नि.70 मे.जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,रत्नागिरी यांचेसमोर तक्रार क्रमांक : 146/2009 तक्रार दाखल झाल्याचा दि.03/11/2009 तक्रार निकाली झाल्याचा दि.30/06/2010 श्री.अनिल गोडसे, अध्यक्ष श्रीमती स्मिता देसाई, सदस्या कु.कमल श्रीधर सावंत रा.मु.पो.करजुवे, माडवणेवाडी, ता.संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी. ... तक्रारदार विरुध्द 1. भारत संचार निगम लिमिटेड, रत्नागिरी करिता जनरल मॅनेजर, व्दारा भारत संचार निगम लिमिटेड, संचार भवन, रत्नागिरी कोर्टासमोर, खारेघाट रोड, रत्नागिरी. 2. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, लिमिटेड, रत्नागिरी करिता, अधिक्षक अभियंता, व्दारा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, “महावितरण”, नाचणे रोड, रत्नागिरी तालुका व जिल्हा रत्नागिरी. ... सामनेवाला तक्रारदारतर्फे : विधिज्ञ श्री.गांधी सामनेवाले क्र.1 तर्फे : विधिज्ञ श्री.रेडिज सामनेवाले क्र.2 तर्फे : विधिज्ञ श्री.डिंगणकर -: नि का ल प त्र :- द्वारा : मा.अध्यक्ष, श्री.अनिल गोडसे 1. तक्रारदार यांनी सदरची तक्रार सामनेवाला यांनी दिलेल्या सेवेतील त्रुटीमुळे झालेल्या नुकसानभरपाईसाठी दाखल केली आहे. 2. सदर तक्रारीचा थोडक्यात तपशिल खालीलप्रमाणेः- तक्रारदार ही मौजे करजुवे येथे तिच्या वयोवृध्द आईसह कायमस्वरुपी वास्तव्यास आहे. तक्रारदार ही अविवाहीत असून ती तिचे वडिलोपार्जित जमिनीतून तसेच घराशेजारील जागेमधून भाजीपाला करुन उत्पन्न कमावीत होती. तक्रारदार हिचे घरामध्ये तक्रारदार हिचे आईचे नांवे विद्युत कनेक्शन सन 1995 पासून अस्तित्वात आहे. तसेच तक्रारदार हिचे घरामध्ये सामनेवाला क्र.1 यांचेकडील दुरध्वनी सेवा तक्रारदार हिचे आईचे नांवे सन 2002 पासून अस्तित्वात आहे. तक्रारदार व तीची आई ही सदर दोन्ही सेवेंचा वापर व उपभोग घेत होत्या व आहेत. 3. दि.21/11/2007 रोजी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास तक्रारदार हिचे घरातील टेलिफोनची रिंग थोडयाथोडया वेळाने वाजत राहिल्याने अखेर रात्री 1.30 वाजणेचे दरम्यान तक्रारदार ही टेलिफोनचा रिसिव्हर उचलून बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करत असताना तक्रारदार हीस तात्काळ वीजेचा शॉक लागल्यासारखे झाले व त्यामुळे तक्रारदारच्या उजव्या हाताच्या अंगठयाजवळची दोन बोटे अक्षरशः जळून गेली व हात मनगटापर्यंत भाजला. तसेच डाव्या पायालादेखील मोठया भाजल्याच्या जखमा झाल्या. त्यानंतर रत्नागिरी येथे रहाणारे तक्रारदारांचे बंधू यांना बोलवून घेतल्यानंतर पोलीस ठाण्यामध्ये खबर देण्यात आली. पोलीसांनी तक्रारदार यांना औषधोपचाराकरीता ग्रामीण रुग्णालय संगमेश्वर येथे पाठविले. तेथून त्यांना तातडीने रत्नागिरी येथील सिव्हील हॉस्पीटलमध्ये पाठविण्यात आले. तक्रारदार यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना दि.22/11/2007 रोजी मुंबई येथील जे.जे.रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर वेगवेगळे उपचार करण्यात आले. तक्रारदार यांचे प्राण वाचविताना वैद्यकीय अधिका-यांना त्यांच्या उजव्या हाताचा पंजा मनगटापर्यंत काढून टाकावा लागला. तसेच डाव्या पायावर देखील वेगवेगळे उपचार करुनदेखील त्याचा बराचसा भाग निकामीच राहिला. तक्रारदारांची तब्येत काहीशी स्थिरावल्यानंतर दि.05/03/2008 रोजी म्हणजे तब्बल 105 दिवसांनंतर त्यांना जे.जे.रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. तक्रारदाराच्या औषधोपचारासाठी बराच खर्च आला. तसेच तक्रारदाराच्या भावालाही त्यांच्या सेवासुश्रुषेकरीता त्यांचेबरोबर रहावे लागले. तक्रारदारांचा उजव्या हाताचा पंजा मनगटापर्यंत काढून टाकल्यामुळे त्यांना शारिरिक दुर्बलता आली व मानसिक आघात झाला. दरम्यानच्या काळामध्ये पोलीसांनी तक्रारदार यांचा जबाब घेतला तसेच पोलीसांनी योग्य तपास केला तसेच सामनेवाला यांच्या कर्मचा-यांनाही सदर घटना कळविण्यात आली व त्यांनी वस्तुस्थितीची पहाणी केली. तक्रारदाराच्या घरातील विद्युत पुरवठा घटनेनंतरही सुरु होता. तथापी दूरध्वनी संचापर्यंत आलेल्या वायरपैकी बॉक्सवरील वायर जळलेली होती. तसेच करजुवे डिंगणी रस्त्याच्या बाजूला असलेल्या दत्ताराम नलावडे यांच्या बंगल्याजवळ असलेल्या सामनेवाला क्र.2 यांचे इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर सेंटरवरील पोलवरील 11,000 व्होल्टच्या मुख्य वायरपैकी एका वायरखालून सामनेवाला क्र.1 यांच्या कर्मचा-याने टाकलेली टेलिफोनच्या वायरचा इलेक्ट्रिक वायरला स्पर्श होवून विद्युत प्रवाह टेलिफोन वायरमधून जावून तक्रारदार यांना शॉक बसल्याची घटना घडली आहे असे पहाणीव्दारे निष्पन्न झाले. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना सेवा देताना योग्य ती खबरदारी घेतली नाही व सुरक्षिततेची कोणतीही काळजी न घेतल्यामुळे तक्रारदारांना शॉक बसण्याची घटना घडली. त्यामध्ये सामनेवाला क्र.1 व 2 यांचे संबंधीत कर्मचा-यांचा बेजबाबदारपणा व बेफिकीरी व निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले. सामनेवाला यांनी दिलेल्या सेवेतील त्रुटीमुळे तक्रारदार यांनी त्यांना दि.15/04/2009 रोजी नुकसानभरपाई मागण्यासाठी रजिस्टर पोस्टाने पत्र पाठविले. सदर पत्राला सामनेवाला क्र.1 यांनी कोणतेही उत्तर दिले नाही तर सामनेवाला क्र.2 यांनी ते कोणतीही नुकसानभरपाई देण्यास जबाबदार नाहीत असे दि.24/06/2009 च्या पत्राने कळविले. त्यामुळे तक्रारदार यांनी नुकसानभरपाई रक्कम रु.10,00,000/- मिळण्यासाठी, तसेच शारिरिक, मानसिक त्रासापोटी व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु.25,000/- मिळणेसाठी प्रस्तुतचा तक्रार अर्ज या मंचामध्ये दाखल केला आहे. तक्रारदार यांनी तक्रार अर्जासोबत नि.2 ला स्वतःचे शपथपत्र दाखल केले आहे. तसेच नि.4 चे यादीने एकूण 14 कागद दाखल केले आहेत. 4. सामनेवाला क्र.2 यांनी याकामी नि.15 वर आपले म्हणणे सादर केले आहे. सामनेवाला यांनी तक्रारदाराच्या तक्रार अर्जातील बहुतांश मजकूर नाकारलेला आहे. सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदारास नुकसानभरपाई देण्याची जबाबदारी ही सामनेवाला क्र.1 यांची आहे. सदरचा अपघात हा सामनेवाला क्र.1 यांचे चुकीमुळे व निष्काळजीपणामुळे झाला असल्याचे सामनेवाला क्र.2 यांनी नमूद केले आहे. सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदार हीस टेलीफोन कनेक्शन देताना त्यांची वायर ही तक्रारदाराच्या घराच्या शेजारी राहणारे नलावडे यांचे घराच्या हद्दीवर असणा-या नारळाच्या झावळीमधून सामनेवाला क्र.2 यांच्या तारांखालून नेली होती. माडाच्या झावळीचे वा-याच्या झोतात पुढे-मागे होणाच्या क्रियेमुळे सामनेवाला क्र.1 च्या वायरचे सामनेवाला क्र.2 यांच्या लाईव्ह तारांना घर्षण होवून वायरीवरील प्लॅस्टीक वेस्टन जळून त्यानंतर तारेमधील विद्युत प्रवाह टेलीफोन वायरमधून वाहत जावून तक्रारदार हीस शॉक बसला. सामनेवाला यांचे वायरचे इन्स्टॉलेशन (जोडणी) ही 1995 मधील आहे. तर सामनेवाला क्र.1 यांची जोडणी ही 2002 सालातील आहे. विद्युत कायद्यातील तरतूदीप्रमाणे विद्युत लाईन व टेलीकम्युनिकेशन लाईन हया एकमेकांना क्रॉस करुन अगर जवळून न्यावयाच्या असतील तर ज्याची लाईन नंतर घालावयाची आहे त्या डिपार्टमेंटने कोड ऑफ प्रॅक्टीसप्रमाणे प्रोटेक्टींग डिव्हाईस अगर गार्डींगचे व्यवस्था करणे गरजेचे असते. तसेच त्याबाबतची एक महिन्याची नोटीस पूर्वी जी लाईन आहे त्यांना देणे गरजेचे असते. सामनेवाला क्र.1 यांनी अशी कोणतीच नोटीस सामनेवाला क्र.2 यांना दिली नाही तसेच गार्डींगबाबत कोणतीही तरतूद, व्यवस्था अथवा काळजी घेतली नाही हे सामनेवाला क्र.1 यांचे कृत्य निष्काळजीपणाचे व बेजबाबदार आहे असे सामनेवाला क्र.2 यांनी आपल्या म्हणण्यामध्ये नमूद केले आहे. सदर कामी भारतीय वीज अधिनियम 2003 चे कलम 161 नुसार विद्युत निरिक्षक यांची नेमणूक शासनाने केलेली असते. वीजेने अपघात झाल्यास त्या संदर्भात चौकशी करुन निष्कर्ष काढण्याचे अधिकार कायद्याने त्यांना दिले आहेत. सामनेवाला क्र.2 यांनी अपघाताची माहिती सदर विद्युत निरिक्षक यांना देताच विद्युत निरिक्षक यांनी चौकशीअंती दि.17/01/2001 च्या हुकूमाने सामनेवाला क्र.1 यांना अपघाताच्या नुकसानीस जबाबदार धरले आहे. या सर्व बाबींचा विचार करता सामनेवाला क्र.2 यांच्याविरुध्दची तक्रार फेटाळण्यात यावी असे सामनेवाला यांनी आपल्या म्हणण्यामध्ये नमूद केले आहे. सामनेवाला क्र.2 यांनी आपल्या म्हणण्यासोबत नि.16 ला शपथपत्र व नि.17 चे यादीने दोन कागद दाखल केले आहेत. 5. सामनेवाला क्र.1 यांनी याकामी हजर होवून नि.10 वर तक्रारदार ही सामनेवाला यांची ग्राहक आहे का? व प्रस्तुतची तक्रार चालविण्यास या मंचाला न्यायाधिकार आहे का ? याबाबत प्राथमिक मुद्दा काढण्यात यावा व त्यावर सुनावणी घेण्यात यावी अशी विनंती केल्याने त्याबाबत तक्रारदार यांचे म्हणणे घेण्यात येवून प्राथमिक मुद्दा काढण्यात आला व दोन्ही विधिज्ञांचा युक्तिवाद ऐकून घेवून तक्रारदार ही सामनेवाला क्र.1 यांची ग्राहक आहे तसेच प्रस्तुत तक्रार अर्ज चालविण्यास या मंचाला न्यायाधिकार आहे असा निष्कर्ष नि.10 वर नोंदविण्यात आला. सामनेवाला क्र.1 यांनी विहित मुदतीत आपले म्हणणे सादर न केल्याने त्यांचेविरुध्द म्हणणे नाही असा हुकूम नि.1 वर करणेत आला. सदरचा आदेश सामनेवाला क्र.1 यांनी नि.29 च्या अर्जान्वये रद्दबातल करुन घेवून नि.31 वर आपले म्हणणे सादर केले. 6. सामनेवाला क्र.1 यांनी नि.31 वर सादर केलेल्या म्हणण्यामध्ये तक्रारदार यांच्या तक्रार अर्जातील संपूर्ण मजकूर नाकारलेला आहे. तक्रारदारांचे तक्रारीतील कथन हे टेलीफोन उपकरण व सेवेशी निगडीत आहे. त्यामुळे टेलीग्राफ ऍक्टच्या तरतूदीनुसार तक्रार अर्जातील एकंदर विषय हा तांत्रिक गोष्टीशी संबंधीत असल्याने तो या मंचाच्या अधिकारक्षेत्राबाहेरील आहे. त्यामुळे प्रस्तुतचा तक्रार अर्ज चालविण्यास या मंचास अधिकार नाही असे सामनेवाला क्र.1 यांनी आपल्या म्हणण्यामध्ये नमूद केले आहे. टेलीफोन रिसिव्हर व टेलीफोन संच हे विद्युत रोधक साधनांपासून बनविलेले असल्याने त्यामधून किंवा रिसिव्हर उचलल्यामुळे वीजेचा शॉक लागू शकतो हे तांत्रिकदृष्टया अशक्य आहे. टेलीफोन संचातील किंवा रिसिव्हरला असलेल्या वायरचा शास्त्रीयदृष्टीकोनातून विचार केला तर सदरची वायर ही 11,000 व्होल्ट इतका वीजप्रवाह सहन करु शकत नाही. त्यामुळे सदर वायरमधून एवढया तीव्रतेचा प्रवाह प्रवाहीत झाल्यास सदरची वायर तात्काळ जळून तुटणे क्रमप्राप्त आहे परंतु टेलीफोनचा संच व त्याची वायर ही पूर्णपणे सुस्थितीत आढळून आली. त्यामुळे टेलीफोन रिसिव्हर उचलल्यामुळे तक्रारदार हीस विद्युत शॉक लागला ही वस्तुस्थिती अशक्य आहे. तक्रारदार हीस स्वतःच्या निष्काळजीपणामुळे अन्यत्र कोठेतरी वीजप्रवाहीत वायरला स्पर्श केल्याने तक्रारदारास वीजेचा शॉक लागण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे त्याबाबत सामनेवाला क्र.1 यास जबाबदार ठरविणे अन्यायकारक होणारे आहे. सामनेवाला क्र.1 यांनी त्यांच्या वाहिनीची उभारणी करताना योग्य ती काळजी घेतलेली होती. सामनेवालांची टेलीफोन वायर ही पाच पेअरची केबल असून ती शिथ्ड व इन्सुलेटेड आहे व ती आर्थिंगदेखील केलेली असते. सदरची वायर ही वीजरोधक मटेरियलपासून बनविलेली असल्याने व ती ओपन वायर नसल्याने तीला गार्डींग करण्याची जरुरी नाही असे सामनेवाला यांनी आपल्या म्हणण्यामध्ये नमूद केले आहे. सामनेवाला क्र.2 यांचे तज्ञ विद्युत निरिक्षक यांचेमार्फत जी काही तथाकथीत छाननी केली त्यावेळेस सामनेवालाच्या अधिका-यांना बोलाविले नव्हते. झालेल्या प्रकाराची दोन्ही खात्याचे टेक्निकली तज्ञ अधिका-यांमार्फत तपासणी होणे गरजेचे आहे. तक्रारदाराने केलेल्या मागण्या हया पूर्णतः चुकीच्या, अवास्तव व बेकायदेशीर असल्याने तक्रारदाराचा अर्ज खर्चासह फेटाळण्यात यावा असे सामनेवाला क्र.1 यांनी आपल्या म्हणण्यामध्ये नमूद केले आहे. सामनेवाला क्र.1 यांनी आपल्या म्हणण्याच्या पृष्ठयर्थ नि.32 ला शपथपत्र व नि.33 च्या यादीने दोन कागदपत्र दाखल केले आहेत. तसेच नि.41 वर कर्मचारी श्री.भोंगले यांचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. 7. तक्रारदार यांनी नि.45 वर शपथपत्राच्या स्वरुपात प्रतिउत्तर दाखल केले आहे. त्यामध्ये त्यांनी सामनेवाला यांच्या म्हणण्यातील मजकूर नाकारलेला आहे. तक्रारदार यांनी नि.46 च्या यादीने चार कागद दाखल केले आहेत. सामनेवाला क्र.2 तर्फे नि.53 च्या अर्जाने विद्युत निरिक्षक यांचे शपथपत्र व नि.55 च्या यादीने बारा कागद दाखल केले आहेत. तक्रारदार यांनी नि.58 च्या यादीने दोन कागद दाखल केले आहेत. सामनेवाला क्र.2 यांनी नि.60 वर आपला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. तक्रारदार यांनी नि.61 वर आपला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. सामनेवाला क्र.1 यांनी नि.65 वर आपला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. 8. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज, शपथपत्र, तक्रारदार यांनी दाखल केलेली कागदपत्रे, सामनेवाला यांनी दिलेले म्हणणे, शपथपत्र, सामनेवाला यांनी दाखल केलेली कागदपत्रे, तक्रारदार यांचे प्रतिउत्तर, दोन्ही दाखल करण्यात आलेली साक्षीदार यांची शपथपत्रे, दोन्ही बाजूंनी दाखल केलेला लेखी युक्तिवाद व ऐकण्यात आलेला तोंडी युक्तिवाद यावरुन खालील मुद्दे मंचाच्या निष्कर्षासाठी उपस्थित होतात. अ.क्र. | मुद्दे | उत्तरे | 1. | तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत का ? व सदरचा तक्रार अर्ज चालविण्यास या मंचास न्यायाधिकार आहे का ? | होय. | 2. | तक्रारदार हीस सामनेवाला क्र.1 यांच्या टेलीफोन जोडणीमूळे विद्युत शॉक लागला ही वस्तुस्थिती तक्रारदार यांनी सिध्द केली आहे काय ? | होय. | 3. | तक्रारदार हीस विद्युत शॉक लागल्यामुळे कायमचे अपंगत्व आले ही बाब सिध्द होते काय ? | होय. | 4. | सामनेवाला यांच्या सेवेतील त्रुटीमुळे तक्रारदारास विद्युत शॉक लागून तिला कायमचे अपंगत्व आले ही बाब तक्रारदार हीने सिध्द केली आहे काय ? | सामनेवाला क्र.1 बाबत होय. | 5. | तक्रारदार ही मागणीप्रमाणे अनुतोष मिळण्यास पात्र आहे काय ? | अंशतः होय. | 6. | काय आदेश ? | अंतिम आदेशाप्रमाणे. |
विवेचन 9. मुद्दा क्र.1- याकामी सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदार ही त्यांची ग्राहक नाही असा कोणताही आक्षेप घेतलेला नाही. तथापी सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदार ही त्यांची ग्राहक नसून सदरचा तक्रार अर्ज चालविण्यास या मंचास न्यायाधिकार नाही असा आक्षेप घेतला आहे. तसेच सदर तक्रार अर्जातील विषय हा तांत्रिक गोष्टीशी निगडीत असल्याने या मंचाच्या अधिकार क्षेत्राबाहेरील आहे असे मुद्दे उपस्थित केल्याने व तसा प्राथमिक मुद्दा काढण्याचा अर्ज नि.10 वर दिला असल्याने या सर्व बाबींबाबत नि.10 वरील आदेशात निष्कर्ष काढून तक्रारदार ही सामनेवाला यांची ग्राहक असून सदरचा तक्रार अर्ज चालविण्यास या मंचास न्यायाधिकार आहे असे ठरविण्यात आले. 10. मुद्दा क्र.2- तक्रारदार यांनी त्यांच्या तक्रार अर्जामध्ये तक्रारदार हिला दि.21/11/2007 रोजी रात्री 1.30 वाजण्याचे दरम्यान रिसीव्हर उचलून बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करताना वीजेचा शॉक लागला असे नमूद केले आहे. सामनेवाला क्र.1 यांनी सदरची वस्तुस्थिती नाकारली आहे. सामनेवाला यांनी त्यांच्या नि.31 वरील म्हणण्यामध्ये टेलीफोन रिसीव्हर व टेलीफोन संच हे विद्युत रोधक साधनांपासून बनविलेले असल्याने त्यामधून किंवा रिसीव्हर उचलल्यामुळे वीजेचा शॉक लागू शकतो ही गोष्ट तांत्रिकदृष्टया अशक्य आहे असे नमूद केले आहे. सामनेवाला यांनी त्यांच्या म्हणण्यामध्ये परिच्छेद 8 मध्ये तक्रारदार हीने वीजप्रवाहीत वायरला स्पर्श केल्याने तिला वीजेचा शॉक लागल्याची दाट शक्यता आहे असे नमूद केले आहे. तक्रारदार व सामनेवाला यांचे म्हणणे व युक्तिवाद विचारात घेता तक्रारदार हीस वीजेचा शॉक लागला होता का ? ही बाब प्रथमतः पहाणे गरजेचे आहे. दि.21/11/2007 रोजी मध्यरात्री सदर घटना घडल्यानंतर तक्रारदार हीने सदर घटनेची फिर्याद पोलीस स्टेशन संगमेश्वर येथे सकाळी 8.35 वाजता दिल्याबाबत पोलीस ठाणे दैनंदिनीची प्रत तक्रारदार हीने नि.4/2 वर दाखल केलेली आहे. पोलीसांनी लगेच दि.21/11/2007 रोजी केलेल्या पंचनाम्याची प्रत नि.4/9 वर दाखल आहे. तसेच पोलीसांनी घेतलेले जबाब तक्रारदार हीने नि.46 चे यादीने याकामी दाखल केले आहेत. सामनेवाला यांनी सदरचे जबाब हे फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 161 व 162 प्रमाणे घेतले असलेने ते याकामी पुराव्यात वाचता येणार नाही असा मुद्दा उपस्थित केला. तक्रारदार यांनी याकामी नि.67/2 वर मा.मुंबई उच्च न्यायालयातील रिट पिटीशन 447/2005 ची प्रत दाखल केली आहे सदर निवाडयावरुन 161 व 162 प्रमाणे घेतलेले जबाब हे दिवाणी प्रकारच्या कामकाजामध्ये वाचता येतील असे नमूद केले आहे. सदर निवाडयाचे अवलोकन करता फौजदारी प्रकिया संहिता 161 प्रमाणे नोंदविण्यात आलेले जबाब हे दिवाणी स्वरुपाच्या कामकाजामध्ये वाचता येतील असे निदर्शनास येते. याकामी विद्युत निरिक्षक यांनी विद्युत कायदा, 2003 मधील कलम 161 प्रमाणे चौकशी केली असून सदर चौकशी अहवालाबाबत याकामी नि.54 ला शपथपत्र दाखल केले आहे. या सर्व कागदपत्रांचे अवलोकन केले असता तक्रारदाराच्या घराच्या बाहेर टेलीफोन वायरचा विद्युत भारीत वायरला स्पर्श झाल्याने सदरच्या विद्युत प्रवाहीत टेलीफोन वायरमधून विद्युत प्रवाह प्रवाहीत होवून तक्रारदारास शॉक लागला असे निदर्शनास येते. सामनेवाला यांनी त्यांची विद्युत उपकरणे व त्यांची टेलीफोन उपकरणे ही विद्युतरोधक साधनांपासून बनविलेली असतात असे नमूद केले आहे व टेलीफोन उपकरणास शॉक बसू शकत नाही असे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. याकामी नि.4/9 वर असलेल्या पंचनाम्याचे अवलोकन केले असता टेलीफोन संचाची वायर सुरक्षित असलेचे नमूद केले आहे परंतु टेलीफोन संचाच्या पाठीमागे रोझेट बॉक्सपर्यंत आलेली वायर जळाली असल्याचे नमूद केले आहे. हीच बाब सामनेवाला क्र.1 यांच्या कर्मचा-यांनी या मंचासमोर दाखल केलेल्या नि.33/2 वरील प्रतिज्ञापत्रावरुन प्रामुख्याने निदर्शनास येते. सामनेवाला क्र.1 यांच्या कर्मचा-यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रावरुन टेलीफोन वायरमधून विद्युत प्रवाह प्रवाहीत झाला त्यामुळे टेलीफोनची आलेली मेन वायर ही वितळून तुटलेली आढळून आली असे प्रामुख्याने स्पष्ट होते. टेलीफोनच्या रिसीव्हरला हात लागून विद्युत शॉक बसत नाही हे सामनेवाला क्र.1 यांचे म्हणणे वादाकरीता जरी खरे मानले तरी टेलीफोन संचाच्या जवळ असलेल्या मेन वायरमधून विद्युत प्रवाह प्रवाहीत झाला आहे आणि तक्रारदाराने फोन उचलण्याची वेळ मध्यरात्रीची आहे ही बाब विचारात घेता तक्रारदार यांना निश्चितच सामनेवाला क्र.1 यांच्या टेलीफोन जोडणीमुळे विद्युत शॉक लागला ही बाब प्रामुख्याने स्पष्ट होते. 11. मुद्दा क्र.3- तक्रारदारास विद्युत शॉक लागल्यानंतर तिने लगेच दुस-या दिवशी सकाळी 8.30 वाजता तक्रार दिली. पोलीसांनी तक्रारदार हीस ग्रामीण रुग्णालय संगमेश्वर येथे पाठवले असे नि.4/3 वरील पोलीस ठाणे दैनंदिनीवरुन दिसून येते. सदरच्या घटनेनंतर तक्रारदार हीस सिव्हील हॉस्पीटल रत्नागिरी येथे ऍडमिट करण्यात आले तेथून तिला जे.जे.रुग्णालय येथे हलविण्यात आले. जे.जे.रुग्णालय येथे 105 दिवस उपचार घेतल्यानंतर तक्रारदार हीस घरी हलविण्यात आले. तक्रारदार हीचा उजवा हात सदर अपघातामुळे मनगटापासून कापावा लागला. तक्रारदार हीने याकामी नि.58/2 ला डिसॅबिलीटी सर्टिफिकेट दाखल केले आहे. सदरचे डिसॅबिलीटी सर्टिफिकेट हे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिलेले असून त्यामध्ये 45% डिसॅबिलीटी दाखवली आहे. सदरच्या सर्टिफिकेटचे अवलोकन केले असता तक्रारदार हीचा उजवा हात विद्युत शॉक लागल्यामुळे कापावा लागल्यामुळे तक्रारदार हीस कायमचे अपंगत्व आले आहे ही बाब प्रामुख्याने स्पष्ट होते. 12. मुद्दा क्र.4- तक्रारदार हीस विद्युत शॉक लागून तिला कायमचे अपंगत्व आले यामध्ये नेमका कोणाचा दोष आहे ? हे ठरवत असताना काही कायदेशीर तरतुदींचा उहापोह करणे गरजेचे आहे. याकामी सामनेवाला क्र.1 व 2 यांची जबाबदारी ठरवत असताना सामनेवाला क्र.2 यांनी आपल्या म्हणण्यामध्ये व युक्तिवादामध्ये सामनेवाला क्र.2 यांची विद्युत लाईनची जोडणी ही 1995 सालातील आहे. सामनेवाला क्र.1 यांची जोडणी ही 2002 सालातील आहे. कायदेशीर तरतूदीप्रमाणे अगोदर अस्तित्वात असणा-या विद्युत लाईन जवळून टेलीफोन वायर नेताना भारतीय विद्युत अधिनियम, 1956 मधील कलम 87 मधील तरतूदीप्रमाणे नंतर लाईन नेणा-या डिपार्टमेंटने सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. भारतीय विद्युत कायदा, 2003 मधील कलम 185 मधील Repeal and Saving मध्ये 2 (c) मध्ये खालीलप्रमाणे नमूद करण्यात आले आहे. (c) The Indian Electricity Rules, 1956 made under section 37 of the Indian Electricity Act, 1910 as stood before such repeal shall continue to be in force till the regulations under section 53 of this Act are made. सदर तरतूदीचा विचार करता जरी नविन 2003 च्या कायद्यानुसार मूळचा 1910 चा कायदा संपुष्टात आला असला तरी त्या कायद्यानुसार बनविण्यात आलेले 1956 चे अधिनियम अद्यापही अस्तित्वात आहेत. त्यामुळे सदर कायद्यातील कलम 87 मधील तरतूद याकामी लागू होते. याकामी दुसरा मुद्दा उपस्थित होतो तो विद्युत निरिक्षक यांनी केलेली चौकशी व त्यानुसार काढलेला निष्कर्ष यास कायदेशीररित्या किती महत्व प्राप्त होईल हे ठरविणे गरजेचे आहे. विद्युत निरिक्षक यांना सन 2003 च्या कायद्यातील कलम 161 नुसार विद्युत अपघाताच्या संबंधाने चौकशी करण्याचे अधिकार दिलेले आहेत. सदर विद्युत निरिक्षक यास सदर चौकशीसाठी दिवाणी कोर्टाचे अधिकार बहाल करण्यात आले आहेत. सदर कायद्यातील कलम 2 (21) मध्ये विद्युत निरिक्षकची व्याख्या देण्यात आली आहे. Electrical Inspector means a person appointed as such by the appropriate government under sub-section 1 of section 157 and also includes Chief Electrical Inspector. सदर कायद्याच्या कलम 162 (2) मध्ये खालील तरतूद करण्यात आली आहे. 162 (2) In the absence of express provision to the contrary in this Act, or any rule made there under, an appeal shall lie from the decision of a Chief Electrical Inspector or an Electrical Inspector to the Appropriate Government or if the Appropriate Government by general or special order so directs, to an Appropriate Commission. 13. याकामी विद्युत निरिक्षक यांनी सदर अपघाताची चौकशी केली असून त्यांचे स्वतःचे प्रतिज्ञापत्र व अहवाल नि.54 ला दाखल केला आहे. सदर विद्युत निरिक्षक हे उप-अभियंता म्हणून सार्वजनिक बांधकाम खात्यात विद्युत विभाग रत्नागिरी येथे कार्यरत आहेत व त्यांच्याकडे विद्युत निरिक्षक या पदाचा अतिरिक्त कार्यभार आहे. सदर विद्युत निरिक्षक यांनी याकामी चौकशी करुन सदर अपघाताची नुकसानभरपाई देण्यास सामनेवाला क्र.1 यांना जबाबदार धरले आहे. सदर विद्युत निरिक्षक हे सामनेवाला क्र.2 यांचे कर्मचारी नसून शासनाने नियुक्त केलेले स्वतंत्र कर्मचारी आहेत. कायद्यानुसार दिवाणी न्यायालयाचे अधिकार प्राप्त झालेल्या विद्युत निरिक्षकांनी चौकशी करुन दिलेल्या निर्णयाविरुध्द सामनेवाला क्र.1 यांनी कोणतेही अपिल केलेले दिसत नाही. तसेच विद्युत निरिक्षक यांच्या निष्कर्षाबद्दल आपले युक्तिवादामध्ये आक्षेप घेतलेला आहे. तथापी सामनेवाला यांनी विद्युत निरिक्षक यांनी शपथपत्र दाखल करुनही त्यांचा उलटतपास घेतलेला नाही तसेच सदर निष्कर्षाविरुध्द वर विवेचनात नमूद केलेल्या कायदेशीर तरतूदींचा विचार करता कोणतेही अपिल केले नसल्याने विद्युत निरिक्षक यांचा अहवाल अंतिम ठरतो. विद्युत निरिक्षक यांचा अहवाल व शपथपत्र विचारात घेता सामनेवाला क्र.1 यांना अपघातास जबाबदार धरले आहे. विद्युत निरिक्षक यांच्या शपथपत्रामधील मजकूराचे अवलोकन केले असता सामनेवाला क्र.1 यांनी सामनेवाला क्र.2 यांच्या 11 KV दाब असलेल्या वायरजवळून स्वतःची वायर नेताना कोणत्याही सुरक्षिततेचा विचार केला नाही व काळजी घेतली नाही. ग्राहकाला दूरध्वनी सेवा पुरविताना सदरची दूरध्वनी सेवा पूर्णपणे सुरक्षित आहे की नाही ? याची काळजी सामनेवाला क्र.1 यांनी घेणे गरजेचे होते. तशी काळजी सामनेवाला क्र.1 यांनी न घेतल्यामुळे सदरचा अपघात झाला असल्याचे दिसून येते. सामनेवाला क्र.1 यांच्या निष्काळजीपणामुळे तक्रारदार हीस विद्युत शॉक लागून तिस कायमचे अपंगत्व आले या निष्कर्षाप्रत सदरचा मंच आला आहे. 14. मुद्दा क्र.5- तक्रारदार हीने याकामी सामनेवाला यांच्या सदोष व त्रुटीयुक्त सेवेमुळे झालेल्या नुकसानीपोटी रक्कम रु.10,00,000/- व शारिरिक, मानसिक त्रासापोटी रक्कम रु.25,000/- ची मागणी केलेली आहे. तक्रारदार यांनी त्यांच्या तक्रार अर्जामध्ये तक्रारदार या वडिलोपार्जित जमीन जागेमधून गडी-माणसाच्या सहकार्याने उत्पन्न घेत होत्या. तसेच घराशेजारील जागेमधून भाजीपाला वगैरे करुन उत्पन्न घेत होत्या असे नमूद केले आहे. परंतू तक्रारदारांनी आपल्या उत्पन्नासंबंधी इतर कोणताही अन्य पुरावा दाखल केलेला नाही. त्यामुळे तक्रारदारांचे नेमके उत्पन्न किती ? हे तक्रारदार यांनी याकामी सिध्द केलेले नाही. तथापी तक्रारदार यांचे कमीतकमी उत्पन्न दरदिनी रु.100/- म्हणजेच प्रतिमहिना रु.3,000/- गृहीत धरले तसेच सन्मा.सर्वोच्च न्यायालय यांनी Laxmi Devi and Ors. V/s. Mohmmad Tabbar and Anr. या सिव्हील अपिल क्र.2090/2008 च्याकामी दि.25/03/2008 रोजी दिलेल्या निर्णयामध्ये गृहीत धरलेले एक वर्षाचे कमीतकमी उत्पन्न रु.36,000/- हे मार्गदर्शक म्हणून जरी विचारात घेतले तरी तक्रारदाराचे दरसाल उत्पन्न रु.36,000/- होते असे गृहीत धरणे न्यायोचित होईल असे मंचाचे मत आहे. तक्रारदार यांना नुकसानभरपाई मंजूर करताना सदरची तक्रार ही विद्युत शॉक लागून झालेल्या अपघातासंदर्भाताची असल्याने मोटार अपघात दाव्यामध्ये नुकसानभरपाई देताना जे निकष लावले जातात ते निकष याकामी मार्गदर्शक म्हणून विचारात घेवून तक्रारदाराचे असणारे वय 46 वर्षे लक्षात घेता मोटार वाहन कायद्यामध्ये 46 वयासाठी दिलेला मल्टीप्लायर 13 विचारात घेवून तक्रारदाराचे उत्पन्न 36,000 X 13 = 4,68,000 एकूण व तक्रारदारास आलेले 45% अपंगत्व विचारात घेता रक्कम रु.2,10,600/- व्याजासह मंजूर करणे योग्य ठरेल असे मंचाचे मत आहे. तसेच तक्रारदार यांनी याकामी त्यांना औषधोपचारासाठी व मुंबईला रहाण्यासाठी व उपचारसाठी नेमका किती खर्च आला याचा कोणताही तपशिल दिला नाही त्यामुळे त्यापोटी रक्कम रु.25,000/- व्याजासह मंजूर करणे योग्य होईल असे या मंचाचे मत आहे. तक्रारदार हीस झालेल्या शारिरिक, मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई व तक्रार अर्जाचा खर्च म्हणून रक्कम रु.10,000/- मंजूर करणे संयुक्तिक ठरेल असेही मंचाचे मत झाले आहे. वरील सर्व विवेचनावरुन सदरचा मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1. तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे. 2. तक्रारदार हीस सामनेवाला क्र.1 यांनी झालेल्या नुकसानीबाबत रक्कम रु.2,35,600/- (रु.दोन लाख पस्तीस हजार सहाशे मात्र) ही रक्कम तक्रार अर्ज दाखल तारखेपासून म्हणजे दि.03/11/2009 पासून संपूर्ण रक्कम पदरी पडेपर्यंत संपूर्ण रकमेवर द.सा.द.शे.9% दराने व्याजासह अदा करावी असा सामनेवाला यांना आदेश करण्यात येतो. 3. तक्रारदार हीस सामनेवाला क्र.1 यांनी शारिरिक, मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई व तक्रार अर्जाचा खर्च म्हणून रक्कम रु.10,000/- अदा करावेत असा आदेश करण्यात येतो. 4. वर नमूद आदेशाची पूर्तता सामनेवाला क्र.1 यांनी दि.30/08/2010 पर्यंत करण्याची आहे. 5. सामनेवाला यांनी आदेशाची पूर्तता विहीत मुदतीत न केल्यास तक्रारदार त्यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतूदीनुसार दाद मागू शकतील. रत्नागिरी दिनांक : 30/06/2010 (अनिल गोडसे) अध्यक्ष, ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, रत्नागिरी जिल्हा. (स्मिता देसाई) सदस्या, ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, रत्नागिरी जिल्हा. प्रत : तक्रारदार यांना हातपोच/रजि.पोस्टाने प्रत : सामनेवाले यांना हातपोच/रजि.पोस्टाने |