::: निकालपत्र :::
(घोषित द्वारा: श्रीमती रेखा आर.जाधव, मा.सदस्या.)
अर्जदाराने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारा विरुध्द दाखल केली आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्यात अशी की,
अर्जदार ही मौजे राठोडा ता. निलंगा जि. लातूर येथील रहिवाशी असून शेतकरी आहे. अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 3 कडून दि. 27.05.2011 रोजी युवराज 15 महिन्द्रा ट्रॅक्टर घेतले. सदर ट्रॅक्टरचा क्रमांक एम.एच.24 सी 6701 आहे. अर्जदारस ट्रॅक्टर खरेदी करते वेळेस गॅरंटी व वारंटी दिली होती. अर्जदाराचे ट्रॅक्टर 1 महिना व्यवस्थित चालले, त्यानंतर ट्रॅक्टरमध्ये बिघाड सुरु झाला, अर्जदाराने सदर ट्रॅक्टर गैरअर्जदार क्र. 3 कडे घेवुन गेले असता, त्यांना गैरअर्जदार क्र. 2 यांच्याकडे जाण्यास सांगीतले. त्यांनी सदर ट्रॅक्टरचे हेड खराब असल्याबद्दल सांगीतले. अर्जदारास गैरअर्जदार क्र. 2व 3 ने सदर हेड बदलुन न देता, दि. 21.06.2011 रोजी रक्कम रु; 6954/- चे पार्ट बदलुन दिले,सदर ट्रॅकटर मध्ये उत्पादीत दोष आहे.
गैरअर्जदार क्र. 1 ते 3 ने वारंटी काळात ट्रॅक्टरचे हेड बदलुन अथवा दुरुस्त करुन दिले नाही, म्हणुन गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सेवेत त्रूटी केली आहे. अर्जदाराने दि. 30.04.2012 रोजी नोटीस दिली.
अर्जदाराने तक्रारी अर्जात गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांनी सदर ट्रॅक्टर बदलुन दयावे व गैरअर्जदाराने दररोज रु. 2250/- याप्रमाणे अर्जदारास रक्कम रु. 4,05,000/- 12 टक्के व्याजासह, तसेच मानसिक व शारिरीक त्रासापोटी व तक्रारीच्या खर्चापोटी रु. 30,000/:- व अर्जदाराचा बोजा नोंद नवीन ट्रॅक्टरवर करावा तसेच अर्जदाराने भरलेल्या संपुर्ण रक्कमेवर 12 टक्के व्याज देण्याची मागणी केली आहे.
अर्जदाराने तक्रारी अर्जासोबत पुरावा म्हणुन शपथपत्र दिले आहे. व त्यासोबत एकुण 11 कागदपत्रे दाखल केले आहेत.
गैरअर्जदार क्र. 1 यांनी लेखी म्हणणे दिले. त्यात अर्जदाराच्या वाहनात उत्पादीत दोष नाही गैरअर्जदार सेवेत त्रूटी केली नाही. अर्जदाराने दि. 27.03.2011 रोजी सदर ट्रॅक्टर घेतले सदर वाहनाची वारंटी 12 महिने किंवा 750 तासाची आहे. अर्जदाराने सदरचे ट्रॅक्टर दि. 26.2.2013 पर्यंत 23 महिन्यात 1042 तास इतके चालले आहे. सदर प्रकरण मंचाच्या कार्यक्षेत्रात येत नाही. अर्जदारास सदरचे ट्रॅक्टर पुर्णत: तपासणी केल्यानंतर देण्यात आले आहे. सदरचे ट्रॅक्टर हे स्टॅन्डर्ड क्वालीटीचे प्रमाणित केलेले आहे. अर्जदाराने खोटी तक्रार दाखल केली आहे. अर्जदारास तक्रार दाखल करण्यास कारण प्राप्त झाले नाही. म्हणुन अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात यावी.
गैरअर्जदार क्र. 2 यांनी लेखी म्हणणे दिले आहे, गैरअर्जदार क्र. 3 ने पुरसीस दिली आहे. गैरअर्जदार क्र. 2 चे म्हणणे हेच गैरअर्जदार क्र. 3 चे म्हणणे आहे. अर्जदाराने ट्रॅक्टर खरेदी करते वेळेस नियमावली प्रमाणे वापर करण्यासाठी लेखी व तोंडी माहिती गैरअर्जदाराने दिली आहे. अर्जदारास सदर ट्रॅक्टरच्या फ्री सर्व्हीसेस वारंटी काळात दिल्या आहेत. अर्जदारास वारंटी काळातील दुरुस्त्याही फ्री करुन दिल्या आहेत. अर्जदाराने दि. 16.10.2010 रोजी सदर ट्रॅक्टर दुरुस्तीसाठी आणले आहे, त्यावेळी सदर ट्रॅक्टर हे 401 तासापर्यंत चालले होते. गैरअर्जदाराच्या निदर्शनास आले की, सदर टॅक्टरचा ड्रायव्हर अनुभवी
नाही, वाहनात मर्यादेपेक्षा लोड भरल्यामुळे, व वापर केल्यामुळे सदरील ट्रॅक्टरच्या noice In gear मध्ये बिघाड उदभवला होता. अर्जदाराने ट्रॅक्टर वापरताना काळजी घेतली नाही. सदर वाहनात उत्पादीत दोष नाही. अर्जदार हा ट्रॅक्टरमधील बिघाडास स्वत: जबाबदार आहे. गैरअर्जदार निष्काळजीपणा केलेला नाही. अर्जदार हा सदरचा ट्रॅक्टरचा वापर व्यावसायीक तत्वाकरीता करत होता. अर्जदार हा ट्रॅक्टरच्या दुरुस्तीस स्वत: जबाबदार आहे. अर्जदार हा ग्राहक या संज्ञेत येत नाही. सदरचे ट्रॅक्टर हे द. 18.12.2012 ते 26.12.2013 या काळात गैरअर्जदाराने दुरुस्ती केलेली आहे. अर्जदाराचे ट्रॅक्टर हे व्यवस्थीत आहे अर्जदाराने कारण नसतांना सदरची तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराने टॅक्टरमध्ये अतिरिक्त लोड दिल्याचे दाखल केलेल्या फोटोवरुन दिसते. अर्जदाराची सदर तक्रार खोटी आहे, सदर तक्रार रु. 10,000/- खर्चासह खारीज करण्यात यावी, अशी विनंती केली आहे.
अर्जदाराने तक्रारी अर्जासोबत पुरावा म्हणुन शपथपत्र व कागदपत्रे दिली आहेत, तसेच गैरअर्जदाराचे लेखी म्हणणे व अर्जदार व गैरअर्जदाराचा युक्तीवाद याचे अवलोकन केले असता, खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
- अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय.
- गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सेवेत त्रूटी केली आहे काय ? नाही
- अर्जदार अनुतोष मिळण्यास पात्र आहे काय ? नाही.
- काय आदेश ? अंतिम आदेशा प्रमाणे
मुद्दा क्र; 1 चे उत्तर होय असून, अर्जदाराने गैरअर्जदार यांना मोबदला देवुन सेवा खरेदी केले आहे, सदरचा मोबदला गैरअर्जदार यांनी स्विकारल्यामुूळे अर्जदार हा ग्राहक या संज्ञेत येतो.
मु्दा क्र. 2 चे उत्तर नाही असे असून, अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 3 कडून दि. 17.05.2011 रोजी गैरअर्जदार क्र. 1 यांचे उत्पादीत ट्रॅक्टर युवराज 15 त्याचा क्रमांक एम.एच.24 सी 6701 खरेदी केले. सदर ट्रॅक्टरची वारंटी ही 12 महिने किंवा 750 तासाची असल्याचे वारंटी पुस्तिकेमधील मुद्दा क्र. 1 मध्ये दिसून येते. अर्जदाराने दि. 26.04.2011 रोजीचे लक्ष्मी ट्रॅक्टर्स जॉब कार्ड दाखल केले आहे. त्यावरुन असे दिसून येते की, अर्जदारास वारंटी काळात गैरअर्जदाराने फ्री सर्व्हीस दिली आहे. अर्जदाराने दि. 15.06.2011 रोजी गिअर बॉक्स मध्ये आवाज येत असल्याबद्दल सदर ट्रॅक्टर दुरुस्तीस दिले आहे. त्यात मुद्दा क्र. ड मध्ये ट्रॅक्टरला झटका बसल्यामुळे सेट अॅप चे दात तुटले आहेत, असे दिसून येते. गैरअर्जदाराने ट्रॅक्टर दुरुस्त करताना केलेल्या निरिक्षणामध्ये कंपनीने रिकमंड केलेले अवजारे ट्रॅक्टरला वापरावे अन्यथा ट्रॅक्टरमध्ये दोष आल्यास लक्ष्मी ट्रॅक्टर किंवा कंपनी जिम्मेदार राहणार नाही असे लिहील्याचे जॉब कार्ड वरुन सिध्द होते. अर्जदाराने दि. 16.10.2011 रोजीचे जॉब कार्ड दाखल केले आहे, त्यात ट्रॅक्टर बिघाडाची कारणे, वापर योग्य नसल्यामुळे व अवजारांच्या लोडमुळे झाल्याचे दिसून येते. गैरअर्जदार क्र. 2 व 3 ने ट्रॅक्टरचे इन्स्टालेशन रिपोर्ट दाखल केला आहे. त्यात ट्रॅक्टर वापरावयांची संपुर्ण नियमावली दिली आहे त्या वेळेस अर्जदाराचे पती ड्रायव्हर म्हणुन हजर असल्याचे दिसून येते. अर्जदाराने सदर ट्रॅक्टर मध्ये उत्पादीत दोष असल्याचा पुरावा दिलेला नाही. अर्जदाराचे सदर वाहन गैरअर्जदाराच्या नियमावलीप्रमाणे वापरल्याचे दिसून येत नाही. अर्जदाराने अतिरिक्त लोडचा वापर केल्याचे स्पष्ट होते. अर्जदाराने सदरची तक्रार वारंटी कालावधी संपल्यानंतर एक वर्षानी दाखल केली आहे. गैरअर्जदाराने सेवेत त्रूटी केल्याचे दिसून येत नाही.
अर्जदाराने कागदोपत्री पुरावा देवुन सदरचा ट्रॅक्टरमध्ये उत्पादीत दोष असल्याचे सिध्द केले नसल्यामुळे अर्जदार अनुतोषास पात्र नाही असे दिसून येते.
सबब न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
आदेश
- अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात येत आहे.
- खर्चा बाबत काही आदेश नाही.