निकालपत्र
(घोषीत द्वारा- मा. सौ. स्मिता बी.कुलकर्णी, अध्यक्षा )
1. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्या विरुध्द सेवेत त्रुटी दिल्याच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे आहे.
2. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्याकडून क्वाईन बॉक्स (P.C.O.) फोन नं. 264104 सन 2006 मध्ये घेतला होता. त्यासाठी दि. 24/07/2006 रोजी 1,000/- रुपये भरलेले होते. गैरअर्जदार बिल वेळेवर देत नव्हते तसेच बंद पडलेला फोन चालू करुन देत नव्हते, कार्यालयातील कर्मचारी ग्राहकांना सौजन्याची वागणूक देत नव्हते यामुळे कंटाळून अर्जदाराने दिनांक 01.07.2010 पासून फोन बंद करण्यासाठी प्रतिवादींना 15 दिवस आधी कळविले. तसेच फोनसाठी भरलेले रु.1,000/- व्याजासह परत मिळण्यासाठी अर्ज केला. गैरअर्जदार यांना स्मरणपत्रे पाठवून, वारंवार चकरा मारुन सुध्दा आजपर्यंत अर्जदाराचे अनामत रक्कम परत केलेले नाही तसेच एकाही पत्राचे उत्तर दिलेले नाही. अर्जदाराने तक्रारीबाबतचा घटनाक्रम खालील प्रमाणे दिलेला आहे.
3. अर्जदाराने गैरअर्जदाराकडे दिनांक 24.07.2006 रोजी 1000/- रुपये अनामत म्हणून भरलेले आहेत. गैरअर्जदार हे अर्जदारास बिल वेळेवर देत नव्हते त्यामुळे अर्जदारास 10/- रुपये दंड नेहमीच लागत होता. अर्जदाराने दिनांक 16.06.2010 च्या पत्रानुसार दिनांक 01.07.2010 पासून फोन कायमचा बंद करण्यासाठी अर्जदारास कळविलेले होते. तसेच दिनांक 09.09.2010 ला देखील गैरअर्जदार यांनी स्मरणपत्र दिलेले होते. 3 महिन्यानंतरही रक्कम परत मिळालेली नसल्यामुळे अर्जदाराची तक्रार टेलिफोन अदालतमध्ये ठेवावी अशी विनंती दिनांक 12.10.2010 च्या पत्राने गैरअर्जदार 1 यांना करण्यात आली होती. अर्जदाराने दिनांक 24.12.2010 रोजी उपस्थित राहून टेलिफोन अदालतमध्ये डिपॉझीटची रक्कम परत मिळावी म्हणून कैफियत मांडली. प्रतिवादीने डिपॉझीटची रक्कम ताबडतोब परत करण्यास संबंधितांना तिथेच सर्वासमोर सांगितले होते. त्यानंतरही रक्कम मिळाली नसल्याने दिनांक 28.07.2011 रोजी प्रतिवादींना पुन्हा पत्र देवून रक्कम देण्याची विनंती केली परंतू गैरअर्जदार यांनी रक्कम दिली नाही. 4 वर्षानंतर दिनांक 11.09.2014 रोजी अर्जदाराने पुन्हा गैरअर्जदार यांना पत्र लिहून डिपॉझीट परत करण्याची विनंती करुनही अर्जदारास रक्कम मिळालेली नाही त्यामुळे अर्जदाराने सदर तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदार यांनी तक्रारीमध्ये गैरअर्जदार यांच्याकडून डिपॉझीटची रक्कम रु. 1,000/- जुलै-10 पासून 10 टक्के व्याजासह मिळावी तसेच दाव्याच्या खर्चापोटी रक्कम रु. 5,000/- व मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 3,000/- मिळावे अशी विनंती तक्रारीद्वारे केलेली आहे.
4. गैरअर्जदार यांना मंचाची नोटीस प्राप्त झाल्यानंतर गैरअर्जदार हे आपल्या वकीलामार्फत हजर होऊन आपले लेखी म्हणणे दाखल केले. गैरअर्जदार यांचे थोडक्यात म्हणणे पुढील प्रमाणे आहे.
5. अर्जदाराची तक्रार ही वस्तुस्थितीवर आधारीत असल्यामुळे त्याचे उत्तर देणे गरजेचे नाही. तसेच अर्जदाराचे म्हणणे की, कार्यालयातील कर्मचारी ग्राहकांशी सौजन्याने वागत नव्हते, हे म्हणणे मान्य नाही. अर्जदाराने तक्रारीमध्ये दिलेला घटनाक्रम या सदरातील मजकूर गैरअर्जदार यांना मान्य असल्याने त्यावर गैरअर्जदार भाष्य करु इच्छित नाही. अर्जदार यांना दरमहा बिले वेळेवर येत नसल्यामुळे 10/- रुपयाचा दंड नेहमीच लागत होता हे म्हणणे गैरअर्जदार यांना मान्य नाही. अर्जदाराने सादर केलेल्या दि. 16.06.2010 च्या अर्जाद्वारे अर्जदाराचा टेलिफोन दिनांक 01.08.2011 रोजी बंद करण्यात आला होता. गैरअर्जदार यांनी अर्जदाराची डिपॉझीटची रक्कम रु.1,000/- परत करण्याविषयी मान्यता दिली असून तसा प्रस्ताव वरिष्ठाकडे पाठवलेला आहे. गैरअर्जदार हे अर्जदाराचा फोन क्रमांक 02462-264103 ची अनामत रक्कम देण्यास तयार आहेत त्यामुळे अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात यावी अशी विनंती गैरअर्जदार यांनी लेखी जबाबाद्वारे केलेली आहे.
6. गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या उत्तरावर अर्जदार यांनी आपले लेखी म्हणणे देवून कागदपत्रे दाखल केलेली आहेत. दोन्ही बाजुंनी पुराव्याकामी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केलेली आहेत. दोन्ही बाजुंनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता खालील बाबी स्पष्ट होतात.
7. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्याकडून दिनांक 24.07.2006 अनामत रक्कम रुपये 1,000/- भरुन क्वाईन बॉक्स (P.C.O.) फोन घेतलेला असल्याची बाब दोन्ही बाजुंना मान्य आहे. अर्जदार यांची गैरअर्जदाराविरुध्द तक्रार अशी आहे की, गैरअर्जदार हे अर्जदारास दरमहा बिले वेळेवर देत नव्हते त्यामुळे अर्जदारास नेहमीच 10/- रुपये दंड लागत होता यासाठी अर्जदार यांनी बिले दाखल केलेली आहेत. सदरील बिले व भरल्याच्या पावत्या यांचे अवलोकन केले असता गैरअर्जदार यांनी अर्जदारास मे-2007 मधील बिल विलंबाने दिलेले असून त्यासाठी अर्जदार यांनी दिनांक 21.05.2007 रोजी अर्ज दिलेला आहे. याच बाबीची पूनरावर्ती मे-2008 व मार्च-2008 रोजी झालेली असल्याचे अर्जदाराने दाखल केलेल्या कागदपत्रावरुन दिसून येते. यावरुन गैरअर्जदार हे अर्जदारास विलंबाने बिले देत असल्याचे स्पष्ट होते त्यामुळे अर्जदाराच्या तक्रारीतील म्हणणे की, गैरअर्जदार हे अर्जदारास दरमहा बिल वेळेवर देत नसल्याने अर्जदारास विनाकारण दंडाची रक्कम भरावी लागत होती, हे म्हणने योग्य असल्याचे स्पष्ट होते. अर्जदार यांची गैरअर्जदार विरुध्दची दुसरी तक्रार अशी आहे की, कार्यालयातील कर्मचारी ग्राहकांशी सौजन्याने वागत नव्हते. याबद्दल अर्जदार यांनी दाखल केलेल्या दि. 29/09/2007 रोजीच्या पत्रावरुन अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्याकडे टेलिफोन अदालत सन 2007- 2008 यामध्ये अर्ज केलेला होता व दिनांक 29 सप्टेंबर,2007 रोजी चिफ अकौंट ऑफिसर G M T BSNL Nanded यांनी गैरअर्जदार यांच्या कार्यालयातील कर्मचा-यांनी ग्राहकांशी सौजन्याने वागावे अशा पध्दतीचा आदेश अर्जदाराच्या तक्रारीवर दिलेला आहे. यावरुन अर्जदाराने गैरअर्जदाराविरुध्द, गैरअर्जदार यांचे कर्मचारी ग्राहकांशी सौजन्याने वागत नाही अशी केलेली तक्रार रास्त आहे. अर्जदार यांची 3 नंबरची गैरअर्जदार यांच्या विरुध्दची तक्रार अशी आहे की, अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्या वरील दोन्ही बाबींना कंटाळून दि. 16.06.2006 रोजी सदरील टेलिफोन बंद करण्याविषयी अर्ज दिला ही बाब गैरअर्जदार यांना मान्य आहे. अर्जदाराने दिनांक 16.06.2010 रोजी फोन बंद करण्यासाठी अर्ज दिल्यानंतरही गैरअर्जदार यांनी अर्जदाराचा टेलिफोन दिनांक 01.08.2011 रोजी बंद केलेला आहे. गैरअर्जदारांनी आपल्या लेखी जबाबातील परि.क्र.4 मध्ये ही बाब मान्य केलेली आहे. यावरुन अर्जदाराने टेलिफोन बंद करण्यासाठी दिलेल्या अर्जानंतर सुमारे 1 वर्षानी गैरअर्जदार यांनी कार्यवाही केलेली असल्याचे निदर्शनास येते. गैरअर्जदार यांनी अर्जदाराची अनामत रक्कम टेलिफोन बंद करुनही अदयापपर्यंत परत दिलेली नाही. याबाबत गैरअर्जदार यांनी लेखी जबाबामध्ये अर्जदाराची डिपॉझीटची रक्कम परत करण्याविषयी वरिष्ठाकडे प्रस्ताव पाठवलेला असून त्यास मान्यता दिलेली आहे. त्यामुळे रक्कम परत देण्यास तयार आहेत असे लेखी जबाबामध्ये कथन केलेले आहे. अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडे दि. 16.06.2010 रोजी टेलिफोन बंद करण्यासाठी अर्ज दिलेला होता यावरुन गैरअर्जदार यांनी त्वरित निर्णय घेवून अर्जदाराचा टेलिफोन बंद करुन अर्जदारास त्वरीत अनामत रक्कम परत करणे बंधनकारक होते परंतू गैरअर्जदार यांनी आजपर्यंत म्हणजेच सुमारे 4-5 वर्षे अर्जदाराची अनामत रक्कम परत न करुन सेवेत गंभीर त्रुटी दिलेली आहे. अर्जदार हे जेष्ठ नागरिक आहेत. अर्जदार यांना अनामत रक्कम परत मिळण्यासाठी गैरअर्जदार यांच्याकडे वारंवार चकरा माराव्या लागल्या असल्याचे अर्जदार यांनी दाखल केलेल्या दिनांक 16.06.2010, 09.09.2010, 12.10.2010, 28.07.2011, 19.09.2014, 10.05.2010 रोजी दिलेल्या अर्जावरुन दिसून येते. त्यामुळे अर्जदारास निश्चितच मानसिक त्रास झालेला असल्याचे मंचाचे मत आहे.
8. वास्तविक पाहता गैरअर्जदार यांनी आपल्या ग्राहकांशी सौजन्याने वागून ग्राहकांच्या असलेल्या तकारींचे निराकरण त्वरित दूर करुन देणे, योग्य सेवा देणे क्रमप्राप्त आहे परंतू सदर तक्रारीमध्ये अर्जदार यांना गैरअर्जदार यांनी कुठल्याही प्रकारची सौजन्याची वागणूक दिलेली नाही. अर्जदारास गैरअर्जदाराकडून सौजन्याची वागणूक मिळण्यासाठी टेलिफोन अदालतमध्ये तक्रार दाखल करावी लागली तसेच अर्जदाराने टेलिफोन बंद केल्यानंतरही अनामत रक्कम परत मिळण्यासाठी दाखल केलेल्या टेलिफोन अदालतीमधील निर्णयानंतरही सुमारे 4 वर्षे गैरअर्जदार यांनी अर्जदाराची अनामत रक्कम परत केलेली नाही. या दोन्हीही बाबीवरुन गैरअर्जदार यांनी अर्जदारास सेवेत त्रुटी दिलेली असल्याचे सिध्द होते. गैरअर्जदार यांच्या सदरील वर्तनामुळे अर्जदारास निश्चितच मानसिक त्रास झालेला आहे.
वरील विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
1. अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2. गैरअर्जदार यांनी अर्जदारास रक्कम रु. 1,000/- दिनांक 01.07.2010 पासून 9 टक्के व्याजासह आदेश तारखेपासून 30 दिवसांच्या आत दयावेत.
3. गैरअर्जदार यांनी अर्जदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 2,500/- व तक्रार खर्चापोटी रक्कम रु. 2,500/- आदेश तारखेपासून 30 दिवसांच्या आत दयावेत.
4. आदेशाची पूर्तता झाल्याबद्दलचा अहवाल दोन्ही पक्षांनी 45 दिवसानंतर मंचात दाखल करावा.प्रकरण 45 दिवसानंतर पुन्हा आदेशाच्या पूर्ततेच्या अहवालासाठी ठेवले जाईल.
5. निकालाच्या प्रती दोन्ही पक्षकारास मोफत देण्यात याव्यात.