(द्वारा मा. सदस्या – श्रीमती. माधुरी एस. विश्वरुपे)
1. तक्रारदारांनी सामनेवाले नं. 1 कंपनीने उत्पादित केलेला मोबाईल हॅडसेट GIONEE - P25 model (Product serial V120121505015407710 & IMEI No. 86710002617817 ) ता. 17/07/2015 रोजी विकत घेतला. सदर मोबाईलच्या इन्वहाईसची प्रत मंचात दाखल आहे.
2. तक्रारदार यांचा मोबाईल 11 महिने व्यवस्थितपणे चालु होता. सदर मोबाईल ता. 16/07/2016 रोजी ना दुरूस्त (Hanged) झाला. तक्रारदार यांनी सामनेवाले नं. 1 कपंनीच्या सर्विस सेंटर बाबत मार्केटमध्ये चौकशी केला असता उल्हासनगर येथील सव्हीस सेंटर 5 ते 6 महीन्यापासून बंद असल्याचे समजले.
3. तक्रारदार यांनी त्यानुसार सामनेवाले नं. 2 यांचेकडे ता. 17/07/2016 रोजी प्रत्यक्ष जावुन भेट दिली तथापी रविवार असल्याने सदर सेंटर बंद असल्याचे आढळले.
4. तक्रारदार यांनी ता. 18/07/016 रोजी सामनेवाले नं. 2 यांचेकडे दुरूस्तीसाठी दिला असता त्यांनी I/W (In Warranty) सदर मोबाईल दुरूस्तीसाठी स्विकारला व त्याप्रमाणे सर्विस पावती दिली. सामनेवाले नं. 2 यांनी तक्रारदार यांना ता. 18/07/2016 रोजी दिलेली मोबाईल सर्विस पावती / जॉब शिट क्र. 577 ची प्रत मंचात दाखल आहे.
5. तकारदार यांच्या म्हण्ण्यानुसार सामनेवाले यांनी त्याच दिवशी SMS द्वारे तक्रारदार यांना मोबाईल दुरुस्तीचा अंदाजे खर्च रु. 2,578.49 असल्याचे कळवले.
6. तक्रारदार यांनी या संदर्भात सामनेवाले नं. 1 यांच्या मुख्य कार्यालयामध्ये संपर्क करुन तक्रारदार यांचा मोबाईल सामनेवाले नं. 2 यांनी In Warranty दुरूस्तीसाठी स्विकारल्याची माहीती दिली. तथापी मोबाईल दुरूस्तीचा Closer Report ता. 22/07/2016 रोजी तक्रारदार यांच्या मोबाईलचा वॉरंटी कालावधी संपुष्टात आल्यानंतर 6 दिवसांनी तयार झाला असल्याने दुरूस्तीचा खर्च देणे आवश्यक असल्याचे सामनेवाले नं. 1 यांनी सांगितले. सबब तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार सामनेवाले यांचे विरुध्द दाखल केली आहे अशी तक्रारदार यांची तक्रार आहे.
7. सामनेवाले नं. 1 व 2 यांना मंचाची नोटीस प्राप्त होवुनही गैरहजर असल्याने सामनेवाले 1 व 2 यांचे विरुध्द प्रस्तुत तक्रार एकतर्फा चालविण्याबाबतचा आदेश मंचाने पारित केला आहे.
8. तक्रारदार यांची तक्रार, दाखल कागदपत्रे, पुरावा शपथपत्र यांचे सखोल वाचन केले तक्रारदार यांनी दाखल केलेली तक्रार, कागदपत्रे व पुरावा शपथपत्र हाच त्यांचा लेखी व तोंडी युक्तिवाद असल्याबाबत निवेदन केले. सबब उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे प्रकरण अंतीम आदेशासाठी नेमण्यात येते.
9. कारण मिमांसा
अ) तक्रारदार यांनी सामनेवाले नं. 1 कंपनीने उत्पादीत केलला मोबाईल हॅडसेंट रक्कम रु. 5,099/- किमतीचा ता. 17/06/2015 रोजी विकत घेतल्याचे तक्रारदार यानी दाखल केलेल्या मोबाईलच्या बिलावरुन स्पष्ट होते.
ब) तक्रारदार यांना सदर मोबाईल विकत घेतल्यानंतर 12 महिन्याचा वॉरंटी कालावधी असल्याबाबत सामनेवाले यांनी दिलेली warranty card ची प्रत मंचात दाखल आहे.
क) प्रस्तुत प्रकरणात सामनेवाले यांचे तर्फे आक्षेप दाखल नाही. सबब तक्रारदार यांचा पुरावा अबाधित आहे.
ड) तक्रारदार यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदार यांचा मोबाईल वॉरंटी कालावधीत ता. 16/06/2016 रोजी नादुरूस्त (Hang) झाला. तक्रारदार यांचा मोबाईल Start होत नसल्याने त्यांनी त्यांच्या परिसरामध्ये उल्हासनगर येथील सामनेवाले नं. 1 कंपनीच्या सर्व्हिस सेंटर मध्ये संपर्क करण्याचा प्रयत्न केला. तथापी सदर सर्व्हिस सेंटर गेल्या 5 ते 6 महीन्यापासून बंद असल्याचे आढळले तसेच सामनेवाले नं. 2 यांचे सेंटर ता. 17/06/2016 रोजी रविवार असल्याने बंद होते सबब तक्रारदारांना सदर मोबाईल ता. 16/06/2016 व ता. 17/06/2016 रोजी दुरूस्तीसाठी देणे शक्य झाले नाही.
इ) तक्रारदार यांनी सामनेवाले नं. 2 यांचेकडे ता. 18/07/2016 रोजी सदर मोबाईल दुरूस्ती साठी दिला असुन सामनेवाले नं. 2 यांनी तक्रारदार यांना मोबाईल दुरूस्ती बाबतचे दिलेले जॉबशीटची प्रत मंचात दाखल आहे. सदर जॉबशीट मध्ये नमुद केल्यानुसार सामनेवाले नं. 2 यांनीसदर मोबाईल I/W (In warranty) दुरूस्ती साठी स्विकारल्याचे नमुद केले आहे.
ई) तक्रारदार यांच्या म्हणण्यानुसार सामनेवाले नं. 2 यांनी सदर मोबाईल दुरूस्तीसाठी रक्कम रु. 2,478/- चार्जेसची आकारणी केल्याबाबतचा SMS तक्रारदार यांना पाठवला तथापी तक्रारदार यांचा मोबाईल बंद असल्यामुळे त्यांना तो प्राप्त झाला नाही असे तक्रारदार यांनी तोंडी युक्तिवादाचे वेळी निवेदन केले.
उ) तक्रारदार यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदार यांचा मोबाईल सामनेवाले नं. 2 यांनी इन वॉरंटी दुरूस्तीसाठी स्विकारल्यानंतर पुन्हा दुरस्ती चार्जेसची आकारणी करुन त्रृटींची सेवा दिली आहे.
ऊ) सामनेवाले यांचेतर्फे आक्षेप दाखल नाही. सबब तक्रारदार यांचा पुरावा अबाधित आहे. सामनेवाले नं. 2 यांनी तक्रारदार यांच्या मोबाईल विना मोबदला कोणत्याही चार्जेसची आकारणी न करता दुरूस्त करुन देणे आवश्यक आहे असे मंचाचे मत आहे.
ए) सामनेवाले नं. 1 यांनी तक्रारदारांना सदर मोबाईल दुरूस्तीचा closer Report ता. 22/07/2016 रोजी तयार झालेला असल्याने दुरूसतीचा खर्च देणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे. तथापी तक्रारदार यांना ता. 16/06/2016 रोजी त्यांच्या परिसरातील सामनेवाले नं. 1 यांचे सर्विस सेंटर बंद असल्याने व ता. 17/07/2016 रोजी रविवार असल्याने तक्रारदार यांनी ता. 18/07/2016 रोजी सामनेवाले नं. 2 यांचे कडे सदर मोबाईल दुरूस्ती साठी दिला असुन त्यांनी In Warranty दुरुस्तीसाठी स्विकारल्याचे जॉबशीट क्र. 577 ता. 18/07/2016 यावरुन स्पष्ट होते. सबब, सामनेवाले यांनी तक्रारदार यांना मोबाईल दुरूस्तीच्या खर्चाची आकारणी करुन त्रृटीची सेवा दिल्याचे जाहीर करण्यात येते.
7. सबब, खालील प्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
1) तक्रार क्र. 507/2016 अंशतः मंजुर करण्यात येते.
2) सामनेवाले 1 व 2 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तकरित्या तक्रारदार यांना सदोष सेवा दिल्याचे जाहीर करण्यात येते.
3) सामनेवाले 1 व 2 यांना वैयक्तिकरित्या व संयुक्तकरित्या आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांचा मोबाईलची विना मोबदला व कोणत्याही चार्जेसची आकारणी न करता ता.31/08/2017 पर्यंत दुरूस्ती करुन द्यावी. तसे न केल्यास ता. 01/09/2017 पासून प्रत्येक महीन्याकरीता रक्कम रु. 100/- (अक्षरी रु. शंभर फक्त) दंडाची रक्कम आदेश पुर्तीपर्यंत तक्रारदार यांना द्यावी.
4) सामनेवाले 1 व 2 यांना वैयक्तिकरित्या व संयुक्तकरित्या आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांना तक्रारीच्या खर्चाची रक्कम रु.2,000/- (अक्षरी रु. दोन हजार फक्त) ता. 31/08/2017 पर्यंत द्यावी. सदर रकमा विहित मुदतीत अदा न केल्यास दि. 01/09/2017 पासून आदेशाच्या पुर्ततेपर्यंत द.सा.द.शे 9% व्याजदरासह द्याव्यात.
5) आदेशाच्या प्रती उभय पक्षकाराना विनाविलंब, विनाशुल्क पाठविण्यात याव्यात.
6) संचिकेच्या अतिरिक्त प्रती असल्यास तक्रारदारांना परत करण्यात याव्यात.