::निकालपत्र:: (पारीत व्दारा- श्री नितीन माणिकराव घरडे , मा.सदस्य ) (पारीत दिनांक-16 एप्रिल, 2014 ) 01. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षा विरुध्द ग्राहक संरक्षण अधिनियम-1986 चे कलम-12 खालील प्रस्तुत तक्रार मंचा समक्ष दाखल केली. 02. तक्रारकर्त्याचे तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे- विरुध्दपक्ष गणेश हाऊसिंग एजन्सी नागपूर या संस्थेचे मालक असून विरुध्दपक्ष या संस्थेचे नावाने शेतजमीनीचे अकृषक भूखंडामध्ये रुपांतरण करुन मासिक किस्तीवारीने भूखंड विक्रीचा व्यवसाय करतात. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाचे मालकीचे मौजा ऐरखेडा, पटवारी हलका क्रं 16, खसरा क्रं 177, तहसिल कामठी, जिल्हा नागपूर या ले-आऊट मधील भूखंड क्रं 38, क्षेत्रफळ 750 चौरसफूट मासिक किस्तीने घेण्याचे ठरविले. सदर भूखंडाची एकूण किंमत रुपये-26,250/- एवढी ठरली. भूखंड विक्री संबधाने उभय पक्षांमध्ये दि.24.05.2004 रोजी बयानापत्र तयार करण्यात आले. बयानापत्रा नुसार तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडे भूखंडापोटीची संपूर्ण रक्कम रुपये-26,250/- दि.25.05.2004 ते दि.05.12.2008 या कालावधीत वेळोवेळी मासिक किस्तीव्दारे जमा केली. तक्रारकर्त्याने भूखंडाची शेवटची किस्त विरुध्दपक्षाकडे दि.05.12.2008 रोजी जमा केल्या नंतर विरुध्दपक्षास विक्रीपत्र करुन देण्याची विनंती केली असता अद्दाप ले-आऊटला शासना कडून अकृषक परवानगी प्राप्त झाली नसल्याचे तसेच नकाशा नगररचना विभागा कडून मंजूर झाला नसल्याचे सांगण्यात आले. शासनाकडून अकृषक परवानगी आणि नगररचनाकार यांचे कडून ले-आऊट नकाशास मंजूरी मिळाल्या नंतर तक्रारकर्त्यास नोटीस व्दारे सुचित करण्यात येईल व नोटीस पाठविल्या पासून एक महिन्याचे आत तक्रारकर्त्याने करारातील भूखंडाचे विक्रीपत्र नोंदवून घ्यावे असेही विरुध्दपक्षा कडून सांगण्यात आले. त्यानंतरही जवळपास एक वर्षाचा कालावधी उलटून
गेल्या नंतरही विरुध्दपक्षाकडून तक्रारकर्त्यास कोणतही सूचना प्राप्त न झाल्यामुळे तक्रारकर्त्याने जानेवारी-2009 मध्ये विरुध्दपक्षाची भेट घेतली असता ले-आऊटला अद्दापही शासना कडून मंजूरी प्राप्त व्हावयाची असल्याचे विरुध्दपक्षाने सांगितले. त्यानंतरही तक्रारकर्त्याने वारंवार विरुध्दपक्षाकडे भूखंडाचे विक्री संबधी पाठपुरावा केला. तक्रारकर्ता दि.13.09.2012 रोजी विरुध्दपक्षास भेटले व विरुध्दपक्षाने अन्य लोकांना भूखंडाचे विक्रीपत्र नोंदवून दिल्याचे सांगितले असता विरुध्दपक्षाने विक्रीपत्र करुन देत नाही, जे करायचे आहे ते करुन घ्यावे असे उत्तर दिले. म्हणून तक्रारकर्त्याने दि.25.09.2012 रोजी विरुध्दपक्षास कायदेशीर नोटीस पाठविली असता ती विरुध्दपक्षास दि.27.09.2012 रोजी प्राप्त झाली. सदर नोटीसला विरुध्दपक्षाने दि.05.11.2012 रोजी खोटे उत्तर पाठविले व भूखंड विक्रीचा करारनामा केल्याची बाब नाकारली. अशाप्रकारे विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यास दोषपूर्ण सेवा दिली असल्याचे नमुद केले. म्हणून तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षा विरुध्द प्रस्तुत तक्रार दाखल करुन तीव्दारे, विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यास बयानापत्रातील नमुद भूखंड क्रं 38 चे विक्रीपत्र नोंदवून द्दावे किंवा तक्रारकर्त्याने भूखंडा पोटी विरुध्दपक्षाकडे जमा केलेली रक्कम रुपये-26,250/- दि.05.12.2008 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो बाजार भावा प्रमाणे व्याजासह परत करण्याचे विरुध्दपक्षास आदेशित व्हावे. तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-5000/- व शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-20,000/- विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यास देण्याचे आदेशित व्हावे. 03. विरुध्दपक्षाने निशाणी क्रं 10 वर प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्दाचे कलम-24 (अ) नुसार मुदतबाहय असल्याने खारीज व्हावी असा अर्ज मंचा समक्ष सादर केला. त्यावर मंचाने दि.02.01.2014 रोजीचे आदेशा नुसार विरुध्दपक्षाने करारातील भूखंड विक्री योग्य झाल्याची बाब तक्रारकर्त्यास कळविली नसल्याने प्रस्तुत तक्रारीचे कारण सतत घडत असल्याने तक्रार मुदतीत आहे व गुणवत्तेवर अंतिम निकाल पारीत करण्यात येईल असे आदेशात नमुद केले. विरुध्दपक्षाने निशाणी क्रं 13 वर लेखी उत्तर मंचा समक्ष सादर केले. विरुध्दपक्षाने आपले लेखी उत्तरात प्राथमिक आक्षेप घेतला की, प्रस्तुत तक्रार ही ग्राहक संरक्षण कायद्दातील तरतुदी नुसार मुदतबाहय असल्याचे कारणावरुन खारीज करण्यात यावी. तसेच ज्या कराराचे आधारावर तक्रारकर्त्याने मंचा समक्ष तक्रार दाखल केली आहे, त्यावर कोणतेही मुद्रांक शुल्क भरलेले नसल्याने मुद्रांक कायद्दा नुसार सदर करारास कुठलाही
अर्थ उरलेला नाही. प्रस्तुत तक्रार ही गुंतागुंतीची असल्याचे कारणावरुन ती दिवाणी न्यायालयात दाखल व्हावी असे आदेशित होऊन तक्रार खारीज व्हावी. तक्रारकर्त्याने मंचा समक्ष दाखल केलेली तक्रार ही खोटी व बिनबुडाची असून विरुध्दपक्षास त्रास देण्याचे हेतूने दाखल केलेली आहे. विरुध्दपक्षाने परिच्छेद निहाय उत्तर देताना नमुद केले की, शेतजमीनीचे अकृषक रुपांतरण करुन ले आऊट पाडून भूखंड विक्रीचा व्यवसाय विरुध्दपक्ष करीत नाही. तसेच विरुध्दपक्षाचा गणेश हाऊसिंग एजन्सी सोबत काहीही संबध नाही. तक्रारकर्त्याने खोटी व बनावट तक्रार मंचा समक्ष दाखल केली आहे. तक्रारकर्त्याने तक्रार पुराव्यानिशी सिध्द करावी. तक्रारकर्ता व विरुध्दपक्ष यांच्यात कधीही करारा संबधी बोलणी झालेली नसल्या कारणाने दि.20.05.2004 रोजी करार करण्याचा प्रश्नच उदभवत नाही. सदर करार हा बनावट असून त्यावरील विरुध्दपक्षाची सही बनावट व खोटी आहे. तसेच दि.24.05.2004 च्या तथाकथीत करारावर साक्षदारांच्या सहया नाहीत. तक्रारकर्त्याने मंचा समक्ष तक्रारी सोबत दाखल केलेल्या पावत्या या बनावट व खोटया आहेत. त्यामुळे तक्रारकर्त्याने दाखल केलेला करार व पावत्या विरुध्दपक्षास मान्य नाहीत. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षास वकीला मार्फतीने दि.25.09.2012 रोजी नोटीस पाठविला होता, त्यास विरुध्दपक्षाने दि.05.11.2012 रोजी उत्तर पाठविले असून ते खरे असून विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्या सोबत कुठलेही करार/व्यवहार केलेले नाही. विरुध्दपक्षाचा तक्रारकर्त्या सोबत संबध नसल्यामुळे फसवणूक केली नाही वा तक्रारकर्त्यास दोषपूर्ण सेवा दिलेली नाही. विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याशी कोणताही व कुठलाही करार केलेला नसल्यामुळे प्रस्तुत तक्रार मंचा समक्ष चालण्यास अपात्र आहे. विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्या सोबत कोणताही करार केलेला नसल्याने तक्रारकर्ता हा ग्राहक या सदरात मोडत नाही. तक्रारकर्त्याची तक्रार ही रुपये-20,000/- दंड आकारुन खारीज व्हावी असा आक्षेप विरुध्दपक्षाने घेतला. 04. तक्रारकर्त्याने निशाणी क्रं 3 वरील दस्तऐवज यादी नुसार दस्तऐवज दाखल केलेत, ज्यामध्ये भूखंड करारनामा/बयानापत्र, विरुध्दपक्ष गणेश हाऊसिंग एजन्सीव्दारे निर्गमित केलेल्या पावत्या, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षास पाठविलेली कायदेशीर नोटीस, पोस्टाची पोच पावती, विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याचे नोटीसला दिलेले उत्तर अशा दस्तऐवजांचे प्रतीचा समावेश आहे. तक्रारकर्त्याने लेखी युक्तीवाद सादर केला. 05. विरुध्दपक्षाने लेखी उत्तर व लेखी युक्तीवाद सादर केला. अन्य दस्तऐवज दाखल केले नाहीत. 06. प्रस्तुत प्रकरणात उभय पक्षांचे अधिवक्त्यांच्या मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला. 07. तक्रारकर्त्याची प्रतिज्ञालेखावरील तक्रार, विरुध्दपक्षाचे प्रतिज्ञालेखा वरील लेखी उत्तर, प्रकरणातील उपलब्ध कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करण्यात आले असता, न्यायमंचाचे निर्णयार्थ उपस्थित होणारे मुद्दे व त्यावरील निष्कर्ष खालील प्रमाणे आहेत-
मुद्दे उत्तर (1) विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यास करारातील नमुद भूखंडाची विहित मुदतीत विक्री करुन न देऊन दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब सिध्द होते काय?.............................................होय. (2) काय आदेश?...............................................तक्रार अंशतः मंजूर ::कारण मिमांसा ::
मु्द्दा क्रं 1 व 2 बाबत- 08. “विरुध्दपक्ष” म्हणजे श्री गणेश हाऊसिंग एजन्सी तर्फे अशोक आनंदराव धापोडकर असे समजण्यात यावे. विरुध्दपक्षाने आपले नि.क्रं 10 वरील प्राथमिक आक्षेपात तसेच लेखी उत्तरात आक्षेप घेतला आहे की, तक्रारकर्त्याने मंचा समक्ष दाखल केलेल्या पावत्यांच्या प्रतीवरुन शेवटची पावती ही दि.05.12.2008 रोजीची आहे आणि त्यामुळे तक्रारकर्त्याने तक्रार ही दि.04.12.2010 पर्यंत मंचा समक्ष दाखल करावयाची होती परंतु तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार ही दि.14.06.2013 रोजी दाखल केली आहे, त्यामुळे ग्राहक संरक्षण कायदा कलम-24 (अ) प्रमाणे तक्रार मुदतबाहय असल्याचे कारणावरुन खारीज व्हावी. यावर मंचाने दि.02.01.2004 रोजीचे आदेशा मध्ये विरुध्दपक्षाने करारातील भूखंड विक्री योग्य झाल्याची बाब तक्रारकर्त्यास कळविली नसल्याने प्रस्तुत तक्रारीचे कारण सतत घडत असल्याने तक्रार
मुदतीत असल्याचे नमुद केले आहे. करारातील नमुद भूखंडाची विक्री जो पर्यंत तक्रारकर्त्याचे नावे करुन देण्यात येत नाही तो पर्यंत प्रस्तुत तक्रारीचे कारण हे सदोदीत घडणारे असल्याने तक्रार मुदतीत आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. त्यामुळे विरुध्दपक्षाचे तक्रार मुदतीत नसल्याचे आक्षेपात काहीही तथ्य दिसून येत नाही.
09. विरुध्दपक्षाचा असाही आक्षेप आहे की, त्यांनी तक्रारकर्त्यास दि.24.05.2004 रोजीचे भूखंडाचे करारनामा/बयानापत्र करुन दिलेले नाही तसेच तक्रारकर्त्या कडून भूखंडापोटीची कोणतीही रक्कम स्विकारलेली नाही, त्यामुळे तक्रारकर्ता आणि विरुध्दपक्ष यांचेमध्ये ग्राहक आणि सेवा देणारे असे संबध प्रस्थापित होत नाही त्यामुळे तक्रार खारीज व्हावी. विरुध्दपक्षाचे या आक्षेपा वरुन विरुध्दपक्षाने सरळ सरळ तक्रारकर्ता आणि विरुध्दपक्ष यांचेमध्ये जो काही भूखंड विक्रीचा करार झालेला आहे तसेच भूखंडापोटी ज्या काही रक्कमा तक्रारकर्त्याने अदा केलेल्या आहेत त्या स्पष्टपणे नाकबुल केलेल्या आहेत. त्यामुळे मंचाव्दारे प्रकरणातील करारनामा/बयानापत्र तसेच भूखंडाची रक्कम मिळाल्या बाबतच्या पावत्यांच्या प्रतींचे अवलोकन करण्यात आले.
10. भूखंड करानामा/बयानापत्रा वरुन सदर बयानापत्रावर श्री गणेश हाऊसिंग एजन्सी नोंदणी क्रं-8233/03 नमुद असून कार्यालयाचा पत्ता कलमना ते कामठी रोड, रनाळा, तहसिल कामठी, जिल्हा नागपूर तसेच ब्रँच ऑफीसचा पत्ता व्दारा अशोक धापोडकर, पांचपावली रोड, कुंभारपूरा, पिवळया मार्बतीच्या बाजूला जागनाथ बुधवारी, नागपूर फोन क्रं-2733209 असे नमुद आहे. लिहून घेणार या समोर तक्रारकर्ता गिरीश मोतीराम बगले आणि लिहून देणार या स्तंभा समोर श्री गणेश हाऊसिंग एजन्सी तर्फे श्री अशोक आनंदराव धापोडकर, वय-40 रा. जागनाथ बुधवारी नागपूर पत्ता नमुद केलेला आहे. सदर बयानापत्रात मौजा येरखेडा, तहसिल कामठी, जिल्हा नागपूर, पटवारी हलका नं.16, खसरा क्रं 177 मधील प्लॉट क्रं 38 क्षेत्रफळ 750 चौरसफूट , प्रतीचौरसफूट किंमत रुपये-35/- प्रमाणे एकूण रुपये-26,250/- एवढया किंमतीमध्ये विकण्याचा सौदा दि.26.05.2004 रोजी झाला असून त्यापैकी बयाना दाखल रुपये-1650/- आणि उर्वरीत रक्कम रुपये-24,600/- वेळोवेळी मासिक किस्तीव्दारे भरावयाची होती व दि.26.05.2008 पर्यंतचे मुदतीचे आत
भूखंडाचे विक्रीपत्र करुन देण्यात येईल असे नमुद आहे. करीता सौदे चिठठी दोन साक्षीदारां समोर वाचून समजावून नागपूर मुक्कामी लिहून दिली. तारीख-24.05.2004 नमुद असून बयानापत्राचे खाली श्री गणेश हाऊसिंग एजन्सी नागपूर तर्फे स्वाक्षरी केल्याचे नमुद आहे. तसेच साक्षदार क्रं 1) व क्रं 2) हे स्तंभ रिकामे असून लिहून घेणा-याची सही सुध्दा रिकामी आहे. 11. तक्रारकर्त्याने प्रकरणात दाखल केलेल्या भूखंडाच्या पावतींचे प्रतींवर श्री गणेश हाऊसिंग एजन्सी, कार्यालयीन पत्ता-कलमना-कामठी रोड, तहसिल कामठी जिल्हा नागपूर नमुद असून खाली श्री गणेश हाऊसिंग एजन्सी तर्फे स्वाक्षरी केलेली आहे. 12. विरुध्दपक्षाचे असे म्हणणे आहे की, त्याने तक्रारकर्त्यास भूखंड विक्रीचा करारनामाच करुन दिला नाही तसेच तक्रारकर्त्या कडून भूखंडाच्या मासिक किस्ती स्विकारल्या नाहीत त्याच बरोबर गणेश हाऊसिंग एजन्सीशी त्याचा काहीही संबध नसल्याचे लेखी उत्तरात नमुद केले आहे. विरुध्दपक्षाने एकदम विरोधी भूमीका घेऊन तक्रारकर्त्याचे तक्रारीस पूर्णपणे विरोधात उत्तर दिल्याचे दिसून येते.
13. मंचाचे मते श्री गणेश हाऊसिंग एजन्सीशी विरुध्दपक्ष अशोक आनंदराव धापोडकर याचा कोणताही संबध नव्हता तर करारनामा/बयानापत्रावर ब्रँच ऑफीस या स्तंभासमोर अशोक धापोडकर, पांचपावली रोड, कुंभारपुरा, पिवळया मार्बतीचे बाजूला, जागनाथ बुधवारी, नागपूर फोन क्रं 2733209 असे छापण्याची काहीच आवश्यकता नव्हती. तसेच लिहून देणार या स्तंभामध्ये श्री गणेश हाऊसिंग एजन्सी तर्फे श्री अशोक आनंदराव धापोडकर रा.जागनाथ बुधवारी नागपूर यांचे नाव छापलेले आहे. असे असताना बयानापत्र विरुध्दपक्ष अशोक आनंदराव धापोडकर याने नाकारलेले आहे तसेच गणेश हाऊसिंग एजन्सी तर्फे निर्गमीत पावत्या सुध्दा नाकारलेल्या आहेत. श्री गणेश हाऊसिंग एजन्सीशी जर विरुध्दपक्ष अशोक आनंदराव धापोडकर यांचा कुठलाही संबध नसताना बयानापत्रावर अशोक आनंदराव धापोडकर यांचे नाव, पत्ता व दुरध्वनी क्रमांक छापण्याची गरज नव्हती. सर्वसाधारण व्यवहारा मध्ये कोणी कोणाचेही नाव आणि पत्ता दुरध्वनीसह कोणताही संबध नसताना छापू शकत नाही. त्यामुळे विरुध्दपक्षाचे असे म्हणणे की, त्यांचा श्री गणेश हाऊसिंग एजन्सीशी संबध नाही या म्हणण्यात कोणतेही तथ्य दिसून येत नाही.
14. विरुध्दपक्षाचा असाही एक आक्षेप आहे की, भूखंडाचे बयानापत्रावर मुद्रांक शुल्क भरलेले नसल्याने त्या कराराला कुठलाही अर्थ उरत नाही. या संदर्भात विरुध्दपक्षाने मा. वरिष्ठ न्यायालयाचे AIR 1946 PC 51, AIR 1962 AP 132, AIR 1972 AP 373 & AIR 1981 AP 175 निकालपत्रांवर भिस्त ठेवली. 15. मंचाचे मते तक्रारकर्त्याने बयानापत्रा सोबत भूखंडाच्या मासिक किस्ती भरल्याच्या पावत्या सुध्दा अभिलेखावर दाखल केलेल्या आहेत आणि त्यावरुन तक्रारकर्त्याने भूखंडापोटी विरुध्दपक्षास मोबदला अदा केलेला असल्याने तक्रारकर्त्याची तक्रार ग्राहक संरक्षण कायद्दा अंतर्गत मोडते, त्यामुळे विरुध्दपक्षाचे वरील आक्षेपात कोणतेही तथ्य दिसून येत नाही.
16. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षास दि.26.09.2012 रोजी नोंदणीकृत डाकेने कायदेशीर नोटीस पाठविली असता सदर नोटीसचे पोच वर श्री गणेश हाऊसिंग एजन्सीचा स्टॅम्प मारुन स्वाक्षरी करुन सदर नोटीस स्विकारल्याची पोच आहे. विरुध्दपक्ष अशोक आनंदराव धापोडकर याचा लेखी उत्तरानुसार असा आक्षेप आहे की, श्री गणेश हाऊसिंग एजन्सीशी कुठलाही संबध नाही तर श्री गणेश हाऊसिंग एजन्सीव्दारे स्विकारलेल्या कायदेशीर नोटीसला त्यांनी अधिवक्ता श्री सुनिल के. सवाई यांचेव्दारा दि.05.11.2012 व्दारे उत्तर कसे काय दिले कारण विरुध्दपक्ष अशोक आनंदराव धापोडकर यांचेच लेखी उत्तरा नुसार विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याच्या नोटीसला उत्तर दि.05.11.2012 रोजी दिलेले आहे. यावरुन असे सिध्द होते की, श्री गणेश हाऊसिंग एजन्सीव्दारे केल्या गेलेल्या व्यवहाराशी अशोक आनंदराव धापोडकर यांचा प्रत्यक्ष/अप्रत्यक्षरित्या संबध आहे. 17. तक्रारकर्त्याचे तक्रारी नुसार त्याने वेळोवेळी मासिक किस्तीव्दारे भूखंडापोटी दि.25.05.2004 ते दि.05.12.2008 या कालावधीत विरुध्दपक्ष श्री गणेश हाऊसिंग एजन्सी, नागपूर येथे बयानापत्रा नुसार भूखंडापोटीची संपूर्ण रक्कम रुपये-26,250/- जमा केली आहे व आपले म्हणण्याचे पुष्टयर्थ श्री गणेश हाऊसिंग एजन्सी, नागपूर (Regd. No.-8233/03 Nagpur) व्दारा निर्गमित पावत्यांच्या प्रती दाखल केलेल्या आहेत, त्यावरुन तक्रारकर्त्याने नमुद कालावधीत बयानापत्रा नुसार भूखंडापोटी संपूर्ण रक्कम रुपये-26,250/- विहित मुदतीत भरल्याची बाब सिध्द होते. अशाप्रकारे तक्रारकर्त्याने बयानापत्रा नुसार विहित मुदतीत भूखंडाची संपूर्ण रक्कम विरुध्दपक्षाकडे जमा करुनही त्यास भूखंडाचे विक्रीपत्र विरुध्दपक्षाने नोंदवून दिले नाही व दोषपूर्ण सेवा दिली ही बाब सिध्द होते. 18. विरुध्दपक्षाने करारा नुसार विहित मुदतीत तक्रारकर्त्यास भूखंडाचे विक्रीपत्र करुन दिलेले नाही. त्यामुळे विरुध्दपक्षाने करारा नुसार करारातील नमुद भूखंडाची नोंदणीकृत खरेदी तक्रारकर्त्याचे नावे करुन द्दावी. नोंदणीचा खर्च तक्रारकर्त्याने सोसावा व असे करणे विरुध्दपक्षास शक्य नसल्यास तक्रारकर्त्याने भूखंडापोटी विरुध्दपक्षा कडे जमा केलेली रक्कम रुपये-26,250/- शेवटची मासिक किस्त जमा केल्याचा दिनांक-05.12.2008 पासून ते प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.12% दराने व्याजासह तक्रारकर्त्यास परत करावी. विरुध्दपक्षाचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्त्यास झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल व आर्थिक नुकसानी संबधाने रुपये-7000/- आणि तक्रारखर्च म्हणून रुपये-5000/- नुकसान भरपाई देणे योग्य राहील असे मंचाचे मत आहे. 19. वरील सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन, प्रकरणात खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो. ::आदेश:: तक्रारकर्त्याची तक्रार विरुध्दपक्ष श्री गणेश हाऊसिंग एजन्सी तर्फे अशोक आनंदराव धापोडकर यांचे विरुध्द अंशतः मंजूर करण्यात येते. 1) विरुध्दपक्ष श्री गणेश हाऊसिंग एजन्सी तर्फे अशोक आनंदराव धापोडकर यास निर्देशित करण्यात येते की, त्याने तक्रारकर्त्याचे नावे करारातील नमुद तेवढया क्षेत्रफळा एवढया भूखंडाची नोंदणीकृत खरेदी करुन द्दावी. खरेदी नोंदणीचा खर्च तक्रारकर्त्याने सहन करावा. विरुध्दपक्षास करारातील नमुद भूखंडाची विक्री तक्रारकर्त्याचे नावे करुन देणे शक्य नसल्यास तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडे भूखंडापोटी जमा केलेली एकूण रक्कम रु.-26,250/- (अक्षरी रुपये सव्वीस हजार दोनशे पन्नास फक्त) दि.05.12.2008 पासून ते प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.12% दराने व्याजासह तक्रारकर्त्यास परत करावी. 2) विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यास झालेल्या शारिरीक, मानसिक त्रासा बद्दल व आर्थिक नुकसानी बद्दल रु.-7000/-(अक्षरी रु. सात- हजार फक्त) आणि तक्रारखर्च म्हणून रु.-5000/-(अक्षरी रु.पाच- हजार फक्त) द्दावेत. 3) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्षाने निकालपत्राची प्रत प्राप्त झाल्या पासून 30 दिवसांचे आत करावे. 4) निकालपत्राची प्रमाणित प्रत उभय पक्षांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात यावी. |