नि.69 मे.जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,रत्नागिरी यांचेसमोर तक्रार क्रमांक : 11/2010 तक्रार अर्ज या मंचात वर्ग झाल्याचा दि. 15/02/2010 तक्रार अर्ज निकाली झाल्याचा दि. 12/11/2010 श्री.अनिल गोडसे, अध्यक्ष श्रीमती स्मिता देसाई, सदस्या सौ. वर्षा मिहिर झारापकर रा.फलॅट नं.एस3, व्दारका महालसाई प्लाझा, औदुंबर नगर, कुडाळ, ता.कुडाळ, जि.सिंधुदुर्ग. ... तक्रारदार विरुध्द गौतमी गोपाळ म्हाडदळकर रा.औदुंबर नगर, कुडाळ, ता.कुडाळ, जि.सिंधुदुर्ग. ... सामनेवाला तक्रारदारतर्फे : विधिज्ञ श्री.तायशेटे सामनेवालेतर्फे : विधिज्ञ श्री.कुंटे -: नि का ल प त्र :- द्वारा : मा.अध्यक्ष, श्री.अनिल गोडसे 1. तक्रारदार यांनी प्रस्तुतचा तक्रार अर्ज सामनेवालाविरुध्द त्यांच्या विविध मागण्यांसाठी दाखल केला आहे. तक्रारदारांनी सदरचा अर्ज सिंधुदुर्ग येथील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचामध्ये दाखल केला होता. प्रस्तुत तक्रार अर्जास सिंधुदुर्ग मंचामध्ये तक्रार अर्ज क्र.56/2009 देण्यात आला होता. प्रस्तुतचा तक्रार अर्ज सन्मा.राज्य आयोग यांचेकडील ट्रान्सफर अर्ज क्र.26/2009 मध्ये दि.25/09/2009 रोजी पारीत केलेल्या आदेशानुसार या मंचामध्ये वर्ग करण्यात आला. 2. सदर तक्रार अर्जाचा थोडक्यात तपशील खालीलप्रमाणेः- तक्रारदार हीने सामनेवाला यांनी मौजे कुडाळ येथे बांधलेल्या “व्दारका महालसाई प्लाझा” या इमारतीतील दुस-या मजल्यावरील सदनिका दि.04/08/2008 रोजीच्या खरेदीखतान्वये खरेदी केली. तक्रारदार हीने सदनिका खरेदी केली तेव्हा त्यामधील काही कामे अपूर्ण होती, ती कामे तक्रारदार हीने स्वतःच्या पैशाने पूर्ण केली. त्याचा खर्च सामनेवाला हीने तक्रारदारास देण्याचे कबूल केले होते परंतु सामनेवाला हीने खर्चाची रक्कम दिली नाही तसेच बांधकामामध्ये अनेक त्रुटी असल्याचे तक्रारदाराच्या निदर्शनास आले. त्यामुळे सदरच्या त्रुटी दूर करुन मिळाव्यात अथवा त्रुटी दूर करण्यासाठी येणा-या खर्चाची रक्कम मिळावी, तसेच अपूर्ण कामांसाठी खर्च केलेली रक्कम मिळावी, शारिरिक, मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई मिळावी या मागण्यांसाठी तक्रारदार यांनी प्रस्तुतचा तक्रार अर्ज दाखल केला आहे. तक्रारदार यांनी आपल्या तक्रार अर्जासोबत नि.3 चे यादीने एकूण 10 कागद दाखल केले आहेत. तसेच नि.25 च्या अर्जाने व नि.26 च्या यादीने एकूण 13 फोटोग्राफस हजर केले आहेत. 3. सामनेवाला यांनी याकामी नि.9 येथे आपले म्हणणे शपथपत्राच्या दाखल केले आहे. सामनेवाला यांनी आपल्या म्हणण्यामध्ये तक्रारदाराच्या तक्रार अर्जातील बहुतांश मजकूर नाकारलेला आहे. तक्रारदार यांनी फलॅट खरेदी करतेवेळी फलॅटमध्ये असलेल्या त्रुटीबाबत व सदोष बांधकामाबाबत कोणतीही तक्रार केलेली नाही. सदरचे खरेदीखत तक्रारदार यांनी फलॅटची पाहणी करुन केलेले आहे. तसेच तक्रारदारानी फलॅटच्या खरेदीसाठी ज्या बँकेचे कर्ज काढले त्या बँकेच्या अधिका-यांनी फलॅटची पाहणी केली. त्यावेळेस त्यांना कोणत्याही त्रुटी जाणवल्या नाहीत. तक्रारदाराने वीज उपकरणे जोडण्यासाठी भिंतींना, कॉलमना हातोडयाने मोठमोठी भोके पाडली त्यामुळे फलॅटमध्ये भेगा पडल्या आहेत. तक्रारदार हीने मेंटेनन्सची रक्कम दिली नाही तसेच विद्युत उपकरणे जोडण्यास लागणा-या ट्रान्सफॉर्मरची खर्चाची रक्कमही दिली नाही. तसेच वेळोवेळी येणा-या विद्युत बिलाची रक्कमही अदा केली नाही. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना कोणतीही सदोष सेवा दिलेली नाही. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज फेटाळण्यात यावा असे सामनेवाला यांच्या म्हणण्यामध्ये नमूद केले आहे. सामनेवाला यांनी प्रस्तुतचा तक्रार अर्ज या मंचात वर्ग झाल्यानंतर आपणास जादा म्हणणे देण्याचे आहे असे नि.20 वरील अर्जान्वये विनंती केली होती. परंतु त्यानंतर नि.23 वर जादा म्हणणे देण्याचे नाही अशी पुरशिस सादर केली आहे. 4. तक्रारदार यांनी नि.10 वर दिलेल्या अर्जानुसार कनिष्ठ अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग कुडाळ यांची याकामी कोर्ट कमिशनर म्हणून नेमणूक करण्यात आली. कोर्ट कमिशनर यांनी आपला अहवाल नि.58 वर दाखल केला. तक्रारदार यांनी सदर अहवालाबाबत नि.60 वर आपले म्हणणे दिले आहे. सामनेवाला यांनी कमिशन अहवालाबाबत कोणतेही म्हणणे दाखल केलेले नाही. 5. तक्रारदार यांनी नि.61 वर आपले पुराव्याचे रिजॉईंडर ऍफिडेव्हीट सादर केले आहे. तक्रारदार यांनी आपल्या सदरच्या ऍफिडेव्हीटमध्ये तक्रारदार यांनी विद्युत वितरण कंपनी व सामनेवाला यांच्याविरुध्द वीज मिटर जोडणी मिळावी या कारणासाठी तक्रार अर्ज दाखल केला होता परंतु विद्युत वितरण कंपनीने वीज जोडणी दिल्यामुळे सदरचा तक्रार अर्ज काढून घेण्यात आला असे नमूद केले आहे. 6. सामनेवाला यांनी या मंचामध्ये वर्ग करण्यात आलेल्या तक्रार अर्जाबाबत सन्मा.राज्य आयोग यांचेकडे ट्रान्सफर अर्ज क्र.05/2010 चा दाखल केला होता. परंतु सदरचा अर्ज काढून घेतल्यामुळे त्याकामी दि.06/05/2010 रोजी झालेल्या आदेशाची प्रत नि.39 वर दाखल आहे. तक्रारदारतर्फे प्रस्तुत प्रकरणी जादा पुरावा देणेचा नाही अशी पुरशिस नि.64 वर दाखल करण्यात आली आहे. 7. तक्रारदार यांनी नि.67 वर आपला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. सामनेवाला यांनी आपला लेखी युक्तिवाद दाखल केला नाही तसेच सामनेवाला अथवा त्यांचे विधिज्ञ तोंडी युक्तिवादासाठीही मंचासमोर उपस्थित राहीले नाहीत. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज, तक्रारदार यांनी दाखल केलेली कागदपत्रे, सामनेवाला यांनी दिलेले शपथपत्राच्या स्वरुपातील म्हणणे, प्रतिउत्तर, तक्रारदारतर्फे दाखल केलेला लेखी युक्तिवाद व ऐकण्यात आलेला तोंडी युक्तिवाद यावरुन खालील मुद्दे मंचाच्या निष्कर्षासाठी उपस्थित होतात. अ.क्र. | मुद्दे | उत्तरे | 1. | सामनेवाला यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा दिली आहे काय ? | होय. | 2. | तक्रारदार हे मागणीप्रमाणे अनुतोष मिळण्यास पात्र आहेत काय ? | अंशतः मंजूर. | 3. | तक्रारदार हे शारिरिक, मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई व तक्रार अर्जाचा खर्च मिळण्यास पात्र आहेत काय ? | होय. | 4. | काय आदेश ? | अंतिम आदेशाप्रमाणे. |
विवेचन 8. मुद्दा क्र. 1 -तक्रारदार यांनी आपल्या तक्रार अर्जामध्ये सामनेवाला यांनी बांधकामात काही त्रुटी ठेवल्या व कामे अपूर्ण ठेवली ती कामे तक्रारदारास पूर्ण करावी लागली त्यामुळे सामनेवाला यांच्या सदोष सेवेबाबत प्रस्तुतचा तक्रार अर्ज दाखल केला आहे. तक्रारदार यांना विद्युत मिटर जोडणी दिली नाही व सदरची जोडणी तक्रारदारास देण्यासही सामनेवाला यांनी आक्षेप घेतला व त्यासाठी तक्रारदार यांना या मंचामध्ये दुसरी तक्रार दाखल करावी लागली. सामनेवाला यांनी सदनिकेच्या बांधकामामध्ये काही त्रुटी ठेवल्या त्याबाबत कोर्ट कमिशनर यांनी आपल्या नि.58 वरील अहवालामध्ये अभिप्राय नोंदविला आहे. तक्रारदार यांनी सामनेवाला यांना त्यांच्या तक्रारीचे निराकरण करुन द्यावे म्हणून नोटीस पाठवली होती. त्या नोटीसची कार्यालयीन प्रत याकामी नि.3/9 वर दाखल आहे. या सर्व बाबींचे अवलोकन केले असता सामनेवाला यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा दिली हे स्पष्ट होते. 9. मुद्दा क्र. 2 - तक्रारदार यांनी आपल्या तक्रार अर्जामध्ये विविध मागण्या केल्या आहेत त्यापैकी परिच्छेद 3 तक्रारीचा तपशिल यातील कॉलम नंबर 5 मध्ये उपकॉलम 1 मध्ये रक्कम रु.4,077/- मिळावेत तसेच उपकलम 2 मध्ये ऑक्टोबर 2008 चे वीज भाडे दोन वेळा आकारले ते जादाचे वीज भाडे रु.583/- परत मिळावेत अशी मागणी केली आहे. तक्रारदार यांनी रक्कम रु.4,077/- बाबत कॉलम 4 मध्ये उल्लेख केला आहे व काही अपूर्ण कामे सदनिकेचा ताबा घेतल्यावर आपण पूर्ण केली व त्यासाठी सदरचा खर्च आला असे नमूद केले आहे. परंतु तक्रारदार यांनी त्याबाबतचा कोणताही योग्य तो पुरावा मंचासमोर आणला नाही. त्यामुळे तक्रारदाराची सदरची मागणी अमान्य करण्यात येते. वीज बिलाबाबतही तक्रारदारांनी आपल्या तक्रार अर्जातील कथनाशिवाय इतर कोणताही अन्य पुरावा मंचासमोर आणला नाही. त्यामुळे तक्रारदाराची सदरची मागणी अमान्य करण्यात येते. 10. तक्रारदार यांनी कॉलम नंबर 5 मधील उपकॉलम 6 मध्ये फलॅटमधील सर्व त्रुटी दूर करुन देण्याबाबत आदेश व्हावा अथवा विरुध्द पक्षाच्या खर्चाने सदरच्या त्रुटी दूर करुन मिळाव्यात अशी मागणी केली आहे. याबाबत तक्रारदार यांनी आपल्या तक्रार अर्जातील तक्रारीचा तपशिलमधील परिच्छेद 5 मध्ये सामनेवाला यांनी बांधकामामध्ये ठेवलेल्या त्रुटींबाबतचा उल्लेख केला आहे. सामनेवाला यांनी आपल्या म्हणण्यामध्ये सदरची वस्तुस्थिती नाकारली आहे. तक्रारदार यांनी नि.26 च्या यादीने 13 फोटोग्राफस दाखल केले आहेत. परंतु त्याबाबत कोणताही शाबितीसाठीचा पुरावा मंचासमोर आणला नाही. अशा परिस्थीतीत कोर्ट कमिशनर यांनी नि.58 ला दाखल केलेला अहवाल याकामी विचारात घेणे गरजेचे आहे. सदर अहवालाबाबत सामनेवाला यांनी आपले म्हणणे नोंदविलेले नाही अथवा सामनेवाला व त्यांचे विधिज्ञ हे युक्तिवादासाठी मंचासमोर उपस्थित राहीले नाहीत अथवा त्यांनी आपला लेखी युक्तिवादही दाखल केला नाही. कोर्ट कमिशनर यांनी आपल्या अहवालामध्ये फलॅटमधील भिंतींना गेलेल्या भेगा बुजविण्यासाठी रक्कम रु.300/- खर्च सुचविला आहे. तसेच तक्रारदार यांच्या सदनिकेचे वॉटरप्रुफींग करण्यासाठी रु.25,500/- इतका खर्च सुचविला आहे. फलॅटमधील दरवाज्यांना बारीक भेगा पडल्या आहेत त्यासाठीचा खर्च रक्कम रु.200/- सुचविला आहे. संडास फलोरींगमधील दोष दूर करण्यासाठी रक्कम रु.2,000/- इतका खर्च सुचविला आहे. तसेच संडास बाथरुमच्या खिडक्यांना ऍल्युमिनीयमच्या लूवर्स खिडक्या बसविण्यासाठी रक्कम रु.1,800/- खर्च सुचविला आहे. सामनेवाला यांना सदर त्रुटींचे निराकरण करुन देण्यासाठी आदेश करण्यापेक्षा कोर्ट कमिशनर यांनी सुचविलेला खर्च तक्रारदार यांना देणेबाबत आदेश करणे योग्य व न्यायोचित होईल असे या मंचाचे मत झाले आहे. त्यामुळे कोर्ट कमिशनर यांनी सुचविलेला खर्च एकूण रक्कम रु.29,800/- तक्रारदार यांना अदा करणेबाबत आदेश करणे योग्य व संयुक्तिक होईल या निष्कर्षाप्रत सदरचा मंच आला आहे. तक्रारदार यांनी आपल्या तक्रार अर्जात सदरची रक्कम व्याजासह मिळावी अशी मागणी केली आहे. तक्रारदार यांची मागणी विचारात घेता सदरची रक्कम तक्रार अर्ज दाखल तारखेपासून व्याजासह मंजूर करणे योग्य होईल असे मंचाचे मत झाले आहे. 11. तक्रारदार यांनी सदर तक्रार अर्जामध्ये इतर अन्य काही मागण्या केल्या आहेत परंतु सदरच्या मागण्यांचे अवलोकन केले असता सदरच्या मागण्या हया सामाईक स्वरुपाच्या असल्याचे दिसून येते. त्याबाबत तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायद्यातील कलम 13 (6) अन्वये तक्रार अर्ज दाखल करण्यास परवानगी घेतलेली नाही व इतर सर्व सदनिका धारकांना याकामी योग्य ती पूर्तता करुन सामिल करुन घेतले नाही त्यामुळे सदर मागण्यांचा याकामी विचार करण्यात येत नाही. 12. मुद्दा क्र. 3 - तक्रारदार यांनी शारिरिक, मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई, तक्रार अर्जाचा खर्च इत्यादी मागण्या केल्या आहेत. सामनेवाला यांनी दिलेल्या सदोष सेवेमुळे तक्रारदारांना प्रस्तुतचा तक्रार अर्ज दाखल करावा लागला व त्यामुळे तक्रारदार यांना निश्चितच शारिरिक, मानसिक त्रासास सामोरे जावे लागले. तसेच प्रस्तुतचा तक्रार अर्ज दाखल झाल्यानंतर सदर तक्रार अर्जाचा पाठपुरावा करण्यासाठी विधिज्ञांसह सिंधुदुर्ग येथून रत्नागिरी येथे यावे लागले. सामनेवाला यांनी प्रस्तुत कामी कोर्ट कमिशनर यांना अहवाल सादर करण्यासाठी आदेशीत केल्यावर कोर्ट कमिशनर यांचेकडून वेगवेगळया कारणांसाठी वारंवार परस्पर तारखा घेतल्याचे नि.41, नि.43, नि.57 वरील अर्जांन्वये दिसून येते. त्यामुळे कमिशनचे काम होण्यासही विलंब झाला. या सर्व बाबी तक्रार अर्जाचा खर्च मंजूर करताना आम्ही विचारात घेऊन तक्रारदार हा तक्रार अर्जाचा खर्च तसेच शारिरिक, मानसिक त्रासापोटीची नुकसानभरपाई मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे मत झाले आहे. वरील सर्व विवेचनावरुन सदरचा मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1. तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे. 2. तक्रारदार यांना सामनेवाला यांनी रक्कम रु.29,800/- (रु.एकोणत्तीस हजार आठशे मात्र) अदा करावेत तसेच सदर रकमेवर तक्रार अर्ज दाखल तारखेपासून संपूर्ण रक्कम पदरी पडेपर्यंत संपूर्ण रकमेवर द.सा.द.शे.9% दराने व्याज अदा करावे असा आदेश करण्यात येतो. 3. तक्रारदार यांना सामनेवाला यांनी शारिरिक, मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.15,000/- (रु.पंधरा हजार मात्र) अदा करावेत असा आदेश करण्यात येतो. 4. वरील सर्व आदेशाची पूर्तता सामनेवाला यांनी दि.31/12/2010 पर्यंत करण्याची आहे. 5. सामनेवाला यांनी विहित मुदतीत आदेशाची पूर्तता न केल्यास तक्रारदार त्यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदीनुसार दाद मागू शकतील. रत्नागिरी दिनांक : 12/11/2010. (अनिल गोडसे) अध्यक्ष, ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, रत्नागिरी जिल्हा. (स्मिता देसाई) सदस्या, ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, रत्नागिरी जिल्हा. प्रत : तक्रारदार यांना हातपोच/रजि.पोस्टाने प्रत : सामनेवाले यांना हातपोच/रजि.पोस्टाने
| [HONABLE MRS. Smita Desai] MEMBER[HONABLE MR. Anil Y. Godse] PRESIDENT | |