अॅड सम्राट एस. रावते तक्रारदारांकरिता
अॅड. विकास व्ही. थोरात जाबदेणारांकरिता
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
श्रीमती, अंजली देशमुख, मा. अध्यक्ष यांचेनुसार
:- निकालपत्र :-
दिनांक 28/सप्टेंबर/2012
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे -
1. तक्रारदार D.U.B. – Dysfunctional Uterine Bleeding या आजाराने ग्रस्त होत्या. त्यासाठी त्यांना डॉ. कातेकारी यांनी जाबदेणार यांच्याकडे उपचार घेण्यासंदर्भात पाठविले होते. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार जाबदेणार यांच्या हॉस्पिटल मध्ये सुखसुविधा व व्यवस्था, उच्चशिक्षीत पारंगत डॉक्टर्स काम करतात. तक्रारदारांना झालेल्या आजारात रुग्णाच्या आयुष्याचा प्रश्न असतो हे तक्रारदारास माहित असल्यामुळे हॉस्पिटल मध्ये प्रवेश घेण्यापूर्वी तक्रारदारांनी रेडिओलॉजिस्ट डॉ. घन:श्याम एम. तुरकर यांच्याकडून ओटोपोटाचा – पेल्व्हीस सोनाग्राफी अहवाल घेऊन जाबदेणार यांच्याकडे उपचारासाठी गेल्या. सोनोग्राफी अहवालामध्ये फायब्रॉईडची अनियमित वाढ झाल्याचे व त्याचा आकार 3.56 से.मी असल्याचे दिसून आले. तक्रारदारांकडील सर्व कागदपत्रांची पहाणी केल्यानंतर जाबदेणार डॉक्टरांनी तक्रारदारांना त्यांच्या आजारापासून मुक्त होण्यासाठी म्हणून मिरेना संयंत्र बसविण्याचा सल्ला दिला. मिरेना हा सर्वात्तम इलाज आहे असे सांगितले. डॉक्टरांच्या आश्वासनावर व वैद्यकीय सल्ल्यावर विश्वास ठेवून मिरेना संयंत्र बसविण्यास तक्रारदारांनी परवानगी दिली. त्यानुसार तक्रारदारांना शस्त्रक्रियेद्वारे दिनांक 13/12/2009 रोजी मिरेना संयंत्र बसविण्यात आले. त्याचवेळी तक्रारदारांना पुष्कळ औषध व गोळया घेण्यासही सांगितले. तक्रारदारांनी सांगितलेली सर्व औषध व गोळया वेळेवर, तंतोतंत घेतल्या. उपचाराच्या एक ते दीड महिन्याच्या कालावधीत तक्रारदार जाबदेणार यांच्या सतत संपर्कात, मार्गदर्शनात होत्या. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार मिरेना बसविल्यानंतरही त्यांना डी.यू.बी चा त्रास होतच होता. मिरेना डिवाईस बसविल्यानंतरही आराम पडला नव्हता. एका आठवडयात आराम मिळेल व डी.यू.बी आजाराचा समूळ नाश होईल असे जाबदेणार यांनी तक्रारदारांना सांगितले होते. तक्रारदारांच्या विनंतीनुसार जाबदेणार यांनी पुन्हा ओटीपोटाचा सोनोग्राफी अहवाल काढला. त्यामध्ये फायब्रॉईड 1 से.मी. नी आतील बाजूस अनियमित वाढ झाल्याचे निदर्शनास आले. तरीदेखील जाबदेणार यांनी एका आठवडयात तक्रारदारांना आराम मिळेल असे सांगितले. दरम्यानच्या कालावधीत दिनांक 12/12/2009, 13/12/2009, 20/12/2009 व 11/01/2010 रोजी जाबदेणार यांनी तक्रारदारांची सोनोग्राफी केली. शेवटी जाबदेणार यांच्या आश्वासनांना कंटाळून व डी.यू.बी आजाराच्या त्रासामुळे तक्रारदारांनी दिनांक 15/1/2010 रोजी डॉ. सुनिता तांदुळवाडकर, रुबी हॉस्पिटल, पुणे यांच्याकडे तपासणी केली असता त्यांनी तक्रारदारांना क्रिटीकल अल्ट्रा सोनोग्राफी क्लिनीक येथील रेडिओलॉजिस्ट डॉ. मनोज चिंचवडकर यांच्याकडे डी.यू.बी आजाराच्या तपासणीसाठी पाठविले. तपासणीनंतर डॉ. चिंचवडकर यांनी फिब्रोईडाचा आकार 6.21 डी 1 [से.मी], 5.72 डी 2 [से.मी], 4.63 डी 3 [से.मी], 85.02 व्हॉल्युम [सी.सी] असून तो असाधारण किंवा नेहमीपेक्षा भिन्न असल्याचे सांगितले. डॉ. सुनिता तांदुळवाडकर यांना तपासणीसाठी दिला असता त्यांनी तक्रारदारांवरील मिरेना संयंत्र रोपण हा उपचार अतिशय चुकीचा आहे, हा उपचाराचा सल्ला डॉक्टरांकडून तक्रारदारांच्या परिस्थितीत अपेक्षित नाही व नव्हता असे सांगितले. यावर फक्त शस्त्रक्रिया हा एकच उपचार होता आणि आहे जो की रुग्णाच्या हिताचा व सर्व हॉस्पिटल मध्ये डॉक्टरांकडून सामान्यपणे केला जाणारा उपचार आहे. म्हणून तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार जाबदेणार यांनी चुकीचा, उणीव असलेला, आरोग्यशास्त्र आणि आरोग्यतत्वशास्त्राला अनुसरुन उपचार केला नाही, मिरेना संयंत्र रोपणाची आवश्यकता नव्हती. जाबदेणार यांनी फायब्रॉईडचा आकार पाहण्यासाठी घेतलेला सोनोग्राफी अहवाल प्रथम दर्शनीच चुकीचा, निष्काळजीपणाचा होता आणि आहे. जाबदेणार यांच्या सोनोग्राफी अहवालातील दिसणारा फिब्रॉईडचा आकार आणि डॉ. मनोज यांच्या सोनोग्राफी अहवालातील दिसणारा फिब्रॉईडाचा आकार यामध्ये खूपच तफावत होती आणि आहे. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार डॉ. घन:श्याम तरुकर, गोंदिया आणि डॉ. मनोज चिंचवडकर, पुणे यांचा फायब्रॉईडचा सोनोग्राफी अहवाल ता तंतोतंत सारखा/जुळणार आहे. तर जाबदेणार यांनी वेळोवेळी घेतलेला फायब्रॉईडचा सोनोग्राफी अहवाल वरील डॉक्टरांपेक्षा अतिशय भिन्न होते व आहेत. जाबदेणार डॉक्टरांनी तक्रारदारांबद्यल अक्षम्य निष्काळजीपणा, बेपरवाई दाखविलेली आहे. दिलेला औषधोपचार पूर्णपणे चुकीचा आहे. डॉ. सुनिता तांदुळवाडकर यांच्या सल्ल्यानुसार मिरेना संयंत्र रोपणाची आवश्यकता नव्हती. फायब्रॉईडचा आकार हा असामान्य होता. जाबदेणार यांनी केलेला उपचार हा सर्वसाधारण डॉक्टर व्यवसायात कधीच केला किंवा सुचविला जात नव्हता आणि नाही म्हणून चुकीचा व निष्काळजीपणाचा आहे. जाबदेणार यांनी आरोग्य शास्त्र व आरोग्यतत्वशास्त्र यांनी स्विकारलेल्या आणि मान्यता दिलेल्या आदर्शांचे पालन केले नाही. त्यामुळे तक्रारदारांचे शारिरीक, मानसिक व आर्थिक नुकसान झाले, त्रास सहन करावा लागला, आयुष्य धोक्यात होते. तक्रारदारांनी वकीलांमार्फत दिनांक 2/3/2010 रोजी जाबदेणार यांना नोटीस पाठविली व नुकसान भरपाई पोटी रुपये 5,00,000/- ची मागणी केली. जाबदेणार यांनी नोटीस घेतली नाही. म्हणून तक्रारदारांनी परत दिनांक 15/9/2010 रोजी वकीलांमार्फत नोटीस पाठविली पण ती नॉट क्लेम म्हणून परत आली. जाबदेणार यांनी तक्रारदारांवर उपचार करतांना पुरेपूर बुध्दी वापरली नाही, व्यावसायिकरित्या जागरुक नव्हते, तसेच डी.यू.बी च्या इलाजासाठी वैद्यकीय सुखसुविधा, व्यवस्था करण्यात तत्पर नव्हते. तसेच पारंगत, उच्च शिक्षीत, व्यावसायिक डॉक्टर्स जाबदेणार यांच्याकडे नाहीत. जाबदेणार यांनी काळजी न घेता मिरेना संयंत्र रोपण केले, जे की कधीच न सुचवलेले, पाठपुरावा न करता केलेले आणि वैद्यकीय काळजी न घेता केलेले दिसून येते. मिरेना संयंत्र रोपण हे स्त्री पुढील पाच वर्षे गरोदर राहू नये म्हणून करतात. तक्रारदार हे कधीच जाबदेणार यांच्याकडे गरोदर राहू नये या आजारासाठी दाखल झाले नव्हते. तक्रारदारांचे पती श्री. डॉ. सुरज पाल यांनी 15 वर्षापूर्वीच नस बंदी केली आहे त्यामुळे मिरेना रोपणाची गरज नव्हती. मिरेना संयंत्र रोपण करण्याच्या साहित्यामध्ये असे स्पष्ट सांगितले आहे की, हा ईलाज रुग्णाला जर ऊत्रिन व व्हजायनल [Uterine and vaginal] त्रास होत असेल तरच मिरेना रोपण करणे अथवा सल्ला देणे हे अतिशय चुकीचे आहे. जाबदेणार हे वैद्यकीय व्यावसायिक पात्रता धारक नाहीत. जाबदेणार यांनी चुकीच्या, मान्यता नसलेल्या, खोटया तपासणीमुळे व स्वत:च्या मनाप्रमाणे केलेल्या इलाजामुळे तक्रारदारांना शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागले म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून जाबदेणार यांच्या हॉस्पिटलमधील झालेला खर्च व याचसाठी इतर झालेला खर्च रुपये 27,350/-, तपासणीसाठी व शस्त्रक्रियेसाठी रुबी हॉस्पिटल, पुणे येथे झालेला खर्च व याचसाठी इतर झालेला खर्च रुपये 50,000/-, तपासणीसाठी आणि शस्त्रक्रियेसाठी अकोला इंडोस्कोपी सेन्टर, अकोला येथे झालेला खर्च व याचसाठी इतर झालेला खर्च रुपये 1,50,000/-, एकूण रुपये 2,27,350/- 28 टक्के व्याजासह मागतात. तसेच मानसिक शारिरीक व आर्थिक नुकसान भरपाई पोटी रुपये 3,00,000/- व तक्रारीचा खर्च मागतात. तक्रारदारांनी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
2. जाबदेणार यांनी लेखी जबाब दाखल करुन तक्रारदारांच्या मागणीस विरोध दर्शविला. जाबदेणार यांच्या म्हणण्यानुसार त्या MBBS [Bachelor of Medicine and Surgery] आहेत. तसेच त्या MD - Obstetrics and Gynecology आहेत. भारती विद्यापीठ युनिर्व्हसिटी मेडिकल कॉलेज व भारती हॉस्पिटल व रिसर्च सेन्टर, पुणे येथे Obstetrics and Gynecology विभागाच्या हेड ऑफ द डिपार्टमेंट आहेत. तसेच अनेक हॉस्पिटल मध्ये ज्यात दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचा समावेश होतो त्यामध्ये पॅनल कन्सल्टंट म्हणून काम करतात. मार्च 2010 मध्ये मिरेना – द इंडियन कॉन्टेक्स्ट या विषयावर मुख्य वक्ते म्हणून World congress of FOGSI येथे त्यांना बोलावण्यात आले होते.
तक्रारदार जाबदेणार यांच्याकडे ओ.पी.डी रुग्ण म्हणून दिनांक 12/12/2009 रोजी आल्या होत्या. तक्रारदारांना पाळीच्या वेळी अधिकचा रक्तस्त्राव एक वर्षापासून होत होता ही त्यांची तक्रार होती. त्यासाठी तक्रारदारांनी यू.एस.जी रिपोर्ट आणला होता ज्यामध्ये युटेरसचा आकार नॉर्मल होता, फायब्रॉईडचा आकार वाढल्याचे दिसून येत होते. तक्रारदार होमिओपॅथिक उपचार घेत होत्या. जाबदेणार यांनी तपासणी केल्यानंतर त्यांना खालीलप्रमाणे आढळून आले-
तक्रारदारांचे/रुग्णाचे वय 45 वर्षे, उंची 145 से.मी, वजन 90 कि.ग्रॅ., रक्तदाब 150/90 मि.मि होता. अशा प्रकारची प्रकृती असेल तरे शस्त्रक्रिया व अॅनेस्थेशिया देणे अवघड असते. तक्रारदारांचे पूर्वी दोन सिझेरिन झालेले होते. दोन्ही सर्जरी पेल्व्हीक होत्या. त्यामुळे visceral injury – injury to adjacent organs like bladder and ureter चा धोका होता. रुग्णाने पूर्वी कॉपर टी बसविली होती व त्यास व्यवस्थित साथही दिलेली होती. पूर्वी progesterone थेरेपी घेतली होती. त्यावेळी पेशंटनी/तक्रारदारांनी जाबदेणार डॉक्टरांना सर्व उपचारा संदर्भात माहिती दिली होती. उदा. औषध/इंजेक्शनद्वारे हार्मोन्स देऊन किंवा मिरेना बसविणे ही कर्न्झवेटिव्ह उपचार पध्दती समजावून सांगितली होती तसेच शस्त्रक्रियेद्वारे उपचार पध्दती म्हणून vaginal, abdominal, laparoscopic शस्त्रक्रियेबद्यल माहिती सांगितली होती. सर्व उपचार पध्दतीचे फायदे तोटे, परिणाम तक्रारदारांना सांगण्यात आले होते. त्यावेळी तक्रारदारांनी त्यांचे पती गोंदियाला असतात, पतींशी फोनवरुन बोलून माहिती सांगावी अशीही विनंती केल्यामुळे जाबदेणार डॉक्टर तक्रारदारांच्या पतींशी बोलले होते. सर्व माहिती दिल्यानंतर तक्रारदारांनी/रुग्णांनी मिरेना संयंत्र रोपण करण्यास सांगितले. त्याचवेळी मिरेना रोपणानंतर त्याचे परिणाम जाणविण्यास युटेरिन रक्तस्त्राव कमी होण्यास दोन ते सहा महिने जावे लागतात हेही तक्रारदारांना सांगण्यात आले होते. मिरेना ही एक ड्रग डिलीव्हरी सिस्टीम असून त्यातून प्रोजेस्ट्रॉन्स – हार्मोन्स स्त्रवित केले जातात. त्यानंतर दिनांक 13/12/2009 रोजी तक्रारदार जाबदेणार यांच्याकडे मिरेना रोपणासाठी आल्या. मिरेना रोपणाचे फायदे तोटे, परिणाम सांगितल्यानंतर तक्रारदारांकडून मिरेना रोपणासाठी लेखी परवानगी घेण्यात आली. मिरेना रोपणा पूर्वी जाबदेणार डॉक्टरांनी तक्रारदारांची ट्रान्स व्हजायनल अल्ट्रासोनोग्राफी केली. दिनांक 13/12/2009 रोजी मिरेना रोपण करण्यात आले. त्यावेळी तक्रारदार/रुग्णाची क्लिनिकल स्थिती स्टेबल होती, शस्त्रक्रियेनंतरही तक्रारदार/रुग्णाची क्लिनिकल स्थिती स्टेबल होती, म्हणून तक्रारदार/रुग्णाला घरी सोडण्यात आले. तक्रारदारांना हॉस्पिटल मध्ये कधीच दाखल करण्यात आले नव्हते. ओ.पी.डी रुग्ण म्हणूनच तक्रारदारांवर मिरेना रोपणाची प्रोसिजर करण्यात आली होती. तक्रारदारांची एकूण प्रकृती, वजन [स्थुल प्रकृती], पुर्वीचे झालेले दोन सिझेरिन सेक्शन्स, रक्तदाब याचा विचार करता तक्रारदार/रुग्णावर शस्त्रक्रियेद्वारे उपचार करणे धोक्याचे होते म्हणून मिरेना रोपण ही उपचार पध्दती योग्य होती ती तक्रारदार/रुग्णानी सुध्दा स्विकारली होती. रुग्णावर मोठी शस्त्रक्रिया ज्यामध्ये रुग्णाच्या जीवास धोका निर्माण होऊ शकतो ती टाळून कन्झर्व्हेटिव्ह उपचार करण्याची जबाबदारी डॉक्टरांची असते. त्यानुसारच जाबदेणार डॉक्टरांनी तक्रारदारांवर सर्वात योग्य ती उपचार पध्दती – मिरेना रोपण केले होते. जाबदेणार यांनी दिलेल्या वैद्यकीय सेवेमध्ये कुठलाही निष्काळजीपणा नव्हता. मिरेना रोपणानंतर तक्रारदार/रुग्ण एक आठवडयानंतर दिनांक 19/12/2009 रोजी जाबदेणारांकडे आले होते. त्यावेळी तक्रारदार/रुग्णाची स्थिती चांगली होती, त्या आनंदी होत्या, कुठलाही त्रास झाल्याचे त्यांनी सांगितले नव्हते. जाबदेणार डॉक्टरांनी मिरेना रोपण व्यवस्थित झाल्याची खात्री केली होती. त्याच दिवशी परत एकदा ट्रान्स व्हजायनल अल्ट्रासोनोग्राफी करण्यात आली होती, तेव्हा बसविलेल्या डिव्हाईस – मिरेना ची पोझिशन योग्य असल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर तक्रारदार पुन्हा जाबदेणार यांच्याकडे दिनांक 11/1/2010 रोजी आल्या व PV bleeding बद्यल त्यांनी तक्रार केली. विचारणा केली असता, क्लिनीकल तपासणी मध्ये तक्रारदार हया जाबदेणार डॉक्टरांनी सांगितलेली औषधी अनियमितपणे घेत असल्याचे दिसून आले. तक्रारदारांनी काही हार्मोनल गोळया घेतल्या होत्या, Tab. Primolut N अनियमित घेतल्या होत्या. त्याचेवळी जाबदेणार डॉक्टरांनी तक्रारदारास हया गोळया नियमितपणे घेण्यास सांगितले होते. गोळया अनियमितपणे घेतल्यामुळे अनियमित रक्तस्त्राव होतो असेही तक्रारदारांना सांगण्यात आले होते. जाबदेणार डॉक्टरांनी तक्रारदारास रक्तस्त्राव स्टॅबिलाईज होण्यासाठी Tab. Duoluton L घेण्यास सांगितले. मिरेना मुळे युटेरिन रक्तस्त्राव कमी होण्यासाठी, उपचार परिणामकारक होण्यासाठी दोन ते सहा महिन्यांचा कालावधी लागतो हेही तक्रारदारांना सांगण्यात आले होते. जाबदेणार यांनी तक्रारदारांची ट्रान्स व्हजायनल अल्ट्रासोनोग्राफी दिनांक 12/12/2009, 20/12/2009 व 11/1/2010 रोजी केली होती. प्रत्येक वेळी सोनोग्राफी मध्ये मिरेना संयंत्र योग्य बसविल्याचे दिसून आले. त्यावेळी endometrial thickness 7 mm पेक्षा अधिक नव्हता. तक्रारदार/रुग्ण ज्या ज्या वेळी जाबदेणार डॉक्टरांकडे आल्या होत्या त्या प्रत्येक वेळी तक्रारदार/रुग्णास रक्तस्त्राव झाल्याचे दिसून आले नव्हते. जाबदेणार यांच्या म्हणण्यानुसार फायब्रोईड युटेरिन रक्तस्त्रावामध्ये मिरेना संयंत्र बसविणे ही शस्त्रक्रियेपक्षा योग्य उपचार पध्दती आहे. जाबदेणार यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदारांची प्रकृती, वजन, रक्तदाब, मागील सिझेरिन्स विचारात घेता शस्त्रक्रिया हा उपचार तक्रारदार/रुग्णास मानवणारा नव्हता. त्याउलट मिरेना रोपण सुरक्षित होते. मिरेना संयंत्राद्वारे हार्मोन्स डिलीव्हर endometrium केले जातात. मिरेना मुळे त्यातील progesterone मुळे, पेशंटच्या शरीरातील हार्मोन्स वर काहीही विपरीत परिणाम होत नाही. जाबदेणार यांनी सांगितल्याप्रमाणे हार्मोनल प्रिस्क्रीप्शन नुसार तक्रारदारांनी औषधी घ्यावयास हवी होती. तक्रारदारांनी रुबी हॉल क्लिनीक, पुणे येथील जो रक्ताचा रिपोर्ट नुसार तक्रारदारांचे हिमोग्लोबिन 12.20 gm/dl होते. तक्रारदारांनी दुसरे ओपिनिअन घेतले याबद्यल कुठलीही माहिती जाबदेणार यांना दिली नाही. तसेच त्यानंतर तक्रारदारांनी हिस्टरेक्टमी ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला त्याची माहिती जाबदेणार यांना नव्हती. तक्रारदारांनी जर जाबदेणार यांनी सांगितलेल्या पध्दतीनुसार नियमितपणे औषधी घेतली असती तर कदाचित शस्त्रक्रिया टळली असती. स्टॅन्डर्ड वैद्यकीय पध्दतीनुसार तक्रारदारास योग्य असलेला उपचार जाबदेणार डॉक्टरांनी दिलेला होता. हा उपचार देतांना जाबदेणार यांनी संपूर्ण काळजी घेतलेली होती. जाबदेणार यांनी कुठलाही वैद्यकीय निष्काळजीपणा केलेला नव्हता. तक्रारदारांनी पाठविलेल्या दिनांक 2/3/2010 व 15/09/2010 रोजीच्या नोटीसा जाबदेणार यांना प्राप्त झालेल्या नाहीत. तक्रारदारांनी जाबदेणार यांच्या वैद्यकीय सेवेतील निष्काळजीपणा पुराव्यासह सिध्द केलेला नाही. वरील कारणांवरुन तक्रारदारांची तक्रार रुपये 10,000/- खर्चासह नामंजुर करावी अशी मागणी जाबदेणार करतात. जाबदेणार यांनी शपथपत्र, कागदपत्रे, मेडिकल लिटरेचर, निवाडे, डॉ. सुनिता तांदुळवाडकर यांचे शपथपत्र दाखल केले.
3. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. जाबदेणार यांनी दिनांक 13/12/2009 रोजी मिरेना संयंत्र बसविल्यानंतर त्याचा परिणाम होण्यास दोन ते सहा महिने लागतील असे तक्रारदारांना सांगितले असतांनाही तक्रारदार लगेचच एक आठवडयानंतर दिनांक 19/12/2009 रोजी लगेचच त्यांचा अति रक्तस्त्रावाचा [bleeding] चा त्रास कमी झाला नाही म्हणून जाबदेणार डॉक्टरांकडे गेल्या. त्यावेळेस जाबदेणार डॉक्टरांनी मिरेना संयंत्र तक्रारदारांच्या शरीरात व्यवस्थित बसले किंवा नाही याची तपासणी करण्यासाठी ट्रान्स व्हजायनल अल्ट्रासोनोग्राफी केली असता मिरेना संयंत्र व्यवस्थित असल्याचे सांगितले. मिरेना संयंत्रामध्ये हार्मोन्स असलेली औषधी असतात व ती स्त्रवण्यास [delivery] वेळ लागत असल्यामुळे, त्याचा परिणाम होण्यासही वेळ लागणार होता. त्यास दोन ते सहा महिन्यांचा अवधी लागणार असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यासाठी डॉक्टरांनी मेडिकल लिटरेचर दाखल केले आहे. ते पुढीलप्रमाणे-
Fibroid bleeding controlled by progesterone containing (Lng-IUS) IUD, Author – Paul Indman, M.D. 19/07/2010 –
“A progesterone containing IUS (or “Lng-IUS), marketed in the USA AS Mirena, has to be shown to decrease or eliminate menorrhagia (heavy menstrual bleeding) in many women, and is providing for some to be a viable alternative to surgery. This study evaluated 46 women with fibroids and measured their bleeding at baseline and at 3, 6, and 12 months after insertion of the IUD. After 6 months almost 60% of women stopped having periods. This decreased to 35% at the end of 2 years. Mid cycle bleeding decreased to approximately 10% in women with the IUD. The size of the fibroids was measured by ultrasound, and there was no decrease in size during the study period.”
वरील मेडिकल लिटरेचर वरुन हे मिरेना [LNG IUD] डिव्हाईस बसविल्यानंतर त्याचा योग्य तो परिणाम दिसण्यास दोन ते सहा महिन्यांचा अवधी लागणार असल्याचे स्पष्ट होते. तसे असतांनाही तक्रारदारांनी हया कालावधीपूर्वीच दुसरीकडून हिस्टरेक्टमी करुन घेतली. यामध्ये जाबदेणार डॉक्टरांचा कुठलीही सेवेत त्रुटी नाही तसेच निष्काळजीपणाही नाही. डॉक्टरांनी तक्रारदार/ रुग्णाच्या एकुण प्रकृतीनुसार [स्थूल, हायपरटेन्शन, उंची] चा विचार करुनच या थेरेपीचा अवलंब करण्याचे ठरविले होते. वास्तविक मिरेना [LNG IUD]संयंत्र बसविल्यामुळे तक्रारदारांच्या शरीराचे कुठलेही नुकसान झालेले नाही. जर डॉक्टरांनी ही कन्झर्व्हेटिव्ह ट्रिटमेंट न देता सरळ शस्त्रक्रियेचाच निर्णय घेतला असता तर तक्रारदार/रुग्णाच्या शरीराचे नुकसान झाले असते असे मंचाचे मत आहे.
सर्व प्रकारच्या उपाय योजनेचे संपूर्ण प्रकारे [फायदे, तोटे, परिणाम, गुंतागूंत] माहिती दिल्यानंतरच तक्रारदारांनी स्वत:च मिरेना संयंत्र बसविण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामध्ये जाबदेणार डॉक्टरांनी कुठलाही दबाव तक्रारदार/रुग्णावर टाकलेला नाही.
जाबदेणार डॉक्टरांनी डॉ. सुनिता तांदुळवाडकर यांचे शपथपत्र दाखल केले. त्यांनी जाबदेणार डॉक्टरांनी योग्य तो उपचार दिल्याचे व त्यात कुठलाही निष्काळजीपणा नसल्याचे म्हटले आहे. डॉ. सुनिता तांदुळवाडकर यांनी त्यांच्या शपथपत्रामध्ये “That, as in this case the HRF (High Risk Factors) were obesity, hypertension, previous two open surgeries (cesarean sections) the gynecologist who will first see such patient for the first time will always weigh between the conservative and surgical treatment with its associated risks and try to give conservative treatment as a first option, as patient is only 42 years of age. Though patient had a fibroid as the fibroid was not in the cavity and hemoglobin of the patient was above 10 gm % conservative treatment can very well be opted for. It is a known fact that Mirena takes 2-6 months for its action and then it remains for 5 years by which time patient may attain menopause and may not need surgery for her life time.”
तसेच Current Opinion in Obstetrics & Gynecologyमध्ये खालीलप्रमाणे नमूद करण्यात आलेले आहे.
Current Opinion in Obstetrics & Gynecology :
December 2004- Volume 16- Issue 6- pp 487-490
Women’s health
Levonorgestrel – (Mirena Device) ( LNGIUS) releasing intrauterine system in the treatment of heavy menstrual bleeding –
Hurskainen, Ritva; Paavonen. Jorma
Spiroff – Text Book
“Because menorrhagia is often a reason for seeking medical attention, it is
important to consider the outcomes and costs to provide the most appropriate care. The levonorgestrel – releasing intrauterine system improves health- related quality quality of life significantly at relatively low cost. It is the most effective medical treatment for menorrhagia and comparable to surgical interventions. The system is not associated with serious complications. Although not all women are successfully treated, about 60% avoid hysterectomy and are satisfied with the treatment. Thus, the levonorgestrel – releasing intrauterine system should be the first line of treatment for heavy menstrual bleeding.”
वरील मेडिकल लिटरेचर वरुन मिरेना डिव्हाईस ही उपचार पध्दती शस्त्रक्रियेपेक्षा खूपच परिणामकारक आहे ही बाब स्पष्ट होते.
तसेच Cyclical Progestogens for heavy menstrual bleeding (Cochrane Review) Lethaby A, Irvine G, Cameron I. ABSTRACT मध्ये पुढील प्रमाणे नमूद केले आहे-
“Progestogen therapy administered from day 5 to 26 of the menstrual cycle was significantly less effective at reducing menstrual blood loss than the progestogen releasing intrauterine system (LNG IUS) although the reduction from baseline was significant for both groups. The odds of the menstrual period becoming “normal” (i.e <80 mls/cycle) were also less likely in patients treated with norethisterone (NET) (days 5 to 26) compared to patients treated with LNG IUS.”
यासंदर्भात मंचाने मा. सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा श्री. अच्युतराव हरिभाऊ खोडवा विरुध्द स्टेट ऑफ महाराष्ट्र IV 2006 CPJ Page 8 या न्यायनिवाडयाचा आधार घेतला. या निवाडयामध्ये पुढीलप्रमाणे नमूद केलेले आहे
“पेशंटवर उपचार करतांना, प्रत्येक डॉक्टरांची वैद्यकीय मते आणि कौशल्ये वेगवेगळी असू शकतात. परंतु ते उपचार मेडिकल प्रोफेशनला मान्यता प्राप्त असणारे असले पाहिजेत, डॉक्टरांनी पेशंटवर उपचार करतांना त्यांचे पुर्ण कौशल्य वापरले, दक्षता घेतली आणि तरीही पेशंटचा मृत्यू झाला किंवा त्यास कायमचे अपंगत्व आले तर अशा वेळी तो डॉक्टरांचा निष्काळजीपणा ठरत नाही. ”
प्रस्तुतच्या तक्रारीमध्ये सुध्दा जाबदेणार डॉक्टरांनी मेडिकल प्रॅक्टीस नुसार, तक्रारदारांची प्रकृती, वय, वजन, मागील दोन सिझेरिन्स, रक्तदाब या सर्वांचा विचार करुनच, सर्व प्रकारच्या थेरेपी तक्रारदार/रुग्णास सांगून कन्झर्व्हेटिव्ह ट्रिटमेंट – मिरेना बसविण्याचा सल्ला दिला होता. त्यास तक्रारदारांनी संमती दिली होती. त्यानुसारच तक्रारदारांवर मिरेना रोपण करण्यात आले होते. मिरेना रोपणानंतर त्याचा परिणाम जाणविण्यासाठी दोन ते सहा महिन्यांचा कालावधी जावा लागतो असेही जाबदेणार डॉक्टरांनी तक्रारदार/रुग्णास सांगितले होते. यासंदर्भात वर नमुद केल्याप्रमाणे मेडिकल लिटरेचरही मंचासमोर दाखल करण्यात आलेले आहे. मिरेना रोपणानंतर आठच दिवसात तक्रारदार/रुग्ण जाबदेणार यांच्याकडे आल्यानंतर त्यांना कुठला त्रास झाला, अतिरक्तस्त्राव झाला यासंदर्भात त्यांनी कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही. तक्रारदार रुग्ण मिरेना रोपणानंतर आठच दिवसात परत आल्यानंतर जाबदेणार डॉक्टरांनी सोनोग्राफी करुन मिरेना रोपण व्यवस्थित झाल्याबद्यलची खात्रीही करुन घेतलेली होती. परंतु तरीही तक्रारदारांनी त्यानंतर केवळ एका महिन्यातच दुस-या डॉक्टरांकडून शस्त्रक्रिया करुन घेतलेली आहे. उलट तक्रारदारच जाबदेणार यांनी सांगितल्यानुसार औषध घेत नव्हते, अनियमितपणे औषध घेत होते हे हॉस्पिटलच्या कागदपत्रांवरुन दिसून येते. मिरेना बसविल्यानंतर त्याचा परिणाम दिसून येण्यासाठी दोन ते सहा महिन्यांचा कालावधी लागणार होता हे माहित असूनही तक्रारदारांनी स्वत:च दुसरी शस्त्रक्रिया केलेली आहे त्यासाठी मात्र ते जाबदेणारास जबाबदार ठरवतात असे मंचाचे मत आहे. जाबदेणार यांच्या सेवेतील त्रुटी व निष्काळजीपणा तक्रारदारांनी पुराव्यासह सिध्द केलेला नसल्यामुळे व मा. सर्वोच्च न्यायालयाच्या वर नमुद न्यायनिवाडयानुसार मंच तक्रारदारांची तक्रार नामंजुर करीत आहे.
वरील विवेचनावरुन व दाखल कागदपत्रांवरुन खालीलप्रमाणे आदेश देण्यात येत आहे-
:- आदेश :-
[1] तक्रार नामंजुर करण्यात येत आहे.
[2] खर्चाबद्यल आदेश नाही.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.