सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर
उपस्थिती - मा.सौ.सविता भोसले,अध्यक्षा
मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्य.
मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्या.
तक्रार अर्ज क्र. 181/2012
तक्रार दाखल दि.14-02-2013.
तक्रार निकाली दि.28-08-2015.
श्रीमती. निर्मला शंकरराव गोंजारी
रा. युनिट नं. 3, सर्व्हे नं.77अ/1अ/1बी/1,
चैतन्य रेसिडेन्सी, करंजे-तर्फे सातारा. .... तक्रारदार.
विरुध्द
मे. गानू अँण्ड पाटील असोसिएटस्,सातारा तर्फे भागीदार
1. श्री. मोहन रामचंद्र गानू,
2. श्री. मंदार मोहन गानू,
दोघे रा.मोहर बंगला, प्लॉट नं. 14,
सावंत कॉलनी, शाहूनगर, गोडोली,सातारा
3. श्री. महेश नामदेव पाटील,
रा.एफ-7, मलालक्ष्मी कॉम्प्लेक्स, सदर बझार,सातारा
4. मॅनेजर,कर्नाटका बँक लि.,शा.सातारा
यशोधन कॉम्प्लेक्स, सायन्स कॉलेजसमोर,सातारा .... जाबदार.
तक्रारदारातर्फे –अँड.पी.पी.खामकर.
जाबदार तर्फे – अँड.के.व्ही.पाटील.
न्यायनिर्णय
(सदर न्यायनिर्णय मा.सौ.सविता भोसले, अध्यक्षा यानी पारित केला)
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 नुसार दाखल केला आहे. तक्रारअर्जातील थोडक्यात मजकूर पुढीलप्रमाणे-
तक्रारदार हे करंजे तर्फे सातारा येथील रहिवासी आहेत. तर जाबदार क्र. 1 ते 3 हे गाणू अँन्ड पाटील असोसिएटस् नावाने बांधकाम व्यवसाय करतात. सर्व्हे नं. 77 अ/1 अ/1 ब/1, इंदलकरनगर,म्हसवे रोड, करंजे तर्फ सातारा या मिळकतीमध्ये ‘चैतन्य रेसिडेन्सी’ या नावाने बंगलो स्कीम जाबदाराने तयार केली आहे. सदर स्कीम सादर करतेवेळी जाबदाराने प्रस्तुत मिळकतीमधील स्कीममध्ये युनिट नं. 1 हा मॉडेल युनिट म्हणून सर्व सोयीनीयुक्त असा बंगलो बांधून त्याव्दारे उर्वरीत स्कीममधील बंगलो युनिट विक्री करणेसाठी सदर मॉडेल युनिटमधील सोयी-सुविधा, किमान सुविधा म्हणून (Basic Amenities) पुरवल्या जातील अशा स्वरुपामध्ये जाहीरात (Marketing) केली. तक्रारदार व त्यांचा मुलगा दोघेही नोकरीस असलेने सातारा येथे रहाणेसाठी प्रस्तुत जाबदार यांचे वर नमूद केलेप्रमाणे बंगलो युनिट क्र. 3 चे खरेदीबाबत जाबदार क्र. 1 ते 3 यांचेशी चर्चा करुन व जाबदाराने बांधलेल्या मॉडेल युनिटमधील सोयीसुविधा तक्रारदार यांना पसंद पडल्याने व प्रस्तुत सर्व सुविधा जाबदाराने तक्रारदाराचे युनिट नं. 3 मध्ये देण्याचे जाबदार यांनी मान्य केलेने तक्रारदाराने सदर बंगलो युनिट नं. 3 खरेदी करणेबाबतचा व्यवहार रक्कम रु.15,00,000/- (रुपये पंधरा लाख मात्र) या किंमतीस ठरवला. त्यानुसार ता.9/11/2009 रोजी तक्रारदार यांना जाबदाराने साठेखत करुन दिले व प्रस्तुत युनिटचा ताबा दि.1/2/2010 पूर्वी देणेचे मान्य केले. प्रस्तुत साठेखताचेवेळी तक्रारदाराने जाबदार क्र. 1 ते 3 यांना रक्कम रु.2,25,000/- (रुपये दोन लाख पंचवीस हजार मात्र) अदा केले व ऊर्वरीत रक्कम रु.12,75,000/- (रुपये बारा लाख पंच्याहत्तर हजार मात्र) जानेवारी 2010 मध्ये होणा-या खरेदीपत्रावेळी भरणा करुन सदर व्यवहार पूर्ण करणेचे ठरले. जाबदाराने जाबदार क्र. 4 या बँकेतून कर्ज अर्थसहाय्य घेणेस तक्रारदाराला सांगीतले. कारण जाबदार क्र. 1 ते 3 चा नियमीत व्यवहार या बँकेतील खातेवर होता. त्यामुळे तक्रारदाराने जाबदार क्र. 1 ते 3 चे सहकार्याने जाबदार क्र. 4 बँकेकडील रक्कम रु.11,00,000/- (रुपये अकरा लाख मात्र) अर्थ सहाय्य मिळणेसाठी अर्ज केला. त्यानुसार जाबदार क्र. 4 बँकेने तक्रारदाराला सदर मिळकत खरेदीसाठी जानेवारी 2010 मध्ये होऊ घातलेले खरेदीपत्राचे वेळी बांधकाम पूर्ण झालेबाबत खात्री करुन घेऊन तदनंतरच रक्कम रु.11,00,000/- (रुपये अकरा लाख मात्र) कर्ज रक्कम जाबदार क्र. 1 ते 3 यांना अदा करणेबाबत जाबदार क्र. 4 बँकेने स्पष्ट केले. त्याचप्रमाणे जाबदार क्र. 4 ही राष्ट्रीयकृत बँक असलेने बांधकामाचे टप्पे व मंजूर आराखडयाप्रमाणे बांधकाम पूर्ण झालेनंतर उर्वरीत संपूर्ण अर्थसहाय्य अगर बांधकाम पूर्ण झाल्यानंतर खरेदीपत्राचे वेळी मंजूर अर्थसहाय्याचा एकरकमी धनादेश देण्याची ग्वाही जाबदार क्र. 4 ने दिली.
परंतू जाबदार क्र. 1 ते 3 यांनी अपेक्षीत वेळेत बांधकाम पूर्ण केले नाही. तसेच जाबदार नं. 4 यांचेकडून हातमिळवणी करुन (रुपये अकरा लाख मात्र) जाबदार क्र. 1 ते 3 यांचे खातेवर वर्ग करुन दि.25 जानेवारी 2010 रोजी खरेदीपत्र करुन देणेबाबत तक्रारदाराला समज दिली. त्यानुसार जाबदाराने स्वतः इंग्रजी टंकलिखित केलेल्या दस्तावर तक्रारदाराच्या सहया घेतल्या. तद्नंतर सदर दस्त त्याचदिवशी नोंदणीकृत न करता दि.2/2/2010 रोजी नोंदविण्यात आला. प्रस्तुत खरेदीपत्रादिवशी तक्रारदाराने जाबदाराला अपू-या बांधकामाबाबत विचारणा करता खरेदी व्यवहारातील उर्वरीत रक्कम रु.1,75,000/- (रुपये एक लाख पंच्याहत्तर हजार फक्त) मॉडेल बंगलो युनिट नं. 1 नुसार पुढील 3 महिन्यात बांधकाम पूर्ण झालेनंतर चेकने दर्शविलेली सदर रक्कम अदा करणेबाबत सुचविले. प्रस्तुत खरेदी दस्तात जाबदार क्र. 4 बँकेने रक्कम रु.11,00,000/- (रुपये अकरा लाख मात्र) जाबदाराला दिले धनादेश अगर डि.डि.बाबत कोणताही उल्लेख न करता दस्त पूर्ण केला. सदर खरेदी दस्तानंतर जाबदार क्र. 1 ते 4 यांनी संगनमताने परस्पर रक्कम रु.11,00,000/- (रुपये अकरा लाख मात्र) चा व्यवहार केला व बांधकाम पूर्ण होणेपूर्वीच अगर वस्तुस्थितीची पाहणी न करताच फेब्रुवारी, 2010 पासून तक्रारदारास कर्जाचा हप्ता सुरु झाला. जाबदार क्र. 4 बँकेने नियमांचे उल्लंघन करुन सेवेत त्रुटी दिली आहे. तसेच जाबदार क्र. 1 ते 3 यांनी ठरले वेळेत बांधकाम पूर्ण करुन तक्रारदारास वेळेवर ताबा दिला नाही. त्यामुळे जाबदार क्र. 1 ते 3 यांनी चक्क फसवणूक केली. जून,2010 पर्यंत देखील जाबदार क्र. 1 ते 3 ने बांधकाम पूर्णत्वास नेले नाही. आधिच कर्जाची रक्कम जाबदाराने बँकेकडून उचलल्यामुळे बांधकाम न करता तक्रारदाराला त्रास देण्यास सुरुवात केली. तक्रारदाराने अपूर्ण कामाची यादी काढून जाबदार क्र. 4 यांना दिली. तसेच जाबदार क्र. 2 ला ही दिली. अखेर ता.11/8/2010 रोजी तक्रारदार यांच्या मिळकतीत वीज जोड देण्यात आला त्यावेळी तक्रारदाराकडून रक्कम रु.75,000/- चेकव्दारे येणे रकमेमधून वसूल करुन घेतले व उर्वरीत कामे पंधरा दिवसात पूर्ण करुन देण्याचे आश्वासन जाबदाराने दिले. तदनंतर जाबदाराने उर्वरीत कामे सुरु केली. दि.16/9/2010 रोजी जाबदार क्र. 1 ते 3 ने तकारदाराला सदर मिळकतीचा ताबा दिला. त्यावेळी तक्रारदाराचे लक्षात आलेली मॉडेल बंगलो युनिट नं. 1 मधील सोयी सुविधा तक्रारदाराच्या बंगल्यात दिलेल्या नाहीत. साध्या पध्दतीने तकलादू सुविधा दिल्या आहेत. प्रस्तुत बाब तक्रारदाराने जाबदाराचे निदर्शनास आणून दिली त्यावेळी जाबदाराने व सदर खरेदीपत्रातील साक्षीदार यांनी याबाबतीत काहीही करु शकत नसलेचे म्हटले.
तक्रार अर्ज पॅरा नं. 9 अ मध्ये युनिट 1 मध्ये असले सुविधांची यादी व पॅरा 9 ब मध्ये यनिट 3 च्या अपूर्ण बाबींची यादी दिली आहे. व तक्रारदाराचे युनिट बंगलोत निकृष्ठ दर्जाच्या सुविधा दिल्या, माल निकृष्ठ दर्जाचा वापरला आहे. तसेच तक्रारदाराला पिण्याच्या पाण्याचे कनेक्शन अद्याप दिलेले नसलेने बोअरचे साठवण टाकीतील क्षारयुक्त पाणी प्यावे लागते जे पिण्यास धोकादायक आहे. सदर सर्व बाबींची जाबदाराला दि.7/12/2010 रोजी वकीलांमार्फत नोटीस देऊन कल्पना दिली. नोटीस जाबदार क्र. 1 ते 4 यांना मिळूनही आवश्यक ते बदल अगर पूर्तता जाबदाराने केली नाही अगर नोटीसला उत्तरही दिले नाही. तसेच खरेदीपत्रानुसार उर्वरीत रक्कम तक्रारदार रु.1,75,000/- (रुपये एक लाख पंच्याहत्तर हजार मात्र) दि.17/8/2010 चे दरम्यान पैकी रक्कम रु.75,000/- (रुपये पंच्याहत्तर हजार मात्र) जाबदाराला दिले नसतानाही जाबदाराने उर्वरीत रक्कम रु.1,00,000/- ऐवजी खरेदीपत्रावेळी दिलेचे सदर रक्कम रु.2,00,000/- रुपये दोन लाख मात्र) नमूद करुन सदरचा चेक तक्रारदाराचे खात्यावरुन अनादर करुन घेतला तदनंतर चेकबाबत जाबदाराने तक्रारदाराला नोटीस दिली व तक्रारदारावर फौजदारी खटला क्र. 1133/2010 हा सातारा येथील फौजदारी न्यायालयात दाखल केला. अशाप्रकारे जाबदाराने, तक्रारदाराने खरेदी केले युनिट नं. 3 या बंगल्यात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरुन व ठरलेप्रमाणे योग्य सोयीसुविधा न देऊन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन तक्रारदाराची घोर फसवणूक जाबदार यांनी केलेने, जाबदार यांचेकडून मॉडेल युनिट नं. 1 प्रमाणे सर्व सोयीसुविधा तक्रारदाराचे युनिट क्र. 3 मध्ये करुन द्याव्यात व निकृष्ठ दर्जाच्या व चुकीच्या बाबी या तक्रार कामी यादीने देण्यात आलेल्या सर्व या जाबदाराने तक्रारदाराचे युनिटमध्ये वेळेत पुरवाव्यात नुकसानभरपाई व अर्जाचा खर्च मिळावा यासाठी प्रस्तुत तक्रार अर्ज तक्रारदाराने मे. मंचात दाखल केला आहे.
2. तक्रारदाराने प्रस्तुत कामी जाबदारकडून मॉडेल युनिट क्र. 1 प्रमाणे सर्व सोयी सुविधा पूर्ण होऊन मिळाव्यात व योग्य दर्जाच्या मिळाव्यात, जाबदाराने खरेदीपत्रातील रकमेव्यतिरिक्त बेकायदेशीर आकारणी करुन ताब्यात असले को-या चेकचा गैरफायदा घेऊन दिले नाहक त्रासाबाबत कॉम्पेनसेटरी कॉस्ट म्हणून रक्कम रु.1,00,000/- (रुपये एक लाख मात्र) अदा करणेबाबत आदेश व्हावेत, जाबदार क्र. 4 कडून रक्कम रु.50,000/- कॉम्पेनसेटरी कॉस्ट मिळावी, मानसिकत्रासाबाबत जाबदार क्र. 1 ते 4 कडून रक्कम रु.25,000/- मिळावेत व अर्जाचा खर्च रक्कम रु.15,000/- मिळावा अशी विनंती केली आहे.
3. तक्रारदाराने प्रस्तुत कामी नि. 2 कडे अँफीडेव्हीट, नि. 5 चे कागदयादीसोबत नि.5/1 ते 5/9 कडे अनुक्रमे साठेखत, खरेदीपत्र, वकीलांमार्फत तक्रारदाराने जाबदाराला दिलेली नोटीस, रजि.पावत्या, यु.पी.सी. पावती, पोस्टाच्या पोहोतच पावत्या, न स्विकारलेला नोटीस लखोटा, तक्रारदाराचे बँक पासबुक, उतारा, खरेदी दस्तातील IDBI बँकेचा चेक क्र. 006242, नि. 35 चे कागदयादीसोबत नि. 35 अ कडे फौजदारी अपील नं. 74/2012 मधील फौजदारी कोर्टात तक्रारदार व जाबदार यांचे दरम्यान झाले तडजोडीची सही शिक्क्याची नक्कल वगैरे कागदपत्रे तक्रारदाराने याकामी दाखल केली आहेत.
4. प्रस्तुत कामी जाबदार क्र. 1 ते 3 यांनी नि.24 कडे म्हणणे, नि.25,26,27 कडे म्हणण्याचे अँफीडेव्हीट, नि.28 कडे जाबदार क्र. 4 चे अँफीडेव्हीट, नि. 29 कडे जाबदार क्र. 4 चे म्हणणे, नि. 33 चे कागदयादीसोबत सातारा येथील फौजदारी केसमधील S.C.C. 1133/2010 मधील जजमेंटची नक्कल वगैरे कागदपत्रे मे. मंचात दाखल केली आहेत.
वर नमूद जाबदार क्र. 1 ते 4 यांनी तक्रारदाराचे तक्रार अर्जातील सर्व कथने फेटाळली आहेत. परंतू प्रस्तुत जाबदार व तक्रारदार यांचे दरम्यान फौजदारी अपील क्र. 72/2010 मध्ये तडजोड झाली असून प्रस्तुत तक्रारदार यांचे मागणीप्रमाणे सर्व पूर्तता जाबदाराने व तक्रारदाराने केलेल्या आहेत. त्यामुळे जाबदार यांनी तक्रारदारानी याकामी मागणी केलेपैकी सर्व पूर्तता जाबदाराने करुन दिली आहे. फक्त अत्यावश्यक बाब म्हणून जाबदार यांनी पिण्याचे पाण्याचे कनेक्शन तक्रारदार यांचे युनिट नं. 3 मध्ये जोडून देणे व नुकसानभरपाई एवढयाच मागण्या आता उर्वरीत राहीलेने प्रस्तुत मागण्या जाबदार क्र. 1 ते 3 यांनी पूर्ण कराव्यात, जाबदार क्र. 4 कडून कोणतीही मागणी नाही असा युक्तीवाद तक्रारदार व जाबदार यांनी केला आहे.
5. प्रस्तुत कामी मे. मंचाने प्रस्तुत तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दयांचा विचार केला.
अ.नं. मुद्दा निष्कर्ष
1. तक्रारदार हे जाबदाराचे ग्राहक आहेत काय ? होय
2. जाबदाराने तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय ? होय
3. अंतिम आदेश काय ? खालील नमूद
आदेशाप्रमाणे
विवेचन-
6. वर नमूद मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत. कारण- तक्रारदाराने जाबदार क्र. 1 ते 3 यांचेकडून सर्व्हे नं. 77 अ/1अ/1ब/1, इंदलकरनगर, म्हसवे रोड, करंजे तर्फे, सातारा या मिळकतीत ‘चैतन्य रेसिडेन्सी’ या नावाचे बंगलो स्कीममध्ये युनिट नं. 3 खरेदी करणेचा व्यवहार रक्कम रु.15,00,000/- (रुपये पंधरा लाख मात्र) ला ठरला व दि. 9/11/2009 रोजी प्रस्तुत युनिट क्र. 3 बंगल्याचे नोंदणीकृत साठेखत जाबदाराने तक्रारदाराला करुन दिले. प्रस्तुत रकमेपैकी रक्कम रु.2,25,000/- (रुपये दोन लाख पंचवीस हजार मात्र) तक्रारदाराने जाबदाराला अदा केले व उर्वरीत रक्कम रु.12,75,000/- (रुपये बारा लाख पंच्याहत्तर हजार मात्र) खरेदीपत्रावेळी देण्याचे ठरले. प्रस्तुत कामी तक्रारदाराने नोंदणीकृत साठेखत, खरेदीपत्र, नि. 5 चे कागदयादीसोबत दाखल केले आहे. जाबदाराने नोंदणीकृत साठेखत व खरेदीपत्र झालेचे मान्य केले आहे. तसेच प्रस्तुत कामी जाबदार यांनी तक्रारदार यांचेविरुध्द निगोशिएबल इन्स्टूमेंट अँक्ट कलम 138 नुसार चेक बाऊन्स झालेने स.क्री.केस नं. 1133/2010 ही मे फौजदारी कोर्टात दाखल केली होती. प्रस्तुत केसचा निकाल दि.2/6/2012 रोजी झाला व तक्रारदाराने या निकालावर मे. जिल्हा न्यायालयात फौजदारी अपील नं.74/12 दाखल केले होते. प्रस्तुत कामी मे. जिल्हा न्यायालयामध्ये उभयपक्षकार तक्रारदार व जाबदार (अपेलंट व रिस्पॉंडंट) यांचेदरम्यान तडजोड झाली असून रिस्पॉंडंट यांनी तक्रारदाराने या मे. मंचात दाखल केले तक्रार अर्जात मागणी केलेल्या सर्व मागण्यांची पूर्तता केलेली असून फक्त पिण्याचे पाण्याचे कनेक्शन तक्रारदाराचे युनिट नं. 3 यामध्ये देण्याचे राहीले आहे. तसेच तक्रारदाराला नुकसानभरपाई मिळावी एवढीच मागणी जाबदारानी पूर्ण करणेचे राहून गेले असून जाबदार यांचेकडून पिण्याचे पाण्याचे कनेक्शन व नुकसानभरपाई व अर्जाचा खर्च मिळावा. इतर सर्व मागण्या जाबदाराने पूर्ण केलेबाबत तक्रारदाराने त्यांचे तोंडी युक्तीवादात कथन केले आहे. सबब याबाबतीत म्हणजेच अत्यावश्यक बाब म्हणून, पिण्याचे पाणी कनेक्शन जीवन प्राधीकरणामार्फत जाबदाराने तक्रारदार यांना देणे ही अत्यावश्यक बाब असतानाही जाबदार क्र. 1 ते 3 यांनी ती पूर्ण केलेली नाही. सबब जाबदार क्र. 1 ते 3 यांनी तक्रारदाराला सदोष सेवा दिली आहे असे आमचे स्पष्ट मत आहे. त्यामुळे आम्ही मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर होकारार्थी दिले आहे. तसेच तक्रारदाराने जाबदार क्र. 4 कडून कोणतीही मागणी नाही असे कथन केले आहे. सबब जाबदार क्र. 4 यांचेवर कोणतीही जबाबदारी बसविणे न्यायोचीत होणार नाही असे या मे. मंचाचे स्पष्ट मत आहे.
सबब प्रस्तुत कामी तक्रारदाराने तक्रार अर्ज पॅरा क्र. 10 ब मधील कलम 14 – जीवनप्राधिकरणाचे पिण्याचे पाण्याचे नळ जोडून देणे ही जाबदाराची जबाबदारी असून ती अत्यावश्यक बाब असलेने जाबदार क्र. 1 ते 3 यांनी तक्रारदाराचे युनिट नं. 3 बंगल्यात जीवन प्राधिकरणाचे पिण्याचे पाण्याचे नळ (कनेक्शन) जोडून तक्रारदारांना पिण्याचे पाणी तात्काळ उपलब्ध करुन देणे न्यायोचीत होणार आहे. सबब जाबदार क्र. 1 ते 3 यांनी तक्रारदार यांना जीवनप्राधीकरणाकडून पिण्याचे पाण्याचे नळ कनेक्शन ताबडतोब जोडून तक्रारदार यांना पिण्याचे पाणी उपलब्ध करुन द्यावे. तसेच जाबदार क्र. 1 ते 3 यांनी तक्रारदार यांना झाले शारिरीक व मानसिकत्रासासाठी रक्कम रु.20,000/- (रुपये वीस हजार फक्त) व अर्जाचा खर्च म्हणून रक्कम रु.5,000/-(रुपये पाच हजार फक्त) अदा करणे न्यायोचीत होणार आहे असे या मे. मंचाचे स्पष्ट मत आहे.
8. सबब आम्ही खालीलप्रमाणे अंतीम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1. तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2. जाबदार क्र. 1 ते 3 यांनी तक्रारदार यांना त्यांचे युनिट नं.3 या बंगल्यात
जीवन प्राधीकरणाचे पिण्याचे पाण्याचे नळ (कनेक्शन) जोडून द्यावे व
तक्रारदाराचे पिण्याचे पाण्याची गरज तात्काळ पूर्ण करावी. प्रस्तुत पिण्याचे
पाणी नळ कनेक्शन जोडून देण्याचे काम जाबदार क्र. 1 ते 3 यांनी आदेश
पारीत तारखेपासून 30 दिवसांचे आत पूर्ण करुन द्यावे.
3. जाबदार क्र. 1 ते 3 यांनी तक्रारदार यांना मानसीक व शारिरीक त्रासापोटी
रक्कम रु.20,000/- (रुपये वीस हजार फक्त) व अर्जाचा खर्च म्हणून रक्कम
रु.5,000/-(रुपये पाच हजार फक्त) अदा करावेत.
4. जाबदार क्र. 4 यांना याकामी जबाबदारीतून वगळणेत येते.
5. वरील सर्व आदेशाचे पालन जाबदार क्र. 1 ते 3 यांनी आदेश पारीत
झालेपासून 30 दिवसांचे आत करावे.
6. विहीत मुदतीत आदेशाचे पालन जाबदार क्र. 1 ते 3 यांनी न केलेस तक्रारदार
यांना जाबदारांविरुध्द ग्राहक संरक्षण कायदा कलम 25 व 27 प्रमाणे कारवाई
करणेची मुभा राहील.
7. सदर न्यायनिर्णयाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य पाठवणेत याव्यात.
8. सदर न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
ठिकाण- सातारा.
दि. 28-08-2015.
(सौ.सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ.सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.