(मा.अध्यक्ष, श्री.आर.एस.पैलवान यांनी निकालपत्र पारीत केले)
नि का ल प त्र
अर्जदार यांना सामनेवाला यांचेकडून एक्सचेंज बोनस योजनेप्रमाणे रु.10,000/- मिळावेत व या रकमेवर 18 टक्के दराने व्याज मिळावे, मानसिक त्रास, छळ, पोस्टेजखर्च, फोन खर्च यासाठी रु.1,00,000/- मिळावेत, नोटीस खर्च रु.2000/- व अर्जाचे खर्चापोटी रु.20,000/- मिळावेत यासाठी अर्जदार यांचा अर्ज आहे.
सामनेवाला यांना या तक्रार अर्जाची नोटीस रजि.ए.डी.पोष्टाचे पान क्र.18 चे पोहोच पावतीप्रमाणे दि.27/05/2011 रोजी बजावण्यात आलेली आहे. परंतु सामनेवाला हे या कामी गैरहजर राहीले म्हणून त्यांचेविरुध्द दि.02/07/2011 रोजी एकतर्फा आदेश करण्यात आलेला आहे.
अर्जदार यांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचा विचार होवून पुढीलप्रमाणे मुद्दे विचारात घेतले आहेत.
1) अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत काय?- होय
2) सामनेवाला यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे काय?- होय.
3) अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून एक्स्चेंज बोनस योजनेप्रमाणे व्याजासह रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत काय?. होय
4) अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून नोटीस खर्चापोटी, मानसिक त्रासापोटी व अर्जाचे खर्चापोटी रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत काय?- होय
5) अंतीम आदेश- अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला यांचेविरुध्द अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
विवेचन
याकामी अर्जदार यांचे वतीने अँड.डी.के.शिंदे यांनी युक्तीवाद केलेला आहे.
सामनेवाला यांनी नाशिक टाईम्स या दि.27/05/2009 रोजीच्या दैनिकामध्ये जाहीरात प्रसिध्द करून जुन्या चार चाकी गाडयावर आकर्षक एक्सचेंज ऑफर देवून नविन गाडी विक्रीची योजना प्रसिध्द केलेली होती. त्याप्रमाणे अर्जदार यांनी त्यांचे मालकिची मारुती 800 मॉडेलची एम एच 15 ए एच 3808 ही गाडी सामनेवाला यांना देवून हुंदाई कंपनीची नवीन सँट्रो जी एल कार दि.02/06/2009 रोजी खरेदी घेतलेली आहे. एक्सचेंज ऑफरबाबत सर्व कागदपत्रांची पुर्तता अर्जदार यांनी सामनेवाला यांचेकडे केलेली होती परंतु सामनेवाला यांनी अर्जदार यांना एक्सचेंज ऑफरप्रमाणे रक्कम दिलेली नाही. याबाबत अर्जदार यांनी सामनेवाला यांचेकडे दि.13/08/2010 रोजी लेखी तक्रार केली. त्यानंतर दि.01/02/2011 रोजी वकिलांचेमार्फत नोटीसही पाठवली. परंतु त्यानंतरही सामनेवाला यांनी अर्जदार यांना एक्सचेंज ऑफर प्रमाणे रक्कम दिलेली नाही.
अर्जदार यांनी पान क्र.5 लगत सामनेवाला यांची एक्सचेंज ऑफरची जाहीरात पान क्र.6 लगत सामनेवाला यांनी दिलेली दि.31/05/2009 रोजीची नवीन सँट्रो गाडीची बुकिंगची रु.10,000/- ची पावती, पान क्र.7 लगत सामनेवाला यांची दि.31/05/2009 रोजीची नवीन सँट्रो गाडीची फायनल पेमेंट रु.2,71,000/- ची पावती, पान क्र.8 लगत सामनेवाला यांची दि.02/06/2009 रोजीची नवीन सँट्रो गाडीची फायनल पेमेंट रु.60,000/- ची पावती, पान क्र.9 लगत मारुती कारची आर सी बुकची झेरॉक्स प्रत, इ.कागदपत्रे दाखल केलेली आहेत. अर्जदार यांचे तक्रार अर्ज व प्रतिज्ञापत्रामधील कथन सामनेवाला यांनी स्पष्टपणे नाकारलेले नाही. अर्जदार यांचे तक्रार अर्ज व प्रतिज्ञापत्रामधील कथन व पान क्र.5 ते 9 लगतची कागदपत्रे यांचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे.
अर्जदार यांनी पान क्र.10 लगत सामनेवाला यांचे दि.01/04/2010 रोजीची पत्राची प्रत हजर केलेली आहे. या पत्रानुसार सामनेवाला यांनी अर्जदार यांचेकडून ट्रान्सफर स्मार्टकार्ड रिसीटची मागणी केलेली होती. त्याप्रमाणे अर्जदार यांनी सामनेवाला यांचेकडे पान क्र.11 चे पत्रानुसार ट्रान्सफर स्मार्टकार्ड रिसीट दि.13/08/2010 रोजीच दाखल केलेली आहे व तशी पोहोच सामनेवाला यांनी अर्जदार यांना दिलेली आहे. परंतु सामनेवाला यांनी अर्जदार यांना पान क्र.5 चे जाहीरातीप्रमाणे बोनसची रक्कम दिलेली नाही यामुळे अर्जदार यांनी सामनेवाला यांना पान क्र.12 प्रमाणे दि.28/06/2010 रोजी पत्र पाठवले आहे व पान क्र.13 प्रमाणे दि.31/01/2011 रोजी अँड.डि.के.शिंदे यांचेमार्फत नोटीस पाठवली आहे ही नोटीस सामनेवाला यांनी पान क्र.14 चे पोस्टाचे पोहोच पावतीप्रमाणे मिळालेली आहे यानंतरही सामनेवाला यांनी अर्जदार यांना बोनसची रक्कम दिलेली नाही. वरील सर्व कारणांचा विचार होता सामनेवाला यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केलेली आहे असे या मंचाचे मत आहे.
पान क्र.5 चे जाहीरातीमध्ये मारुती 800 या मॉडेलकरीता स्पेशल ऑफर रु.10,000/- एक्स्चेंज ऑफर रु.5000/- असे एकूण फायदा रु.15,000/- असा स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे. या पान क्र.5 चे जाहीरातीचा विचार होता अर्जदार यांना सामनेवाला यांचेकडून त्यांच्या पान क्र.9 च्या कागदपत्राप्रमाणे जुन्या मारुती 800 या मॉडेलचे गाडीकरीता रक्कम रु.10,000/- इतकी रक्कम एक्सचेंज बोनस म्हणून मिळणे गरजेचे होते. वरील सर्व कारणांचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून एक्सचेंज बोनसचे रक्कम रु.10,000/- इतकी रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.
सामनेवाला यांचेकडून रक्कम रु.10,000/- इतकी मोठी रक्कम अर्जदार यांना योग्य त्या वेळेत मिळालेली नाही यामुळे निश्चीतपणे अर्जदार यांना आर्थीक नुकसान सहन करावे लागले आहे याचा विचार होता अर्जदार हे आर्थीक नुकसान भरपाईपोटी सामनेवाला यांचेकडून मंजूर रक्कम रु.10,000/- या रकमेवर अर्जदार यांचे पान क्र.11 चे पत्राची तारीख दिनांक 13/08/2010 पासून संपुर्ण रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्के दराने व्याज मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.
अर्जदार यांनी सामनेवाला यांना पान क्र.12 नुसार दि.28/06/2010 रोजी पत्र पाठवलेले आहे व पान क्र.13 व 14 नुसार अर्जदार यांनी सामनेवाला यांना दि.31/01/2011 रोजी अँड डि के शिंदे यांचेमार्फत नोटीस पाठवली आहे. याकरीता निश्चीतपणे अर्जदार यांना खर्च करावा लागला आहे याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून नोटीस खर्च रु.750/- इतकी रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.
सामनेवाला यांचेकडून बोनसची रक्कम मिळावी या मागणीसाठी अर्जदार यांना सामनेवाला यांचेविरुध्द या मंचाकडे दाद मागावी लागली आहे. त्याकरीता प्रस्तुतचा तक्रार अर्ज दाखल करावा लागला आहे. वरील सर्व कारणामुळे निश्चीतपणे अर्जदार यांना मानसिक त्रास सहन करावा लागला आहे व तक्रार अर्ज दाखल करण्यासाठी खर्चही करावा लागला आहे. वरील सर्व कारणांचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून मानसिक त्रासापोटी रु.2500/- व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.1000/- अशी रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत असेही या मंचाचे मत आहे.
अर्जदार यांचा तक्रार अर्ज, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, वकिलांचा युक्तीवाद आणि वरील सर्व विवेचन याचा विचार होवून पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहेत.
आ दे श
1) अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला यांचेविरुध्द अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2) आजपासून 30 दिवसांचे आत सामनेवाला यांनी अर्जदार यांना पुढीलप्रमाणे रकमा द्याव्यात.
अ) रक्कम रु.10,000/- द्यावेत व आर्थीक नुकसान भरपाईपोटी या मंजूर
रकमेवर दि.13/08/2010 पासून संपुर्ण रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे. 9
टक्के दराने व्याज द्यावे.
ब) मानसिक त्रासापोटी रक्कम रु.2500/- द्यावेत.
क) नोटीस खर्चापोटी रु.750/- द्यावेत
ड) अर्जाचा खर्च रु.1000/- द्यावेत.