तक्रारदार स्वत:
जाबदेणारांकरिता श्रीमती राजश्री लोकरी, अधिकृत प्रतिनिधी
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
श्रीमती, अंजली देशमुख, मा. अध्यक्ष यांचेनुसार
:- निकालपत्र :-
दिनांक 30/जुन/2012
1. तक्रारदारांना पी एच डी करावयाची होती म्हणून ते इंटरनेट सर्च करीत होते. त्यावेळी त्यांना जाबदेणार यांचा पत्ता मिळाला. जाबदेणार यांची मुख्य शाखा बंगलोर येथे आहे. तक्रारदारास बंगलोर येथे जाणे शक्य नसल्यामुळे जाबदेणार यांच्या मुंबई येथील शाखेशी त्यांनी संपर्क साधला आणि तेथे प्रथम जाऊन माहिती घेतली. त्यावेळी जाबदेणार यांनी तक्रारदारास पी एच डी करण्याबाबत पुर्ण मार्गदर्शन करु, बाहेरील देशातील पी एच डी गाईडशी त्यांची वैयक्तिक ओळख असल्यामुळे त्यांचा पत्ता ई मेल द्वारे तक्रारदारांना देऊ, जेणेकरुन तक्रारदार त्यांच्याशी चर्चा करतील असे सांगितले. त्याबरोबरच व्हिसा साठी मार्गदर्शन करुन बाहेरील देशात प्रवेश मिळाल्यानंतर जर्मन संस्कृती, रहाणीमान, चालीरिती यांची माहिती 1-2 लेक्चर मधून देऊ यासाठी रुपये 20,000/- कन्सल्टन्सी चार्जेस आहेत. त्याबदल्यात पी एच डी गाईड, ई मेल, फोन नंबर, स्टडी मटेरिअल देऊ असे सांगितले. मात्र यासाठीचे पोस्टल चार्जेस तक्रारदारांनी दयावयाचे आहेत असे त्यांना सांगण्यात आले. त्यानुसार तक्रारदारांनी 10/12/2009 रोजी आय सी आय सी आय च्या रामचंद्र सभामंडप, आपटे रोड येथे रुपये 20,000/- जाबदेणार यांच्या खात्यात जमा केले. त्यानंतर पावतीबद्यल विचारणा केली असता थोडया दिवसात मिळेल असे सांगितले. त्यानंतर जाबदेणारांकडून मेल द्वारे रजिस्ट्रेशन फॉर्म मिळाला. त्यात तक्रारदारांनी माहिती भरुन फॉर्म पाठवून दिला. अनेकवेळा फोन केल्यानंतर, पैसे भरल्याची पावती प्राप्त झाली. तक्रारदार आणि जाबदेणार यांच्यातील सर्व व्यवहार ई मेल व पोस्टल होता. जाबदेणार यांनी माहिती दिल्यानुसार कोणत्याही व्यक्तीचा ई मेल किंवा फोन नंबर तक्रारदारांना मिळाला नाही. जाबदेणार हे गूगल वर सर्च केल्याप्रमाणे विषय टाकून त्यातून येणा-या वेब पेज लिंक्स तक्रारदारांना पाठवत होते. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार ते सुध्दा हे सर्व करु शकत होते. जाबदेणार त्यांना माहित असलेल्या लोकांचे ई मेल्स तक्रारदारांना पाठवत नव्हते. जाबदेणार संस्थेमार्फत पी एच डी साठी बाहेर गेलेल्या विद्यार्थ्यांचे ई मेल्स तक्रारदारांना मागितले परंतु जाबदेणार यांनी ते देण्यास टाळाटाळ केली. तक्रारदारांना नको असलेल्या मार्गदर्शक सुचना जाबदेणार त्यांना देत होते. उदाहरणार्थ स्वखर्चाने पी एच डी ऐवजी एम.एस करा मग पी एच डी ला लगेच प्रवेश मिळेल. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार जर एम एस करुनच पी एच डी करावयाची होती तर मग जाबदेणारांकडे पैसे गुंतविले नसते. तक्रारदारांनी त्यांचा बायोडाटा सुधारवला पाहिजे, अजुन थोडा अनुभव घेतला पाहिजे असा सल्ला देत होते. जाबदेणार यांनी तक्रारदारांना शेवटपर्यन्त कुठलीही माहिती दिली नाही. रक्कम मात्र पुर्ण घेतली. म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणारांकडून भरलेली रक्कम रुपये 20,000/- 18 टक्के व्याजासह, मानसिक त्रासापोटी रुपये 40,000/-, तक्रारीचा खर्च रुपये 2,000/- व इतर दिलासा मागतात. तक्रारदारांनी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
2. जाबदेणार यांनी लेखी जबाब दाखल करुन तक्रारदारांच्या मागणीस विरोध दर्शविला. जाबदेणार यांच्या म्हणण्यानुसार जाबदेणार यांचे कार्यालय बंगलोर येथे आहे. तक्रारदारांनी जाबदेणार यांच्या बंगलोर कार्यालयाशी झालेला पत्र व्यवहार दाखल केलेला आहे. त्यामुळे प्रस्तूत मंचास तक्रार चालविण्याचा अधिकार नाही. जाबदेणार यांनी तक्रारदारास सेवा दिली हेाती. परंतु तक्रारदारांनी सेवा घेतली नाही. जाबदेणार यांच्या म्हणण्यानुसार दिनांक 10/12/2009 रोजीची पावती मंचात दाखल केली आहे. जाबदेणार यांनी त्यांना सर्व्हिसेस दिलेल्या होत्या. तक्रारदारांनी जी फी भरलेली आहे ती नॉन रिफंडेबल आहे. त्यामुळे अटी व शर्ती दोघांवर बांधील आहे. जाबदेणार यांनी एकूण 16 गाईड्स ची नावे दिली होती. रेफरन्सची नावे तक्रारदारास कळविली होती. परंतु तक्रारदार कोणत्याही गाईड्सच्या प्रोफाईलशी समाधानी नव्हते. यावरुन गाईडशी पत्र व्यवहार चालू होता हे दिसून येते. पी एच डी होऊ शकत नाही त्यामुळे तक्रारदार रक्कम परत मागत आहे. ती नॉन रिफंडेबल आहे. वरील कारणांवरुन तक्रार दंडासह नामंजुर करावी अशी मागणी जाबदेणार करतात. जाबदेणार यांनी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
3. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. प्रस्तूत तक्रार ही तक्रारदारांनी जाबदेणारांकडून पी एच डी साठी गाईड ची नावे व इतर मार्गदर्शन मिळविण्यासाठी रक्कम रुपये 20,000/- भरुन सेवा घेतलेली होती. जाबदेणार यांचे मुख्य ऑफीस बंगलोर येथे आहे, तर शाखा मुंबई येथे आहे. तक्रारदारांनी जाबदेणार यांच्या बंगलोर येथील शाखेत पैसे भरल्याचे दिनांक 10/12/2009 ची पावती मंचासमोर दाखल करण्यात आलेली आहे. मंचाने दिनांक 1/2/2011 रोजी तक्रार दाखल करतांनाच कार्यक्षेत्राचा मुद्या उपस्थित केला होता, आक्षेप घेतला होता “Admitted complaint keeping open the point of jurisdiction” असे नमूद करुन दिनांक 1/2/2011 रोजी तक्रार दाखल करुन घेण्यात आली होती. त्यावेळी तक्रारदारांनी कार्यक्षेत्राबाबत पुढील तारखेस स्पष्टीकरण देऊ असे सांगितले होते. जाबदेणार यांनीदेखील कार्यक्षेत्राचा मुद्या लेखी जबाबामध्ये उपस्थित केलेला आहे. तक्रारदारांनी कार्यक्षेत्राच्या मुद्याबाबत स्पष्टीकरण दिलेले नाही. युक्तीवादादरम्यान जाबदेणार यांनी तक्रारदारास भरलेल्या फी च्या 30 टक्के रक्कम देण्यास तयारी दर्शविली होती. तक्रारदारांनी ती रक्कम घ्यावी. मंचास प्रस्तूत तक्रार चालविण्यासाठी कार्यक्षेत्र नसल्यामुळे मंच तक्रार नामंजुर करीत आहे.
वरील विवेचनावरुन व दाखल कागदपत्रांवरुन खालीलप्रमाणे आदेश देण्यात येत आहे-
:- आदेश :-
[1] तक्रार नामंजुर करण्यात येत आहे.
[2] खर्चाबद्यल आदेश नाही.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.