(पारीत व्दारा मा. सदस्य श्री. एम.ए.एच. खान)
(पारीत दिनांक – 11 मार्च, 2019)
01. तक्रारकर्त्याने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 खाली विरुध्द पक्षाविरुध्द दाखल केलेली आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
तक्रारकर्त्याचे म्हणणे असे आहे की, विरुध्द पक्ष क्रं. 1 यांचेकडून दुचाकी वाहन किंमत रुपये 72,140/- अदा करुन दिनांक 20/05/2016 ला खरेदी केले होते त्याची वॉरन्टी दोन वर्षाकरीता होती व तक्रारदाराने अतिरिक्त रक्कम देवून वॉरन्टी अतिरिक्त 1 वर्षाकरीता वाढवून घेतली होती.
तक्रारदाराने दुचाकी वाहन खरेदी केल्यानंतर दोन महिन्याच्या आत म्हणजे दिनांक 28/07/2016 रोजी तक्रारदार वाहन स्वतः चालवित असतांना अचानक बंद पडले व त्याच दिवशी विरुध्द पक्ष क्रं. 3 यांच्याकडे दुरुस्तीला दिली व विरुध्द पक्ष क्रं. 3 ने तक्रारदाराला असे सांगितले की, सदर वाहनातील इंजिनमध्ये बिघाड हा त्याच्या विज काम्प्रेसर मुळे झालेला होता व तो आता दुरुस्त झाला आहे. तक्रारदाराचे वाहन पुन्हा दिनांक 22/08/2016, दिनांक 18/10/2016, 27/12/2016, 09/02/2017 ला आणि दिनांक 23/09/2017 ला तदनंतर पुनश्चः दिनांक 16/03/2018 रोजी पुन्हा वाहन बंद पडून तक्रारदार यांचेकडे बंद अवस्थेत आहे.
तक्रारदाराचे म्हणणे असे की, त्यांनी वाहन खरेदी केल्यानंतर दोन महिन्याच्या आत बंद पडले व वारंवार बंद पडल्यामुळे विरुध्द पक्षाच्या दुरुस्ती अहवालानुसार त्यात सदोष इंजिन असल्यामुळे वाहन उत्पादन दोष (Manufacturing Defect) असल्याने व वाहन दुरुस्ती पलीकडे असल्यामुळे खरेदी किंमत व्याजसह परत करण्यात यावी तसेच तक्रारदाराने त्यांच्या निगडीचे कामकाजासाठी दुसरे वाहन खरेदी केल्यामुळे त्याला मानसिक त्रासापोटी व दाव्याचा खर्च विरुध्द पक्षांनी तक्रारदाराला अदा करावे या साठी या मंचात तक्रार दाखल केलेली आहे.
03. प्रस्तुत तक्रार दाखल झाल्यानंतर विरुध्द पक्षाला मंचाद्वारे नोटीसेस जारी करण्यात आल्या. त्यावर विरुध्द पक्ष क्रं. 1 व 2 यांनी हजर होवून आपले लेखी कथन सादर केले, परंतु विरुध्द पक्ष क्रं. 3 यांना नोटीस प्राप्त होवून ते सतत गैरहजर राहिल्याने त्यांचेविरुध्द प्रकरण एकतर्फा चालविण्याचा आदेश पारीत करण्यात आलेला आहे.
04. प्रकरणांतील तपशिल असा आहे की, तक्रारदारने विरुध्द पक्ष क्रं. 1 यांचेकडून दुचाकी वाहन होंडा कंपनीचे मॉडेल कोड CB125 SHINE SP, TYPE- 21D/CB125/SHINE SP DISC, FRAM NO. ME4JC732DG8029811, ENGINE NO. JC73E80065896 या वर्णनाचे वाहन रुपये 72,140/- ला दिनांक 20/05/2016 रोजी भंडारा येथून खरेदी केली होती त्याबाबत विरुध्द पक्ष क्रं. 1 यांनी पावती निर्गमित केली त्यांचा NO.VEHINV – MH170001-1617-00619 असा असून प्रकरणांत वर्णण यादीतील क्रं. 01 वर दाखल आहे. तक्रारदाराने तक्रारीसोबत वॉरन्टी रजिस्ट्रेशन कॉर्ड व वाहनासाठी अतिरिक्त रुपये 420/- देवून पुढील 1 वर्षासाठी म्हणजे दिनांक 21/05/2019 पर्यंत वॉरन्टी वाढवून घेतली होती त्याचे कागदपत्र प्रकरणांत 1 ते 4 पर्यंत दाखल केलेले आहेत.
तक्रारदाराने वाहन खरेदी केल्यानंतर दोन महिन्याच्या आत दिनांक 28/07/2016 रोजी वाहन अचानक बंद पडले व सदर वाहन सुरु न झाल्याने दुरुस्तीच्या अटी व शर्तीप्रमाणे विरुध्द पक्ष क्रं. 3 यांच्याकडे दुरुस्तीसाठी सादर केले व त्याची प्रकरणांत दुरुस्ती पावती दाखल केली सदर पावतीच्या अहवालाप्रमाणे दुरुस्तीची तारीख व वेळ असुन त्यातील नोंदविलेला दोष Abnormal Vibration When Stopped होता. त्यावेळी सदर वाहन फक्त 4992 कि.मि. चालले असल्याचे विरुध्द पक्ष क्रं. 3 च्या दुरुस्ती अहवालावरुन दिसून येते ते पृष्ठ क्रं. 19 वर उपलब्ध आहे. तदनंतर वाहन दिनांक 22/08/2016, दिनांक 18/10/2016, दिनांक 27/12/2016, 09/02/2017, 23/09/2017, 16/03/2018 रोजी बंद पडून विरुध्द पक्ष क्रं. 3 यांनी वेळोवेळी दुरुस्ती केल्याचा अहवाल व दुरुस्तीतील दोष त्यांच्या दुरुस्ती अहवालात स्पष्टपणे नमुद केलेला आहे.
तक्रारदाराला वाहनातील इंजिन मधील दोष लक्षात आल्यानंतर सदोष उत्पादन या सबबीखाली विरुध्द पक्षाला दिनांक 31/03/2018, 23/04/2018 रोजी आपले वकीलांमार्फत कायदेशीर नोटीस बजावली आहे व त्याच्या रजिस्टर्ड पोचपावत्या आणि दिनांक 06/04/2018 रोजी विरुध्द पक्षाच्या वकीलांनी नोटीसला अनुसरुन दिलेले उत्तर व ई-मेल च्या प्रती प्रकरणांत दाखल केले आहेत त्यात विरुध्द पक्षाने तक्रारदाराची विनंती अमान्य केलेली आहे, म्हणून सदरहू वाद उभय पक्षात उपस्थित झाला व त्यामुळे तक्रारदाराने या मंचात वाहनाची किंमत व्याजासह, मानसिक त्रास व तक्रारीचा खर्च मिळण्याची मागणी केलेली आहे.
05. विरुध्द पक्ष क्रं. 1 व 2 यांनी तक्रारीला अनुसरुन आपला लेखी जबाब व शपथपत्र सादर केले त्यांत त्यांनी तक्रारदाराच्या तक्रारीतील सर्व मुद्ये नाकारलेले आहेत व विरुध्द पक्ष क्रं. 1 व 2 यांनी वेळोवेळी दुरुस्तीस टाकलेले वाहन वॉरन्टीच्या अटी व शर्तीनुसार दुरुस्तीप्रमाणे वाहनाचे आवश्यक भाग बदललेले आहेत व वाहनात निर्मिती दोष असल्याचे नाकारले असल्यामुळे सेवेतील त्रुटी व अनुचित व्यापार पध्दती नाकारलेली आहे. तसेच विरुध्द पक्ष 1 व 2 यांच्या वकीलांनी युक्तिवादादरम्यान असा मुद्या उपस्थित केला की, तक्रारदाराने सदर वाहनात इंजिनमध्ये निर्मीती दोष उद्भवला असे तक्रारीमध्ये नमुद केले असले तरी तक्रारदाराने तज्ञाचा अहवाल प्रकरणांत दाखल केलेला नाही असे मंचासमक्ष सांगितले आहे, परंतु तक्रारदाराने जरी तज्ञाचा अहवाल दाखल केलेला नसला तरी विरुध्द पक्षाने दाखल केलेल्या सदर वाहन तपासणी अहवालावरुन स्पष्ट होत असल्यामुळे विरुध्द पक्षाचा मुद्या अमान्य करण्यात येतो.
तक्रारदार व विरुध्द पक्ष क्रं. 1 व 2 यांनी आप आपले शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल करुन प्रकरणांत तोंडी युक्तिवाद करुन आपली बाजु मांडली.
06. वरील विवेचनावरुन प्रकरणांत खलील मुद्ये उपस्थित होतात.
अ) विरुध्द पक्ष क्रं 3 यांना नोटीस मिळूनही ते गैरहजर राहिल्याने त्यांनी आपला कोणताही मुद्या उपस्थित केलेला नाही. विरुध्द पक्ष क्रं. 1 व 2 यांनी वाहनाची सविस्तर तपासणी केल्यानंतर विरुध्द पक्ष क्रं. 1 कंपनीचा अधिकृत विक्रेता यांचेकडून विक्रीला गेले असल्याने विरुध्द पक्ष क्रं. 3 कंपनीचे अधिकृत दुरुस्ती सेवा केंद्र असल्याने वाहनाची वेळोवेळी दुरुस्ती केली व त्याबाबतच्या वेळोवेळी पावत्या दिलेल्या आहेत. विरुध्द पक्षकार हे वाहनाचे अधिकृत विक्रेते असुन त्यांनी उक्त वाहन त्यांच्याद्वारे विक्रीला गेले असल्याचे मान्य केलेले आहे.
ब) तक्रारदाराच्या तक्रारीसोबत सादर केलेल्या दस्तावरुन व विरुध्द पक्षकाराने वॉरन्टी कालावधीत वेळोवेळी दुरुस्ती केली आहे व दुरुस्तीचा दोष नोंदविलेला आहे व त्यांतील नोंदीनुसार विरुध्द पक्ष क्रं. 1 व 2 यांनी इंजिन ला दोष निर्माण झालेच्या नोंदी नमुद आहेत. त्यामुळे वाहनात निर्मीती दोष असल्याचे दिसून येते. तक्रारदाराने तोंडी युक्तिवादामध्ये मा. राज्य ग्राहक वाद निवारण आयोग, न्यु दिल्ली यांचे प्रकरण क्रमांक 484/2007 या मधील अपील क्रमांक 201/2008 चा आधार घेवून आपली बाजु मांडली.
निष्कर्ष
07. एकदरीत उभय पक्षात सादर करण्यात आलेली कागदपत्रे व तोंडी युक्तिवाद ऐकूण मंच या निष्कर्षास येते की, तक्रारदाराने होंडा कंपनीचे मॉडेल कोड CB125 SHINE SP या वर्णनाचे वाहन रुपये 72,140/- ला दिनांक 20/05/2016 रोजी भंडारा येथून खरेदी केल्यानंतर दोन महिन्याच्या आतच इंजिनमध्ये बिघाड झाला व वाहन वॉरन्टीच्या कालावधीत वारंवार बंद पडलेले व त्याचे कारण इंजिन मधील दोष असल्याचे विरुध्द पक्ष क्रं. 3 कंपनीचे अधिकृत सेवा केंद्राच्या कागदपत्रावरील नोंदीवरुन स्पष्टपणे दिसून येते. सदर वाहन आज तारखेपर्यंत तक्रारदाराकडे बंद अवस्थेत पडून आहे. तक्रारदाराला त्यांचे निगडीचे कामासाठी दुसरे वाहन खरेदी केले व त्याला अकारण भुर्दड बसलेला आहे. त्यामुळे तक्रारदार मुळ वाहनाची किंमत व्याजासह मिळण्यास तसेच झालेला मानसिक त्रास व तक्रारीचा खर्च देखील विरुध्द पक्ष क्रं. 1 व 2 यांचेकडून मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. विरुध्द पक्ष क्रं. 3 हे कंपनीचे अधिकृत सेवा केंद्र असल्याने व त्यांच्या सेवेत कोणतीही त्रुटी दिसून येत नसल्याचे त्यांचेविरुध्दची तक्रार खारीज होण्यास पात्र आहे.
यावरुन मंच तक्रारदाराची तक्रार अंशतः मान्य करुन खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
::आदेश::
(1) तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करुन विरुध्द पक्ष 1 व 2 यांनी एकत्रित व संयुक्तरित्या ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 2(C) (i) व (iii) अंतर्गत अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब त्रुटीची सेवा दिल्याचे घोषित करण्यात येत आहे.
(2) तक्रारदाराने दिनांक 20/05/2016 रोजी खरेदी केलेल्या वाहनाची किंमत रुपये 72,140/- विरुध्दपक्ष क्रं- 1 व 2 यांनी एकत्रीत व संयुक्तरित्या रक्कम जमा तारखेपासून प्रत्यक्ष रक्कम अदायगी पावेतो द.सा.द.शे 12 टक्के व्याजदाराने दोन महिन्याच्या आत (दिनांक 12/05/2019 पर्यंत) तक्रारकर्त्याला अदा करावी.
(03) तक्रारकर्त्याला मानसिक व शारीरीक त्रासापोटी तसेच दाव्याचा खर्च एकत्रीत रक्कम रुपये 30,000/- (अक्षरी रुपये तीस हजार फक्त) विरुध्दपक्ष क्रं-1 व 2 यांनी तक्रारकर्त्याला एकत्रीत व संयुक्तरित्या आदेशीत दिनांकापासून दोन महिन्याच्या आत अदा करावे.
(04) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं- 1 व 2 यांनी आदेश दिनांकापासून दोन महिन्याचे आत तक्रारदारास रक्कम अदा करण्यास कसुर केल्यास आदेशातील मुद्या क्रं. 2 व 3 मधील रकमेच्या मुदतीनंतर म्हणजे दिनांक 12/05/2019 पासून द.सा.द.शे. 18 टक्के व्याजदराने प्रत्यक्ष रक्कम अदायगी पावेतो तक्रारकर्त्याला अदा करावे.
(05) विरुध्द पक्ष क्र. 3 च्या विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
(06) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकाराना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
(07) तक्रारकर्त्याला “ब” व “क” फाईल्स परत करण्यात याव्यात.