जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नंदेड प्रकरण क्र.124/2008. प्रकरण दाखल दिनांक – 26/03/2008. प्रकरण निकाल दिनांक – 07/07/2008. समक्ष - मा.श्री.सतीश सामते अध्यक्ष (प्र). मा.श्रीमती. सुजाता पाटणकर. सदस्या. श्री.अंबादास पि.कमलाकर कुलकर्णी, अर्जदार. वय वर्षे 61, व्यवसाय वैद्यकिय व्यवसाय, रा.मु.पो.हार्टी ता.तुळजापुर जि.उस्मानाबाद. विरुध्द. 1. ग्लोबल कम्युनिकेशन, द्वारा- प्रोप्रा.रिलायंस वेब वर्ल्ड एक्सप्रेस 17, गैरअर्जदार. महात्मा फुले मार्केट,नांदेड. 2. रिलायंस वेब स्टोअर लि, द्वारा – व्यवस्थापक, रजिस्टर्ड ऑफीस, ई ब्लॉक, धिरुभाई नॉलेज सिटी ठाणे बेलापुर रोड, कोपरखैरने,नवी मुंबई. अर्जदारा तर्फे. - अड.एम.डी.देशपांडे. गैरअर्जदार क्र.1 तर्फे - एकतर्फा. गैरअर्जदार क्र.2 तर्फे - अड.एस.जी.कार्लेकर. निकालपत्र (द्वारा,मा.श्रीमती.सुजाता पाटणकर,सदस्या) यातील अर्जदार श्री.अंबादास कमलाकर कुलकर्णी यांची थोडक्यत तक्रार अशी की, अर्जदार यांनी गैरअर्जदाराकडुन दि.16/11/2005 रोजी त्यांच्या अधिकृत दुकानातुन एक रिलयंस मोर्बईल कनेक्शनसह मोबाईल क्र.9326894696 असलेला रक्कम रु.2,000/- देऊन खरेदी केला. अर्जदाराकडुन दि.11/06/2007 रोजी वजिराबाद भागातुन हरवला. सदरील घटनेची फिर्याद वजिराबाद पोलिस स्टेशन येथे दिली. याबाबत अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र. 1 यांच्याशी संपर्क साधला मोबाईल हरवल्याची माहीती दिली व नविन मोबाईल कनेक्शन देण्याची विनंती केली त्यांनी पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीची नक्कल सादर करण्यास सांगितले. अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 1 यांच्याकडे नोकीया हॅण्डसेट खरेदी केल्यानंतर तो चालुच झाला नाही, याबाबत गैरअर्जदाराला विचारले असता, लवकरच चालु होईल असे सांगितले. नंतर अर्जदाराने दि.19/06/2007, 27/06/2007, 06/07/2007 रोजी गैरअर्जदार क्र. 1 यांच्याशी संपर्क साधुन मोबाईल चालु करुन देण्या विषयी विनंती केली. परंतु त्याचा उपयोग झाला नाही. पुन्हा दि.14/07/2007 रोजी गैरअर्जदाराशी संपर्क साधला असता, मोबाईल खरेदी केल्याची पावती जमा करण्यास सांगीतल्यावरुन तसे ते जमा करण्यात आले आणि त्याची पोहच गैरअर्जदारांनी दिली. अर्जदाराची विनंती आहे की, मोबाईल किंवा त्याची किंमत रु.2,000/- त्यावर दि.11/06/2007 पासुन 18 टक्के व्याजासह आणि मानसिक शारिरीक त्रास व आर्थिक नुकसान भरपाई म्हणुन रु.15,000/- तसेच दावा खर्चाबद्यल रु.5,000/- गैरअर्जदाराकडुन मिळावेत. गैरअर्जदार क्र. 1 यांना या मंचा तर्फे नोटीस देण्यात आली. त्यांना नोटीस तामील होऊनही ते मंचा समक्ष हजर न राहुन आपले म्हणणे सादर केले नाही म्हणुन त्यांच्या विरुध्द एकतर्फा आदेश पारीत करुन प्रकरण पुढे चालविण्यात आले. गैरअर्जदार क्र. 2 यांना नोटीस देण्यात आली त्यांनी हजर होऊन आपले लेखी म्हणणे दाखल केले. त्यांचे म्हणणे असे की, गैरअर्जदार यांनी त्यांच्या लेखी म्हणणेमध्ये असे म्हटले आहे की, सदरची तक्रार या मे.मंचा समोर चालु शकत नाही कारण मुंबई येथेच सदरचे प्रकरण चालु शकते. सदरचा हॅण्डसेट हा नोकीया कंपनीचा असल्याने नोकीया कंपनीला सदर कामी पक्षकार करणे गरजेचे होते. मोबाईल हॅण्डसेट घेतल्यानंतर अर्जदार यांना त्यांच दिवशी त्यांचे जुने नंबरवरच हॅण्डसेट चालु करुन दिलेले आहे. त्यानंतर अर्जदार पहील्यांदा दि.19/06/2007 रोजी गैरअर्जदार क्र. 1 यांचेकडे तक्रार घेऊन आलेले आहेत. म्हणजेच हॅण्डसेट घेतले पासुन आठ दिवसांनी अर्जदार हे गैरअर्जदार क्र.1 यांच्याकडे तक्रार घेऊन आलेले आहेत. नोकिया कंपनीला पक्षकार न केल्यामुळे सदरचा अर्ज आवश्यक पक्षकार न केल्याने मे.मंचात चालु शकत नाही त्यामुळे तो अर्ज खारीज होण्यास पात्र आहे असे म्हटलेले आहे. अर्जदार यांनी आपल्या तक्रार अर्जासोबत यादीप्रमाणे कागदपत्र व शपथपत्र दाखल केले. तसेच गैरअर्जदार क्र.2 यांनी आपल्या जबाबासोबत कोणतेही दस्तऐवज दाखल केले नाही त्यांनी शपथपत्र दाखल केलेले आहे. मुद्ये. उत्तर. 1. अर्जदार हे गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांचे ग्राहक आहेत काय? होय. 2. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे काय ? होय. 3. काय आदेश ? अंतीम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्या क्र. 1 – अर्जदार यांनी अर्जासोबत नोकीयाचा हॅण्डसेट गैरअर्जदार क्र. 1 यांच्याकडुन खरेदी केल्याबाबतची पावती दाखल केलेली आहे. गैरअर्जदार क्र. 1 यांनी सदरची बाब या मंचामध्ये हजर होऊन कोणत्याही प्रकारे नाकारलेले नाही. गैरअर्जदार क्र. 2 यांनी त्यांच्या लेखी म्हणणेमध्ये अर्जदार हे ग्राहक असल्याचे नाकारलेले नाही याचा विचार करता अर्जदार गैरअर्जदार क्र.1 व 2 चे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे. मुद्या क्र. 2 - अर्जदार यांच्या कथनानुसार अर्जदार यांनी दि.11/06/2007 रोजी गैरअर्जदार क्र. 1 यांच्याकडुन नवीन रिलायंस नोकीया हॅण्डसेट रक्कम रु.2,000/- इतक्या किंमतीला खरेदी केलेला होता,हे अर्जदारांनी दाखल केलेल्या पावती क्र.180 वरुन स्पष्ट होत आहे. अर्जदार यांनी नोकीया हॅण्डसेट खरेदी केल्यानंतर तो चालुच झाला नाही याबाबत गैरअर्जदारांकडे संपर्क साधुन मोबाईल चालु करुन देण्या विषयी विनंती केलेली आहे. दि.14/07/2007 रोजी अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र.1 यांच्याकडे संपर्क साधल्यानंतर गैरअर्जदारांनी सदरील मोबाईलची पावती गैरअर्जदाराकडे जमा करण्यास सांगितले त्याप्रमाणे अर्जदारांनी दि.14/07/2007 रोजी त्यांचा नोकीया हॅण्डसेट व सदर मोबाईल हॅण्डसेटची मुळ पावती गैरअर्जदार क्र. 1 यांच्याकडे जमा केली त्या बाबत गैरअर्जदार क्र. 1 यांनी अर्जदार वजीराबाद येथे दिलेली फिर्यादीच्या पाठी मागे(Handset and Receipt at Global Communication Nanded) त्यांनी शिक्का व सही केल्याचे दिसुन येत आहे. त्यानंतर अर्जदारांनी गैरअर्जदाराकडे मोबाईल दुरुस्त करुन परत देण्याची विनंती केली परंतु सदरचा मोबाईल सोलापुरला पाठविले त्यानंतर आठ दिवसांनी विचारणा केली असता, पुण्याला पाठविल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर अर्जदार यांनी वेळोवेळी मोबाईलची मागणी केली असता, त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यामुळे अर्जदार यांनी मोबाईल किंवा त्याची किंमत रक्कम रु.2,000/- परत देण्याची विनंती केली असता, गैरअर्जदार क्र. 1 यांनी त्यास स्पष्टपणे नकार दिला त्यामुळे अर्जदार यांनी दि.26/10/2007 रोजी पुन्हा सोलापुर येथील रिलायंस मोबाईल अधिकृत दुकानातुन रु.2,000/- देऊन मोबाईल खरेदी केला. म्हणजेच अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र. 1 यांचेकडुन दि.11/06/2007 रोजी घेतलेले नोकीया हॅण्डसेट हा चालु नसल्याने अर्जदार यांना दुसरा मोबाईल दि.26/10/2007 रोजी नवीन विकत घ्यावा लागला ही बाब स्पष्ट होत आहे. अर्जदार यांच्या अर्जातील कोणतेही कथन गैरअर्जदार क्र.1 यांनी मे.मंचा समोर हजर राहुन नाकारलेले नाही अगर त्याचे पुष्टयार्थ कोणतेही कागदोपत्री पुरावा या मे.मंचा समोर हजर केलेले नाही. अर्जदार यांनी अनेकदा मागणी करुनही गैरअर्जदार क्र. 1 यांनी अर्जदार यांना मोबाईल चालु करुन दिला नाही किंवा त्याची किंमतीही परत दिली नाही म्हणुन अर्जदारांनी गैरअर्जदार क्र. 1 व2 यांना पत्र पाठवून मागणी केली व नाईलाजास्तव दाद मागावे लागले असे लेखी कळविल्याचे अर्जदार यांनी दाखल केलेल्या पत्रावरुन स्पष्ट होते. सदरचे पत्र गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना मिळुनही सदर पत्राला कोणतेही उत्तर गैरअर्जदार यांनी दिलेले नाही. गैरअर्जदार क्र. 2 यांनी त्यांच्या लेखी म्हणणेमध्ये अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र. 1 यांच्याकडुन मोबाईल खरेदी केलेले आहे व सदरचा मोबाईल चालु न झाल्याने परत दुरुस्त करणेसाठी गैरअर्जदार क्र. 1 यांचेकडे दिलेली आहे ही बाब मान्य केलेली आहे. अर्जदार यांचेकडे एक माणुस हॅण्डसेट घेऊन गेलेला असतांना अर्जदाराने सदरचा हॅण्डसेट घेण्याचे नाकारले म्हणुन गैरअर्जदार क्र. 1 यांनी सदरचा हॅण्डसेट अर्जदार यांना रजिस्टर पोष्टाने पाठविला असे गैरअर्जदार क्र. 2 यांनी त्यांच्च्या लेखी म्हणणेमध्ये नमुद केलेले आहे परंतु सदरचे कथना पुष्टयार्थ कोणतेही कागदोपत्री पुरावा या मे.मंचा समोर हजर केलेले नाही. अर्जदार यांच्याकडुन गैरअर्जदार क्र. 1 यांनी मोबाईल चालु करण्यासाठी स्विकारला आहे. त्यानंतर अर्जदार यांनी अनेकदा मागणी करुनही सदरचा हॅण्डसेट गैरअर्जदार क्र. 1 यांनी परत दिलेला नाही अगर त्यांना त्याबाबत काही कळविलेले नाही याचा विचार होता, गैरअर्जदार क्र. 1 यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांचा तक्रारअर्ज त्यांनी दाखल केलेली कागदपत्र त्यांच्या वकीलांनी केलेला युक्तीवाद तसेच गैरअर्जदार क्र. 2 चे लेखी म्हणणे शपथपत्र याचा विचार करता आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश. गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदार यांना खालील प्रमाणे रक्कम द्यावे. 1. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांच्याकडुन मोबाईल खरेदीपोटी घेतलेले रक्कम रु.2,000/- द्यावे. सदर रक्कमेवर दि.14/07/2007 पासुन 9 टक्के व्याज द्यावे. गैरअर्जदार यांनी अर्जदाराला झालेल्या मानसिक त्रापोटी रु.1,000/- आणि दावा खर्चाबद्यल रु.500/- द्यावे. 2. आदेशाचे पालन एक महिन्यात करावे. 3. संबंधीतांना निकाल कळविण्यात यावा. (श्रीमती.सुजाता पाटणकर) (श्री.सतीशसामते) सदस्या अध्यक्ष (प्र) गो.प.निलमवार. लघुलेखक. |