निकालपत्रः- श्रीमती सुमन प्र.महाजन, अध्यक्षा ठिकाणः बांद्रा निकालपत्र तक्रारीचे संक्षिप्त स्वरुप खालीलप्रमाणेः- तक्रारदार हिने 5645 क्रमांकाच्या गुवाहाटी एक्सप्रेसचे AC II Tier चे दि.02.05.2009 चे लोकमान्य टिळक ते मिर्झापूरचे तिकीट आरक्षित केले होते, परंतु त्या दिवशी त्या गाडीला AC II Tier चा डबाच नव्हता. सामनेवाले यांनी वेळेवर AC II Tier च्या डब्याऐवजी AC III Tier डबा लावला. त्यामुळे तक्रारदार व तिच्या मुलीला AC III Tier च्या डब्यातून प्रवास करावा लागला. तो डबा खूप घाण होता व त्यात खूप धूळ होती, प्रवाशांना त्यांचे बर्थ स्वतःच स्वच्छ करून घ्यावे लागले. त्या डब्यात पाण्याची व्यवस्था नव्हती. प्रवाशांनी वारंवार मागणी केल्यानंतर इगतपुरी स्टेशनवर TTE ने पाणी आणून दिले. 2 त्या दिवशी तक्रारदार हिचे पती तिला व तिच्या मुलीला स्टेशनवर सोडायला आले होते. त्यांनी AC II Tier चा डबा शोधण्यासाठी गाडीच्या सुरुवातीच्या डब्यापासून शेवटच्या डब्यापर्यंत धावपळ केली. नंतर गाडीच्या तिकीट निरीक्षकाने सांगितले की, AC II Tier कोच उपलब्ध नसल्याने त्याऐवजी AC III Tier कोचची व्यवस्था केली आहे. तक्रारदार हिची तक्रार की, याबाबत सामनेवाले यांनी प्रवाशांना आगाऊ सूचना दिल्या नव्हत्या. तक्रारदार हिच्यासाठी 21 क्रमांकाचे आसन आरक्षित केलेले होते ते AC II Tier च्या डब्यात खालील आसन होते. मात्र, AC III Tier च्या डब्यात ते आसन मधीलआसन होते. तक्रारदार हिला तिच्या मुलीच्या दृष्टीने खालील आसन सोयीचे होते. म्हणून तीने तिकीट निरीक्षकाला तिला खालील आसन देण्याची विनंती केली परंतु त्यांनी तिचे ऐकून घेतले नाही. म्हणून तिला व तिच्या मुलीला दिवसासुध्दा झोपूनच प्रवास करावा लागला. कारण AC III Tier च्या डब्यात मधील असनावर बसता येत नाही. सामनेवाले यांनी AC II Tier व AC III Tier मधील तिकीटाच्या रकमेच्या फरकाची परताव्याची फक्त स्लिप दिली. सामनेवाले यांच्या वरील कृत्यामुळे तिला मानसिक त्रास झाला व त्यांची गैरसोय झाली असा तक्रारदार हिचा आरोप आहे. म्हणून तिने सदरची तक्रार करुन रु.1,00,000/- नुकसानभरपाई व तिकीटातील फरकाची रकम मागितली आहे. 3 सामनेवाले यांनी त्यांचे म्हणणे देऊन तक्रारदार हिचे आरोप नाकारले. त्यांचे म्हणणे की, गुवाहाटीवरुन मुंबईला 5646 क्रमांकाची गाडी आली होती, तीची देखभाल करण्याची जबाबदारी गुवाहाटी येथील नॉर्थ फ्रंटीयर रेल्वेची होती सामनेवाले यांची नाही. त्यांनी गाडीची देखभाल व्यवस्थित केली नाही, म्हणूनAC IITier डब्यात यांत्रिक बिघाड झाला, ही सामनेवाले यांची सेवेत न्यूनता नाही. तीच गाडी परत मुंबईहून गुवाहाटीला पाठविली, तिचा क्रमांक 5645 असा होता. त्या गाडीच्या AC II Tier च्या डब्यात यांत्रिक बिघाड झाल्याने तो डबा 5645 या क्रमांकाच्या गाडीला लावता आला नाही. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून AC IITier च्या डब्याऐवजी AC III Tier चा डबा लावण्यात आला, कारण त्यावेळी त्यांचेकडे AC II Tier चा डबा उपलब्ध नव्हता. तो डबा अस्वच्छ व घाणेरडा होता व त्यात पाणी नव्हते हा तक्रारदार हिचा आरोप खोटा आहे असे सामनेवाले म्हणतात. त्यांचे म्हणणे की, त्या डब्याच्या नळाला पाण्याचा दाब कमी होता म्हणून इगतपुरीला गाडी गेल्यानंतर पाणी भरण्यात आले. AC II Tier चा डबा उपलब्ध नाही व AC III Tier चा डबा लावण्यात आलेला आहे अशी घोषणा केलेली होती. AC III Tier च्या डब्यात बर्थची व्यवस्था AC II Tier डब्यातील व्यवस्थेपेक्षा वेगळी असल्याकारणाने तक्रारदार हिच्या आसनाची जागा बदलली. तक्रारदार हिने तिकीट निरीक्षकाला आसन बदलून देण्यासाठी विनंती केली नव्हती. जर तिने तशी विनंती केली असती तर त्यांनी तिचे आसन बदलून दिले असते. त्या डब्यात खालील आसन फक्त सात होते. त्यापैकी काही आसनं आरएसीवाल्यांना दिली होते. सामनेवाले यांचे म्हणणे की, त्यांची सेवेत न्यूनता नाही व तक्रार रद्द होण्यास पात्र आहे. 4 आम्ही तक्रारदारतर्फे वकील – श्री. वानखेडे यांचा युक्तीवाद ऐकला. सामनेवाले तर्फे युक्तीवादाच्या वेळी कोणीही हजर नव्हते. आम्हीं कागदपत्रं वाचली. 5 तक्रारदार हिने AC IITier चे गुवाहाटी एक्सप्रेसचे मुंबई ते मिर्झापूरचे तिकीट आरक्षित केले होते परंतु वेळेवर AC IITier च्या डब्याऐवजी AC IIITier च्या डब्यातून मिडल बर्थवरून प्रवास करावा लागला हे तक्रारदार हिचे म्हणणे सामनेवाले यांनी नाकारले नाही. वरील परिस्थितीत साहजिकच, तक्रारदार हिला मानसिक त्रास होऊन गैरसोय झाली. वेळेवर डबा शोधण्यासाठी त्यांची धावपळ झाली. AC IITier चा डब्यात यांत्रिक बिघाड झाला होता, याबद्दल सामनेवाले यांनी काहीही कागदोपत्री पुरावा दिलेला नाही. ऐनवेळी AC IITier च्या डब्याऐवजी AC IIITier चा डबा लावला, ही सामनेवाले यांची सेवेत न्यूनता आहे. AC IIITier चा डबा ऐनवेळी लावल्यामुळे त्यात पाण्याची व्यवस्था नव्हती. हा तक्रारदाराचा आरोप मान्य करण्यासारखा आहे. मुंबई ते इगतपुर या प्रवासा दरम्यान पाण्याची व्यवस्था नव्हती, त्यामुळे तक्रारदाराची गैरसोय झाली. गाडीची व्यवस्थितपणे देखभाल करणे हे सामनेवाले यांचे कर्तव्य होते ते त्यांनी पार पाडलेले नाही ही त्यांची सेवेत न्यूनता आहे. त्यामुळे तक्रारदार हिला मानसिक त्रास झाला व तिची गैरसोय झाली, त्यासाठी वाजवी नुकसान भरपाई देणे हि सामनेवाले यांची जबाबदारी आहे. तसेच AC IITier व AC IIITier च्या तिकीटाच्या रकमेतील फरक जो सामनेवाले यांनी तक्रारदार हिला देऊ केला होता, ती रक्कम मिळण्यासही ती पात्र आहे. म्हणून मंच खालील आदेश करीत आहे. आदेश (1) तक्रार क्र.51/11(548/2009) अंशतः मंजूर करण्यात येते. (2) सामनेवाले क्र.1 ते 4 यांनी संयुक्तिकरित्या किंवा वैयक्तिकरित्या AC IITier व AC IIITier या तिकीटाच्या रकमेतील फरकाची रक्कम तक्रारदार हिला द्यावी. (3) सामनेवाले क्र.1 ते 4 यांनी संयुक्तिकरित्या किंवा वैयक्तिकरित्या तक्रारदार हिला रक्कम रु.5,000/- नुकसान भरपाई द्यावी तसेच रक्कम रु.3,000/- या अर्जाचा खर्च द्यावा व स्वतःचा खर्च सोसावा. (4) आदेशाच्या प्रमाणित प्रतीं दोन्हीं पक्षकारांना विनामूल्य पाठविण्यात याव्या.
| [HONABLE MR. G L Chavan] Member[HONABLE MRS. S P Mahajan] PRESIDENT | |