जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, कोल्हापूर
मध्यवर्ती इमारत, दुसरा मजला, दक्षिण बाजू, बावडा रोड, कोल्हापूर-416 003.
...........................................................................................................................
तक्रार क्र.499/2011
दाखल दि.10/10/2011
आदेश दि.22/04/2013
श्री. सचिन तातोबा टारे,
रा.शिरटी, ता.शिरोळ,
जि.कोल्हापूर. ........तक्रारदार
विरुध्द
जनरल मॅनेजर, दि रिलायन्स जनरल इन्यशु. कं.,
517/ए-2, जेम्स्टोन शॉप क्र.71 ते 74,
एस.टी.स्टँड जवळ, जि.कोल्हापूर. ........सामनेवाला
तक्रारदार तर्फे वकील:- श्री.डी.ए.बेळंके, हजर. सामनेवाले तर्फे वकील:-श्री.पी.आर.कोळेकर, हजर
गणपूर्ती:- 1. मा. श्री. संजय पी. बोरवाल, अध्यक्ष
2. मा. श्री. दिनेश एस. गवळी, सदस्य
3. मा. श्रीमती सावनी एस. तायशेटे, सदस्या
व्दाराः- श्रीमती सावनी एस. तायशेटे, सदस्या
निकालपत्र
प्रस्तुत प्रकरणात तक्रारदार यांनी सामनेवाले-रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि.यांचेकडून तक्रारदार यांचे वहानाचे अपघातात नुकसान झालेने नुकसानभरपाई मिळणेकरीता सदरचा अर्ज दाखल केला आहे.
तक्रारदारांची थोडक्यात तक्रार खालीलप्रमाणेः-
2 तक्रारदाराने वाहतुक व्यवसाय करणेच्या हेतुने टाटा ए.सी.ई. क्र.एम.एच.-09-बीसी-4288 हे वाहन दि.11.03.2010 इ.रोजी स्वतःचे नांवे खरेदी केले. त्याची नोंदणी आर.टी.ओ. कार्यालयात लाईट व्हेईकल म्हणून नोंद करणेत आली आहे. सदरच्या वाहनाचा विमा ही वाहन खरेदी करीत असताना सामनेवाले-कंपनीकडून घेतलेला आहे, विम्याची मुदत दि.15.03.2010 ते दि.14.03.2011 अशी आहे. सदरहू वाहनावर-श्री.कर्मवीर भाऊराव पाटील संस्थेचा बोजा नमुद आहे. तक्रारदाराचे वाहनाचा अपघात दि.01.01.2011 रोजी शिरढोण येथे भाडयाकरिता गेले असताना तेथुन माल उतरवून परत येत असताना बोरगांवच्या हद्दीत आले असता, समोरून येणा-या हिरो होंडा स्प्लेंडर, एम.एच.10-ए.एस.-4734 याने समोरुन येऊन तक्रारदाराचे वाहनास धडक दिली, सदरचे अपघातमध्ये मोटर सायकलचालक –श्री.मधुकर साबळे जखमी होऊन त्यात तो मयत झाले आहे. सदरच्या मोटर सायकलची धडक तक्रारदारांच्या वर नमुद टाटा ईसीई यास बसलेने त्याचे आतोनात नुकसान झाले. सदर अपघातानंतर, तक्रारदाराने विमा कंपनीकडे अपघाताची सुचना दिली व सदरचे वाहन दुरुस्तीसाठी विमा कंपनीच्या सांगणेवरुन चेतन मोटर्स येथे नेण्यात आले. त्यावेळी चेतन मोटार्स यांनी तक्रारदाराचे लायन्सस पाहून वाहन दुरस्त करणेस नकार दिला. तद्नंतर दि.06.01.2011 रोजी वकील-श्री. सागर पाटील यांचेकडून सामनेवाले यांना वाहन दुरुस्तीबाबत वकीलामार्फत सामनेवाले यांना विनंती वजा नोटीस पाठविली होती. त्यावेळी तक्रारदारास सदरचे वाहन दुरुस्ती करुन घेणेस सामनवाले यांनी तोंडी सुचना दिली. सदरच्या वाहनाची दुरुस्ती झालेनंतर संपुर्ण दुरुस्ती बिले विमा कंपनीकडे देण्यात आली आहे.
3 त्यानंतर, दि.16.4.2011 रोजी विमा कंपनीने तक्रारदार यांचे लायसन्स अपघाताच्या वेळी वेघ नव्हते. या कारणासाठी तक्रार अर्जाच्या परिच्छेद क्र.8 मध्ये नमुद तपशिलाप्रमाणे तक्रारदारदराच विमा क्लेम नाकारला आहे. सदरचा क्लेम नाकारणे हे अक्षम्य आहे. व त्यामुळे सामनेवाले यांनी सेवेत त्रुटी केली आहे. तक्रारदारांनी तक्रार अर्जाचे कलम-10 मध्ये नमुद वाहन दुरुस्ती खर्च् रु.34543, कोर्ट खर्च व वकील फी रक्कम रु.5,000/- मानसिक त्रासाकरिता रु.25,000/-, तक्रारदाराचे वाहन दि.02.01.2011 ते दि.21.01.2011 या कालावधीत तक्रारदाराचे बुडालेले उत्पन्न रु.16,000/-अशी एकुण मागणी केलेली रक्कम रु.80,543/- व त्यावर द.सा.द.शे.15% व्याजासह सामनेवाले यांचेकडून रक्कम वसुल होऊन मिळावी. यासाठी सदरची तक्रार या मंचात दाखल केली आहे.
4 सदरकामी सामनेवाले-विमा कंपनी हजर होऊन त्यांनी दि.28.11.2011 रोजी म्हणणे दाखल करुन त्यांनी सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदीनुसार कायदेशिररित्या चालविणेस पात्र नाही. तक्रारदार हे माल वाहतुकीचा व्यवसाय करतात व त्यांनी त्यांचे टाटा ए.सी.ई. क्र.एम.एच.-09-बीसी-4288 या कमर्शिअल वाहनाचा विमा सामनेवाले कंपनीकडे उतरविला आहे. त्यामुळे तक्रारदाराची प्रस्तुतची तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदयातील ग्राहक या व्याख्येत /संज्ञेत येत नसलेने ती चालणेस पात्र नाही, या कारणास्तव तक्रार नामंजूर करणेत यावी असे नमुद केले आहे. त्याचप्रमाणे, सामनेवाले-कंपनीने केव्हाही तक्रारदाराचे वाहनांचा सर्व्हे केलेला नाही अगर तक्रारदारास सदरचे वाहन दुरुस्त करुन घेणेबाबत तोंडी सुचना दिलेली नाही असे कथन केलेले आहे. तक्रारदार यांनी सदरील वाहन माल वाहतुकीसाठीच खरेदी केले होते व अपघातेचे वेळीही तक्रारदार हे माल वाहतुक करत होते. तसेच अपघाताचे वेळी ड्रायव्हरकडे योग्य व वैध ड्रायव्हींग लायसन नव्हते. त्यामुळे पॉलीसीच्या अटी व शर्तींचा भंग झालेला आहे. सबब, तक्रारदाराची तक्रार नामंजूर करणेत यावी असे नमुद केलेले आहे.
5 तक्रारदर यांचा तक्रार अर्ज, दाखल कागदपत्रे व सामनवाले यांची कैफियत व अनुषांगिक कागदपत्रे पाहता तसेच उभय पक्षकारांच्या वकीलांचा तोंडी युक्तीवाद ऐकता, सदर प्रकरणी तक्रारदार हे जाबदार विमा कंपनीचे ग्राहक होतात का ? हा मुद्दा प्रथम विचारात घेणे आवश्यक आहे असे या मंचास वाटते. त्यास अनुसरुन मंचाचे विवेचन खालीलप्रमाणे,
6 तक्रारदार यांचा तक्रार अर्ज पाहीला असता, त्यांचे अर्जामध्ये परिच्छेद क्र.2 मध्ये प्रस्तुत अर्जदार यांनी वहातुक व्यवसाय करणेच्या हेतुने टाटा ए.सी.ई. क्र.एम.एच.-09-बीसी-4288 हे वाहन दि.11.03.2010 रोजी खरेदी केले असे नमुद केले आहे. त्याचप्रमाणे, तक्रारदार यांनी त्यांचे तक्रार अर्जाचे परिच्छेद क्र.5 मध्ये दि.01.01.2011 रोजी तक्रारदार हे आपले मालकीची टाटा ए.सी.ई. क्र.एम.एच.-09-बीसी-4288 ही घेऊन भाडयाकरिता शिरढोण येथे गेलेले होते. सदर टाटा ए.सी.ई. मधुन भरलेला माल उतरवुन ते परत येत होते असे कथन केलेले आहे. यावरुन, एक बाब मंचापुढे स्पष्ट होते ती म्हणजे, तक्रारदारांना विषयाधीन वाहन त्यांच्या व्यवसायासाठी (Commercial Purpose) म्हणजे व्यापारी उद्देशासाठी आहे. तक्रारदारांच्या व्यापाराचे स्वरुप पाहता, ग्राहक संरक्षण कायदयातील कलम-2(1)(डी)(i) मध्ये नमुद ग्राहकाच्या व्याखेत तक्रारदारांचा अंतर्भाव होत नाही असा मंचाचा स्पष्ट निष्कर्ष निघतो आणि या निष्कर्षाच्या आधारे तक्रार अर्ज नामंजूर करणे योगय व न्याय होईल असे मंचास वाटते.
7 प्रस्तुत प्रकरणी तक्रारदाराच्या व्यापारी उद्देशामुळे ते जाबदारांचे ग्राहक ठरत नसल्याचे सिध्द झाल्याने प्रस्तुत प्रकरणी उपस्थित करण्यात आलेल्या अन्य मुद्दयांबाबत विचार या निकालपत्रात करणेत आलेला नाही.
8 उक्त नमुद विवेचान व निष्कर्षाच्या आधारे प्रस्तुत प्रकरणी खालीलप्रमाणे आदेश पारीत करणेत येत आहेत.
सबब, मंचाचा आदेश की,
आदेश
1 तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे.
2 खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.
3 आदेशाच्या प्रमाणित प्रतीं उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात. `
(श्रीमती सावनी एस. तायशेटे) (श्री. दिनेश एस. गवळी) (श्री. संजय पी. बोरवाल)
सदस्या सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, कोल्हापूर.
vrb