मंचाचे निर्णयांन्वये श्री. मिलिंद केदार, सदस्य. - आ दे श – (पारित दिनांक : 24/11/2010) 1. प्रस्तुत तक्रार तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत दाखल केलेली असून तक्रारकर्त्याच्या तक्रारीचा आशय असा आहे की, त्याने गैरअर्जदार क्र. 3 द्वारा निर्मित न्यु मायका ची 90 शीट किंमत रु.1,08,000/- गैरअर्जदार क्र. 1 कडून एप्रिल 2009 मध्ये खरेदी करुन कार्यालयीन फर्निचरकरीता उपयोगात आणले. सदर न्युमायकाची शीट ही चांगल्या गुणवत्तेची व खात्रीची असल्याबाबतची हमी गैरअर्जदार क्र. 1 ने व वितरक गैरअर्जदार क्र. 2 आणि गैरअर्जदार क्र. 3 च्या प्रतिनीधींनी दिली. तक्रारकर्त्याच्या पुढे असे लक्षात आले की, जुन 2009 मध्ये सदर न्युमायका फर्निचरला जेथे जेथे लावलेली आहे, तेथून पसरत जाऊन आपोआप तुटत गेली. याबाबत तक्रारकर्त्याने गैरअर्जदाराला 07.09.2009 च्या नोटीसद्वारे तक्रार केली. गैरअर्जदार क्र. 3 चे प्रतिनिधी श्री शोभित साह व गैरअर्जदार क्र. 1 यांनी दि.14.09.2009 रोजी तक्रारकर्त्याच्या कार्यालयाला भेट देऊन तपासणी केली व गैरअर्जदार क्र. 1 ने विकलेल्या वरील न्यूमायकामध्ये त्रुटी व दोषपूर्ण असल्याचे कबूल करुन तसे पत्र तक्रारकर्त्याला दिले आणि एक महिन्याचे आत निवारण करण्याचे आश्वासन दिले. तसेच नोटीसला दिलेल्या उत्तरातसुध्दा गैरअर्जदार क्र. 3 च्या न्युमायकाच्या उत्पादनात त्रुटी असल्याचे कबुल केले आहे. तक्रारकर्त्याने वरील त्रुटीपूर्ण न्युमायकाबाबत सदर तक्रार मंचासमोर दाखल करुन वादग्रस्त न्युमायकाची किंमत रु.1,08,000/-, सदर न्युमायका लावण्याकरीता आलेल्या सामुग्रीचा खर्च रु.1,66,550/-, वॅट कर रु.34,319/-, मजूरी रु.1,09,000/- अशी एकूण रु.4,17,869/- ची मागणी केलेली आहे. 2. सदर तक्रारीचा नोटीस गैरअर्जदारांवर बजावण्यात आला असता गैरअर्जदार क्र. 1 व 3 यांनी सदर तक्रारीस लेखी उत्तर दाखल केले. गैरअर्जदार क्र. 2 यांना नोटीस प्राप्त होऊनही त्यांनी लेखी उत्तर दाखल केले नाही किंवा मंचासमोर उपस्थित झाले नाही, म्हणून मंचाने त्यांच्याविरुध्द एकतर्फी कारवाई चालविण्याचा आदेश दि.03.08.2010 रोजी पारित केला. 3. गैरअर्जदार क्र. 1 आपल्या लेखी उत्तरात न्युमायका हा गुणवत्ताप्राप्त नसलेला व त्रुटीपूर्ण असल्याने, त्यामुळे तक्रारकर्त्याने तक्रारीत नमूद केलेले फर्निचरला लावल्यानंतर तो पसरत जाऊन तुटलेला आहे हे प्रत्यक्ष पाहणी केल्यावर त्यांच्या लक्षात आले व त्यांनी जी काही आवश्यक मदत लागेल ती करण्याचे आश्वासन दिले. न्युमायकाची किंमत मान्य केलेली असून एक महिन्याच्या आत त्यांचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. तक्रारकर्त्याला परत सनमायका बदलावयचा असल्यास खर्च करावा लागेल व त्याकरीता गैरअर्जदार क्र. 3 उत्पादक हेच जबाबदार असल्याचे नमूद केले आहे. 4. गैरअर्जदार क्र. 3 ने आपल्या उत्तरात त्यांची कंपनी ही चांगल्या प्रतीची आहे. तक्रारकर्त्यानेच इतर माल, चीकटण, अनुभवी कामगार व यंत्र न वापरल्यामुळे सदर मायका तुटत गेले. तक्रारकर्त्याचे इतर म्हणणे नाकारलेले आहे व सदर तक्रार खारीज करण्याची मागणी केलेली आहे. 5. मंचासमोर सदर प्रकरण युक्तीवादाकरीता दि.19.11.2010 रोजी आले असता तक्रारकर्ता, गैरअर्जदार क्र. 1 व 3 चा युक्तीवाद ऐकण्यात आला. गैरअर्जदार क्र. 2 अनुपस्थित. मंचाने सदर प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या कागदपत्रांचे, शपथपत्रांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्कर्षाप्रत आले. -निष्कर्ष- 6. तक्रारकर्त्याने गैरअर्जदार क्र. 3 उत्पादित न्युमायका गैरअर्जदार क्र. 2 वितरक असलेले गैरअर्जदार क्र. 1 कडून 90 न्युमायकाचे शीट्स खरेदी केलेले असल्याने तक्रारकर्ता हा गैरअर्जदारांचा ग्राहक ठरतो असे मंचाचे मत आहे. 7. तक्रारकर्त्याने गैरअर्जदार क्र. 1 कडून 16.05.2009 रोजी न्युमायका नावाचे सनमायकाचे शीट्स खरेदी केले ही बाब दस्तऐवज पृष्ठ क्र. 9 वरुन स्पष्ट होते. सदर शीट्स लावल्यानंतर त्या सदोष होत्या. त्या पसरत जाऊन तुटत गेल्या याबाबतची गैरअर्जदाराला कायदेशीर नोटीसद्वारे माहिती दिल्याचे दस्तऐवजावरुन स्पष्ट होते. सदर नोटीस गैरअर्जदाराला मिळूनसुध्दा तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या टपालाच्या पोच पावतीवरुन स्पष्ट होते. तक्रारकर्त्याने सदर न्यूमायकामध्ये दोष होता याबाबत तक्रार केल्यानंतर 14.09.2009 रोजी तक्रारकर्त्याच्या सदर कार्यालयाला भेट देऊन शोभित साह यांची स्वाक्षरी असलेले दस्तऐवज मंचासमोर दाखल केले आहे. तसेच न्युमायका सदोष असल्याबाबतची तक्रार नोटीसद्वारे गैरअर्जदारांना तक्रारकर्त्याने केलेली आहे. गैरअर्जदार क्र. 3 यांनी सदर नोटीसला उत्तर दिलेले नाही. गैरअर्जदार क्र. 1 यांनी सदर नोटीसला उत्तर दिलेले आहे व मान्य केले आहे की, न्युमायकामध्ये निर्मिती दोष (Manufacturing defect) आहे. तसेच तक्रारीच्या उत्तरामध्ये गैरअर्जदार क्र. 3 च्या प्रतिनीधीने तक्रारकर्त्याच्या कार्यालयामध्ये भेट दिली व उत्पादित दोष असल्याबाबतची बाब मान्य केली आहे. त्यामुळे मंचाचे असे मत आहे की, सदर न्युमायकाचे उत्पादन गैरअर्जदार क्र. 3 ने केलेले आहे. तसेच उत्पादन दोष असल्याबाबतचे गैरअर्जदार क्र. 1 ने मान्य केले आहे आणि सदर बाब ही न्युमायकाची पाहणी केल्यावर मान्य केली असल्यामुळे मंचाचे असे मत आहे की, गैरअर्जदार क्र. 3 ने तक्रारकर्त्याच्या कार्यालयामध्ये 90 शिट्स न्युमायकाच्या परत बदलवून लावून द्याव्या किंवा तक्रारकर्त्यास सदर न्युमायकाची किंमत व ते लावण्याकरीता आलेला एकूण खर्च रु.3,09,719/- परत करावा. तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तऐवज क्र. 1 वरुन न्युमायकाला सदर खर्च आल्याचे स्पष्ट होते. 8. तक्रारकर्त्याने सदर न्युमायका लावण्याकरीता मजूरी रु.1,09,000/- चा खर्च आल्याचे नमूद केले आहे व ते परत मिळण्याची मागणी केलेली आहे. परंतू सदर बाब सिध्द करणारा कोणताही पुरावा वा दस्तऐवज दाखल न केल्याने तक्रारकर्त्याची सदर मागणी ग्राह्य धरता येत नाही. गैरअर्जदाराने आपल्या उत्तरात न्युमायका हा योग्य पध्दतीने लावला नसल्याचे म्हटले आहे. परंतू सदर बाब सिध्द करण्याकरीता गैरअर्जदाराने कोणतीही पावले उचलली नाही, म्हणून गैरअर्जदारांचा सदर आक्षेप मान्य करण्यात येत नाही. तक्रारकर्त्याने तक्रारीमध्ये शारिरीक व मानसिक त्रासाकरीता रु.50,000/- ची मागणी केलेली आहे. न्यायोचितदृष्टया तक्रारकर्ता हा शारिरीक व मानसिक त्रासाकरीता भरपाई म्हणून रु.5,000/- मिळण्यास पात्र आहे. तसेच तक्रारीच्या खर्चाबाबत रु.2,000/- मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे. उपरोक्त निष्कर्षावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे. -आदेश- 1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2) गैरअर्जदार क्र. 3 ला आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्त्याला 90 शीट्स न्युमायकाच्या परत बदलवून लावून द्याव्या किंवा तक्रारकर्त्याला रु.3,09,719/- परत करावे. सदर रक्कम आदेश प्राप्त झाल्यापासून 30 दिवसात न दिल्यास त्यावर द.सा.द.शे.9 टक्के दराने दंडनीय व्याज देय राहील. 3) गैरअर्जदार क्र. 3 ने शारिरीक व मानसिक त्रासाकरीता भरपाई म्हणून रु.5,000/- तक्रारकर्त्याला द्यावे. 4) गैरअर्जदार क्र. 3 ने तक्रारीच्या खर्चाबाबत रु.2,000/- तक्रारकर्त्याला द्यावे. 5) गैरअर्जदार क्र. 1 व 2 विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते. 6) सदर आदेशाचे पालन गैरअर्जदार क्र. 3 ने आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आत करावे.
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |