न्यायनिर्णय
सदर न्यायनिर्णय मा.सौ.सविता भोसले, अध्यक्षा यानी पारित केला
1. तक्रारदारांनी सदरचा तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 नुसार दाखल केला आहे. तक्रारअर्जातील थोडक्यात कथन खालीलप्रमाणे-
तक्रारदार हे करंजे तर्फ सातारा येथील कायमस्वरुपी रहिवासी आहे. ते रुक्मिणी स्पेशालिटी केमिकल्स ही प्रोप्रायटरी फर्म चालवितात. प्रस्तुत उदयोग ते कुटुंबाच्या चरितार्थासाठी करीत आहेत. जाबदार हे गायत्री केमिकल इंडस्ट्रीज फर्मचे प्रोप्रायटर आहेत. तक्रारदार हे जाबदाराकडून खरेदी केलेला डॉस 50 टक्के केमिकलमध्ये पाणी समाविष्ट (dilute) करुन तसेच त्यावर योग्य ती प्रक्रीया करुन सदर खरेदी केलेल्या मालाची केमिकल्सची तीव्रता कमी कमी त्याचे रुपांतर नवीन मालामध्ये करुन हा माल पुर्नविक्री न करता ग्राहकाना विकत होता.
तक्रारदाराने जाबदाराकडून डॉस 50 टक्के 500 कि.ग्रॅ. खरेदी करणेसाठी जाबदाराकडे चौकशी केली असता जाबदाराने मोबाईलवरुन दि.15-11-2011 रोजी एस.एम.एस.करुन डॉस 50 टक्के 500 कि.ग्रॅ.या प्रकारचा माल प्रति कि.ग्रॅ. दर रु. 70/- व त्यावर व्हॅट रु.5/- प्रमाणे दर सांगितला. सदरचा दर तक्रारदारास मान्य असल्याने तक्रारदाराने जाबदाराकडे सदर मालाची ऑर्डर मोबाईलवरुन दिली व त्याप्रमाणे सदर ऑर्डरच्या अॅडव्हान्सपोटी तक्रारदारानी जाबदाराचे युनियन बँकेतील खाते क्र.545901010050146 या खात्यावर रक्कम रु.18,000/- दि.21-11-2011 रोजी जमा केले. सदर ऑर्डप्रमाणे जाबदाराने तक्रारदाराला V Trans (India) या ट्रान्स्पोर्टने पावती क्र.1167594 ने माल दि.21-11-2011 रोजी पाठवून दिला.
सदरचा माल तक्रारदाराना दि.24-11-2011 रोजी मिळाला असता प्रस्तुत माल योग्य गुणवत्तेचा नसलेचे (डिफेक्टिव्ह) तक्रारदाराना आढळून आले. तसेच जाबाराने सदर मालासोबत पाठवलेले बील क्र.202 मध्ये डॉस या मालाचा प्रति.कि.ग्रॅ.चा दर रक्कम रु.80/- नमूद करुन एकूण 500 किलोचे व्हॅटसहित रक्कम रु.42,000/- एवढया रकमेच्या बिलाची आकारणी केली. वास्तविक वर नमूद केलेप्रमाणे दि.5-11-2011 रोजीचे एस.एम.एस.प्रमाणे सदरचा माल रक्कम रु.70/- प्रतिकिलो या दराने जाबदाराने पाठवणे गरजेचे होते. मात्र तक्रारदारांची फसवणूक करणेचे हेतूने जाणुनबुजून सदर बिलात कोणत्या प्रकारचे डॉस आहे हे नमूद न करताच जाबदाराने जादा रकमेचे बिल पाठविले, मात्र जाबदारानी बिल क्र.202 ने पाठवलेला माल हा डिफेक्टीव्ह असल्याने तक्रारदाराने तातडीने त्याच दिवशी जाबदाराचे मोबाईल क्र.9850821230 वर फोन करुन एस.एम.एस.करुन सदर मालाची ऑर्डर रद्द करुन सदर मालासाठी अँडव्हान्स म्हणून जमा केलेली रक्कम रु.18,000/- + रु.1,250/- टान्स्पोर्ट खर्च, + रु.500/- स्थानिक ट्रान्स्पोर्ट खर्च अशी एकूण रक्कम रु.19,750/- तकारदाराचे आय.डी.बी.आय.बँकेतील खात्यावर जमा करणेस जाबदाराना सांगितले मात्र जाबदारानी सदरची रक्कम तक्रारदाराचे खात्यावर जमा केली नाही, म्हणून तक्रारदारानी जाबदारांचे मोबाईलवरुन विचारणा केली असता जाबदारानी तक्रारदारासं त्यांचा खाते क्रमांक पाठवा म्हणजे खात्यावर रक्कम जमा करता येईल असे सांगितले. त्याप्रमाणे दि.30-11-2011 रोजी तक्रारदाराने जाबदारांना आय.डी.बी.आय.बँक,करंजे, सातारा येथील खातेक्रमांक दिला व डिफेक्टिव्ह मालासंबंधी पत्राने तक्रारदाराने आर.पी.ए.डी.ने जाबदाराना कळविले होते, तसेच दि.3-12-2011 रोजी जाबदाराने तक्रारदाराला मोबाईलवरुन कृपया माल परत पाठवून दया म्हणजे तुमचे खात्यात रक्कम जमा करतो असा एस.एम.एस.पाठविला. याप्रमाणे दि.15-12-2011 रोजी V Trans (India)Ltd. ट्रान्स्पोर्ट कंपनीने जाबदाराला माल परत पाठविला. तसेच ट्रान्स्पोर्ट रिसीटबाबत माहिती तक्रारदाराने जाबदाराना मोबाईलद्वारे एस.एम.एस.करुन पाठवली, तसेच पोस्टानेही पाठवली. जाबदाराला सदरचा माल परत मिळूनही जाबदारानी प्रस्तुत डिफेक्टिव्ह मालाची रक्कम तक्रारदाराचे खात्यावर जमा केली नाही. अशा प्रकारे जाबदाराने अनुचित व्यापारी प्रथांचा अवलंब करुन तक्रारदाराची फसवणूक केली आहे. तक्रारदाराला चांगल्या प्रतीचा माल न मिळाल्याने तक्रारदाराना मे.विजयालक्ष्मी एंटरप्रायजेस यांनी दिलेल्या ऑर्डरची पूर्तता करता आली नाही तसेच दरम्यानचे काळात तक्रारदार कोणतेही उत्पादन करु शकले नाहीत. तक्रारदारांचे रक्कम रु.55,000/-चे नुकसान झाले आहे. जाबदाराने मालाची रक्कम तक्रारदाराला परत दिली नसल्याने तक्रारदाराने वकीलांमार्फत दि.12-3-2012 रोजी नोटीस पाठवली. सदरची नोटीस जाबदाराना मिळूनही जाबदाराने तक्रारदाराला सदर मालाची रक्कम परत अदा केली नाही, त्यामुळे तक्रारदाराने सदर मालाची नुकसानभरपाईची रक्कम जाबदाराकडून मिळणेसाठी सदरचा तक्रारअर्ज दाखल केला आहे.
2. तक्रारदाराने सदर कामी जाबदारांकडून रक्कम रु.19,750/- (रु.एकोणीस हजार सातशे पन्नास मात्र)वसूल होऊन मिळावी, सदर रकमेवर सदरची रक्कम तक्रारदारास मिळेपर्यंत द.सा.द.शे.18 टक्केप्रमाणे व्याज जाबदाराकडून मिळावे, तक्रारदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी रक्कम रु.15,000/- जाबदाराकडून वसूल होऊन मिळावेत अशी विनंती या कामी तक्रारदाराने केली आहे.
3. तक्रारदाराने सदर कामी नि.2 कडे प्रतिज्ञापत्र, नि.5 चे कागदयादीसोबत नि.5/1 ते 5/12 कडे अनुक्रमे तक्रारदाराने मालाचे अँडव्हान्सपोटी जाबदाराचे बँक खात्यावर जमा केलेली रक्कम रु.18,000/- ची पावती, जाबदाराने तक्रारदारास माल पाठवलेची पावती, जाबदाराने मालासोबत पाठविलेले बील, तक्रारदाराने जाबदाराला डिफेक्टिव्ह मालाबाबत पाठवलेले पत्राची झेरॉक्स प्रत, प्रस्तुत पत्र जाबदारास पाठवलेची पोस्टाची पावती, तक्रारदाराने डिफेक्टिव्ह मालासाठी जाबदाराला पाठविलेले पत्र जाबदाराने स्विकारलेची पोहोच पावती, तक्रारदाराने जाबदाराविरुध्द सातारा शहर पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीची प्रत, तक्रारदाराने जाबदाराला वकीलांतर्फे पाठवलेल्या नोटीसची प्रत, तक्रारदाराने स्वतः जाबदाराला पाठवलेल्या नोटीसची पोस्टाची पावती, तक्रारदाराने जाबदाराला केलेल्या मोबाईलवरील संपर्काचे स्पष्टीकरण, विजयालक्ष्मी एंटरप्रायजेसने तक्रारदारास दिलेल्या ऑर्डरची प्रत, तक्रारदाराने जाबदाराला परत पाठवलेल्या मालाची पावती, नि.9 कडे दुरुस्ती अर्ज, नि.10 कडे दुरुस्ती प्रत, नि.11 कडे पुरावा संपलेची पुरसीस, नि.13 चे कागदयादीसोबत नि.13 कडे जाबदाराने तक्रारदारास पाठवलेल्या मालाचे बिल, नि.14 कडे पुराव्याचे प्रतिज्ञापत्र, नि.15 कडे लेखी युक्तीवाद वगैरे कागदपत्रे तक्रारदाराने सदर कामी दाखल केली आहेत.
4. सदर कामी जाबदाराना तक्रारअर्जाची नोटीस मिळालेची पोहोचपावती नि.7 कडे दाखल आहे. तक्रारअर्जाची नोटीस मिळूनही जाबदार या कामी हजर राहिले नाहीत किंवा त्यांनी म्हणणेही दाखल केलेले नाही, सबब जाबदाराविरुध्द नि.1 वर एकतर्फा आदेश पारित झाला आहे. जाबदाराने तक्रारदाराचे तक्रारअर्जातील कोणतेही कथन खोडून काढलेले नाही.
5. सदर कामी वर नमूद केलेप्रमाणे तक्रारदाराने दाखल केलेली सर्व कागदपत्रे, पुराव्याचे प्रतिज्ञापत्र, तसेच लेखी युक्तीवाद यांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे.मंचाने सदर तक्रारअर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दयांचा विचार केला-
अ.क्र. मुद्दा उत्तर
1. तक्रारदार व जाबदार हे नात्याने ग्राहक व सेवादेणार आहेत काय? होय.
2. जाबदारानी तक्रारदाराना सदोष सेवा पुरविली आहे काय? होय.
3. अंतिम आदेश काय? खालील नमूद केलेल्या आदेशाप्रमाणे.
विवेचन- मुद्दा क्र.1 व 2-
6. वर नमूद मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत कारण तक्रारदाराने त्यांचे प्रोप्रायटरी फर्मसाठी जाबदाराकडून डॉस-50 टक्के– 500 कि.ग्रॅ. खरेदी करणेसाठी मोबाईलद्वारे एस.एम.एस.पाठवून रक्कम रु.70/- प्रति कि.ग्रॅ. व त्यावर रक्कम रु.5/- व्हॅट याप्रमाणे दर मान्य असल्याने जाबदाराकडे एस.एम.एस,द्वारे ऑर्डर देऊन माल पाठवणेबाबत सांगितले व प्रस्तुत मागणी केलेल्या मालाच्या अॅडव्हान्सपोटी तक्रारदाराने जाबदारांचे बँक खाते क्र.545901010050146 या खात्यात रक्कम रु.18,000/- दि.21-11-2011 रोजी जमा केले आहेत. सदर ऑर्डरप्रमाणे जाबदारानी तक्रारदाराला V Trans (India)Ltd. या ट्रान्स्पोर्टने पावती क्र.1167594 ने दि.21-11-2011 रोजी माल पाठवून दिला. सदरच्या बाबी तक्रारदाराने नि.5 चे कागदयादीसोबत नि.5/1 कडे रक्कम रु.18,000/-जाबदाराचे खात्यावर जमा केलेची पावती नि.5/2 कडे जाबदाराने माल पाठवून दिलेली पावती, नि.5/3 कडे जाबदाराने मालासोबत पाठवलेले बीलाची झेरॉक्स प्रत,(नि.13/1 कडे मूळ बील) वगैरे कागदपत्रावरुन शाबीत होते, तसेच तक्रारदाराचे तक्रारअर्जास जाबदाराने हजर होऊन म्हणणेही दाखल केलेले नाही. जाबदाराविरुध्द एकतर्फा आदेश पारित झालेला आहे. सबब तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक असून जाबदार हे तक्रारदाराचे सेवापुरवठादार असल्याचे निर्विवाद सत्य आहे. तसेच तक्रारदाराने मागणी केलेप्रमाणे जाबदाराने तक्रारदारांना V Trans (India)Ltd या ट्रान्स्पोर्टने माल पाठविला, मात्र सदरचा माल डिफेक्टिव्ह होता तसेच सदर मालाचा दर प्रतिकिलो साठी रक्कम रु.80/- दिला होता व 500 किलोचे बील रक्कम रु.40,000/- + व्हॅट रक्कम रु.2,000/- असे रु.42,000/-चे बिल मालासोबत पाठविले होते. ठरलेल्या दराप्रमाणे रक्कम रु.50/- प्रति कि.ग्रॅ.ने बिल पाठविले नाही, तर वाढीव दराने पाठविले. तसेच पाठविलेला माल हा डिफेक्टिव्ह असल्याचे तक्रारदाराचे लक्षात आले. ही बाब तक्रारदाराने नि.13/1 कडे दाखल मूळ बिलावरुन तसेच तक्रारदाराचे प्रतिज्ञापत्रावरुन शाबीत होते, तसेच जाबदाराने तक्रारअर्जास म्हणणेही दिलेले नाही व हजरही झालेले नाहीत. म्हणून जाबदाराविरुध्द एकतर्फा आदेश पारित झाला आहे. सबब जाबदाराने तक्रारअर्जातील कोणतेही कथन खोडून काढलेले नाही. सबब तक्रारदारास जाबदाराने दुषित सेवा पुरवली असून अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब जाबदाराने केलेला आहे हे स्पष्ट होते. सबब मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
7. प्रस्तुत कामी वरील सर्व मुद्दे व कागदपत्रांचे अवलोकन करता जाबदारानी तक्रारदाराना रक्कम रु.18,000/- अँडव्हान्सपोटी जमा केलेली रक्कम तसेच रक्कम रु.1,250/- ट्रान्स्पोर्ट खर्च वर रक्कम रु.500/- स्थानिक ट्रान्स्पोर्ट खर्च असे एकूण रक्कम रु.19,750/- (रु.एकोणीस हजार सातशे पन्नास मात्र) तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- जाबदाराने तक्रारदारास अदा करणे न्यायोचित होणार आहे.
8. सबब सदर कामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करीत आहोत-
-ः आदेश ः-
1. तक्रारदारांचा तक्रारअर्ज मंजूर करणेत येतो.
2. जाबदारानी तक्रारदाराना रक्कम रु.19,750/- (रु.एकोणीस हजार सातशे पन्नास मात्र) अदा करावेत.
3. सदर रकमेवर अर्ज दाखल तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष तक्रारदाराला मिळेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्के दराने व्याज जाबदाराने तक्रारदारास अदा करावे.
4. तक्रारदाराना मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- जाबदाराने अदा करावेत.
5. सदर आदेशाचे पालन जाबदारानी आदेश पारित तारखेपासून 45 दिवसात करावे.
6. जाबदारानी विहीत मुदतीत आदेशाचे पालन न केल्यास तक्रारदाराना त्यांचेविरुध्द कलम 25 व 27 प्रमाणे दाद मागणेची मुभा राहील.
7. सदरचा न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
8. सदर न्यायनिर्णयाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य पाठवणेत याव्यात.
ठिकाण- सातारा.
दि.16-4-2015.
(सौ.सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ.सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.