जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे
तक्रार क्रमांक – 131/2010 तक्रार दाखल तारीख –02/08/2010
मूक्ती ताहेर नोमानी
वय 60 वर्षे धंदा व्यापार .तक्रारदार
रा.बशीर गंज,बीड ता. जि.बीड
विरुध्द
1. दि जनरल मॅनेजर
मारुती उद्योग लि. गुंडगांव (हरियाणा स्टेट) .सामनेवाला
2. दि पगारिया अँटो लि.
पगारिया तवर,जिल्हा न्यायालयाचे समोर,
अदालत रोड,औरंगाबाद.
3. न्यु अगवान मारुती सर्व्हीस,
लोकमत कार्यालया समोर,स्टेडियम, बीड
4. दि बजाज अलायंन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि.
जी.एल.प्लाझा,एअरपोर्ट रोड,येरवडा, पूणे-411 006.
5. दि मारुती अँटोमोटीव्ह लि.औरंगाबाद,
सिडको बस स्टॅण्डच्या मागे,औरंगाबाद.
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे :- अँड.एस.एम.फारुकी
सामनेवाला 1 तर्फे :- अँड.के.पी.थिंगळे
सामनेवाला 2 तर्फे ः- अँड.पी.एन.मसकर.
सामनेवाला क्र.3 तर्फे ः- कोणीही हजर नाही.
सामनेवाला क्र.4 तर्फे ः- अँड.ए.पी.कूलकर्णी
सामनेवाला क्र.5 तर्फे ः- अँड.डी.बी.कूलकर्णी
निकालपत्र
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदारांचा वाहन नोंदणी क्र.एम.एच.-23-ई-6864 चे मालक आहेत. सदरचे वाहन हे सामनेवाला क्र.1 यांनी उत्पादित केलेले आहे व सामनेवाला क्र.2 यांचेकडून तक्रारदारांनी घेतलेले आहे. त्यांचे मॉडेल मारुती स्विप्ट इंजिन नंबर 1193591 डिझेल असून ते दि.25.3.2009 रोजी खरेदी केले आहे.
सदर वाहनाचा विमा तकारदारांनी सामनेवाला क्र.4 विमा कंपनीकडे दि.2.3.2009 रोजी घेतलेला आहे. त्यांचा वैध कालावधीदि.24.3.2010 पर्यत आहे. विमा मूदत संपण्यापूर्वीच सदर वाहनाचा पून्हा विमा घेतलेला आहे व तो कायम आहे.
दि.24.3.2010 रोजी तक्रारदार सदर वाहनाने औरंगाबाद बीडकडे येत असताना शहागड ते गेवराई रोडवर छोटयाशा वळणावर तक्रारदाराच्या वाहनाचे ब्रेक योग्य त-हेने काम करण्यायोग्य झाले. म्हणून वाहनाच्या ड्रायव्हरने कंट्रोल केले परंतु त्यांच क्षणाला विरुध्द बाजूने मोठे वाहन आले आणि त्यामुळे सदर वाहन वळण घेत असताना मोठया वाहनामुळे पूरेशी जागा नसल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहन चालकाने सदरचे वाहन रोडच्या खाली उतरवले आणि एका झाडाला धडक दिली. त्यामुळे कारचे खूप नूकसान झाले. सदर अपघाताचे एकमेव कारण म्हणजे ब्रेक योग्य त-हेने काम न करणे हे होय म्हणून सदरचा दोष हा उत्पादक दोष आहे.
तक्रारदाराने ताबडतोब विमा कंपनीच्या प्रतिनिधीला फोनवर माहीती दिली. त्यानुसार विमा कंपनीचे सर्व्हेअर त्याठिकाणी आले. त्यांनी अधिकृत सर्व्हीस स्टेशन बीड या सामनेवाला क्र.3 कडे वाहन दूरुस्तीसाठी नेण्यास सांगितले. दूस-या वाहनाच्या सहायाने सदरचे वाहन सर्व्हीस स्टेशनला आणले. त्या बाबत तक्रारदारांना रु.1780/- लागले. सामनेवाला क्र.3यांनी सदरचे वाहन 20 ते 29 दिवस दूरुस्तीसाठी ठेवले. त्यांनी वाहन दूरुस्तीचा खर्च रु.66,664/- आकारला. तक्रारदारांनी सदरचा खर्च सामनेवाला क्र.3 यांना दिला. वाहन ताब्यात घेतले. परंतु वाहन हे योग्य त-हेने काम करीत नव्हते. वाहनाच्या फायरिंगचा दोषयूक्त आवाज यायला लागला. त्याचे एकमेव कारण म्हणजे वाहनाचे ब्रेक योग्य त-हेने काम करीत नव्हते. म्हणून तक्रारदार सदरचे वाहन ताब्यात घेतले नाही आणि सदरचे वाहन ताबडतोब सामनेवाला क्र.3 कडे ठेवले. सदरचे वाहन दूरुस्तीसाठी सामनेवाला क्र.5 यांचेकडे पाठविले. त्यांनी सदर वाहन दूरुस्तीचा आकार रु.371/- आकारला. सदरचे वाहन बिडला आणले. वाहनाचे इंजिन योग्य त-हेने काम करीत नव्हते म्हणून मारुती अँटोमोटीव्ह औरंगाबाद यांना दि.1.1.5.2010 रोजी सूचना केली. सदरचे वाहन हे पूर्णपणे वॉरंटी कालावधीत आहेत म्हणून सामनेवाला यांनी सदर वाहनातील उत्पादित दोष दूर करुन देणे आवश्यक आहे. वाहनाचे ब्रेक फेल झाल्याने व उत्पादित दोषाने तक्रारदाराने प्रथमतः वाहन सामनेवाला क्र.3 कडे दूरुस्त केले. त्यावेळी 20 दिवस आणि त्यानंतर सामनेवाला क्र.5 यांचेकडे राहील्याने तक्रारदार वाहनाचा वापर करु शकले नाहीत. तक्रारदारांनी सामनेवाला क्र.1 यांचेकडे तक्रार केली. त्यांचा तक्रार नंबर 9977449790 आहे परंतु उपयोग झाला नाही.
पून्हा तक्रारदारांनी सर्व्हीस स्टेशन सामनेवाला क्र.5 यांचेशी संपर्क केला त्यांनी इंजिनमध्ये दोष असल्याचे तोडी सांगितले परंतु कूठेही सदर इंजिनची तपासणी करण्याची हिंमत दाखवली नाही. यावरुन स्पष्ट होते की, वाहनात उत्पादित दोष आहे म्हणून इंजिन योग्य त-हेने काम करीत नाही. तसेच ब्रेकही फेल होतात. त्यामुळे तक्रारदारांना आर्थिक, मानसिक त्रास सहन करावा लागला. मोठयाप्रमाणावर खर्च करावा लागला. तरी वाहन पूर्णपणे दूरुस्त झाले नाही ते पूर्णपणे दोषयूक्त आहे. ज्या उददेशाने तक्रारदाराने वाहन खरेदी केले होते तक्रारदारांचा तो उददेश सफल झाला नाही. सदरचा दोष हा दूर होणार नाही.त्यामुळे वाहन बदलून देणे आवश्यक आहे.
तक्रारदारांनी सामनेवाला क्र.1 ते 5 यांना नोटीसा पाठविल्या. सर्वाना नोटीसा मिळाल्या परंतु कोणीही उत्तर दिले नाही. वाहन बदलून दिले नाही. किंवा दूरुस्त करुनही दिले नाही. खालील प्रमाणे तक्रारदार नूकसान भरपाईची मागणी करीत आहेत.
1. दूरुस्तीचा खर्चरु.70,000/-, 2. मानसिक त्रासाचे रु.10,000/-
3. वाहनाच्या वापराचे नूकसान रु.60,000/- 4. सदरचे वाहन बदलून नवीन त्यांच मॉडेलचे चांगले उत्पादित केलेले पूर्ण वॉरंटीसह वाहन मिळण्यास तक्रारदार पात्र आहेत.
विनंती की, सामनेवाला यांना आदेश देण्यात यावा की, तक्रारदाराचे उत्पादित दोषयूक्त वाहन बदलून त्यांच कंपनीचे त्यांच मॉडेलचे त्यांच कॅटेगिरीचे नवीन वाहन देण्यात यावे. रक्कम रु.70,000/- सामनेवाला यांना वैयक्तीक अथवा संयूक्तीक देण्या बाबत आदेश व्हावेत.
सामनेवाला क्र.1यांनी त्यांचा खुलासा नि.28 दि.29.12.2010 रोजी दाखल केला. तक्रारदार ग्राहक नाहीत. तक्रारदार व सामनेवाला क्र.1 यांचा कोणताही करार नाही.
तक्रारीतील वाहन सामनेवाला क्र.1 यांचे उत्पादित वाहन आहे.एवढया हददीपर्यत मान्य आहे. उर्वरित सर्व आक्षेप वाहनाचे दोष बाबत सामनेवाला क्र.1यांनी नाकारलेले आहेत. तक्रारीतील वाद हा अपघाताच्या दूरुस्तीनंतर निर्माण झालेला आहे त्यामुळे तक्रारदार स्वतंत्रपणे नवीन करार वर्कशॉप आणि विमा कंपनी यांच्यात झाला. तक्रारदारांनी असद हेतूने वॉरंटीच्या स्टॉंकच्या पलिकडे मागणी केलेली आहे. तक्रारदार यांनी सामनेवाले यांना कारण नसताना पार्टी केलेले आहे. सदर तक्रारीतील वाद हा ग्राहक विवाद नाही त्यामुळे सदरची तक्रार ही जिल्हा मंचाचे अधिकार क्षेत्रात येत नाही. सामनेवाला क्र. 1 सामनेवाला क्र.2 यांचेत प्रिसिंपल टू प्रिसिंपल तत्वावर डिलरशिप करार आहे. वॉरंटीचे संदर्भात ओनर्स मॅन्यूअल मध्ये तपशील दिलेला आहे. प्रस्तूत प्रकरणात तक्रारदाराच्या वाहनाची वॉरंटी दि.24.3.2010 रोजी संपूष्टात आली होती त्यामुळे तक्रारदार ग्राहक नाही. सामनेवाला क्र.3 यांच्या वाहनाची दूरुस्ती बाबत वेगळा आणि स्वतंत्र करार झाला. तक्रारदारांनी अपघाताचे कारण आक्षेपित समस्याचे वेळेला वर्कशॉप सामनेवाला क्र.3 यांनी सांगितले नाही व ते अपघाताचे कारण नाही. सामनेवाला क्र.3 यांचे ब्रेक फेलचे संदर्भात दूरुस्ती नाही. पोस्ट सिलेंडर दूरुस्ती बाबत करार नाही. तक्रारदारांनी ब्रेक फेलमूळे अपघात झाल्याचे नमूद केलेले नाही. सदरचा आक्षेप हा नंतर सुचलेल्या विचाराने असद हेतूने आहे. तक्रारदार स्वच्छ हाताने जिल्हा मंचात आलेला नाही. त्यामुळे तक्रार रदद करण्यात यावी.
सामनेवाला क्र.2 यांनी त्यांचा खुलासा नि.20 दि.30.11.2010 रोजी दाखल केला. सदरची तक्रार ही जिल्हा मंचाचे अधिकार कक्षेत नसल्याने ती चालू शकत नाही. वाहनाची वॉरंटी अपघाताचे पूर्वीच संपलेली होती. तक्रारदाराचे वाहनाचा अपघात झाला व सदरचे वाहन सामनेवाला क्र.5 यांनी दि.6.4.2009 रोजी दूरुस्त केली. वाहन दूरुस्तीचे जॉब कार्ड दाखल आहे. त्यात अपघाताचा उल्लेख नाही. पहिली फ्रि सर्व्हीसिंग झालेली आहे त्या वेळेला असे आढळून आले की, तक्रारदार सदरचे वाहन निष्काळजीपणने हाताळीत आहे.
तिसरी फ्रि सव्हीसिंग दि.8.4.2009, 8.7.2009 अणि 21.10.2009 रोजी करण्यात आलेली आहे. सदर सर्व्हीसिंगच्या वेळी ब्रेक फेलची कोणतीही तक्रार नाही. यावरुन असे दिसते की, वाहन तसेच ब्रेक सिस्टीम योग्य त-हेने पूर्ण कार्यक्षमतेने काम करीत आहे. तक्रारीत कोणतेही मरिट (गुणवत्ता) नाही. तक्रार खर्चासह रदद करुन सामनेवाला यांना रु.10,000/- खर्च देण्यात यावा.
सामनेवाला क्र.3 यांनी जिल्हा मंचाची नोटीस घेण्यास नकार दिला त्याचे विरुध्द दि.08.10.2010 रोजी एकतर्फा तक्रार चालविण्याचा निर्णय जिल्हा मंचाने घेतला.
सामनेवाला क्र.4 यांनी त्यांचा खुलासा नि.22 दि.30.11.2010 रोजी दाखल केला. खुलाशात तक्रारीतील सर्व आक्षेप त्यांनी नाकारलेले आहेत. तक्रारदारांनी अपघाताची सुचना दिल्यानंतर सर्व्हेअर यांनी घटनास्थळी वाहनाची पाहणी केली तसेच वाहन दूरुस्त झाल्यानंतर पाहणी केली व त्यांनी त्यांचा अंतिम अहवाल दिलेला आहे. त्यानुसार सामनेवाला यांनी तक्रारदारांना दि.12.05.2010 रोजी अंतिम आणि पूर्णतः दावा रक्कम रु.45,000/- मंजूर केलेली आहे.तक्रारदारांनी सदरची रक्कम स्विकारली आहे. तक्रारदार जिल्हा मंचात स्वच्छ हाताने आलेले नाही.यात सामनेवाला विरुध्द तक्रारदारांना कोणतेही कारण घडलेले नाही. तसेच सेवेत कसूर नाही त्यामुळे तक्रार खर्चासह रदद करण्यात यावी.
सामनेवाला क्र.5 यांनी त्यांचा खुलासा दि.08.10.2010 रोजी दाखल केला. तक्रारीतील सर्व आक्षेप त्यांनी नाकारलेले आहेत. तक्रारदाराच्या गाडीचा अपघात झाला होता या बाबत पोलिस स्टेशनला फिर्याद नाही किंवा त्या संदर्भात समक्ष अपघात पाहून समक्ष साक्षीदाराचे जवाब नाही. सदरचा अपघात हा ब्रेक फेल मूळे झाला या बाबत कूठलाही पुरावा नाही.त्यामुळे सेवेत कसूर नाही. तक्रारदारांनी स्वतःहून कार आणली. सदरची कार ही अपघाताच्या दूरुस्ती बाबत जे तक्रारदाराने गृहीत धरले तशी नव्हती. रक्कम रु.1371/- बिलामध्ये रक्कम रु.835.71 हे स्पेअर्स पार्टसचे आहेत व उर्वरित रक्क्म लेबर चार्जेसची आहे. लेबर चार्जेस परत देता येत नाहीत. दूरुस्ती समाधानकारक झाल्याबददल तक्रारदारांनीसही केलेली आहे. ब्रेक फेल होणे आणि इंजिन मधील दोषया दोन वेगवेगळया गोष्टी आहेत. सामनेवाला क्र.5 यांनी सदरचे वाहन दूरुस्तीसाठी आल्यानंतर तक्रारदारांना दि.19.07.2010 रोजी आणि दि.09.07.2010 रोजी पत्राने कळवले होते. त्या बाबत तक्रारदारांनी आजतागायत कूठलाही खुलासा केलेला नाही. वाहनामध्ये उत्पादित दोषा बाबत या सामनेवाला यांचे वर्कशॉपची जबाबदारी नाही.
तक्रारदारांनी सदरचे वाहन दि.08.09.2010 रोजी तक्रार दाखल झाल्यानंतर पूर्ण समाधान झाल्याने घेऊन गेलेले आहेत. त्यात त्यांनी तक्रार कायम ठेऊन वाहन नेत असल्याबददलचा उल्लेख केलेला नाही.केवळ तक्रार जिल्हा मंचा समोर प्रलंबित आहे एवढेच म्हटले आहे. त्यामुळे तक्रारदारांना तक्रार करण्यास ईस्टॉपेल या तत्वाची बांधा येते.दि.08.09.2010 नंतर तक्रारदारांनी सदरचे वाहन वर्कशॉपला आणले नाही. म्हणजेच तक्रारदार पूर्णपणे वाहना बाबत समाधानी आहेत. तक्रारदारास कोणतेही कारण घडलेले नाही. तक्रार खर्चासह रदद करण्यात यावी व सामनेवाला यांना रककम रु.10,000/- खर्च देण्याबाबत आदेश व्हावेत.
तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, तक्रारदाराचे शपथपत्र, तक्रारदारांचा लेखी युक्तीवाद सामनेवाला क्र. 1,ते 5 यांचा खुलासा,सामनेवाला क्र.2 चा लेखी युक्तीवाद, यांचे सखोल वाचन केले.
सामनेवाला क्र.1 यांचे विद्वान वकील श्री.थिगळे, सामनेवाला क्र.4 चे विद्वान वकील श्री.ए.पी.कूलकर्णी व सामनेवाला क्र.5 चे विद्वान वकील श्री.डी.बी.कूलकर्णी यांचा युक्तीवाद ऐकला.
तक्रारीतील सर्व कागदपत्रे पाहता तक्रारदारांनी मारुती स्विप्ट या त्यांच्या मालकीच्या वाहनाचे ब्रेक फेल झाल्याने अपघात झाला व तसेच अपघातानंतर ही सदरचे वाहन योग्य त-हेने दुरुस्त झालेले नाही. सदर वाहनात ब्रेक फेल होणे हा उत्पादित दोष आहे. तसेच इंजिनमध्ये आवाज येत असल्याने उत्पादित दोष असल्याचे सदरचे वाहन बदलून मिळण्यासाठी सदरची तक्रार दाखल केलेली आहे.
या संदर्भात तक्रारदारांनी उत्पादक कंपनीचे सामनेवाला क्र.1 यांनी सर्व्हीस सेंटर सामनेवाला क्र.2 यांना पार्टी केलेले आहे. सामनेवाला क्र.3 यांनी अपघातग्रस्त वाहन दूरुस्त करुन दिले. सामनेवाला क्र.4 ही कंपनी आहे. अपघातानंतर तक्रारदारांना विमा कंपनीने नूकसान भरपाई दिलेली आहे. ती तक्रारदारांनी स्विकारली आहे.
या संदर्भात सामनेवाला क्र.2 आणि 5 यांना खालील प्रमाणे हरकती घेतल्या आहेत. सामनेवाला क्र.1यांनी तक्रारदार हे ग्राहक नाहीत. तक्रारदाराचा कूठलाही सामनेवाला क्र.1 यांचेसोबत करार झालेला नाही. तक्रारदारांनी सामनेवाला क्र.2 यांनी विक्रीसाठी वाहन प्रिसिंपल टू प्रिसिंपल या तत्वाने दिलेलाक आहे. तसेच अपघात झाल्यानंतर वॉरंटी आपोआप संपूष्टात आलेली आहे. त्यामुळे नवीन करार अस्तित्वात येतो या कारणाने तक्रारदार सामनेवाला क्र.1चे ग्राहक नाहीत अशी जोरदार हरकत घेतली आहे.
या संदर्भात मारुती स्विप्ट हे सामनेवाला क्र.1 हे उत्पादक आहेत ही बाब त्यांना मान्य आहे.तक्रारदारांनी वाहनातील उत्पादक दोष बाबत तक्रार केलेली आहे. गुणवत्तेवर सदरची तक्रार उतरल्यास सदरचे दोष दुर करण्याची जबाबदारी उत्पादक कंपनी म्हणून सामनेवाला क्र.1 यांचे येते. जरी तक्रारदार व सामनेवाला क्र.1 यांचेत सरळ करार नसला तरी सामनेवाला क्र.1 ने उत्पादित केलेले वाहन सामनेवाला क्र.2 मार्फत तक्रारदारांनी विकत घेतलेले असल्याने तक्रारदार सामनेवाला क्र.1 चे ग्राहक आहेत असे न्यायमंचाचे मत आहे. त्यामुळे सामनेवाला क्र.1 ची हरकत याठिकाणी ग्राहय धरणे उचित होणार नाही असे न्यायमंचाचे मत आहे.
सामनेवाला क्र.2 आणि 5 यांनी सामनेवाला क्र.2 चे शोरुम औरंगाबाद येथे आहे. गाडी विक्रीचा व्यवहार औरंगाबाद येथेच झालेला आहे. सामनेवाला क्र.5 कंपनीचे अधिकृत दूरुस्ती केंद्र आहे ते औरंगाबाद येथेच आहे. त्यामुळे जिल्हा मंचाच्या अधिकारकक्षेत सदरची तक्रार येत नाही अशी जोरदार हरकत घेतली आहे. या संदर्भात सामनेवाला क्र.2 विरुध्द तक्रारदाराची मागणी नाही. गाडी औरंगाबाद येथेच विकत घेतल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे व तेथूनच त्यांनी ते घेतली आहे. सदर सर्व्हीस सेंटरची बीड येथे शाखा नाही व बीड येथे वाहन दूरुस्तीचे संदर्भात सामनेवाला क्र.5 कडून कोणतीही सेवा देण्यात आलेली नाही. त्यामुळे सामनेवाला क्र.5 ची अधिकारक्षेत्राची हरकत याठिकाणी ग्राहय धरणे उचित होणार नाही असे न्यायमंचाचे मत आहे. गाडी दुरुस्तीचा विषय औरंगाबाद येथील सर्व्हीस सेंटरला झालेला असल्याने बीड जिल्हा मंचाचे कक्षेत सदरची तक्रार येत नाही असे न्यायमंचाचे मत आहे.
सामनेवाला क्र.3 यांनी अपघातग्रस्त वाहन दूरुस्त करुन दिलेले आहे.सदर दूरुस्तीचे संदर्भात सामनेवाला क्र.4 विमा कंपनीने तक्रारदारांना नूकसान भरपाईची रक्कम दिलेली आहे. ती तक्रारदाराने स्विकारली आहे. तसेच सामनेवाला क्र.4 बाबत तक्रारदाराची कोणतीही मागणी नाही. सामनेवाला क्र.3 यांनी गाडी व्यवस्थित दूरुस्त न केल्याबददल तक्रारदाराची तक्रार नाही.
सर्वात महत्वाची तक्रार म्हणजे वाहनातील ब्रेक फेल हा उत्पादीत दोष आहे व इंजिन मधील आवाज हा उत्पादित दोष आहे. या बाबत विचार करता ब्रेक फेलचे संदर्भात सर्व्हीस सेंटर यांनी स्पेअर पार्टसची आकारणी केलेली आहे. त्यात ब्रेकचे संदर्भात कोणतेही स्पेअर पार्टस दिसत नाहीत. तसेच त्या संदर्भात कोणत्याही तज्ञ व्यक्तीचा पुरावा नाही. उत्पादीत दोष असल्याची बाब तक्रारदारावर शाबीतीची जबाबदारी आहे.
सामनेवाला क्र.5 यांनी वाहन अपघातानंतर दूरुस्तीसाठी टाकल्यानंतर दूरुस्त करुन दिलेले आहे व सदरचे वाहन तक्रारदाराचे ताब्यातच आहे असे आलेल्या पुराव्यावरुन दिसते. वाहनात उत्पादित दोष असल्याची बाब स्पष्ट होत नाही. त्यामूळे सामनेवाला यांनी तक्रारदारांना वाहन बदलून देण्याची तक्रारदाराची मागणी याठिकाणी मंजूर करणे उचित होणार नाही.
सेवेत कसूरीची संदर्भात विचार करता सामनेवालाकडे तक्रारदारांनी वाहन दूरुस्तीसाठी टाकले त्यांनी वाहन दूरुस्त करुन दिलेले आहे व तक्रारदारांनी सदरचे वाहन दूरुस्तीनंतर पूर्ण समाधाना अंती स्विकारल्याचे जॉब कार्डवरुन दिसते.त्यामुळे सामनेवाला यांनी तक्रारदारांना दयावयाचे सेवेत कसूर केल्याची बाब कूठेही स्पष्ट होत नाही असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रार रदद करण्यात येते.
2. खर्चाबददल आदेश नाही.
2. ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम-20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(अजय भोसरेकर) (पी.बी.भट)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड