- भरुन घेतला होता. मयताने घेतलेल्या पॉलिसीचा क्र. डी024919795/26102020 असून कालावधी दि. 26/10/2020 ते 25/10/2025 असा आहे. दि.20/12/2020 रोजी मयत दिपक बापू तगारे हे आपले कामावरुन सायंकाळी घरी परत आले. तक्रारदाराचे घराजवळ बांधकामासाठी दगडाचा ढिग टाकलेला होता. तेथे मयत दिपक बापू तगारे हे नमूद मोटार सायकल पार्कींग करीत होते. मयत हे सदरची मोटर सायकल फुल स्टँडवरती लावत असताना गाडी मागे ओढत असताना त्यांचा तोल गेला आणि ते दगडाच्या ढिगा-यावरती उताणे पडले व जखमी झाले. त्यांना उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले. तदनंतर त्यांना दि. 25/12/2020 रोजी सिव्हील हॉस्पीटल, सांगली येथे नेण्यात आले. परंतु दि.26/12/2020 रोजी त्यांना झालेल्या डोक्यातील जखमांमुळे ते मयत झाले. सदर अपघाताची वर्दी विश्रामबाग पोलिसस स्टेशनमध्ये देणेत आली. तदनंतर मयताचे पोस्ट मॉर्टेम व अपघात स्थळाचा पंचनामा करण्यात आला. तदनंतर तक्रारदारांनी याबाबत वि.प.क्र.2 यांचेकडे पी.ए. पॉलिसी रकमेबाबत विचारणा केली असता वि.प. यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही म्हणून तक्रारदारांनी दि. 07/09/2021 रोजी वकीलामार्फत वि.प. यांना नोटीस पाठविली. परंतु तरीही वि.प. यांनी त्यास कोणताही प्रतिसाद दिला नाही. अशा प्रकारे वि.प. विमा कंपनीने तक्रारदारास सेवात्रुटी दिली आहे. म्हणून, तक्रारदाराने प्रस्तुतचा तक्रारअर्ज या आयोगात दाखल केला आहे.
2. प्रस्तुतकामी तक्रारदाराने वि.प. यांचेकडून विमाक्लेमची रक्कम रु. 15,00,000/- व सदर रकमेवर द.सा.द.शे. 15 टक्के दराने व्याज, मानसिक त्रासापोटी व तक्रारीचे खर्चापोटी रु.1 लाख वि.प. कडून वसूल होवून मिळावा अशी विनंती तक्रारदाराने याकामी केली आहे.
3. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत अ.क्र.1 ते 19 कडे अनुक्रमे पोलिस स्टेशन यांचेकडील दैनंदिन तशील, सिव्हील हॉस्पीटलकडील रिपोर्ट, पेशंटचा फोटो, अपघातस्थळाचा पंचनामा, मरणोत्तर पंचनामा, पी.एम.रिपोर्ट, वाहनाचे आर.सी., विमा पॉलिसी, ड्रायव्हींग लायसेन्स, वि.प. यांना दिलेली नोटीस, नोटीसची पोहोच, मयताचा शाळा सोडलेचा दाखला, तक्रारदारांचे आधार कार्ड वगैरे कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
4. वि.प. यांनी सदरकामी म्हणणे/कैफियत व अॅफिडेव्हीट, कागदयादीसोबत पॉलिसी अटी व शर्ती, आय.एम.टी. नियमावलीचा भाग-1, आय.आर.डी.ए. परिपत्रके तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. वि.प. ने त्यांचे म्हणण्यामध्ये तक्रारअर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत. वि.प. ने तक्रारदाराचे तक्रारअर्जावर पुढील आक्षेप घेतलेले आहेत.
i) तक्रारदाराचा तक्रारअर्ज व त्यातील सर्व मजकूर मान्य व कबूल नाही.
ii) वि.प. यांनी कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही.
iii) मयत दिपक बापू तगारे यांना दिलेली पॉलिसी ही मोटर वाहन कायदा 1988, विमा कायदा 1938 चा पार्ट 2ब व आय.एम.टी. नियमावलीप्रमाणे दिली आहे.
iv) तक्रारदाराचे तथाकथित अपघाताबाबत तसेच मयत दिपक बापू तगारे यांचे मृत्यूबाबत क्लेम दाखल करुन वा क्लेम फॉर्म भरुन कागदपत्रे दिली नाही व पॉलिसी अटी प्रमाणे तात्काळ कळविले नाही. त्यामुळे वि.प. यांना वस्तुस्थिती पाहायची संधी मिळाली नाही व पॉलिसीचे अट क्र.1 चे उल्लंघन झाले आहे. सबब, सदरची तक्रार दाखल करणेस कारण घडलेले नाही.
v) तथाकथित अपघातात तक्रारदाराची नमूद मोटार सायकल सामील नव्हती.
vi) कथित अपघातावेळी मयत हा दारुचे अंमलाखाली होता असे दिसून आले. सबब, पॉलिसीतील पी.ए. कव्हर क्लॉजचा भंग होतो व वि.प. हे क्लेम देण्यास जबाबदार नाहीत. सदरचा कव्हर खालील प्रमाणे-
Section III Personal Accident Cover for owner-driver
2. No compensation shall be payable in respect of death or bodily injury directly or indirectly wholly or in part arising or resulting from or traceable to
b. An accident happening whilst such person is under the influence of
intoxicating liquor or drugs.
vii) अपघातावेळी मयताकडे वैध ड्रायव्हींग लायसेन्स नव्हते. सबब, तक्रारदाराची तक्रार नामंजूर करावी अशी मागणी वि.प. यांनी केली आहे.
अशा स्वरुपाचे आक्षेप वि.प. यांनी तक्रारअर्जावर घेतलेले आहेत.
5. वर नमूद तक्रारदार व वि.प. यांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे वि.प. यांचेकडून विमाक्लेमची रक्कम व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे. |
वि वे च न –
6. वर नमूद मुद्दा क्र.1 ते 3 ची उत्तरे आम्ही होकारार्थी दिली आहेत कारण मयत दिपक बापू तगारे यांचे मालकीची दुचाकी मोटरसायकल क्र. एमएच-09-एफआर-0673 होती. सदर मोटरसायकलचा विमा वि.प. यांचेकडे उतरविलेला हेाता. मयत दिपक बापू तगारे यांनी पी.ए. पॉलिसी रक्कम रु. 15,00,000/- ची वि.प. यांचेकडून जादा प्रिमियम रु. 330/- भरुन घेतला होता. मयताने घेतलेल्या पॉलिसीचा क्र. डी024919795/26102020 असून कालावधी दि. 26/10/2020 ते 25/10/2025 असा आहे. वि.प. यांनी सदरची बाब नाकारलेली नाही. सदर पॉलिसीची प्रत याकामी दाखल आहे. सबब, तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत ही बाब निर्विवादपणे स्पष्ट व सिध्द झालेली आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
7. यातील तक्रारदार क्र.1 चे पती व तक्रारदार क्र.2 व 3 यांचे वडील तसेच तक्रारदार क्र.4 व 5 यांचा मुलगा मयत दिपक बापू तगारे हा त्यांचे मालकीची दुचाकी मोटारसायकल क्र. एमएच-09-एफआर-0673 चा विमा विप.क्र.1 व 2 कडे उरविला होता. तसेच पी.ए. पॉलिसी रिस्कची जादा हप्ता रक्कमरु. 330/- वि.प. कडे भरला होता. सदर पीए पॉलिसी ही रक्कमरु. 15,00,000/- ची होती त्याचा पॉलिसी डी024919795/26102020 असून कालावधी दि. 26/10/2020 ते 25/10/2025 असा आहे. मयत दिपक तगारे यांचे दुचाकी वाहन चालवणेचे वैध लायसेन्स आहे. ते याकामी तक्रारदाराने कागदयादीसोबत दाखल केले आहे. दि. 20/12/2020 रोजी मयत दिपक तगारे हा त्याचे ताब्यातील नमूद मोटार सायकल घेवून रात्री घराजवळ आला असता त्याची मोटारसायकल पार्क करत असताना त्याचा तोल जावून तो दारात असलेल्या दगडांच्या ढिगा-यावर पडला व त्याचे डोक्यास गंभीर मार लागून जखमी झाला. त्यावेळी त्यास प्राथमिक उपचारासाठी डॉ अंकलीकर आणि नंतर डॉ भागवत दोघेही रा. नांदणी येथे नेणेत आले. त्यांचे प्रकृतीत सुधारणा झाली नाही म्हणून दि. 25/12/2020 रोजी रात्री सिव्हील हॉस्पीटल, सांगली येथे नेणेत आले. दि. 26/12/2020 रोजी सकाळी 9.45 वा. ते सिव्हील हॉस्पीटल, सांगली येथे मयत झाले. मेडिकल ऑफिसरने विश्रामबाग पोलिस स्टेशनला कळविले. त्याप्रमाणे मयताचा पंचनामा व पोस्टमार्टेम करण्यात आले.सदर अपघाताची वर्दी विश्रामबाग पोलिस ठाणे येथे देणेत आली. त्याप्रमाणे विश्रामबाग पोलिस स्टेशनकडून कागदपत्रे शिरोळ पोलिस स्टेशन येथे पाठवणेत आली व त्याप्रमाणे अपघात ठिकाणचा पंचनामा करणेत आला.
8. दरम्यानच्या काळात तक्रारदार यांनी वि.प. विमा कंपनीच्या ऑफिसमध्ये जावून पी.ए. पॉलिसीच्या रकमेबाबत विचारणा केली असता वि.प. ने पूर्णपणे दुर्लक्ष केले. त्यामुळे तक्रारदाराने वि.प. क्र.1 व 2 यांना अॅड डी.ए.बेळंके यांचेमार्फत दि. 7/09/2021 रोजी रजि.पोस्टाने नोटीस पाठविली. सदर नोटीस व वि.प. क्र.1 व 2 यांना मिळाल्याची पोहोच पावती याकामी तक्रारदाराने दाखल केली आहे. म्हणजेच सदर नोटीस वि.प.क्र.1 व 2 यांना मिळालेचे स्पष्ट होते. परंतु सदर नोटीस वि.प. यांना मिळूनही वि.प. ने कोणतेही उत्तर दिलेले नाही अथवा तक्रारदार यांना विमा पॉलिसीची रक्कमही अदा केली नाही.
9. तसेच सदरचा अपघात हा मयत दिपक तगारे हे वादातील मोटारसायकल क्र. एमएच-09-एफआर-0673 ही त्यांचे घराच्या दारात मधल्या स्टँडवर लावत असताना त्यांचा तोल गेला व ते दारात असलेल्या दगडाच्या ढिगा-यावर पडले व त्यांच्या डोक्याला जबर मार लागून ते गंभीर जखमी झाले ही बाब तक्रारदार यांनी याकामी शपथेवर अॅफिडेव्हीटमध्ये नमूद केली आहे. तसेच वि.प. यांना पी.ए. पॉलिसीची रक्कम मागणी करुनही वि.प. ने सदर पी.ए. पॉलिसीची रक्कम रु. 15,00,000/- (रुपये पंधरा लाख मात्र) तक्रारदाराला अदा केली नाही.
10. याकामी तक्रारदाराने कागदयादीसोबत मयताचे ड्रायव्हींग लायसेन्स दाखल केले आहे. सदरचे ड्रायव्हींग लायसेन्स हे दुचाकी चालविण्याचे वैध ड्रायव्हींग लायसेन्स आहे. हे ड्रायव्हींग लायसेन्स पी.ए. क्लेमसाठी बंधनकारक असते. तसेच मयत दिपक तगारे हे स्वतः वादातील मोटारसायकलचे Registered owner आहेत हे दाखल R.C.T.C. वरुन स्पष्ट होते. याकामी वि.प. ने असा आक्षेप घेतला आहे की, तक्रारदाराने अपघाताबाबत वि.प. यांना तातकाळ कळविले नाही. परंतु याकामी तक्रारदाराने त्यांचे शपथपत्रात शपथेवर कथन केले आहे की, तक्रारदार हे अशिक्षित अडाणी आहेत. तसेच या घटनेमुळे खचून गेले आहेत. दरम्यानच्या काळात कोरोना प्रादुर्भाव चालू राहिल्याने तक्रारदाराने वि.प. क्र.2 चे ऑफिसमध्ये जावून पी.ए. पॉलिसीच्या रकमेबाबत विचारणा केली, परंतु वि.प. यांनी दुर्लक्ष केले. तसेच याकामी सदर अपघाताची वर्दी मेडीकल ऑफिसर यांनी विश्रामबाग पोलिस ठाणे यांचेकडे दिली होती. विश्रामबाग पोलिसांनी सर्व कागदपत्रे शिरोळ पोलिस स्टेशनला पाठविली होती व अपघात ठिकाणचा पंचनामा केला होता. सदरचे कागद याकामी तक्रारदाराने दाखल केले आहेत. तसेच उशिराचे कारण देवून विमा क्लेम नाकारु नयेत असे निर्वाळे मे. वरिष्ठ न्यायालयांनी त्यांच्या वेगवेगळया निवाडयात दिलेले आहेत.
11. वि.प. ने असा आक्षेप घेतला आहे की, वादातील वाहन हे अपघातात सामील नव्हते, त्यामुळे पी.ए.पॉलिसीची रक्कम देता येत नाही. याबाबत सदरकामी घटनास्थळाच्या झालेल्या पंचनाम्याचा विचार करता मयत दिपक हा त्याचे मालकीची वादातील मोटार सायकल त्याचे घराचे दारात स्टँडला पार्क करताना गाडी मागे ओढताना त्याचा तोल गला व तो दारात असले दगडांच्या ढिगा-यावर पडला. त्यामुळे त्याचे डोक्याला गभीर जखमा झाल्या वगैरे घटनास्थळ पंचनाम्यामध्ये नमूद आहे. त्यामुळे वादातील वाहन हे अपघातात समील होते व तेवाहन स्टँडला लावताना पार्क करताना मयत दिपकचा तोल गेला व तो दगडाच्या ढिगा-यावर पडला हे स्पष्ट व सिध्द होते.
12. याकामी वि.प. ने असे म्हटले आहे की, मयत दिपक हा दारुच्या नशेत (Under the influence of alcohol) होता. त्यामुळे तक्रारदार विमा क्लेम मिळणेस पात्र नाही. मात्र वि.प. ने सदरची बाब म्हणजेच मयत दिपक हा दारुच्या नशेत होता ही बाब सिध्द करणेसाठी कोणताही ठोस पुरावा याकामी दाखल केलेला नाही किंवा मयताची रक्त अथवा लघवी तपासणी करुन त्याचा रिपोर्ट याकामी दाखल केलेला नाही तसेच याकामी मयताचे पी.एम. रिपोर्टचे अवलोकन करता पी.एम. मध्ये Cause of death – Head injury असे नमूद आहे. तसेच मयताचे पी.एम.मध्ये कुठही दारुबाबत उल्लेख आलेला नाही तसेच पी.एम. मध्ये दारुचा वास येत होता असाही कुठे उल्लेख दिसत नाही किंवा दिपक तगारे याचेवर ज्यांनी प्राथमिक उपचार अपघातादिवशी केले, त्या डॉ अंकलीकर व डॉ भागवत यांचेही शपथपत्र याकामी मयत दारुच्या नशेत होता हे सिध्द करणेसाठी दाखल केलेले नाही म्हणजेच वि.प. ने सदर घेतलेला आक्षेप वि.प. ने ठोस व सबळ पुराव्यासह सिध्द केलेला नाही हे स्पष्ट होते. वरील सर्व बाबींचा ऊहापोह करता याकामी वि.प. क्र.1 व 2 यांनी तक्रारदार क्र.1 ते 5 यांना पी.ए. पॉलिसीची क्लेमची रक्कम अदा न करुन सेवेत त्रुटी केली आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
13. याकामी तक्रारदाराने दाखल केले पुढील मे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिवाडयांचा व त्यातील दंडकांचा आधार घेतला आहे.
- 2013 ACJ 2712
Dulcina Fernandes and Others
Vs.
Joaquim Xavier Cruz and another
Driver of van alleged that deceased was under influence of liquor brought his scooter to the wrong side and dashed against the van which was standing parked on the extreme left of the road – Eyewitness denied that scooter had dashed the van – Tribunal drew adverse inference against the claimants for their failure to examine the pillion rider, discarded the evidence of eyewitness produced by claimants on the ground that he stated that pillion rider was driving the scooter contrary to the stand of the claimants that deceased was driving the vehicle ignoring the fact that he was examined after 7 years of the accident and relying on the evidence of van driver found that van driver was not rash and negligent in causing the accident – Tribunal dismissed the claim and High Court affirmed the Tribunal’s finding – Police registered a criminal case and filed charge-sheet against van driver – scooterist was not medically examined to ascertain whether he had consumed liquor and was driving the scooter under its influence – Apex court reversed the finding and held that van driver as rash and negligent and allowed compensation as assessed by the Tribunal to the claimants.
- (1971) 3 SCC 930
Bachubhai Hassanalli Karyani
Vs.
State of Maharashtra
The doctor had admitted that a person, placed in the circumstances in which the appellant was put as a result of the accident, would be under a nervous strain and his gait might be unsteady. The doctor had also admitted that a person could smell of alcohol without being under the influence of drinking. No urine test of the appellant was carried out and although the blood of the appellant was sent for chemical analysis, no report of the analysis produced by the prosecution. It seems to us that on this evidence it cannot be definitely held that the appellant was drunk at the time the accident occurred.
वि.प. यांनी याकामी खालील निवाडे दाखल केले आहेत.
Civil Appeal arising out of SLP (Civil) No. 12489/20
Supreme Court of India
IFFCO TOKIO General Insurance Co.Ltd.
Vs.
Pearl Beverages Ltd.
14. वि.प. ने दाखल केलेला मा.सर्वोच्च न्यायालयाचा न्यायनिवाडा व तक्रारदाराने दाखल केलेला मा.सर्वोच्च न्यायालयाचा न्यायनिवाडा यांचे अवलोकन करता,
वि.प. ने दाखल केले न्यायनिवाडयात नमूद केस ही मेडिको लिगल (MLC) आहे. कार ड्रायव्हरविरुध्द एफ.आय.आर. आहे तसेच चार्जशीट आहे. तसेच सदर केस ही वाहनाच्या नुकसान भरपाईची आहे. मोटार वाहन कायदा कलम 185 अन्वये कार ड्रायव्हरवर दारु पिलेचे चार्जेस आहेत. तसेच सदर कार ड्रायव्हरने भरधाव वेगात कार चालवणेचा गुन्हा कबूल केला आहे. इनव्हेस्टीगेटरचा रिपोर्ट या कामी दाखल आहे. कारचालकाने अपघातावेळी दारुच्या अंमलाखाली नव्हतो असे म्हटले असले तरी मी दारु पिलो नव्हतो असे म्हटलेले नाही. सदर ड्रायव्हरने कार प्रथम वीजेच्या खांबास व नंतर भिंतील धडकली आहे. सदर केसलॉमध्ये मे.सर्वोच्च न्यायालयाने ज्या पध्दतीने अपघात झाला व ड्रायव्हरने गुन्हा कबूल केला, त्यामुळे वाहन चालक हा दारुच्या अंमलाखाली होता असे म्हटले आहे
याउलट तक्रारदाराचे प्रस्तुत तक्रारअर्जातील कथनांचा व कागदपत्रांचा ऊहापोह करता, सदरची केस MLC नाही, मयताविरुध्द एफ.आय.आर. नाही तसेच चार्जशीट नाही. सदर केस ही Personal Accident Policy ची आहे. मयताने दारु पिलेचे अथवा दारुच्या अंमलाखाली असलेचे कबूल केलेले नाही अथवा म्हटलेले नाही तर सदरचा मयत हा त्यांचे घरासमोर मोटार सायकल मधल्या स्टँडवर लावत असताना तोल जावून दगडाच्या ढिगा-यावर पडला व जखमी झाला आहे. मयतावर कोणतीही केस नाही. तसेच तो दारुच्या नशेत होता हे दाखविण्यासाठी रक्ताची तपासणी केलेली नाही तसेच त्याबाबत कोणतेही पोलिस पेपर्स नाहीत. मयताच्या पी.एम. रिपोर्टमध्ये ही कुठेही दारुचा उल्लेख नाही अथवा वि.प. ने कोणताही पुरावा याबाबत दाखल नाही. सबब, वि.प. ने दाखल केलेला मे. सर्वोच्च न्यायालयाचा न्यायनिवाडा व तक्रारदाराचा तक्रारअर्ज यातील घटनाक्रम भिन्न प्रकारचा असलेने सदर वि.प. ने दाखल केलेला नमूद न्यायनिवाडा याकामी लागू होणार नाही असे या आयोगाचे मत आहे.
15. सबब, तक्रारदार हे नमूद पी.ए. पॉलिसी योजनेअंतर्गत विमाक्लेमपोटी रक्कम रु.15,00,000/- इतकी रक्कम वि.प. यांचेकडून मिळण्यास तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तसेच सदरचे रकमेवर तक्रारदार हे तक्रारदारांनी वकीलामार्फत वि.प. यांना नोटीस पाठविले तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के व्याजदराने वसूल होवून मिळणेस तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.20,000/- व अर्जाचा खर्च रक्कम रु.5,000/- वि.प. यांचेकडून वसूल होवून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
सबब, प्रस्तुतकामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2) वि.प. विमा कंपनीने तक्रारदार यांना विमाक्लेमपोटी रक्कम रु. 15,00,000/- अदा करावेत व सदर रकमेवर तक्रारदारांनी वि.प. यांना नोटीस पाठविले तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज अदा करावे.
3) मानसिक त्रासापोटी रक्कम रु.20,000/- व अर्जाचा खर्च रु.5,000/- वि.प. विमा कंपनीने तक्रारदारास अदा करावेत.
4) वर नमूद सर्व आदेशांची पूर्तता वि.प. यांनी आदेशाची प्रत मिळाले तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5) विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदींप्रमाणे कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
6) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.