श्री. अमोघ कलोती, अध्यक्ष यांचे कथनांन्वये.
- //आदेश//-
(पारित दिनांक – 02/07/2013)
1. तक्रारकर्त्याला मोटार वाहन अपघातात झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी त्यांनी ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अन्वये प्रस्तुत तक्रार दाखल केलेली आहे.
तक्रारकर्त्याचे कथन थोडक्यात येणेप्रमाणे...
2. विरुध्द पक्ष क्र.1 हे MH-21/FZ-3838 या प्रवासी बस वाहनाचे मालक असुन तिचा विमा विरुध्द पक्ष क्र.2 कडे उतरविला होता. तक्रारकर्ता दि.16.08.2011 रोजी सदर बसने नागपूर ते पूणे प्रवास करीत असतांना नगर-पूणे रोडवर बसला अपघात झाला. अपघातात 3 प्रवासी मृत्यू झाले व तक्रारकर्त्यासह 24 प्रवासी जखमी झाले.
3. तक्रारकर्त्याचे कथनानुसार सदर वाहनाच्या डाव्या बाजूच्या टायरची अवस्था वाईट होती व सदर वाहन लांबच्या प्रवासाकरता उपयुक्त नव्हते. अपघातानंतर तक्रारकर्त्याला चंदननगर, पूणे येथील रक्षक हॉस्पीटलमधे भरती करण्यांत आले. तक्रारकर्ता 10 दिवस हॉस्पीटलमधे भरती होता त्यानंतर डॉक्टरांनी त्याला 30 दिवस संपूर्ण विश्रांती घेण्यांस सांगितले. तक्रारकर्त्याचे कथनानुसार त्याला शारीरिक इजे व्यतिरिक्त जबर मानसीक आघात व आर्थीक नुकसान झाले.
4. तक्रारकर्त्याने दि.04.11.2011 रोजी व दि.19.11.2011 रोजी वकीलामार्फत विरुध्द पक्षांना नोटीस पाठविली, परंतु नोटीस मिळूनही विरुध्द पक्षाने पूर्तता न केल्यामुळे तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार दाखल केली.
5. मंचाने जारी केलेल्या नोटीसची बजावणी झाल्यानंतर विरुध्द पक्ष क्र.1 ने प्रकरणात हजर होऊन लेखी उत्तर दाखल केले. तक्रारकर्त्या व विरुध्द पक्ष क्र.1 यांच्यामधे ग्राहक व सेवा पुरविणारे असे नाते असल्याचे त्यांनी नाकारले. तक्रारकर्ता सदर वाहनाने प्रवास करीत असल्याचे, सदर वाहन विरुध्द पक्ष क्र.1 चे मालकीचे असल्याचे व सदर वाहनाला अपघात झाल्याची बाब विरुध्द पक्षांनी नाकारली नाही. त्यांचे कथनानुसार तक्रारकर्त्याने प्रसन्न् टूर आणि ट्रॅव्हल यांची टिकीट घेतली होती व सदर ट्रॅव्हल कंपनीने तक्रारकर्त्यास विरुध्द पक्ष क्र.1 यांच्या वाहनात बसविले व त्यामुळे तक्रारकर्ता हा सदर वाहनामधे बसुन प्रवास करीत होता. विरुध्द पक्ष क्र.1 ने पुढे कथन केले की, तक्रारकर्त्याला मोटार अपघात न्यायाधिकरण कडून योग्य ती भरपाई मिळू शकत असतांनाही त्यांनी नाहक मंचामधे प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
6. विरुध्द पक्ष क्र.2 यांना नोटीसची बजावणी होऊनही ते प्रकरणात हजर झाले नाही अथवा लेखी उत्तरही दाखल केले नही, करीता प्रकरणात त्यांचे विरुध्द एकतर्फी आदेश पारित करण्यांत आला.
7. तक्रारकर्त्याने दि.02.05.2013 रोजी लेखी युक्तिवाद अभिलेखावर दाखल केला, परंतु विरुध्द पक्ष क्र.1 गैरहजर असल्याने प्रकरण त्यांच्या युक्तिवादाकरीता दि.02.07.2013 रोजी नेमण्यांत आले. नेमलेल्या तारखेसही विरुध्द पक्ष क्र.1 यांनी हजर होऊन लेखी अथवा तोंडी युक्तिवाद सादर केला नाही करीता प्रकरण आदेशाकरीता बंद करण्यांत आले.
8. तक्रारकर्त्यातर्फे त्यांचे वकीलांचा युक्तिवाद ऐकला, अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले. प्रस्तुत प्रकरणी मंचाचे निर्णयार्थ उपस्थित होणाने मुद्दे व त्यावरील निष्कर्ष खालील प्रमाणे नोंदविले आहेत.
मुद्दे निष्कर्ष
- प्रस्तुत तक्रारीची दखल घेण्याचे मंचाला कार्यक्षेत्र आहे काय ? नाही.
- विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास दिलेल्या सेवेत
कमतरता सिध्द होते काय ? प्रश्न उद्भवत नाही.
3. आदेश ? तक्रार खारिज करण्यांत येते.
- // कारणमिमांसा // -
9. मुद्दा क्र.1 बाबतः- सदर प्रवासी बस वाहन MH-21/FZ-3838 विरुध्द पक्ष क्र.1 चे मालकीचे असल्याबाबत, दि.16.08.2011 रोजी तक्रारकर्ता सदर वाहनाने नागपूर ते पूणे प्रवास करीत असल्याबाबत आणि सदर वाहनाला अपघात झाल्याबाबत कोणताच वाद नाही.
10. तक्रारकर्त्याचे कथनानुसार सदर वाहन प्रवास करण्यांस उपयुक्त नसल्याने व वाहन चालकाने हलगर्जीने व अत्यंत वेगाने वाहन चालविल्यामुळे अपघात घडला. तक्रारकर्त्याचे कथनानुसार सदर अपघातात तो जखमी झाला व त्याला दवाखान्याचा खर्च रु.41,450/-, औषध विकत घेण्यापोटी रु.13,944/- इतका खर्च सोसावा लागला. तसेच अपघातामुळे त्याला रु.20,000/- उत्पन्नाचा तोटा झाला, सदर खर्च व नुकसान भरपाई मिळण्याची मागणी तक्रारकर्त्याने केलेली आहे.
11. मा. राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग यांनी, “Master M.A. Gadaffi & Ors. –v/s- Mercedes Benz India Ltd.& Anr.” 2010(3) CPJ 87:2010(4) CTL 140 (NC) या प्रकरणात खालिल प्रमाणे माहिती नोंदविलेली आहे...
“Since compensation primarily based on the deaths of parents of the complainants which was due to fatal injuries was the direct result of the accident on account of hitting of the car which was being driven at a very high speed with a tree complaint would be maintainable only before the Claims Tribunal constituted under the Motor Vehicles Act, 1988- Complaint liable to be dismissed”.
12. मोटार वाहनाचे अपघातात झालेली नुकसान भरपाई मिळण्याकरीता मोटार वाहन अधिनियम 1988 अंतर्गत स्थापीत मोटार वाहन अपघात न्यायाधिकरण यांचेकडे तक्रार दाखल करावयास हवी, ही बाब मा. राष्ट्रीय आयोगाने उपरोक्त प्रकरणात नमूद केली आहे. सदरचा निकाल प्रस्तुत प्रकरणाला लागू होत असल्याने तक्रारकर्त्याला मागणीप्रमाणे दिलासा देण्याचे कार्यक्षेत्र मंचाला नाही, असे मंचाचे मत आहे.
13. मुद्दा क्र.2 व 3 बाबतः- प्रस्तुत प्रकरणी मंचाला कार्यक्षेत्र येत नसल्याचे मुद्दा क्र.1 चे उत्तरात नमुद केले आहे, त्यामुळे मुद्दा क्र.2 बाबत निष्कर्ष नोंदविण्याचे कारण उद्भवत नाही. प्रस्तुत प्रकरणी तक्रारकर्त्याची तक्रार खारिज करणे न्यायोचित ठरेल असे मंचाचे मत आहे.
- // आदेश //-
1) तक्रारकर्त्याची तक्रार खारिज करण्यांत येते.
2) उभय पक्षांनी आप-आपला खर्च स्वतः सोसावा.
3) उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निशुल्क द्यावी.