जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, नागपूर. तक्रार दाखल दिनांक :06/01/2010 आदेश पारित दिनांक :20/05/2010 तक्रार क्रमांक :- 35/2010 तक्रारकर्ता :– 1. राजीव वल्द जगदीशप्रसाद कनोडिया, वय अंदाजेः 45 वर्षे, व्यवसायः व्यापार, राह. 9, जल-विहार कॉलोनी, रिंग रोड, टि पॉईंन्ट, नागपूर. ता.जि. नागपूर. -// वि रु ध्द //- गैरअर्जदार :– 1. मा. जनरल मॅनेजर, एम.आर.डी., कन्ट्री क्लब (इंडिया) लि., 723/ए, प्रथमेश कॉम्प्लेक्स, वीर देसाई रोड, विस्तारीत, अन्धेरी (वेस्ट), मुंबई-400 053. 2. मा. जनरल मॅनेजर, कन्ट्री क्लब (इंडिया) लि., ए डिव्हीजन ऑफ कन्ट्री क्लब (इंडया) लि., ठाकुर अपार्टमेंट, 1 ला माळा, नवाब लेआऊट, टिळक नगर, अमरावती रोड, नागपूर-10. तक्रारकर्त्याचे वकील :– श्री. एस.आर. गजभिये. गैरअर्जदाराचे वकील :– श्री. विनोद लालवाणी. गणपूर्ती :– 1. श्री. नलीन मजिठीया - अध्यक्ष 2. श्री. मिलींद केदार - सदस्य (मंचाचा निर्णय: श्री. नलीन मजिठीया- अध्यक्ष यांचे आदेशांन्वये) -// आ दे श //- (पारित दिनांक :20/05/2010) 1. प्रस्तुत तक्रार ही तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारां विरुध्द मंचात दिनांक 06.01.2010 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :- 2. प्रस्तुत तक्रारीत तक्रारकर्त्याने नमुद केले आहे की, गैरअर्जदार क्र.1 हे कन्ट्री क्लब असुन ते ग्राहकांकडून सभासद नोंदणीसाठी त्यांनी ठरविलेल्या रकमेचा स्विकार करुन ग्राहकांना विविध प्रकारच्या करमणुकीच्या व इतर प्रकारच्या सेवा प्रदान करतात. त्याच प्रमाणे गैरअर्जदार क्र.2 हे गैरअर्जदार क्र.1 यांचे जनल मॅनेजर असुन ते नोंदणी करता लागणारी सर्व कार्यवाही नागपूर येथे पूर्ण करतात. म्हणून गैरअर्जदार क्र.1 व 2 ही सेवा प्रदान करणारी संस्था आहे, असे तक्रारकर्त्याने तक्रारीत नमुद केले आहे. 3. तक्रारकर्त्याने नमुद केले आहे की, त्याने गैरअर्जदारांचे प्रतिनिधी नामे श्री. करुणाकर रेड्डी यांच्या प्रोत्साहनानुसार गैरअर्जदारांमार्फत दिल्या जाणा-या सेवांचा उपभोग करण्याकरीता त्यांचे सभासदत्व स्विकारले. तसेच गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचे प्रतिनिधीचे म्हणण्यानुसार वेळोवेळी लागणा-या फी चा भरणा केला म्हणून तो कायदेशिररित्या गैरअर्जदारांचा ‘ग्राहक’ आहे, असे तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे. तक्रारकर्त्याने नमुद केले आहे की, गैरअर्जदार क्लबचे सभासदत्वाकरीता रु.1,15,000/- भरावयाचे होते, त्यानुसार रु.90,000/- दि.20.02.2008 रोजी गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे भरले व शिल्लक रक्कम रु.25,000/- धनादेशाव्दारा गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना दिल्यानंतर दि.20.03.2008 रोजीच्या गैरअर्जदार क्र.2 यांनी पाठविलेल्या पत्रानुसार आजीवन सभासदत्व मंजूर करुन सभासदत्व नं. एन.ए.पी.पी.एम.116 दिलेला आहे. 4. तक्रारकर्त्याने नमुद केले आहे की, दि.20.02.2008 रोजी गैरअर्जदारांनी त्याचे आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डच्या खात्यामधुन गैरअर्जदारांचे प्रतिनिधींनी रक्कम काढलेली असुन शिल्लक रक्कम सुध्दा दिलेली आहे. परंतु गैरअर्जदारांच्या प्रतिनिधीने सांगितल्याप्रमाणे आजपर्यंत कोणत्याही सवलती गैरअर्जदारांनी दिलेल्या नाहीत, तसेच गैरअर्जदारांची नागपूरमध्ये कुठेही जागा नाही. त्यामुळे गैरअर्जदारांनी त्याची दिशाभुल करुन फसवणुक केल्याचे तक्रारकर्त्याने तक्रारीत नमुद केले आहे. 5. तक्रारकर्त्याने पुढे नमुद केले आहे की, त्याने गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना दि.29.08.2008 रोजी वकीलामार्फत नोंदणीकृत डाकेव्दारा नोटीस पाठविली असता गैरअर्जदाराने सदर नोटीसला दि.13.10.2008 रोजी उत्तर दिले असुन तक्रारकर्त्याला कुठलीही सेवा प्रदान केली नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार मंचासमक्ष दाखल करुन गैरअर्जदारांकडे जमा केलेले रु.1,15,000/- दि.20.02.2008 पासुन 18% व्याजासह मिळण्याबाबत मागणी केलेली आहे. तसेच मानसिक त्रासाबाबत रु.25,000/- व तक्रारीच्या खर्चाची रु.2,000/- ची मागणी केलेली आहे. 6. प्रस्तुत प्रकरणी मंचामार्फत गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना नोटीस बजावण्यांत आली असता, त्यांना नोटीस मिळाल्यानंतर ते मंचात हजर झाले असुन त्यांनी आपला लेखी जबाब खालिल प्रमाणे दाखल केलेला आहे. 7. गैरअर्जदारांनी आपल्या जबाबात, प्रस्तुत तक्रार ही गुणवत्ताहीन तसेच कोणतेही कारण घडले नसतांना व शिल्लक असुन ती दाखल करण्यामागे तक्रारकर्त्याचा हेतु गैरअर्जदारांना त्रास देण्याचा व त्यापासून अवैधानिक लाभ मिळविण्याचा असल्याचे नमुद केले आहे. तसेच तक्रारकर्ता हा स्वतःहुन सदस्यत्व घेण्यासाठी आला होता व सदस्य शुल्क हे नॉन रिफंडेबल फुल लाईफ मेम्बरशीप फी असुन एकदा सदस्य शुल्क घेतल्यानंतर गैरअर्जदार ते परत करणार नाही, याबाबतची सर्व माहिती तक्रारकर्त्याला होती व तक्रारकर्त्याने सर्व अटी व शर्तींचे वाचन करुन त्यावर आपली सही केली आणि त्यानंतर तक्रारकर्ता त्यांचा सभासद झाली असे नमुद केले आहे. गैरअर्जदाराने नमुद केले आहे की, तक्रारकर्त्याने क्रेडिट कार्डव्दारा रक्कम दिली होती आणि फॉर्म भरण्याचे वेळी स्वाक्षरी करुन त्याव्दारे पैसे काढण्याची परवानगी दिली होती, त्यामुळे प्रस्तुत तक्रार खारिज होण्यांस पात्र आहे असे म्हटले आहे. 8. गैरअर्जदारांनी आपल्या जबाबात पुढे नमुद केले आहे की, त्यांनी तक्रारकर्त्याला प्लॉट दिलेला आहे व त्या प्लॉटचे नोंदणीसाठी लागणारे शुल्क रु.15,000/- तक्रारकर्त्याने आजपर्यंत दिलेले नाही, त्यामुळे सदर प्लॉटची नोंदणी झाली नाही. तसेच अर्ज केल्याचे दिनांकापासुन एक महिन्याचे आंत तक्रारकर्त्याला क्लबच्या सर्व सोयी नागपूर येथे उपलब्ध करुन देण्यांत येईल असे तोंडी आश्वासन कधीही दिले नव्हते. तसेच तक्रारकर्त्याचे इतर सर्व म्हणणे अमान्य केले असून प्रस्तुत तक्रार खारिज करण्याची मंचास विनंती केलेली आहे. 9. प्रस्तुत तक्रार ही मंचासमक्ष मौखिक युक्तिवादाकरीता दि.11.05.2010 रोजी आली असता तक्रारकर्ता व गैरअर्जदार यांचे तर्फे वकील हजर. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद त्यांचे वकीलांमार्फत ऐकला तसेच तक्रारीत दाखल दस्तावेजांचे अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्कर्षांप्रत पोहचले. -// नि ष्क र्ष //- 10. प्रस्तुत प्रकरणात तक्रारकर्त्याने खालिल प्रमाणे दस्तावेज दाखल केलेले आहेत... 1. गैरअर्जदारांचे पत्र दि.15.04.2008 ची छायांकित प्रत. 2. पावती क्र.223 ची छायांकित प्रत. 3. गैरअर्जदारांना वकीला मार्फत पाठविलेल्या नोटीसची छायांकित प्रत. 4. नोटीसचे उत्तराची छायांकित प्रत. आम्ही सदर दस्तावेजांचे अवलोकन केले असता तक्रारकर्त्याने गैरअर्जदारांकडे त्याची सभासद नोंदणी रु.1,15,000/- ला करुन घेतली होती. गैरअर्जदार हे त्यांचे सभासदांना भारतात वेगवेगळया ठिकाणी करमणुकीच्या आणी राहण्याच्या सेवा उपलब्ध करुन देत होते. तक्रारकर्त्याने गैरअर्जदाराकडे दि.20.02.2008 रोजी रु.90,000/- क्रेडिट कार्ड व्दारा भरले होते, ही बाब दस्तावेज क्र.2 वरुन सिध्द होते. परंतु तक्रारकर्त्याने नमुद केले आहे की, गैरअर्जदारांनी वर नमुद केल्याप्रमाणे सेवा दिलेली नाही, तसेच सभासदांना नागपूर येथे प्लॉट देणार होते परंतु सदर प्लॉटही दिला नाही. गैरअर्जदारांनी दि.28.04.2010 रोजी मौखिक युक्तिवादाचे वेळी दस्तावेज दाखल केलेले आहे. आम्ही सदर दस्तावेजांचे अवलोकन केले असता सदर दस्तावेज हा सभासद नोंदणी अर्ज असुन त्यात संपूर्ण माहिती भरलेली नाही. पुन्हा गैरअर्जदारांनी पान क्र.42 प्रमाणे दस्तावेज दाखल केलेले आहे. आम्ही सदर दस्तावेजांचे अवलोकन केले असता सदर दस्तावेज हा प्लॉटचे आवंटन पत्र असुन त्यात तक्रारकर्त्याचे नाव नमुद केले आहे. सदर दस्तावेजांचे अवलोकन केले असता प्लॉट नं.1 हा आवंटीत केल्याचे नमुद केले आहे. परंतु सदर पत्रामध्ये प्लॉट हा कोणत्या ठिकाणी व किती क्षेत्रफळाचा आहे तसेच खसरा नंबर काय आहे ह्याबाबी नमुद केलेल्या नाहीत. त्यामुळे सदर दस्तावेज हा मंच ग्राह्य धरु शकत नाही कारण सदर दस्तावेजावर जावक क्रमांक नाही. तसेच सदर पत्र हे तक्रारकर्त्याला केव्हा पाठविले याबाबतही नमुद केलेले नाही. 11. गैरअर्जदारांनी आपल्या लेखी जबाबात नमुद केले आहे की, तक्रारकर्त्याचे सभासदत्व एकदा स्विकारल्यानंतर त्याचे सभासदत्व रद्द करता येत नाही व त्याची रक्कमही परत घेता येत नाही. परंतु गैरअर्जदारांनी पान क्र.38 वर दाखल केलेल्या सभासद फॉर्मचे अवलोकन केले असता तो फॉर्म अपूर्ण भरलेला आहे. तसेच त्यावर सहीच्या ठिकाणी दिनांकही नमुद केलेला नाही. गैरअर्जदारांनी सदर फॉर्म स्विकारतांना नागपूर येथेपण क्लब हाऊस सुरु करण्यांत येईल, असे नमुद केले आहे. परंतु गैरअर्जदारांनी नागपूर येथे क्लब हाऊस सुरु केलेले नाही. त्यामुळे मंचाचे असे मत झाले आहे की, गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्याची दिशाभुल करुन व अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब करुन सभासद फी घेतलेली आहे. सदर फी गैरअर्जदारांनी रक्कम घेतल्याचे दिनांक 20.02.2008 पासुन द.सा.द.शे.9% व्याज रक्कम अदा होईपर्यंत देण्यांस गैरअर्जदार बाध्य राहील. तसेच तक्रारकर्त्याने शारीरिक, मानसिक त्रासाकरीता नुकसान भरपाईची रु.25,000/- ची मागणी केलेली आहे. परंतु सदर मागणी संयुक्तिक वाटत नाही. तथापी वर नमुद केल्याप्रमाणे गैरअर्जदारांनी अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केलेला आहे, त्यामुळे तक्रारकर्ता रु.5,000/- शारीरिक मानसिक त्रासाबद्दल मिळण्यांस पात्र आहे असे मंचाचे मत आहे. तसेच तक्रारीच्या खर्चाचे रु.3,000/- गैरअर्जदारांनी द्यावयास पाहिजे असे मंचाचे मत आहे. प्रस्तुत प्रकरणात दाखल दस्तावेजांचे तसेच युक्तिवादाचे अवलोकन केले असता मंच वरील निष्कर्षांवरुन खालिल प्रमाणे आदेश पारित करण्यांत येते. -// अं ति म आ दे श //- 1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते. 2. गैरअर्जदारांना आदेश देण्यांत येते की, त्यांनी तक्रारकर्त्याला सभासद फीचे रु.90,000/- दि.20.02.2008 पासुन द.सा.द.शे.9% व्याजासह अदा करावी. 3. गैरअर्जदारांना आदेश देण्यांत येते की, त्यांनी तक्रारकर्त्याला शारीरिक, मानसिक त्रासाकरीता नुकसान भरपाई रु.5,000/- व तक्रारीच्या खर्चाचे रु.3,000/- अदा करावे. 4. वरील आदेशाची अंमलबजावणी गैरअर्जदारांनी आदेशाची प्रता मिळाल्याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आंत करावी. (मिलींद केदार) (नलीन मजिठीया) सदस्य अध्यक्ष
| HONABLE MRS. Mrs. Nalini B. Harode, Member | HONABLE MR. JUSTICE Mr. Nalin C. Majithiya, PRESIDENT | HONABLE MR. Mr. Milind R. Kedar, Member | |