न्या य नि र्ण य
(व्दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्यक्षा)
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे—
तक्रारदार हे मिरज, जि. सांगली येथील रहिवासी आहेत. ते स्वतःच्या व कुटुंबाच्या उदरनिर्वाहाकरिता कला/चित्रपट क्षेत्रातील शॉर्ट फिल्म्स बनविण्याचा व्यवसाय करतात. त्यामुळे त्यांना चांगला कॅमेरा व चांगला बॅटरी बॅकअप असणारा स्मार्टफोन आवश्यक होता. वि.प.क्र.1 ही मोबाईचे उत्पादन करणारी कंपनी असून वि.प.क्र.2 हे त्यांचे अधिकृत स्थानिक सर्व्हिस सेंटर आहे. तक्रारदार यांनी वि.प.क्र. 1 यांनी उत्पादित केलेला जिओनी एस-6 हा स्मार्टफोन रक्कम रु.16,800/- इतकी रोख रक्कम देवून खरेदी केला. त्याचे वर्णन Gionee S 6 – I.M.E.I. 869327020731482, 869327021731481 CHAR-GNA985V2000 असे आहे. परंतु सदर फोन खरेदी केलेपासून त्वरितच त्यामध्ये बिघाड होणे सुरु झाले. सदर फोनची बॅटरी चार्ज होत नव्हती. सदर मोबाईल एक तास चार्जिंगला लावला तरी त्या एका तासात फक्त 7 टक्केच चार्जिंग होत होते. मोबाईल चार्जिंगला लावून जर त्या मोबाईलवर थोडे जरी बोलले किंवा इतर थोडे जरी काम केले तरी सदर फोनची बॅटरी पटकन कमी होत होती. त्यामुळे मोबाईल अचानकपणे बंद पडत होता. बॅटरी चार्जिंगचा तर दोष होताच पण त्याबरोबरच मोबाईल ऑफ करुन पुन्हा स्वीच ऑन केल्यानंतरही Android is starting असे 15 ते 20 मिनिटे स्क्रीनवर दिसत होते म्हणजेच मोबाईल स्वीच ऑन केल्यानंतर त्वरित सुरु व्हायला पाहिजे होता तो सुरुच होत नव्हता. त्यामुळे सदरचा फोन खूप वेळा स्वीच ऑफ करुन स्वीच ऑन करावा लागत होता. तसेच मोबाईल चार्जिंगला लावलेले असतान अचानकपणे कोणतेही दुसरेच अॅप्लीकेशन उघडत होते किंवा कॉलिंगचे बटन दाबले असता दुसरेच अॅप्लीकेशन आपोआप उघडत होते. अशा प्रकारचे अनेक दोष आढळून आलेने तक्रारदार यांनी सदरचा फोन कोल्हापूर येथील वि.प.क्र.2 या सर्व्हिस सेंटर सेंटरकडे दि.9/1/17 रोजी दुरुस्तीसाठी जमा केला. त्यांनी तक्रारदार यांना जॉब कार्ड देवून सदर पार्टची दुरुस्ती चार दिवसांत करुन देतो असे खोटे आश्वासन दिले. सदर जॉब कार्डचा नंबर GC17100036863 असा आहे. चार दिवसानंतर तक्रारदार वि.प.क्र. 2 यांचेकडे गेले असता हॅण्डसेट अजून दुरुस्त झालेला नाही या कारणास्तव तक्रारदारास परत पाठवून दिले गेले. त्यानंतर अनेक वेळा तक्रारदार वि.प.क्र.2 यांचेकडे गेले असताना त्यांना समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. सरतेशवेटी ग्राहक न्यायालयात जाणार असे वि.प.क्र. 2 यांना तक्रारदाराने बजावले असता त्यांनी आहे तसा सदोष हॅण्डसेट तक्रारदरास परत केला. अशा प्रकारे वि.प. यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला आहे. सदर मोबाईलमधील दोष आजतागायत दूर झालेला नाही तसेच तो भविष्यात सुध्दा दुरुस्त होण्यासारखा नाही. त्यामुळे तक्रारदारास नाईलाजास्तव दुसरा मोबाईल खरेदी करावा लागला आहे. तक्रारदार हे उदरनिर्वाहासाठी चित्रपट व्यवसायावर अवलंबून आहेत. मोबाईलचा वापर हा त्याच्या व्यवसायाचा अविभाज्य घटक आहे. त्यांनी खरेदी केलेल्या सदोष मोबाईलमुळे त्यांना अनेक अडचणी निर्माण होवून तक्रारदर यांना प्रचंड मानसिक त्रास झालेला आहे. सबब, वि.प. यांनी तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली असलेने तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज या मे. मंचात दाखल केला आहे.
2. तक्रारदाराने याकामी मोबाईल खरेदीची किंमत रक्कम रु.16,800/-, व या रकमेवर खरेदी तारखेपासून ते संपूर्ण रक्कम वसूल होवून मिळेपर्यंत 18 टक्के दराने व्याज मिळावे, व्यावसायिक नुकसानीपोटी रक्कम रु.50,000/-, मानसिक आर्थिक त्रासापोटी रक्कम रु.20,000/- व तक्रारीचा खर्च रु. 5,000/- वि.प. यांचेकडून वसूल होवून मिळावेत अशी विनंती याकामी केली आहे.
3. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत वादातील मोबाईल खरेदी केल्याची पावती, मोबाईल दुरुस्तीसाठी दिलेल्या जॉब कार्डची प्रत, तक्रारदार यांनी सांगली येथील सर्व्हिस सेंटरमध्ये मोबाईल दुरुस्तीसाठी दिल्यानंतर त्यांनी दिलेल्या ELS Report 1125-1482-S6 या रिपोर्टची प्रत इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच तक्रारदाराने मूळ प्रकरणाचे कामी दाखल केलेले शपथपत्र हाच पुरावा म्हणून वाचण्यात यावा पुरसीस तसेच लेखी युक्तिवादही दाखल केला आहे.
4. वि.प. नं.1 व 2 यांचेवर नोटीसची बजावणी होवूनही ते याकामी हजर झाले नाहीत. सबब, प्रस्तुतचे प्रकरण त्यांचेविरुध्द एकतर्फा चालविणेचा आदेश नि.1 वर पारीत करण्यात आला.
5. वर नमूद तक्रारदार यांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदाराला सेवेत त्रुटी/कमतरता दिली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार वि.प. यांचेकडून वादातील मोबाईलची खरेदी किंमत व नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत काय ? | होय, अंशतः. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे. |
वि वे च न –
मुद्दा क्र. 1 –
6. वर नमूद मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत कारण तक्रारदारांनी वि.प.क्र.1 यांचेकडून Gionee S 6 – I.M.E.I. 869327020731482, 869327021731481 CHAR-GNA985V2000 या वर्णनाचा स्मार्टफोन रक्कम रु.16,800/- इतकी रोख रक्कम देवून खरेदी केला ही बाब वि.प.क्र.क्र 1 यांनी प्रस्तुतकामी हजर होवून नाकारलेली नाही. तक्रारदार यांनी नि.5 चे कागदयादीसोबत अ.क्र.1 ला मोबाईल खरेदीचे बिल दाखल केले आहे. सदर बिलाचे अवलोकन केले असता तक्रारदार व वि.प.क्र.1 हे ग्राहक व सेवापुरवठादार आहेत हे स्पष्ट होते. तसेच तक्रारदार यांनी सदरचे मोबाईलमध्ये दोष असलेने तो वि.प.क्र.2 यांचेकडे दुरुस्तीसाठी दिला ही बाब वि.प.क्र. 2 यांनीही हजर होवून नाकारलेली नाही. तक्रारदाराने त्याबाबत वि.प.क्र.2 ने दिलेली सर्व्हिस जॉब शीट दाखल केली आहे. वि.प.क्र.2 हे वि.प.क्र.1 यांचे अधिकृत सर्व्हिस सेंटर आहेत. सबब, तक्रारदार व वि.प.क्र.2 यांचेमध्येही ग्राहक व सेवापुरवठादार हे नाते अस्तित्वात असल्याची बाब स्पष्ट होते. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
7. नि.5/1 ला दाखल केलेल्या नि.20/08/16 च्या वि.प. क्र.1 यांनी तक्रारदारांना दिलेल्या पावतीवरुन असे दिसते की, तक्रारदाराने Gionee S 6 – I.M.E.I. 869327020731482, 869327021731481 CHAR-GNA985V2000 या वर्णनाचा स्मार्टफोन रक्कम रु.16,800/- इतकी रोख रक्कम देवून खरेदी केला. नि.5/2 चे वि.प.क्र.2 या वि.प.क्र.1 चे सर्व्हिस सेंटरचे सर्व्हिस जॉबशीटवरुन असे दिसते की, दि. 9/1/17 रोजी सदरचा मोबाईल हॅण्डसेट दुरुस्तीकरिता देण्यात आलेला होता. तक्रारदाराचे म्हणणे असे की, त्यांनी तक्रारदार यांना जॉब कार्ड देवून सदर पार्टची दुरुस्ती चार दिवसांत करुन देतो असे खोटे आश्वासन दिले. सदर जॉब कार्डचा नंबर GC17100036863 असा आहे. चार दिवसानंतर तक्रारदार वि.प.क्र. 2 यांचेकडे गेले असता हॅण्डसेट अजून दुरुस्त झालेला नाही या कारणास्तव तक्रारदारास परत पाठवून दिले गेले. त्यानंतर अनेक वेळा तक्रारदार वि.प.क्र.2 यांचेकडे गेले असताना त्यांना समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. सरतेशवेटी ग्राहक न्यायालयात जाणार असे वि.प.क्र. 2 यांना तक्रारदाराने बजावले असता त्यांनी आहे तसा सदोष हॅण्डसेट तक्रारदरास परत केला. अशा प्रकारे वि.प. यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला आहे. सदर मोबाईलमधील दोष आजतागायत दूर झालेला नाही तसेच तो भविष्यात सुध्दा दुरुस्त होण्यासारखा नाही. त्यामुळे तक्रारदारास नाईलाजास्तव दुसरा मोबाईल खरेदी करावा लागला आहे असे तक्रारदार यांचे कथन आहे. तक्रारदाराने दाखल केलेल्या वि.प.क्र.2 यांच्या सर्व्हिस जॉबशीटचे अवलोकन केले असता त्यामध्ये हॅण्डसेटची वॉरंटी मोबाईल खरेदीपासून 12 महिन्यांची आहे तर बॅटरी वगैरे अॅक्सेसरीजची वॉरंटी ही सहा महिन्यांकरिता आहे. तक्रारदाराने दि.22/8/16 रोजी मोबाईल खरेदी केला व तो दि.9/1/17 रोजी वि.प.क्र.2 यांचेकडे दुरुस्तीसाठी दिला म्हणजे सदरचे हॅण्डसेटमध्ये निर्माण झालेले दोष हे वॉरंटी कालावधीतच निर्माण झाले ही बाब स्पष्टपणे दिसून येते. तक्रारदाराने त्यांना वि.प. यांनी दिलेला जो ELS Report 1125-1482-S6 हा रिपोर्ट दाखल केला आहे त्यामध्ये Service coverage : Under Warranty असे नमूद आहे. यावरुन सदरचे हॅण्डसेटमध्ये वॉरंटी कालावधीत दोष निर्माण झाले व ते दोष दूर करुन देण्यात वि.प. असमर्थ ठरले आहेत ही बाब सिध्द होते. तक्रारदाराने सादर केलेला पुरावा हा त्याची संपूर्ण केस शाबीत करण्याकरिता पुरेसा आहे. हा सर्व पुरावा जसाच्या तसा मान्य करण्यासारखा आहे, कारण जाबदारांनी प्रस्तुत प्रकरणात हजर राहून तक्रारदाराचे तक्रारअर्जातील कोणतीही कथने नाकारलेली नाहीत किंवा त्याचा पुरावा देखील नाकारलेला नाही. वि.प. यांनी दिलेल्या वॉरंटीनुसार सदरचे हॅण्डसेटमधील दोष निवारण करुन देण्याची जबाबदारी वि.प.क्र.2 यांची होती परंतु तसे करण्यास ते असमर्थ ठरले आहेत, असे तक्रारदाराचे म्हणणे आहे. सदरची बाब वि.प.क्र.2 यांनी अमान्य केलेली नाही. वि.प.क्र. 1 व 2 यांनी प्रस्तुत प्रकरणामध्ये वर नमूद केल्याप्रमाणे आपली लेखी कैफियत दाखल केलेली नाही आणि तक्रारदाराचे कोणतेही कथन अमान्य केलेले नाही. त्यामुळे वि.प.क्र. 1 व 2 यांना तक्रारदाराची संपूर्ण कथने मान्य आहेत असेच गृहित धरावे लागेल. सबब, तक्रारदाराने आपली केस पूर्णतया शाबीत केलेली असून वि.प.क्र.1 व 2 यांनी तक्रारदारास सेवेत त्रुटी दिलेली आहे असा या मंचाचा निष्कर्ष आहे.
8. तक्रारदाराने वि.प.क्र.1 व 2 यांचेकडून मोबाईल खरेदीची किंमत रक्कम रु.16,800/- ची 18 टक्के व्याजासहीत मागणी केली असून वि.प.क्र.1 व 2 यांनी त्यास दिलेल्या दूषित सेवेमुळे त्याचे झालेल्या व्यावसायिक नुकसानीपोटी रक्कम रु.50,000/- ची मागणी केली आहे तसेच त्यास झालेल्या मानसिक व आर्थिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रक्कम रु.20,000/- ची मागणी केली असून या अर्जाचे खर्चापोटी रु.5,000/- ची मागणी वि.प.क्र.1 व 2 यांचेकडून केली आहे. तक्रारदाराचे हॅण्डसेटमध्ये वॉरंटी कालावधीत निर्माण झालेले दोष दूर करण्यास वि.प.क्र.2 हे असमर्थ ठरले आहेत. सबब, तक्रारदारांनी मागणी केल्याप्रमाणे हॅण्डसेटची रक्कम परत मिळणेस तक्रारदार पात्र आहेत असा या मंचाचा निष्कर्ष आहे. तसेच सदर रकमेवर तक्रारदार हे मोबाईल खरेदी केलेल्या तारखेपासून म्हणजे दि.20/8/16 पासून द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज मिळणेसही पात्र आहेत असा या मंचाचा निष्कर्ष आहे. सदरचा वादातील मोबाईल हॅण्डसेट हा तक्रारदाराचे ताब्यात आहे. त्यामुळे वि.प. यांनी मोबाईलची किंमत तक्रारदारास अदा केल्यानंतर सदरचा सदोष हॅण्डसेट तक्रारदार यांनी वि.प. यांना परत करावा असा आदेश करणे न्यायोचित होईल असे या मंचाचे मत आहे. येथे हे नमूद करणे आवश्यक आहे की, कोणताही ग्राहक एखादी वस्तू विकत घेत असताना सदरची वस्तू ही उत्तम स्वरुपाची सेवा देईल अशी खात्री मनात बाळगून विकत घेत असतो आणि त्याची ही इच्छा आणि खात्री ही नैसर्गिक प्रवृत्ती आहे. ज्या वेळेला विकत घेतलेली वस्तू ही उत्पादनाच्या दोषांसह विकत घेतली गेली आहे असे ग्राहकाचे निदर्शनास येते, त्यावेळेला अशा ग्राहकाला मानसिक त्रास होणे हे साहजिकच आहे. परंतु तक्रारदाराचे कथनानुसार त्यास नेमका काय आर्थिक, मानसिक त्रास झाला याबद्दलचे कोणतेही स्पष्टीकरण तक्रारदाराने दिलेले नाही किंवा तसा कोणताही पुरावा देखील आणलेला नाही. तक्रारदाराने सदर नुकसानीपोटी जी रक्कम मागितली आहे, ती या प्रकरणातील मोबाईल फोनच्या किंमतीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे तक्रारदाराची रक्कम रु.20,000/- ची मागणी ही अवास्तव व अवाजवी वाटते. प्रस्तुत प्रकरणाचा एकूण सारासार विचार करता तक्रारदाराला मानसिक व आर्थिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रक्कम रु.5,000/- देण्यास वि.प.क्र.1 व 2 यांना आदेश करणे योग्य राहील असा या मंचाचा निष्कर्ष आहे. तसेच तक्रारदाराने व्यावसायिक नुकसानीपोटी जी रु.50,000/- ची मागणी केली आहे, त्याबाबत तक्रारदाराने कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. सदरची मागणी ही अवाजवी व अवास्तव आहे, त्यामुळे ती मागणी हे मंच विचारात घेत नाही. तसेच तक्रारदाराने तक्रारअर्जाचे खर्चापोटी जी रक्कम रु.5,000/- ची मागणी केली आहे, ती अवास्तव आहे, सबब तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.2,000/- वि.प. क्र.1 व 2 ने तक्रारदारास अदा करणे न्यायाचित वाटते. सबब, प्रस्तुत कामी आम्ही पुढीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहोत. सबब, आदेश.
- आ दे श -
1) तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
2) वि.प.क्र.1 व 2 यांनी तक्रारदाराला वैयक्तिक व संयुक्तरित्या वादातील मोबाईची खरेदी किंमत रक्कम रु.16,800/- (रक्कम रुपये सोळा हजार आठशे मात्र) अदा करावी व सदर रकमेवर मोबाईल खरेदी केलेल्या तारखेपासून म्हणजे दि.20/8/16 पासून द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज अदा करावे.
3) मानसिक व शारिरिक त्रासापोटी वि.प.क्र.1 व 2 यांनी तक्रारदाराला वैयक्तिक व संयुक्तरित्या रक्कम रु. 5,000/- (रक्कम रुपये पाच हजार मात्र) अदा करावी.
4) तक्रारअर्जाचे खर्चापोटी वि.प.क्र.1 व 2 यांनी तक्रारदाराला वैयक्तिक व संयुक्तरित्या रक्कम रु. 2,000/- (रक्कम रुपये दोन हजार मात्र) अदा करावी.
5) वर नमूद सर्व आदेशांची पुर्तता वि.प. क्र.1 व 2 यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.
6) वर नमूद आदेशाची पूर्तता वि.प. क्र.1 व 2 यांनी केलेनंतर तक्रारदार यांनी वादातील मोबाईल हॅण्डसेट वि.प. यांना परत करावा.
7) विहीत मुदतीत आदेशांची पुर्तता न केलेस ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 कलम 25 व 27 प्रमाणे वि.प. विरुध्द कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
8) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.