न्यायनिर्णय
(सदर न्यायनिर्णय मा.सौ. सुरेखा हजारे, सदस्य यानी पारित केला)
1. प्रस्तुत तक्रारदार यांनी त्यांची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 प्रमाणे यातील जाबदारांनी दिलेल्या सदोष सेवेबाबत दाखल केलेली आहे.
पांडुरंग हरिबा क्षिरसागर हे मयत झाले आहेत. पांडुरंग हरिबा क्षीरसागर यांना तक्रारदार क्र. 1 श्रीरंग पांडुरंग क्षिरसागर हे कायदेशीर वारस आहेत. तक्रारदार क्र. 2 व 3 हे तक्रारदार क्र. 1 यांचे भाऊ व भावजय असून तक्रारदार क्र. 4 व 5 हे तक्रारदार क्र. 1 यांचा मुलगा व सुन असून सदरील सर्व तक्रारदार हे पूर्वीपासून वर सरनाम्यात नमूद केलेल्या पत्त्यावर एकत्रात राहतात. जाबदार पतसंस्था ही सहकारी कायद्याप्रमाणे स्थापन झालेली सहकारी संस्था असून ग्राहकांकडून ठेवी स्वरुपात रक्कम स्विकारुन मुदतीनंतर किंवा मुदतीपूर्वी ग्राहकांनी रक्कम मागितल्यास, सदरची रक्कम त्यांना परत देणे अशा स्वरुपाच्या उद्देशाने जाबदार पतसंस्था स्थापन झालेली आहे. जाबदार क्र. 2 व 3 हे सदर पतसंस्थेचे चेअरमन व व्हा.चेअरमन असून. जाबदार क्र. 4 ते 13 हे संचालक आहेत. तक्रारदाराने जाबदार पतसंस्थेमध्ये दामदुप्पट ठेव स्वरुपात रकमा गुंतविलेल्या आहेत. त्याचा तपशिल खालीलप्रमाणे,-
अ.नं | तक्रारदाराचे नाव | ठेव पावती नं | ठेवपावती ठेवलेची तारीख | ठेव रक्कम | मुदत संपलेची तारीख | मुदतीनंतर मिळणारी रक्कम |
1 | पांडुरंग हरिभाऊ क्षिरसागर व श्रीरंग पांडुरंग क्षिरसागर | 003520 | 10.11.05 | 30,000/- | 11.11.11 | 60,000/- |
2 | शरद श्रीरंग क्षिरसागर व सौ.विद्या शरद क्षिरसागर | 003545 | 25.03.06 | 35,000/- | 26.06.12 | 70,000/- |
3 | श्रीरंग पांडुरंग क्षिरसागर व शरद श्रीरंग क्षिरसागर | 003546 | 25.03.06 | 35,000/- | 26.06.12 | 70,000/- |
4 | सौ.आशा सतिश क्षिरसागर | 004414 | 05.08.06 | 25,000/- | 06.11.12 | 50,000/- |
5 | सौ.आशा सतिश क्षिरसागर | 004415 | 05.08.06 | 25,000/- | 06.11.12 | 50,000/- |
6 | सतिश पांडुरंग क्षिरसागर | 004416 | 05.08.06 | 25,000/- | 06.11.12 | 50,000/- |
7 | सतिश पांडुरंग क्षिरसागर | 004417 | 05.08.06 | 25,000/- | 06.11.12 | 50,000/- |
वरील कोष्टकात नमूद केलेल्या तपशिलाप्रमाणे तक्रारदार यांनी त्यांच्या रकमा जाबदार पतसंस्थेमध्ये दामदुप्पट ठेव स्वरुपात ठेवलेल्या होत्या व आहेत. सदर ठेव पावत्यांची मुदत सन 2011-12 साली संपलेली आहे. तक्रारदार यांनी वेळोवेळी रकमेची मागणी करुनही जाबदार यांनी अद्यापपर्यंत तक्रारदार यांना कोणतीही रक्कम अदा केलेली नाही. तक्रारदार यांनी जाबदार यांचे संस्थेमध्ये ठेवलेली ठेव रक्कम मुदत संपल्यानंतर सदर जाबदार यांनी तक्रारदार यांना आजअखेर होणा-या व्याजासह देणे सामनेवाले यांचेवर बंधनकारक होते व आहे. जाबदार यांनी तक्रारदार यांना केवळ आश्वासने देण्यापलिकडे आजअखेर काहीही केलेले नाही. तक्रारदार हे गरीब कुटूंबातील असून तक्रारदार यांनी त्यांचे व्यवसाय वृध्दीसाठी तसेच वृध्दापकाळातील अडीअडचणीसाठी सदर रकमेची तरतूद जाबदार यांच्या संस्थेमध्ये ठेव रक्कम ठेवून केलेली होती. तक्रारदार यांनी जाबदार संस्थेकडे वारंवार रक्कमेची मागणी केली असता सुरुवातीस जाबदार यांनी “रक्कम आज देतो, उद्या देतो” असे लबाडीने सांगून आजअखेर वेळ मारुन नेली. त्यामुळे तक्रारदारांना अत्यंत मानसिक व शारिरीक त्रास सहन करावा लागलेला आहे. त्यामुळे तक्रारदार यांना मानसिक व शारीरिक त्रासापोटी नुकसानभरपाई मागणेचा हक्क प्राप्त झालेला आहे. तक्रारीस कारण दि. 7/5/2015 रोजी तक्रारदार हे जाबदार यांच्याकडे रक्कम मागणेस गेले असता, जाबदार यांनी तक्रारदार यांचेबरोबर भांडण करुन रक्कम देण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला त्यावेळी व त्यासुमारास मे. मंचाचे अधिकार स्थळसिमेत घडलेले आहे. तक्रारदार हे जाबदार यांचे ग्राहक असून जाबदार यांनी तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी व कमतरता केली असल्याने सदरच्या तक्रारीची दखल घेण्याचा मे. मंचास अधिकार आहे. तक्रारदार यांनी जाबदार यांचेविरुध्द या मंचाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही न्यायालयात तक्रार दाखल केलेली नाही. तरी जाबदारांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना दामदुप्पट ठेव पावत्यांवरील रक्कम एक महिन्याच्या आत व्याजासह अदा करावी असे आदेश तक्रार अर्जाचे कामी करणेत यावेत. मुदत संपलेल्या तारखेपासून रक्कम रु.4,00,000/- वर प्रत्यक्ष रक्कम पदरी पडेपर्यंत द.सा.द.शे. 18% दराने व्याज जाबदार यांनी तक्रारदार यांना द्यावे असे आदेश तक्रार अर्जाचे कामी करणेत यावेत. मानसिक व शारिरीक त्रासाकरीता रक्कम रु.50,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रु.20,000/- तक्रारदार यांना जाबदार यांचेकडून देववावा. येणेप्रमाणे तक्रार अर्ज असे.
2. नि. 25 कडे तक्रारदारांच्या अर्जास जाबदार क्र. 2,4,8 व 12 यांनी खालीलप्रमाणे म्हणणे दिले आहे-
अर्जदार यांचा तक्रार अर्ज, त्यामधील मजकूर हा खोटा, लबाडीचा व रचनात्मक स्वरुपाचा असून वस्तुस्थितीचा विपर्यास करणारा आहे. तो या जाबदारांना मुळीच मान्य व कबूल नाही. तक्रारदार याने ज्या स्वरुपामध्ये सदरचा तक्रार अर्ज या सर्व जाबदारांविरुध्द दाखल केलेला आहे, तो त्या स्वरुपामध्ये सर्व जाबदारांविरुध्द कायद्याने चालणार नाही. तक्रारदार यांस प्रस्तुत अर्जातील जाबदार यांचेविरुध्द अर्ज दाखल करण्याचा मुळीच कायदेशीर हक्क अथवा अधिकार नव्हता व नाही. तसेच अर्जदार यांचे अर्ज कलम 1 मधील कथने अपुरी आहेत. अर्जदार याने मयत पांडुरंग हरिभाऊ क्षिरसागर यांचे सर्व वारसांना या अर्जाच्या कामी सामील केलेले नाही. तसेच मयत पांडुरंग क्षिरसागर यांचे वारसाचे सर्टीफिकेटही दाखल केलेले नाही. मयत पांडुरंग क्षिरसागर यांच्या सर्व वारसांना या अर्जाचे कामी दाखल केल्याशिवाय अर्जदार यांचे अर्जाचा कायद्याने विचार करता येणार नाही. सबब अर्जदार यांचे अर्जास Non Joinder of Necessary Parties तत्वाची बाधा येत असल्याने अर्जाचा कायद्याने विचार करता येणार नाही. सबब अर्ज फेटाळण्यात यावा.
अर्ज कलम 2 मधील कथने संस्थेच्या स्वरुपाबाबत तसेच अर्जदार यांनी ठेव म्हणून ठेवलेल्या रक्कमेबाबतचा मजकूर स्थुल मानाने बरोबर आहे. तसेच जाबदार क्र. 2 व 3 हे संस्थेचे चेअरमन व व्हा. चेअरमन तसेच जाबदार क्र. 5 ते 8 आणि 10 ते 12 हे संचालक आहेत हे स्थुल मानाने बरोबर आहे. अर्जदार यांनी या जाबदारांना दिलेली मुळ अर्जाची प्रत अपुरी आहे. तसेच अर्जदार यांनी एकूण रक्कम रुपये 4,00,000/- रुपयांची ठेव ठेवलेली नव्हती व नाही. केवळ रु.2,00,000/- रुपये ठेवीच्या स्वरुपात ठेवलेले होते. अर्ज कलम 3 मधील कथने रचनात्मक स्वरुपाची असून ती या जाबदारांना मुळीच मान्य अथवा कबूल नाहीत. वास्तवीक श्री. गणेश नागरी सहकारी पतसंस्था मर्या., फलटण ही संस्था कार्यरत असून तिचे कामकाज सहकारी कायदा व नियमातील तरतुदीप्रमाणे कार्यरत आहे. अर्जदार यांच्या रकमा वसुल होतील त्याप्रमाणे परत देणेस जाबदार सदैव तयार असतानाही अर्जदार यांनी संपूर्ण रकमा एकाचवेळी परत करण्याचा आग्रह धरल्याने जाबदार संस्था रकमा देत असतानाही अर्जदार यांनी त्या स्विकारल्या नाहीत. अर्ज कलम 4 मधील कथने जाबदारांना मुळीच मान्य व कबूल नाहीत. अर्ज कलम 5 मधील मजकूर काल्पनिक व रचनात्मक स्वरुपाचा असून तो या जाबदारांना मुळीच मान्य अथवा कबूल नाही. जाबदार संस्थेच्या विश्वस्तांनी कधीही अर्जदार यांना मानसीक व शारिरीक त्रास होईल अशी वागणूक दिली नव्हती व नाही. अर्जदार यांचे अर्जास काहीएक कारण घडलेले नव्हते व नाही. तसेच अर्जदार याचे अर्ज कलम 6 मधील मागण्या पुर्णपणे अवास्तव व चुकीच्या असून त्या या जाबदारांना मुळीच मान्य अथवा कबूल नाहीत. श्री गणेश ना.सह.पतसंस्था, फलटण या संस्थेच्या एकूण 6 शाखा असल्याने व त्या सर्व शाखा दुष्काळी पट्टयात असल्याने तसेच बरेचशे सभासदही शेतकरी वर्गातील असल्याने ब-याच संस्थेच्या सभासदांना कर्ज वाटप वेळोवेळी केलेले आहे. तथापी गेल्या तीन-चार वर्षांपासून लागोपाठ दुष्काळ असल्याने संस्थेने वाटप केलेले सभासदांच्या कर्ज रकमेची वसूली करणेस अनेक अडचणी निर्माण झाल्याने सर्व ठेवीदारांना एकाचवेळी त्यांच्या संपूर्ण रकमा परत करणे जिकीरीचे झालेले आहे. तथापी संस्थेने व संचालक मंडळांनी अनेक कर्जदारांवर कायदेशीर कारवाई करुन कर्ज रकमा व्याजासह वसुल करण्याचा तगादा लावलेला आहे. तसेच वसूल झालेल्या रकमेतून ठेवीदारांना त्यांच्या रकमा परत करण्याचा प्रामाणीकपणे प्रयत्न करीत असताना वर नमुद केल्याप्रमाणे आर्थिक व्यवहारामध्ये अनेक अडचणी निर्माण होवू लागल्यामुळे अर्जदार यांनी सेव्हींग खात्यावरील रकमेबाबत तसेच मुदत ठेवीच्या रकमांबाबत एकदम एकाच वेळी सर्व रक्कम मिळण्याचा आग्रह धरल्याने व त्याशिवाय रकमा स्विकारण्यास नकार दिल्याने अर्जदार यांनी हेतुपुरस्सर संस्था वरचेवर देत असलेल्या रकमा न स्विकारल्यामुळे हा अर्ज दाखल झालेला आहे. श्री. गणेश नागरी सहकारी पतसंस्था मर्या., फलटण ही संस्था आजही कार्यरत असताना अर्जदार याने सदरचा अर्ज केवळ संस्थेविरुध्द दाखल करणे न्यायाच्यादृष्टीने आवश्यक असताना अर्जदार यांनी सर्व संस्थेच्या संचालकांना नाहक त्रास देण्याच्या हेतूने सदरचा खोटा अर्ज दाखल केलेला आहे. सदरचा अर्ज संस्थेच्या संचालकांविरुध्द कायद्याने चालणार नाही. तसेच अर्जदार यांच्या अर्ज कलम 6 मधील तक्रारी चुकीच्या आहेत. अर्जदार यास रक्कम रुपये चार लाखावर 18 टक्के व्याजदराने रक्कम मागण्याचा मुळीच कायदेशीर हक्क अथवा अधिकार नाही. तसेच अर्जदार याने काहीएक कारण नसताना सदरचा अर्ज जाबदार संस्थेविरुध्द दाखल केलेला असल्याने शारीरिक व मानसिक त्रासापोटी मागितलेली रक्कम व खर्चाची मागीतलेली रक्कम मिळणेस अर्जदार पात्र नसल्याने अर्जदार याचा अर्ज खर्चासह फेटाळण्यात यावा. येणेप्रमाणे तक्रारदारांचे तक्रार अर्जास जाबदारानी दिलेले म्हणणे आहे.
3. नि.1 वर तक्रारअर्ज असून, नि. 2 ते नि. 6 कडे तक्रार अर्जासोबतचे अँफिडेव्हीट, नि.7 कडे तक्रारदारांचा वकील नियुक्तीसाठी परवानगीचा अर्ज, अर्ज मंजूर. नि.8 वर अँड.ए.आर.कदम यांचे वकीलपत्र, नि.9 कडे कागदयादी, नि.9/1 कडे पांडुरंग ह. क्षीरसागर यांचे मृत्यू प्रमाणपत्र, नि. 9/2 ते नि. 9/4 कडे तक्रारदारांच्या दामदुप्पट ठेव पावतीच्या सत्यप्रती, नि.10 कडे तक्रारदार यांचा पत्ता मेमो, नि. 12 सोबत व्हेरिफाय केलेल्या ठेवपावत्यांच्या सत्यप्रती, नि.11 कडे मंचाने जाबदाराना पाठवलेली नोटीस, नि. 13 ते 20 कडे जाबदार क्र. 4 ते 8 व 10 ते 12 यांना नोटीस पोहोचलेच्या पोहोचपावत्या. नि. 21 कडे जाबदार क्र.13 चा इंटिमेशन देवूनही घेत नाहीत म्हणून पाकीट परत व नि. 22 कडे जाबदार क्र. 9 चा सदर नावाचे मालक मयत आहे या पोष्टाचे शे-याने परत आलेला लखोटा, नि. 23 ला जाबदार क्र. 9 यांना वगळणेसाठीचा अर्ज, नि. 24 कडे जाबदार क्र. 2,4,8,12 तर्फे वकीलपत्र, नि. 25 कडे जाबदार क्र. 2,4,8,12 तर्फे म्हणणे, नि. 26 कडे म्हणणेपृष्ठयर्थ अँफिडेव्हीट, नि.27 कडे अर्जदारांची पुरावा संपलेची पुरसीस, नि.28 कडे अर्जदारतर्फे 29 चे कागदयादीसोबत संचालक मंडळाची यादी, नि. 30 कडे अर्जदाराचे पुराव्याचे शपथपत्र, नि. 31 कडे जाबदार पतसंस्थेतर्फे तक्रारदारांच्या ठेवीचा तपशील असलेले पत्र, नि. 32 कडे तक्रारदारांचा लेखी युक्तीवाद व जाबदारतर्फे तक्रार अर्जास दिलेले म्हणणे तोच पुरावा समजणेत यावा अशी पुरसीस, इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
4. तक्रारदारांची तक्रार, त्यासोबतचे प्रतिज्ञापत्र, पुरावे, जाबदार क्र. 2,4,8,12 यांनी दाखल केलेले म्हणणे व कागदपत्रे तसेच लेखी युक्तीवाद यांचे अवलोकन करुन सदर तक्रारीचे निराकरणार्थ मे. मंचाने खालील मुद्दयांचा विचार केला-
अ.क्र. मुद्दा निष्कर्ष
1. तक्रारदार व जाबदार यांचेत ग्राहक व सेवापुरवठादार
असे नाते आहे काय? होय.
2. जाबदारानी तक्रारदाराना दयावयाच्या सेवेत
त्रुटी केली आहे काय? होय.
3. जाबदार हे तक्रारदारांच्या रकमा देणे लागतात काय? होय.
4. अंतिम आदेश काय? तक्रार अंशतः मंजूर.
7. विवेचन-
मुद्दा क्र. 1
तक्रारदार यांनी जाबदार पतसंस्थेमध्ये दामदुप्पट ठेवी ठेवल्या त्यामुळे ते जाबदार पतसंस्थेचे ग्राहक झाले आहेत. जाबदार पतसंस्थेने तक्रारदारांच्या मुदत ठेवी ठेवून घेवून त्यावर त्यांना व्याज द्यावयाचे ठरल्याने जाबदार हे सेवा पुरवठादार ठरतात. त्यामुळे तक्रारदार व जाबदार यांच्यात ग्राहक व सेवापुरवठादार असे नाते निर्माण होते. म्हणून मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
मुद्दा क्र. 2
तक्रारदारांनी जाबदार पतसंस्थेमध्ये दामदुप्पट ठेवी ठेवल्या. त्या ठेवींवर जाबदार संस्थेने व्याज द्यावयाचे ठरलेले होते. परंतु दामदुप्पट ठेवींची मुदत संपूनही जाबदारांनी तक्रादारांना दामदुप्पट ठेवींचे पैसे व्याजासह परत केलेले नाहीत. म्हणजेच जाबदार हे तक्रारदारांना-ग्राहकांना द्यावयाच्या सेवेत कमी पडले. यावरुन हे सिध्द होते की, जाबदाराकडून ग्राहकास द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी निर्माण झाली आहे. म्हणून मुद्दा क्र.2 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
मुद्दा क्र. 3
9. तक्रारदार क्र. 1 ते 5 (मयत वारस) यांचे नावे कै. पांडुरंग हरिभाऊ क्षिरसागर (मयत) यांनी जाबदार पतसंस्थेमध्ये दामदुप्पट ठेवींमध्ये रक्कम गुंतविली होती व आहे. प्रस्तुत मुदत ठेवींच्या मुदती संपलेनंतर तक्रारदारांनी जाबदार पतसंस्थेकडे वारंवार सव्याज रकमांची मागणी करुनही आजपावेतो जाबदारांनी तक्रारदारांना रकमा दिलेल्या नाहीत. वास्तविक तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक आहेत व जाबदारांनी त्यांच्या मुदत ठेवी त्यांना मुदत संपल्यानंतर सव्याज परत करणे हे जाबदारांवर बंधनकारक होते व जाबदारांनी तक्रारदारांना द्यावयाची हीच सेवा होती. परंतु त्या सेवेमध्ये त्रुटी निर्माण झाल्याने तक्रारदारांना हा अर्ज पैसे वसुलीसाठी दाखल करावा लागला आहे. म्हणूनच जाबदार हे तक्रारदारांच्या रकमा देणे लागतात या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. म्हणून आम्ही मुद्दा क्र. 3 चे उत्तर होकारार्थी देत आहोत.
सदर तक्रारअर्जात cooperative corporate veil नुसार तक्रारदारांचे पैसे देणेस जाबदार क्र.1 पतसंस्था व जाबदार क्र.2 ते 8 व 10 ते 13 यांना हे मंच वैयक्तिक व संयुक्तीकरित्या जबाबदार धरीत आहे. नि.23 कडील आदेशाप्रमाणे जाबदार क्र. 9 ला वगळणेत येते. येथे आम्ही मे. मुंबई उच्च न्यायालयाच्या रिट पिटीशन नंबर 117/2011 मंदाताई संभाजी पवार वि. स्टेट ऑफ महाराष्ट्र या न्यायनिवाडयाचा व त्यातील दंडकांचा आधार घेतला आहे.
10. सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करणेत येत आहेत-
आदेश
1. तक्रारदारांची तक्रार अंशतः मंजूर करणेत येते.
अ.नं | तक्रारदाराचे नाव | ठेव पावती नं | ठेवपावती ठेवलेची तारीख | ठेव रक्कम | मुदत संपलेची तारीख | मुदतीनंतर मिळणारी रक्कम |
1 | पांडूरंग हरिबा क्षिरसागर व श्रीरंग पांडूरंग क्षिरसागर | 003520 | 10.11.05 | 30,000/- | 11.11.11 | 60,000/- |
2 | शरद श्रीरंग क्षिरसागर व सौ.विद्या शरद क्षिरसागर | 003545 | 25.03.06 | 35,000/- | 26.06.12 | 70,000/- |
3 | श्रीरंग पांडूरंग क्षिरसागर व शरद श्रीरंग क्षिरसागर | 003546 | 25.03.06 | 35,000/- | 26.06.12 | 70,000/- |
4 | सौ.आशा सतिश क्षिरसागर | 004414 | 05.08.06 | 25,000/- | 06.11.12 | 50,000/- |
5 | सौ.आशा सतिश क्षिरसागर | 004415 | 05.08.06 | 25,000/- | 06.11.12 | 50,000/- |
6 | सतिश पांडूरंग क्षिरसागर | 004416 | 05.08.06 | 25,000/- | 06.11.12 | 50,000/- |
7 | सतिश पांडूरंग क्षिरसागर | 004417 | 05.08.06 | 25,000/- | 06.11.12 | 50,000/- |
2. वर कोष्टकात दर्शविलेल्या तक्रारदार क्र. 1 यांचे नावे असलेल्या अ.क्र.1 मध्ये दर्शविलेल्या दामदुप्पट ठेव पावती क्र.003520 वरील दर्शविलेल्या रकमेवर ठेव ठेवलेल्या तारखेपासून आदेश पारित तारखेपर्यंत ठेवपावतीवर नमूद केलेल्या व्याजदराने होणारी एकूण सव्याज रक्कम जाबदार क्र.1 पतसंस्था व जाबदार क्र.2 ते 8 व 10 ते 13 यांनी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या तक्रारदार क्र.1 यांना अदा करावी.
3. वर कोष्टकात दर्शविलेल्या तक्रारदार क्र. 4 व 5 यांचे नावे असलेल्या अ.क्र.2 मध्ये दर्शविलेल्या दामदुप्पट ठेव पावती क्र.003545 वरील दर्शविलेल्या रकमेवर ठेव ठेवलेल्या तारखेपासून आदेश पारित तारखेपर्यंत ठेवपावतीवर नमूद केलेल्या व्याजदराने होणारी एकूण सव्याज रक्कम जाबदार क्र.1 पतसंस्था व जाबदार क्र.2 ते 8 व 10 ते 13 वैयक्तिक व संयुक्तीकरित्या तक्रारदार क्र.4 व 5 यांना अदा करावी.
4. वर कोष्टकात दर्शविलेल्या तक्रारदार क्र. 1 व 4 यांचे नावे असलेल्या अ.क्र.3 मध्ये दर्शविलेल्या दामदुप्पट ठेव पावती क्र.003546 वरील दर्शविलेल्या रकमेवर ठेव ठेवलेल्या तारखेपासून आदेश पारित तारखेपर्यंत ठेवपावतीवर नमूद केलेल्या व्याजदराने होणारी एकूण सव्याज रक्कम जाबदार क्र.1 पतसंस्था व जाबदार क्र.2 ते 8 व 10 ते 13 यांनी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या तक्रारदार क्र.1 व 4 यांना अदा करावी.
5. वर कोष्टकात दर्शविलेल्या तक्रारदार क्र. 3 यांचे नावे असलेल्या अ.क्र.4 व 5 मध्ये दर्शविलेल्या दामदुप्पट ठेव पावती क्र.004414 व 004415 वरील दर्शविलेल्या रकमेवर ठेव ठेवलेल्या तारखेपासून आदेश पारित तारखेपर्यंत ठेवपावतीवर नमूद केलेल्या व्याजदराने होणारी एकूण सव्याज रक्कम जाबदार क्र.1 पतसंस्था व जाबदार क्र.2 ते 8 व 10 ते 13 यांनी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या तक्रारदार क्र.3 यांना अदा करावी.
6. वर कोष्टकात दर्शविलेल्या तक्रारदार क्र.2 यांचे नावे असलेल्या अ.क्र.6 व 7 मध्ये दर्शविलेल्या दामदुप्पट ठेव पावती क्र. 004416 व 004417 वरील दर्शविलेल्या रकमेवर ठेव ठेवलेल्या तारखेपासून आदेश पारित तारखेपर्यंत ठेवपावतीवर नमूद केलेल्या व्याजदराने होणारी एकूण सव्याज रक्कम जाबदार क्र.1 पतसंस्था व जाबदार क्र.2 ते 8 व 10 ते 13 यांनी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या तक्रारदार क्र.2 यांना अदा करावी.
8. वरील आदेशाचे पालन जाबदारानी आदेश पारित तारखेपासून 30 दिवसाचे आत करावयाचे आहे. तसे न केलेस जाबदार क्र.1 पतसंस्था व जाबदार क्र.2 ते 8 व 10 ते 13 यांना वैयक्तिक व संयुक्तीकरित्या आदेश पारित तारखेपासून होणा-या सव्याज रकमेवर द.सा.द.शे. 6 टक्के दराने तक्रारदाराच्या हाती रक्कम पडेपर्यंत व्याज अदा करावे लागेल.
9. तक्रारदारास जाबदार क्र.1पतसंस्था व जाबदार क्र.2 ते 8 व 10 ते 13यांनी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या शारिरीक व मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रु.3,000/- अदा करावेत.
10. जाबदारानी विहीत मुदतीत आदेशाचे पालन न केलेस तक्रारदार त्यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायदा कलम 25 व 27 अन्वये दाद मागू शकतील.
11. सदरचा न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
12. सदर न्यायनिर्णयाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य पाठवणेत याव्यात.
ठिकाण- सातारा.
दि. 30–12-2015.
(सौ.सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ.सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.