तक्रारदारांतर्फे अॅड. जयश्री कुलकर्णी
जाबदेणार एकतर्फा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
द्वारा- श्रीमती अंजली देशमुख, मा. अध्यक्ष यांचेनुसार
:- निकालपत्र :-
दिनांक 30 मे 2012
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे-
1. तक्रारदार जेष्ठ नागरिक असून त्यांनी जाबदेणार यांच्या गंगा रिट्रीट कन्ट्रीसाईड क्लबचे सभासदत्व रक्क्म रुपये 30,000/- दिनांक 7/6/2003 च्या चेकद्वारे भरुन स्विकारले. सभासदत्व सहा वर्षासाठी होते. जाबदेणार यांनी तक्रारदारांना रक्क्म भरल्याची पावती दिली. जाबदेणार यांनी वेगवेगळया सुविधा देण्याचे आश्वासन तक्रारदारांना दिले होते. त्यामध्ये कुटूंबातील दोन सभासदांसाठी सभासदत्व कार्ड, हॉलिडे रिक्वीझिशिन कार्ड, एक वर्षासाठी कॅशलेस मेडिक्लेम सर्टिफिकीट, सभासदत्व कालावधीत दरवर्षी 8 दिवस/7 रात्री साठी हॉलिडे सर्टिफिकीट, रिफंड सर्टिफिकीट, नियम व नियमावली बुक, सभासदत्व कालावधीत 3 दिवस/2 रात्री गोवा येथे फ्री स्टे इ. इ. देण्याचे आश्वासन दिले होते. जाबदेणार यांनी रिफंड सर्टिफिकीट दिले नाही. म्हणून तक्रारदारांनी दिनांक 29/09/2004 रोजीच्या पत्रान्वये मागणी केली. परंतु जाबदेणार यांनी दुरध्वनी वरुन 12 वर्षानंतर कुपन द्वारे रिफंड करु व 35 वर्षानंतर चेक द्वारे रिफंड करु असे सांगितले. जाबदेणार यांनी सांगितलेला कालावधी दिनांक 07/06/2009 रोजी संपला. तक्रारदारांनी वारंवार दुरध्वनीवरुन, मेल द्वारे रिफंडची मागणी करुनही जाबदेणार यांनी रिफंड सर्टिफिकीट दिले नाही म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून रिफंड सर्टिफिकीट अथवा रुपये 30,000/- परत मिळावेत, नुकसान भरपाईपोटी रुपये 50,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 5000/- मिळावा अशी मागणी करतात. तक्रारदारांनी शपथपत्र आणि कागदपत्रे दाखल केली.
2. जाबदेणार यांना मंचाची नोटीस लागूनही गैरहजर. म्हणून जाबदेणार यांच्याविरुध्द मंचाने एकतर्फा आदेश पारीत केला.
3. तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. जाबदेणार यांच्या दिनांक 07/06/2003 च्या पावतीचे अवलोकन केले असता तक्रारदारांनी रुपये 30,000/- भरल्याचे नमूद करण्यात आलेले आहे. तसेच पावतीमध्ये “Sr. Citizen for 6 years” असे नमूद करण्यात आलेले आहे. तसेच जाबदेणार यांच्या दिनांक 6/6/2003 च्या पत्राचे अवलोकन केले असता तक्रारदारांना देण्यात आलेल्या Personalized Membership Kit मध्ये “6. Refund Certificate ” चाही समावेश असल्याचे स्पष्ट होते. म्हणजेच जेष्ठ नागरिकांसाठी सभासदत्व कालावधी सहा वर्षांचा होता व त्यानंतर रकमेचा परतावा/ रिफंड सर्टिफिकीट जाबदेणार तक्रारदारांना देणार होते. परंतु जाबदेणार दिनांक 7/6/2009 रोजी सभासदत्व कालावधी संपल्यानंतरही तक्रारदारांनी दिनांक 29/09/2004, 20/12/2004, 19/8/2005 रोजी मागणी करुनही रकमेचा परतावा दिला नाही/ रिफंड सर्टिफिकीट दिले नाही, उलट दिनांक 20/12/2004 च्या पत्रान्वये तक्रारदारांना 12 वर्षानंतर कुपन्स द्वारा रकमेचा परतावा मिळेल व 35 वर्षानंतर चेकद्वारा मिळेल असे कळविले. तक्रारदारांकडून सभासदत्वाची रक्कम स्विकारतांना तक्रारदारांना याबाबत सांगण्यात आलेले नव्हते. ही जाबदेणार यांच्या सेवेतील त्रुटी व अनुचित व्यापारी पध्दतीचा अवलंब आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. म्हणून तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून रुपये 30,000/- तक्रार दाखल दिनांक 09/12/2010 पासून 9 टक्के द.सा.द.शे व्याजासह व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- मिळण्यास पात्र आहेत असे मंचाचे मत आहे.
वरील विवेचनावरुन व दाखल कागदपत्रांवरुन खालीलप्रमाणे आदेश देण्यात येत आहे-
:- आदेश :-
[1] तक्रार अंशत: मान्य करण्यात येत आहे.
[2] जाबदेणार यांनी तक्रारदारांना रक्क्म रुपये 30,000/- तक्रार दाखल दिनांक 09/12/2010 पासून 9 टक्के द.सा.द.शे व्याजासह संपुर्ण रक्कम अदा होईपर्यन्त आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयात दयावी.
[3] जाबदेणार यांनी तक्रारदारांना तक्रारीचा खर्च रक्क्म रुपये 1000/- अदा करावा.
आदेशाची प्रत दोन्ही पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.
[एस.के.कापसे] [अंजली देशमुख]
सदस्य अध्यक्ष