निकालपत्र :- (दि.07/08/2010) ( सौ. प्रतिभा जे.करमरकर,सदस्या) (1) तक्रारीची थोडक्यात हकीगत अशी की-यातील तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.3 विमा कंपनीकडून शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत विमा उतरविला होता व त्याची मुदत10 एप्रिल-2005 ते 9 एप्रिल-2006 अशी होती. सदर शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेअंतर्गत एखादया शेतक-याचा अपघाती मृत्यू झाल्यास रक्कम रु.1,00,000/- नुकसान भरपाई सामनेवाला क्र. 3 व 4 यांचेकडून मिळते; त्याचप्रमाणे शेतक-यांच्या शरिराचे दोन अवयक निकामी झालेस रु.1,00,000/-नुकसान भरपाई तसेच एक अवयव निकामी झालेस रु.50,000/-नुकसान भरपाई विमा कंपनीकडून मिळते. त्याप्रमाणे तक्रारदार यांचा विमा सामनेवाला क्र. 3 व4 यांचेकडे उतरविला असल्याने सदर विमा कंपन्यांनी तक्रारदार यांच्या आयुष्याची जोखिम स्विकारलेली आहे. (2) तक्रारदार आपल्या तक्रारीत पुढे सांगतात, यातील तक्रारदार हे आपले शेतामध्ये बांबुचे झाडाची तोड करीत असताना त्यांच्या तन्याचा काटेरी शिराटयाचा तडाखा तक्रारदार यांचे डोळयावर बसल्यामुळे तक्रारदारांचे डाव्या डोळयास दुखापत झाली. त्यावेळी तक्रारदार यांनी पोलीस पाटील यांचे सांगणेनुसार तेजोमय नेत्र रुग्णालय कोल्हापूर मधील डॉ. महेश दळवी यांचेकडे उपचार घेतले. सदर डॉ.दळवी यांनी तक्रारदार यांच्या डाव्या डोळयाचे ऑपरेशन केले आणि औषध उपचारानंतर डोळयाची दृष्टी परत येईल असे तक्रारदारांना सांगितले. त्याप्रमाणे तक्रारदार यांनी औषध उपचार सुरु ठेवले. परंतु तक्रारदार यांच्या डाव्या डोळयावर उपचार करुनही त्यांच्या डाव्या डोळयाची दृष्टी पूर्ण गेली आहे. त्यामुळेत तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.1यांचेकडे पॉलीसीप्रमाणे नुकसानभरपाई मिळण्यासाठी डॉक्टरांचे सर्टीफिकेट, प्रमाणपत्र, पोलीस पाटील यांचा दाखला, 7/12चा उतारा, इत्यादी सर्व मूळ कागदपत्रांसह दाखल केला. त्याप्रमाणे सामनेवाला क्र.2 यांनी सदरची कागदपत्रे सामनेवाला क्र.4 कडे पाठवली. सदर कागदपत्रे मिळाल्यानंतर ही सामनेवाला क्र.3 व 4 यांनी त्यांना तक्रारदारांना क्लेमबाबत काहीच कळवले नाही. तक्रारदाराचा न्याय क्लेम देण्यास सामनेवालाने अशी टाळाटाळ केल्यामुळे तक्रारदाराने प्रस्तुत मंचाकडे तक्रार दाखल करुन आपल्या पुढील मागण्या मान्य व्हाव्यात अशी विनंती सदर मंचास केली आहे. तक्रारदाराचा डावा डोळा निकामी झालेने नुकसानीची रक्कम रु.50,000/-, तक्रारदारांच्या उजव्या डोळयाची दृष्टी कमी झालेमुळे रक्कम रु.25,000/-, डोळयाचे ऑपरेशन व औषधोपचाराकरिता आलेला खर्च रु.10,400/-, मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.10,000/-व झालेल्या प्रवासखर्चाकरिता रु.2,000/-व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.2,500/-असे एकूण रक्कम रु.99,400/-सामनेवाला यांचेकडून वसूल होऊन मिळावा अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे. (3) तक्रारदाराने आपल्या तक्रारीसोबत तक्रारदाराचे शेतीचा 7/12 उतारा, तलाठी यांचा दाखला, पंचनामा, क्लेम फॉर्म, तेजोमय नेत्र रुग्णालयाचे सर्टीफिकेट, डॉ.पाटील नेत्र रुग्णालय यांचे कार्ड, तहसिलदार राधानगरी यांनी सामनेवाला क्र.4 यांना पाठविलेले पत्र, तक्रारदारांचा सामनेवाला क्र.2 यांना दिलेला विनंती अर्ज, सामनेवाला क्र.4 यांचे सामनेवाला क्र.2 यांना दिलेले पत्र, सामनेवाला क्र.4 यांचा तक्रारदारांना मिळालेला पत्राचा लखोटा इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (4) सामनेवाला क्र. 1 व 2 यांनी आपल्याकडील तक्रारदाराने दाखल केलेली सर्व कागदपत्रे सामनेवाला क्र.3 कडे दाखल केली असून त्यांना केवळ औपचारीक पक्षकार केले आहे. (5) सामनेवाला क्र.4 यांनी त्यांचे लेखी म्हणणेत सदर विमा योजनेबाबत आपण केवळ ब्रोकर/कन्स्लटंट म्हणून काम करीत असून विमा क्लेम मंजूर करणे/न करणे ही सर्व जबाबदारी सामनेवाला क्र.3 ची आहे असे कथन केले आहे. (6) सामनेवाला क्र.3 यांनी तक्रारदाराची विमा पॉलीसी मान्य केली आहे. पंरतु तक्रारदाराने सामनेवालाचा चुकीचा पत्ता दिल्यामुळे तक्रारदाराचा क्लेम फॉर्म व कागदपत्रे सामनेवाला क्र.3 कडे उशिरा पोचली. तक्रारदारांना अपघात दि.03/06/2005 रोजी झाल्याचे कागदपत्रावरुन व डॉक्टरांच्या सर्टीफिकेटवरुन दिसून येत आहे.परंतु सामनेवाला क्र.3कडे क्लेम पेपर्स सन 2008 मध्ये आले.मुदतबाहय क्लेम असल्यामुळे सामनेवाला क्र.3 ने सदर क्लेमचा विचार केला नाही. तसेच डोळयाच्या अपंगत्वाबद्दल सर्टीफिकेटही सिव्हील सर्जन यांचे दिले नाही. त्यामुळे सदर क्लेम अनिर्णित राहण्यास सामनेवाला यांचेकडून कुठलीही सेवात्रुटी झाली नाही.सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह फेटाळून टाकावी असे सामनेवाला क्र.3 चे कथन आहे. (7) सामनेवाला यांनी आपले म्हणणेसोबत कोणतेही कागदपत्र दाखल केलेले नाहीत.
(8) या मंचाने तक्रारदाराच्या वकीलांचा युक्तीवाद ऐकला तसेच तक्रारदाराने दाखल केलेले कागदपत्र तपासले.
(9) तक्रारदारांना दि.03/06/2005 रोजी बांबुच्या काटेरी पानामुळे डोळयाला अपघात होऊन त्यांच्यावर डॉ.दळवी तेजोमय नेत्र रुग्णालय येथे उपचार करण्यात आले.परंतु त्यांचा उपयोग न होता तक्रारदाराच्या डाव्या डोळयाची दृष्टी पूर्णपणे गेली असा डॉ.दळवींचे सर्टीफिकेट आहे. तक्रारदाराची विमा पॉलीसी सामनेवाला क्र.3 विमा कंपनीने अमान्य केली नाही. तक्रारदाराचे क्लेमपेपर्स सामनेवाला क्र.2 मार्फत सामनेवाला क्र.4 कडे दाखल केले होते. परंतु पत्त्यातील व नावातील चुकीमुळे सदर पेपर्स सामनेवाला क्र.3 विमा कंपनीकडे सन 2008रोजी पोचले असे सामनेवाला क्र.3 चे कथन आहे. (10) तक्रारदाराची पॉलीसी, डोळयाला झालेला अपघात व त्यामुळे आलेले अपंगत्व याबाबतीत कुठलाही संदेह नाही. सामनेवाला क्र.3 कडे क्लेमपेपर्स सर्व आवश्यक कागदपत्रांसह पोचवण्यात अनवधानाने सामनेवाला क्र.2 कडून चुक झालेली दिसून येत आहे. परंतु सदर प्रशासकीय चुकीचा आधार घेऊन सामनेवाला क्र.3 विमा कंपनीला तक्रारदाराचा न्याय क्लेम अनिर्णित किंवा नामंजूर करता येणार नाही अशा निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. विमा उतरविण्याचा मूळ हेतू (Main Purpose) तक्रारदाराला झालेला अपघात व त्यामुळे आलेले अपंगत्व विचारात घेऊन सामनेवाला क्र.3 विमा कंपनीची सदर क्लेमबाबत योग्य निर्णय घेण्याची जबाबदारी होती व ती पार न पाडणे ही सामनेवालाची नि:संशय सेवात्रुटी आहे असे आमचे स्पष्ट मत आहे. तक्रारदार यांनी डॉक्टरी उपचाराची बीले दाखल केली नाहीत व पॉलीसी अंतर्गतही ती देय नाहीत. त्यामुळे त्याबाबतीतली तक्रारदाराची मागणी हे मंच ग्राहय धरु शकत नाही. सबब हे मंच पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते. 2) सामनेवाला क्र.3विमा कंपनीने तक्रारदाराला पॉलीसी नियमाप्रमाणे रक्कम रु.50,000/- (रु.पन्नास हजार फक्त) दि.03/06/2008 पासून द.सा.द.शे.9 टक्के व्याजासह दयावी. 3) सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) अदा करावेत.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |