तक्रारकर्त्याने सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 12 अन्वये दाखल केली आहे. अर्जदाराच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणे आहे.
तक्रारकर्ता हा सिंदी मेघे, वर्धा येथील रहिवासी असून शेती व स्थानिक मालवाहतुकीचा व्यवसाय करतो. तक्रारकर्त्याने दि. 03.04.2013 ला वि.प. क्रं. 1 यांचे कडून वि.प.क्रं. 2 यांच्या कंपनीचे सिरीलय नं. 57206470813 व 52744460813 हे दोन टायर्स बिल क्रं. 192 नुसार विकत घेतले होते. तक्रारकर्त्याचे म्हणण्यानुसार सदर टायर्सची डिलीव्हरी घेत असतांना दोन टायर्सपैकी 1 टायर थोडया कमी दर्ज्याचा दिसून येत असल्यामुळे त्याने त्याबाबत वि.प.क्रं. 1 यांना विचारणा केली होती. तेव्हा वि.प.क्रं. 1 यांनी त्यास टायर उत्तम दर्ज्याचे असून भविष्यात कुठलीही हानी होणार नाही असा भरोसा दिल्याने तक्रारकर्त्याने दोन्ही टायर्स ठेवून घेतले.
तक्रारकर्त्याने तक्रारीत असे नमूद केले आहे की, दि. 06.04.2013 ला म्हणजे टायर खरेदी केल्याच्या 3 दिवसातच एक टायर ज्याचा सिरीयल क्रं. 57244460813 याला काही चीरे पडले व तो टायर गाडी उभी असतांनाच फुटला. सदर घटनेबाबत त्याने वि.प.क्रं. 1 यांना दि. 06.04.2013 ला फोनद्वारे कळविले. दि. 07.04.2013 ला तक्रारकर्त्याने सदर टायर वि.प.क्रं. 1 यांचेकडे घेवून गेले. वि.प.क्रं. 1 ने तक्रार लिहून घेतली व त्याची पावती तक्रारकर्त्यास दिली व सदर टायर बदलवून देण्याची हमी दिली. त्यानंतर 15 दिवसांनी तक्रारकर्त्याने वि.प.क्रं. 1 यांचेकडे जावून विचारपूस केली असता वि.प.क्रं. 1 यांनी तक्रारकर्त्यास सांगितले की, सदर टायर हा त.क. च्या चुकीमुळे फुटला असून वि.प.क्रं. 1 व वि.प.क्रं. 2 कुठल्याही प्रकारे जबाबदार नाही, म्हणून सदर टायर ते बदलवून देवू शकत नाही.
तक्रारकर्त्याने तक्रारीत असेही म्हटले आहे की, त.क. चे टाटा 608 हे वाहन सदर घटनेच्या वेळेस उभ्या स्थितीत होते व तसे नसते तर मोठा अपघात होवून जीवित व मालहानी झाली असती.
तक्रारकर्त्याने तक्रारीत असे ही नमूद केले आहे की, दि. 16.04.2013 ला नवीन टायरची किंवा त्याऐवजी पैश्यांची मागणी केली असता वि.प.क्रं. 1 यांनी सदर टायरच्या बनावटीत कुठलीही कमी नसून तो टायर गाडी चालू असतांना एखाद्या धारदार वस्तुने फुटला असल्याचे त.क. यांना सांगितले. तसेच तक्रारकर्त्याने त्याचे तक्रारीत पुढे म्हटले आहे की, त.क. हा वि.प.क्रं. 1 चा ग्राहक असून त्याने सदरचा टायर विकत घेण्यासाठी भरपूर पैसे दिले होते. परंतु चांगल्या दर्ज्याचा टायर मिळाले नसून त्यापैकी 1 टायर चार दिवसांच्या आतच फुटला व त्यामुळे तक्रारकर्त्याला हंगामाचे सुरवातीलाच भरपूर नुकसान सहन करावे लागत आहे.
तक्रारकर्त्याने त्याच्या तक्रारीत असेही नमूद केले की, त.क. ने दि. 16.05.2013 ला वि.प.क्रं. 1 व 2 यांना नोटीस पाठवून त्याला झालेले सर्व नुकसान म्हणजेच रु.28,245/- व त.क.ची गाडी उभी असल्याने त्यापासून त्याला मिळणारे प्रति दिवस रु.500/- प्रमाणे नुकसान भरपाई व रु.20,000/-, शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल वि.प.क्रं. 1 व 2 यांनी द्यावे अशी विनंती केली. त.क. चे म्हणण्यानुसार वि.प.क्रं. 1 व 2 यांना सदरची नोटीस मिळाली असून ही वि.प. क्रं. 1 व 2 यांनी सदर नोटीसला उत्तर दिलेले नाही. म्हणून तक्रारकर्त्याने मंचात दाद मागितली आहे.
त.क. ने पुढे असे नमूद केले आहे की, वि.प.क्रं. 1 व 2 यांनी त.क. ला निकृष्ट दर्ज्याचे टायर विकून सेवेत कसूर केला आहे. त.क. ला त्याचे टाटा 608 वाहनापासून दररोज 500/- ते 1000/- रुपये आर्थिक कमाई होत होती. परंतु वि.प.क्रं. 1 व 2 यांनी निकृष्ट दज्याचे टायर विकल्यामुळे त.क.ला शारीरिक, मानसिक व आर्थिक असे एकूण 50,000/- रुपयाचे नुकसान झाले. त.क. ने सदर टायर हे वर्धा येथे खरेदी केल्यामुळे मंचास सदर तक्रार चालविण्याचा पूर्ण अधिकार आहे असेही त.क.ने तक्रारीत नमूद केलेले आहे.
सदर तक्रारीत त.क. ने त्यास वि.प.क्रं. 1 व 2 यांनी आर्थिक नुकसानी पोटी 30,000/- रुपये द्यावे व शारीरिक व मानसिक त्रसापोटी 20,000/-रुपये द्यावे. असा आदेश होण्यासाठी प्रार्थना केली आहे. त्याचप्रमाणे त.क. ला टाटा 608 चा टायर बदलून द्यावे किंवा त्याचे रु.8425/- परत द्यावे. तसेच भविष्यातील आर्थिक नुकसानपोटी प्रतिरोज रु.500/- प्रमाणे प्रकरणाचा निकाल लागतपर्यंत द्यावे व प्रकरणाचा खर्च रु.5000/- वि.प. क्रं. 1 व 2 यांनी द्यावा अशीही विनंती सदर तक्रार अर्जात त.क. ने केलेली आहे.
वि.प. यांना मंचातर्फे प्रस्तुत प्रकरणात नोटीस बजाविण्यात आली. वि.प. यांनी खालीलप्रमाणे आपले उत्तर दाखल केलेले आहे.
वि.प.क्रं. 1 यांनी त्यांचे लेखी उत्तर नि.क्रं. 13 नुसार दाखल केले. वि.प. क्रं. 1 यांनी आपल्या लेखी उत्तरात प्राथमिक आक्षेप नोंदविला असून त्यांचे म्हणण्यानुसार तक्रारकर्त्याच्या तक्रार अर्जातील मजकुरा वरुन अर्जदार हे मालवाहतुकीचा व्यवसाय करत असून त्यांनी त्याकरिता टाटा 608 हा मालवाहक ट्रक खरेदी केल्याचे व सदर वाहनाच्या टायर्सबाबत तक्रार केल्याचे स्पष्ट होते. ग्राहक संरक्षण कायद्या अंतर्गत व्यापारी कारणाकरिता खरेदी केलेली वस्तू व सेवा ही समाविष्ट करण्यात आलेली नाही. करिता तक्रारकर्ता हा ग्राहक संरक्षण कायद्या अंतर्गत ग्राहक ठरत नाही. म्हणून अर्जदाराची तक्रार खारीज होणे क्रमप्राप्त असल्याचे वि.प. क्रं. 1 ने त्याचे उत्तरात नमूद केलेले आहे.
वि.प.क्रं. 1 यांनीआपल्या उत्तरात त.क. ने दि. 3.4.2013 ला वि.प.क्रं. 2 च्या कंपनीचे टायर त्याचेकडून खरेदी केल्याचे मान्य केले असून त.क. हा शेती व्यवसाय करतो हे विशेषत्वाने अमान्य केलेले आहे. त.क. ने टायर खरेदीकरतांना टायर कमी दर्ज्याचा असल्याबाबत विचारणा व चौकशी त्याच्याकडे केली होती हे वि.प.क्रं. 1 ने अमान्य केलेले आहे. वि.प.क्रं. 1 यांनी त.क. यांना टायर फुटल्याबाबत दि. 06.04.2013 ला फोनद्वारे कळविले हे मान्य केले आहे. परंतु वि.प.क्रं. 1 चे म्हणण्यानुसार त.क. ने गाडीच्या वस्तुस्थितीबाबत जसे की, गाडी कुठे उभी होती, त्यात माल होता अथवा नाही, माल कोणता होता, रस्ता कसा होता, याबाबत खुलासा केलेला नाही. वि.प.क्रं. 1 ने त.क. हा दि. 07.04.2013 ला टायर घेऊन आला असता त्याची तक्रार लिहून घेतली व त्याला पावती दिली हे मान्य केले आहे. तसेच वि.प. क्रं. 1 ने त्यांचे उत्तरात नमूद केले आहे की, विवादीत टायर हा त्यांनी नागपूरला कंपनीकडे त्वरित पाठविला व त्यांना तसेच त.क. ला 15 दिवसानंतर कंपनीकडून एस.एम.एस. प्राप्त झाला. त्यानुसार सदर टायर धारदार वस्तुच्या संपर्कामुळे फुटला असून त्यामध्ये कोणताही निर्मिती दोष नाही. त्यामुळे वि.प.क्रं. 1 यांनी टायर बदलवून देण्याची हमी देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. वि.प.क्रं. 1 ने पुढे असेही नमूद केले की, त्यांनी त.क. च्या तक्रारीच्या निराकरणासाठी सर्वोतोपरी सहकार्य केले असून सेवेतील त्रृटीकरिता वि.प.क्रं. 1 ला जबाबदार ठरविता येणार नाही. वि.प.क्रं. 1 ने उत्तरात असे ही नमूद केले आहे की, त.क. ने वि.प. 2 चे तज्ञांचा अहवाल नाकारला नाही किंवा त्यास आव्हान ही दिलेले नाही. करिता मंचासमक्ष दाखल असलेला तज्ञांचा अहवाल ग्राहय ठरविणे क्रमप्राप्त आहे. वि.प.क्रं. 1 ने त.क. च्या मागणीसह त्याचे तक्रारीतील इतर सर्व कथन अमान्य केलेलेआहे. त्याचप्रमाणे नुकसान भरपाईचा नोटीस प्राप्त झाल्यानंतर त.क. प्रत्यक्ष वि.प.क्रं. 1 यांना भेटल्यामुळे सदर नोटीसला उत्तर देण्याची गरज भासली नाही असे वि.प.क्रं. 1 ने त्याचे उत्तरात नमूद केले आहे. तसेच आर्थिक नुकसानीबाबत त.क. ने कोणताही ठोस पुरावा दाखल केलेला नसल्यामुळे त.क. चे त्याबाबतचे कथन वि.प.क्रं. 1 ने अमान्य केलेले असून सदर तक्रार खारीज करुन वि.प.क्रं. 1 यांना 5000/-रुपये नुकसान भरपाई देय ठरविण्यात यावी अशी मागणी आपल्या लेखी उत्तरात वि.प.क्रं. 1 ने केलेली आहे.
वि.प.क्रं. 2 यांनी त्यांचे लेखी उत्तर नि.क्रं. 12 नुसार दाखल केले. त्यांनी लेखी उत्तरात प्राथमिक आक्षेप नोंदविलेला असून तक्रारकर्त्याने स्वतः नमूद केल्याप्रमाणे शेती व्यतिरिक्त मालवाहतुकीचा व्यवसाय करीत असून सदर व्यवसायाकरिता टायर खरेदी केला असल्यामुळे ग्राहक संरक्षण कायद्याच्या तरतुदीप्रमाणेतक्रार अर्ज खारीज करण्यात यावा अशी विनंती मंचास केलेली आहे. वि.प.क्रं. 2 ने त्यांचेउत्तरातनमूदकेले आहे की, त.क. यांनी वि.प.क्रं. 2 सोबत कुठलाही व्यवहार केलेला नाही. त्याचप्रमाणे वि.प.क्रं. 2 ने त्यांचे उत्तरात असे ही नमूद केले आहे की, त्यांनी सदर टायरची तपासणी करुन वादातीत टायर संबंधी तपासणी अहवाल दि. 12.04.2013 ला दिला असून त्यानुसार टायर मध्ये कुठलाही उत्पादकीय दोष नाही हे त.क. ला कळविलेले होते. तसेच त्यांनी दि. 20.05.2013 च्या पत्रान्वये संपूर्ण वस्तुस्थिती विशद करुन वादातील टायरमध्ये उत्पादकीय दोष नसून चालू स्थितीतील वाहनाला बाहेरील धारदार वस्तुने टायरला इजा पोहचविलेली असल्याचे स्पष्टपणे अहवालात नमूद केले असून त.क. ला कळविले असल्याचे कथन केले आहे. वि.प.क्रं. 2 ने पुढे आपल्या लेखी उत्तरात असे ही नमूद केले आहे की, टायरमध्ये उत्पादकीय दोष असल्याबाबत त.क. ने कोणताही रिपोर्ट अथवा तज्ञांचा अहवाल तक्रार अर्जा सोबत दाखल केला नाही. त्यामुळे वि.प.क्रं. 2 निर्मित टायरमध्ये कोणत्याही प्रकारचा उत्पादकीय दोष नाही असे सिध्द होते. त्यामुळे सदर तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी.
वि.प.क्रं. 2 यांना त.क. हा शेती व्यवसाय तथा मालवाहतुकीचा व्यवसाय करतो हे मान्य आहे. परंतु तक्रारीतील इतर सर्व कथन अमान्य आहे. वि.प.क्रं. 2 यांनी आपल्या उत्तरात असे ही नमूद केले आहे की, टायर खरेदी केल्यानंतर तक्रारकर्त्याने टायरमध्ये किती हवा भरली आणि कश्या रीतीने वाहन चालविले याबाबत गैरअर्जदाराने निर्मित केलेल्या उत्पादकीय टायर्सची गुणवत्ता ठरविता येणार नाही. त्याचप्रमाणे टायर कोणत्या कारणामुळे फुटला याबाबत कोणताही पुरावा त.क. ने सादर केला नाही. वि.प.क्रं. 2 निर्मित टायर्सची गुणवत्ता हा वाहनाचा प्रकार, रस्त्याची दशा, टायरमध्ये भरलेली हवा, वाहन चालविण्याचा प्रकार, वाहनावरील ओझे इत्यादी अनेक प्रकारच्या बाबींवर अवलंबून असते. त्यामुळे टायर्समध्ये उत्पादकीय दोष असल्याचे सिध्द होत नाही व त.क. ने त्याबाबतचा कोणताही तज्ञांचा अहवाल सादर केलेला नाही. करिता वि.प.क्रं. 2 यांचे सेवेत कोणतेही त्रृटी नाही. तसेच टायर विकत घेतानाच निकृष्ट दर्जाचे होते याबाबत कोणतीही माहिती त.क. ने वि.प. 2 ला दिलेली नाही. करिता वि.प. क्रं. 2 यानां त.क. ची मागणी अमान्य असून सदर तक्रार खारीज होण्यास विनंती केली आहे.
सदर प्रकरण मंचासमक्ष दि.02.07.2014 रोजी युक्तिवादाकरिता आले असता त.क. स्वतः हजर. त्यांचा युक्तिवाद ऐकण्यात आला. वि.प.क्रं. 1 चे वकील हजर. त्यांचा युक्तिवाद ऐकून घेण्यात आला. वि.प. 2 व त्यांचे वकील गैरहजर. त्यामुळे प्रकरण निकालाकरिता बंद करण्यात आले.
सदर प्रकरणात उभय पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेण्यात आला. तसेच त्यांनी दाखल केलेले दस्ताऐवज, प्रतिज्ञालेख यांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्कर्षा प्रत पोहचले.
-: कारणे व निष्कर्ष :-
14 तक्रारकर्ता श्री. मनिष धवणे यांनी वि.प.क्रं. 1 यांचे कडून वि.प.क्रं. 2 निर्मित टाटा 608 वाहनाकरिता 2 टायर खरेदी केले. याबाबत त्यांनी प्रकरणात सदर टायरच्या बिलाची पावती नि.क्रं. 3/1 नुसार दाखल केली आहे. तसेच वि.प.क्रं. 1 व 2 यांना तक्रारकर्त्याने टायर खरेदी केल्याचे मान्य आहे. परंतु वि.प.क्रं. 1 व 2 यांनी आपल्या लेखी उत्तरात तक्रारकर्ता हा मालवाहतुकीचा व्यवसाय करीत असून त्याने खरेदी केलेले टायर हे व्यावसायिक लाभाकरिता वापरीत असलेल्या वाहनाकरिता घेतले असल्याने तक्रारकर्ता हा ग्राहकाचे कक्षेत येत नाही असा प्राथमिक आक्षेप नोंदविलेला आहे. करिता मंचासमक्ष तक्रारकर्ता हा वि.प.क्रं. 1 व 2 यांचा ग्राहक आहे किंवा नाही हा प्रमुख मुद्दा आहे. सदर मुद्दा विचारात घेता असे दिसून येते की, तक्रारकर्त्याने त्याचे तक्रारीत तसेच पुरावा म्हणून दाखल केलेल्या शपथपत्रात तो शेती व स्थानिक मालवाहतुकीचा व्यवसाय करतो असे स्पष्टपणे नमूद केलेले आहे. तसेच त.क. ने त्याच्या तक्रारीत परिच्छेद क्रं. 10 मध्ये नमूद केल्याप्रमाणे सदर टाटा 608 या वाहनापासून त्यास दररोज रु.500 ते 1000/- आर्थिक मिळकत होते असे दिसून येते. तसेच तक्रारकर्त्याने सदर टायर फुटल्यामुळे त्याचे 28 ते 30 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे कथन केले असून त्याचे इतर मागण्यांबरोबर प्रामुख्याने सदरची नुकसान भरपाई मिळण्यास विनंती केल्याचे दिसून येते.त्यामुळे तक्रारकर्ता सदर वाहन हे मुख्यत्वे व्यवसायाकरिता वापरीत असल्याचे स्पष्ट होते. त्याचप्रमाणे त.क.ला त्याचे स्वतःचे शेतमाल वाहून नेण्यास सदर वादातीत वाहन नादुरुस्त असल्यामुळे इतर वाहन वापरावे लागत असून त्यामुळे त्याला नुकसान होत असल्याचा कुठलाही पुरावा प्रकरणात दाखल केलेला नाही. तसेच तक्रारकर्त्याने सदर टाटा 608 हे वाहन स्वयंरोजगाराकरिता वापरत होता असा कोणताही उल्लेख तक्रारीत केल्याचे दिसून येत नाही. सदर बाबीवरुन मंच या निष्कर्षाप्रत पोहचतो की, तक्रारकर्ता हा सदर वाहन टाटा 608 हे मालवाहतूक व्यवसायाकरिता वापरतो. म्हणून तक्रारकर्ता हा ग्राहक सरंक्षण कायद्याच्या कलम 2 (1) (d) (i) प्रमाणे वि.प.क्रं. 1 व 2 यांचा ग्राहक ठरत नाही व ग्राहक या संज्ञेत येत नाही.
उपरोक्त सर्व विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
आदेश
1) तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात येत आहे.
2) खर्चाबद्दल कोणताही आदेश नाही.
3) मा.सदस्यांसाठीच्या ‘ब’ व ‘क’ फाईल्स संबंधितांनी परत घेवून
जाव्यात.
5) निकालपत्राच्या प्रति सर्व संबंधित पक्षांना माहितीस्तव व उचित
कार्यवाही करिता पाठविण्यात याव्यात.