न्या य नि र्ण य
द्वारा – मा. सौ मनिषा सं. कुलकर्णी, सदस्या
1. प्रस्तुतचा तक्रारअर्ज तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायदा 11 व 12 प्रमाणे दाखल केलेला आहे. वि.प.क्र.1 व 2 यांना नोटीस आदेश होवून त्यांनी या आयोगासमोर हजर होवून म्हणणे दाखल केलेले नाही. सबब, त्यांचेविरुध्द “ एकतर्फा आदेश ” करण्यात आला.
2. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात पुढीलप्रमाणे—
वि.प.क्र.1 हे वि.प.क्र.2 चे अधिकृत डिलर असून वि.प.क्र.2 हे टीव्ही, फ्रीज, मोबाईल, कॉम्प्युटर इ. इलेक्ट्रॉनिक्स वस्तू उत्पादन करण्याचा व्यवसाय करतात. यातील वि.प.क्र.2 हे वि.प.क्र.1 यांचेमार्फत उत्पादित केलेल्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विक्री करणेचा व्यवसाय करतात. सबब, वि.प.क्र.1 हे वि.प. क्र.2 चे अधिकृत डिलर आहेत. तक्रारदार यांनी वि.प.क्र.1 यांचेकडून GL-T292RASN/LG REF Batch No. 804 PRQT005300 या मॉडेलचा व बॅच नंबरचा फ्रीज दि.15/9/2018 रोजी खरेदी केलेला होता व आहे. सदरचा खरेदी केलेला फ्रीज हा घरगुती वापरासाठी खरेदी करण्यात आलेला होता. तथापि फ्रीजमध्ये खरेदी केलेपासूनच म्हणजे दि.16/9/2018 पासून सदरचे फ्रीजचा कॉम्प्रेसरमधून आवाज येणे सुरु होवून तो अचानकपणे बंद पडू लागला. यानंतर तक्रारदार यांनी वि.प. यांचे अधिकृत सर्व्हिस सेंटरकडे तक्रार क्र. RNP180930070921 नुसार तक्रार दिलेली होती. त्यावेळी वि.प. यांचे अधिकृत सेंटर यांचेकडे दिलेल्या माहितीनुसार व त्यांचेकडील मेकॅनिक यांनी तक्रारदार यांचा फ्रीज दुरुस्त करुन दिलेला नव्हता व नाही. त्याचबरोबर सदरचा फ्रीज वि.प.क्र. 1 यांचेकडूनच हा अन्य ग्राहकास विक्री केला असल्याबद्दलची माहिती समजून आली व मिळालेल्या माहितीनुसार सदरचा वादातील फ्रीज हा वि.प. यांनी दि. 23/5/2018 रोजीच “राज नजीर शेख” या नावाचे इसमास विक्री केलेला होता. मात्र त्यामध्ये दोष असलेने हा फ्रिज वि.प. यांचेकडे परत दिलेला होता व सदरचा दोष असलेला फ्रीज वि.प.क्र.1 यांनी जाणीवपूर्वक व हेतूःत तक्रारदार यांना विक्री केलेला आहे. त्यामुळे वि.प.क्र.1 यांनी तक्रारदार यांना असा दोषयुक्त फ्रीज विक्री करुन द्यावयाचे सेवेत त्रुटी उत्पन्न केलेली आहे. याकरिता तक्रारदार यांची फसवणूक झालेली आहे व सदरचा फ्रीज हा तक्रारदार यांनी खरेदी केले तारखेपासूनच दोषयुक्त असलेने फ्रीजचा उपभोग तक्रारदार यांना व त्यांचे कुटुंबियांनासुध्दा घेता आलेला नाही व या कारणामुळे तक्रारदार यांना व त्यांचे घरच्यांना नाहक आर्थिक, शारिरिक व मानसिक त्रास सहन करावा लागलेला आहे. याकरिता सदरचा तक्रारअर्ज तक्रारदार यांना दाखल करणे भाग पडले. वि.प. यांनी नोटीस मिळून देखील तक्रारदार यांना फ्रीजची रक्कम अदा केलेली नाही अथवा नोटीसीस उत्तरही दिलेले नाही. सबब, वि.प. यांनी तक्रारदार यांना वादातील फ्रीजची रक्कम रु.26800/-, फ्रीज खरेदी केले तारखेपासून म्हणजेच दि. 15/09/18 पासून द.सा.द.शे. 15 टक्के व्याजदराने अदा करणेबाबत विनंती केलेली आहे. तसेच मानसिक व आर्थिक त्रासापोटी रक्कम रु. 50,000/- व अर्जाचा खर्च रु. 20,000/- मागितलेला आहे.
4. तक्रारदार यांनी तक्रारअर्जासोबत वि.प.क्र.1 यांचेकडून खरेदी केलेल्या फ्रिजची पावती, वि.प. यांना दिलेली वकीलांची नोटीस, वि.प. यांना नोटीस पाठविलेबाबत पोस्टाची पावती, तसेच वि.प. यांना वकीलांची नोटीस पोहोचलेबाबतची पोहोचपावती अशी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
5. वि.प. यांना नोटीसची बजावणी होवूनही याकामी हजरही नाहीत व त्यांनी याकामी आपले म्हणणे दाखल केले नाही. सबब, वि.प.क्र.1 व 2 यांचेविरुध्द “ एकतर्फा आदेश ” करण्यात आला.
6. तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, पुरावा व युक्तिवाद यावरुन आयोगासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार हा वि.प. यांचा ग्राहक होतो काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदार यांना सेवा देणेत त्रुटी केली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदारांनी केलेल्या मागण्या मिळणेस तक्रारदार पात्र आहे काय ? | होय, अंशतः. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालीलप्रमाणे |
विवेचन
मुद्दा क्र.1
7. तक्रारदार यांनी दि. 15/9/2018 रोजी वि.प.क्र.1 यांचेकडून GL-T292RASN/LG REF Batch No. 804 PRQT005300 या मॉडेलचा व बॅच नंबरचा या मॉडेलचा व बॅच नंबरचा फ्रीज खरेदी केलेला होता व आहे. सदरचे फ्रिजची टॅक्स इन्व्हॉईस याठिकाणी कागदयादीसोबत तक्रारदार यांनी दाखल केलेली आहे व हा टॅक्स इनव्हॉईस वि.प. म्हणजेच “ गिरीश सेल्स अॅण्ड मार्केटींग ” यांचे सहिशिक्क्याचा आहे. यावरुन तक्रारदार व वि.प यांचेमध्ये सेवा घेणार व सेवा देणार हे नाते निर्माण झाले आहे. सबब, तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदींनुसार वि.प. यांचे ग्राहक होतात या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.2 ते 4
8. तक्रारदार यांनी दि. 15/9/2018 रोजी यांचेकडून GL-T292RASN/LG REF Batch No. 804 PRQT005300 या मॉडेलचा फ्रीज वि.प.क्र.1 कडून खरेदी केलेला आहे व खरेदी केलेपासूनच म्हणजेच दि. 16/9/2018 पासूनच फ्रीजचे कॉम्प्रेसरमधून आवाज येणे सुरु होवून तो अचानकपणे बंद पडू लागला. याबाबत तक्रारदार यांनी वि.प. यांचे अधिकृत सर्व्हिस सेंटरकडे तक्रार क्र. RNP180930070921 नुसार तक्रार दाखल केलेली आहे. मात्र तरीसुध्दा वि.प. यांनी तक्रारदार यांचा फ्रीज दुरुस्त करुन दिलेला नाही. इतकेच नव्हे तर सदरचा फ्रीज हा दि. 23/5/2018 रोजी म्हणजेच तक्रारदार यांनी हा फ्रीज खरेदी करणेपूर्वीच “ राज नजीर शेख ” या इसमास विक्री केलेचे तक्रारदार यांना समजून आलेले आहे व अशा प्रकारे तक्रारदार यांनी खरेदी करणेपूर्वीच विक्री केलेला हा फ्रीज तक्रारदार यांना पुनश्च विक्री करणे ही निश्चितच वि.प. यांनी तक्रारदार यांना देय असणा-या सेवेत त्रुटी केलेली आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. तक्रारदार यांनी या संदर्भात पुराव्याचे शपथपत्र देखील दाखल केलेले आहे व पुराव्यानुसार सदरची बाब शाबीत केलेली आहे. “ राज नजीर शेख ” यांनी खरेदी केलेला फ्रिजच वि.प. यांनी तक्रारदार यांना पुनश्च विक्री केलेचे दिसून येते. यावरुन ही बाब स्पष्ट होते की, निश्चितच “ राज नजीर शेख ” यांनी फ्रीज नादुरुस्त असलेनेच सदरचा फ्रीज वि.प. यांना परत केला असावा. या कारणाकरिताच तक्रारदार यांचेपासून सदरची पुनश्च विक्री केलेबाबतची बाब वि.प. यांनी तक्रारदार यांना स्पष्ट केलेली नाही व फ्रीज हा खरेदी केलेपासूनच नादुरुस्त होता. स्वतःचे पुराव्याचे शपथपत्राबरोबर तक्रारदार यांनी साक्षीदार “ श्री संजय मारुती सुर्यवंशी ” रेफ्रिजरेटर मेकॅनिक, कोल्हापूर यांचेही शपथपत्र दाखल केलेले आहे. यामध्येही श्री संजय मारुती सुर्यवंशी यांनी “आपण रेफ्रिजरेटर मेकॅनिक म्हणून काम करीत असून तक्रारदार यांचे विनंतीवरुन त्यांचे घरी जावून एअर कंडीशनर व रेफ्रिजरेटरची दुरुस्ती केलली आहे. मात्र सदर फ्रीजचे कॉम्प्रेसरमधून आवाज येत होता व थोडया वेळाने फ्रीज बंद पडत होता व हा दोष हा सुरुवातीपासूनच म्हणजेच कंपनी फॉल्ट आहे असेही तक्रारदार यांना सांगितले आहे. ” अशा मजकुराचे शपथपत्र संजय मारुती सुर्यवंशी यांनी दाखल केलेले आहे. यावरुनही सदरचा फ्रीज हा उत्पादित दोष असलेला फ्रीज आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. मात्र वि.प. यांनी आयोगासमोर हजर राहून सदरची बाब व तक्रार खोडून काढली नसलेने त्यांचे विरुध्द प्रतिकूल निष्कर्ष (Adverse inference) हे आयोग काढीत आहे व तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेत त्रुटी केलेली आहे या निष्कर्षाप्रत हे आयेाग येत असलेने तक्रारदार यांनी केलेल्या मागण्या या अंशतः मंजूर करण्याचे निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
9. सबब, तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडून वादातील फ्रीजची रक्कम रु.26,800/- इतकी मागितलेली आहे. यासंदर्भातील टॅक्स इन्व्हॉईस तक्रारदार यांनी दाखल केलेला आहे. सबब, सदरची रक्कम वि.प. यांना देण्याचे आदेश हे आयोग करीत आहे. तसेच या रकमेवर दि. 15/9/2018 पासून म्हणजेच फ्रीज खरेदी केले तारखेपासून ते संपूर्ण रक्कम तक्रारदार यांचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज देणेचे आदेश वि.प.क.1 व 2 यांना करण्यात येत आहेत. याबरोबरच तक्रारदार यांनी मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम रु.50,000/- व तक्रारअर्जाचा खर्च रु.20,000/- मागितलेला आहे. मात्र या आयोगास सदरची रक्कम संयुक्तिक वाटत नसलेने नुकसान भरपाईपोटी रक्कम रु. 5,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.3,000/- देणेचे निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, हे आयोग खालील आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2. वि.प.क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना फ्रिजची रक्कम रु.26,800/- देणेचे आदेश करणेत येतात. सदर रकमेवर वि.प. यांनी दि.15/09/2018 पासून ते संपूर्ण रक्कम तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज अदा करावे.
3. वि.प.क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- व तक्रारीचे खर्चापोटी रु. 3,000/- देणेचे आदेश करणेत येतात.
4. वर नमूद आदेशांची पूर्तता वि.प. यांनी आदेशाचे तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5. विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदयातील तदतुदींअन्वये कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
6. जर यापूर्वी वि.प. यांनी काही रक्कम तक्रारदार यांना अदा केली असेल तर त्याची वजावट करण्याची वि.प. यांना मुभा राहील.
7. सदर आदेशाच्या प्रती उभय पक्षकारांना विनाशुल्क पाठवाव्यात.