Umesh Pandurang Jadhav filed a consumer case on 06 Jul 2015 against Ganesh Developers in the Satara Consumer Court. The case no is cc/14/205 and the judgment uploaded on 28 Aug 2015.
सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर
उपस्थिती - मा.सौ.सविता भोसले,अध्यक्षा
मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्य.
मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्या.
तक्रार क्र. 205/2014.
तक्रार दाखल दि.3-12-2014.
तक्रार निकाली दि. 6-7-2015.
श्री.उमेश पांडुरंग जाधव,
रा.ओझर्डे, ता.वाई, जि.सातारा. .... तक्रारदार
विरुध्द
1. गणेश डेव्हलपर्सतर्फे प्रोप्रा.
गणेश बबनराव हरचुंदे.
रा.मेणवली, ता.वाई, जि.सातारा.
2. सौ.इंदुमती विजय देसाई.
रा.सोनगिरवाडी, वाई, ता.वाई, जि.सातारा. .... जाबदार
तक्रारदारातर्फे –अँड.ए.आर.कदम.
जाबदार क्र.1 – एकतर्फा आदेश.
जाबदार क्र.2- नो से आदेश.
न्यायनिर्णय
सदर न्यायनिर्णय मा.श्री.श्रीकांत कुंभार, सदस्य, यानी पारित केला
1. तक्रारदाराने सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 नुसार यातील जाबदारांविरुध्द त्यांनी दिलेल्या सेवेतील त्रुटीबाबत दाखल केलेली आहे.
तक्रारदारांचे तक्रारीचा थोडक्यात आशय खालीलप्रमाणे-
तक्रारदार हे मु.पो.ओझर्डे, ता. वाई, जि.सातारा येथील रहिवासी असून यातील जाबदार क्र.1 हे बांधकाम व्यावसायिक असून जाबदार क्र.2 हे जमीनमालक आहेत. जाबदार क्र.1 हे गणेश डेव्हलपर्स या नावाने गृहप्रकल्पासाठी जागा घेऊन त्या विकसित करुन त्यावर सदनिका प्रकल्प उभारुन त्याची विक्री करणेचा व्यवसाय जाबदार क्र.1 करतात. प्रस्तुत जाबदार क्र.2 यानी त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या वाई, ता.वाई जि.सातारा येथील वाई नगरपालिकेच्या हद्दीतील सोनगिरवाडी येथील सि.स.नं.2369अ, क्षेत्र 175.6 चौ.मी.संपूर्ण मिळकत पूर्वेस विठ्ठल साळुंखे यांची मिळकत, दक्षिणेस सदाशिव सावंत यांची मिळकत पश्चिमेला चिंचकर व सणस यांची मिळकत, उत्तरेला रस्ता व नदी. येणेप्रमाणे चतुःसीमेतील मिळकतीवर सदनिका विकसित करणेचे ठरविले व त्याप्रमाणे वाई नगरपालिकेकडून दि.21-4-2011 रोजी बांधकाम परवाना घेतला व सदनिका स्वरुपात जागा विकसित करणेसाठी जाबदार क्र.2 व जाबदार क्र.1 यांचेमध्ये नोटराईज्ड विकसन करारनामा झाला. त्यास अनुसरुन विषयांकित मिळकतीवर जाबदार क्र.2 यांचे वतीने भागीदार म्हणून विषयांकित मिळकतीवर ओनरशिप तत्वावर सदनिकांचे बांधकाम करुन त्यातील गाळे, सदनिका विक्री करणेचा नोटरी विकसन करारनामा जाबदार क्र.1 यानी जाबदार क्र.2 कडून दि.13-8-2009 रोजी करुन घेतला असून त्याद्वारे जाबदाराना तयार होणा-या सदनिकांची विक्री करणे त्याअनुषंगाने इमारत बांधकामाचे सर्वाधिकार जाबदार क्र.1 याना जाबदार क्र.2 यानी दिलेले आहेत, त्याप्रमाणे विषयांकित मिळकतीवर जाबदार क्र.1 यानी भगवती कॉम्प्लेक्स या नावाने जाबदार क्र.1 यानी सदनिकांचे बांधकाम केले.
प्रस्तुत तक्रारदारांचे गावी वडिलोपार्जित 11' × 11' चे घर असून ते रहिवासासाठी सर्व कुटुंबाला पुरेसे नसलेने तक्रारदारानी त्यांचे मुलांचे भावी शिक्षणाचे दृष्टीने वाई येथे वास्तव्य करावे असे ठरवून त्याना जाबदार क्र.1 हे बांधीत असलेल्या भगवती कॉम्प्लेक्समधील दुस-या मजल्यावरील सदनिका क्र.3 यांचे क्षेत्र 340.00 चौ.फूट(बिल्टअप एरिया) ही जाबदार क्र.1 व 2 यांचेशी चर्चा करुन खरेदी घेणेचे ठरले. त्याची सर्वानुमते संपूर्ण किंमत रु.4,00,000/-(रु.चार लाख मात्र) इतकी ठरली व एवढयाच किंमतीमध्ये दुस-या मजल्यावरील सदनिका क्र.4 तक्रारदाराना खरेदी देणेचे ठरले, त्याप्रमाणे जाबदार क्र.1 यानी दि.3-8-2011 रोजी तसा नोटरीद्वारे सदनिका खरेदी किंमत रु.4,00,000/-(रु.चार लाख मात्र) पैकी रु.50,000/-(रु.पन्नास हजार मात्र)विसार रक्कम म्हणून रोख स्विकारुन जाबदार क्र.1 यानी साठेखत करुन दिले, त्याप्रमाणे पैसे पोहोचलेची रोखीची पावती जाबदार क्र.1 ने अलाहिदा तक्रारदाराना दिली आहे व नोटराईज्ड करारातील अटी व शर्तीप्रमाणे रक्कम रु.3,50,000/- (रु.तीन लाख पन्नास हजार मात्र)ची रक्कम नोटरी करारनामा झालेपासून सहा महिन्याचे आत बांधकामाचे टप्प्याटप्प्याने जाबदाराना देणेचे ठरले होते परंतु त्याप्रमाणे जाबदार क्र.1 यानी करारनाम्यातील अटी व शर्तीस बाजूला ठेवून सदनिका बांधकामासाठी पैसे लागणार आहेत अशी वेगवेगळी कारणे देऊन तक्रारदारांकडून उर्वरित रक्कम रु.3,50,000/- ची रक्कमही मुदतीपूर्वी वेळोवेळी घेतली व सदनिकेचा ताबा देणेपूर्वीच वसूल केली व प्रत्यक्षात विषयांकित सदनिकेचा ताबा तक्रारदाराना दिला नाही त्यामुळे तक्रारदारानी जाबदाराकडे मे.दुय्यम निबंधकसो. वाई यांचे कार्यालयात विषयांकित सदनिका खरेदीचे साठेखत करारनामा करुन देणेसाठी तक्रारदारांनी तगादा लावल्यावर प्रस्तुत जाबदारानी मे.दुय्यम निबंधकसो. वाई यांचेसमोर रजि.द.क्र.3394/2011 ने दि.22-9-2011 रोजी नोंदणीकृत खरेदी करारनामा तक्रारदाराना करुन दिला, त्यावेळीही दस्तापोटी व दस्तावेळी विषयांकित सदनिकेपोटी पुन्हा रक्कम रु.1,50,000/- स्विकारले मगच दस्त करुन दिला, त्यानंतर प्रस्तुत जाबदाराना तक्रारदारानी अजून रु.2,00,000/- दिले तरच त्याना पार्किंग व टेरेस वापर करणेस दिले जाईल व त्यानंतरच खरेदीपत्र करुन देईन अशी धमकी दिली व विषयांकित सदनिका दुस-यास विक्री करणेची धमकी दिली, त्यामुळे तक्रारदारानी घाबरुन जाऊन पै पाहुण्यांकडून उसनवारी करुन दि.7-1-2012 रोजी रु.1,50,000/-(रु.एक लाख पन्नास हजार मात्र) ठरले व्यवहारापेक्षा जादा जाबदाराला अदा केले, तरीही सदर जाबदारानी या तक्रारदारास विषयांकित सदनिकेचा ताबा व खरेदीपत्र करुन दिले नाही व प्रस्तुत तक्रारदाराना सदोष सेवा दिली म्हणून तक्रारदारानी मे.मंचात तक्रार दाखल करुन जाबदाराकडून भगवती कॉम्प्लेक्स या सदनिका समुहातील दुस-या मजल्यावरील सदनिका क्र.4 याचा कब्जेपट्टीसह कब्जा/ताबा मिळावा व विषयांकित सदनिकेच्या व्यवहारापोटी जादा घेतलेली रक्कम रु.1,50,000/- (रु.एक लाख पन्नास हजार मात्र) व त्यावर दि.7-1-2012 पासून द.सा.द.शे.18 टक्के दराने होणारे व्याजासह रक्कम मिळणेस व साठेखत करारात ठरलेप्रमाणे 18 महिन्यात सदर सदनिकेचा कब्जा वेळेत न दिल्याने व आजअखेर न मिळाल्याने तक्रारदाराना रहाण्याची गैरसोय सोसावी लागली, त्यासाठी मे.कोर्टात दाद मागावी लागली, त्याना अत्यंत गंभीर स्वरुपाचा मानसिक, शारिरीक त्रास सोसावा लागला, त्यापोटी रु.5,00,000/- व अर्जाचे खर्चापोटी रु.25,000/- मिळावेत. प्रस्तुत जाबदारानी जर विषयांकित सदनिका दुस-यास विक्री केली असेल तर साठेखताने सदनिका खरेदीपोटी स्विकारलेली रक्कम रु.5,50,000/- त्यावर दि.3-8-2011 पासून द.सा.द.शे.18 टक्के दराने व्याज मिळावे त्याचप्रमाणे विषयांकित सदनिका जादा व संपूर्ण पैसे स्विकारुनही ती तक्रारदाराना न देता त्यांच्या परस्पर दुस-या व्यक्तीस विक्री केल्याने त्यांची झालेली फसवणूक, सदनिका मिळणेच्या हक्कापासून वंचित रहावे लागलेमुळे झालेली नुकसानी रु.5,00,000/- मिळावी अशी मागणी तक्रारदार मे.मंचास करतात.
3. सदर कामी तक्रारदारानी नि.1 कडे तक्रारअर्ज, त्याचे पृष्टयर्थ नि.2 कडे प्रतिज्ञापत्र, नि.5 सोबत पुराव्याचे एकूण 11 दस्तऐवज त्यामध्ये नि.5/1 कडे दि.3-8-2011 रोजीचा नोटराईज्ड साठेखत करार, नि.5/2 कडे जाबदार क्र.1 यानी तक्रारदाराना रु.50,000/- पोहोचलेची दिलेली पोहोचपावती, नि.5/3 कडे जाबदार क्र.1 यानी तक्रारदाराना दि.22-9-2011 रोजी करुन दिलेला नोंदणीकृत साठेखत करारनामा, नि.5/4 कडे तक्रारदारानी जाबदाराना अदा केलेल्या रु.2,00,000/-ची पावती, नि.5/5 कडे प्रस्तुत तक्रारदारानी जाबदाराना अदा केलेल्या रु.1,50,000/-ची दिलेली पावती, नि.5/6 कडे रजि.द.क्र.2876/2012 चा इंडेक्स उतारा, नि.5/7 कडे तक्रारदाराचे रेशनकार्ड, नि.5/8 कडे तक्रारदारांचे वडिलांचे जागेचा घरजागेचा उतारा, नि.5/8, 5/9 व 5/10 कडे घरमिळकत क्र.1424 ची उता-याची व इतर घरमिळकतीची सहीशिक्क्याची नक्कल, नि.5/11 कडे जाब दार क्र.1 यानी तक्रारदाराना करुन दिलेले रजि.द.क्र.1590/2013 दि.28-3-2013 रोजीचे डीड ऑफ अपार्टमेंटची सत्यप्रत, नि.7 कडे तूर्तातूर्त ताकीद अर्ज, नि.8 कडे त्याचे पृष्टयर्थ प्रतिज्ञापत्र, नि.16 कडे पुराव्याचे प्रतिज्ञापत्र व नि.17 कडे पुरावा संपलेची पुरसीस तक्रारदारानी दाखल करुन त्यांची तक्रार व पुरावा मंचासमोर मांडलेला आहे.
4. यातील जाबदार क्र.1 व2 याना मंचातर्फे सदर प्रकरणाच्या नोटीसा पाठवणेत आल्या. सदर नोटीसा जाबदाराना मिळाल्याच्या पोस्टाच्या पोहोचपावत्या प्रकरणी नि.10 व 10/1 कडे आहेत, त्याप्रमाणे यातील जाबदार क्र.1 याना नोटीस मिळूनही ते मंचात गैरहजर असल्यामुळे मंचाने त्यांचेविरुध्द नि.1 वर दि.17-1-15 रोजी एकतर्फा आदेश पारित केला आहे. यातील जाबदार क्र.2 हे मंचामध्ये नि.13 व नि.15 कडे अँड.ओक यांची नियुक्ती करुन हजर झाले. त्यांनी म्हणणे देणेकामी नि.12, 14 व 16 कडे अर्ज देऊनही वेळेत म्हणणे दिले नाही. नि.16 चे जाबदार क्र.2 चे वकील अर्जावर जाबदाराला म्हणणे देणेस रु.500/- कॉस्ट व शेवटची संधी म्हणून दि.5-3-15 नेमली. भरपूर संधी देऊनही जाबदारानी त्यांचे म्हणणे नेमले तारखेस दाखल केले नाही व त्यानंतरही जाबदार क्र.2 व त्यांचे वकील मंचात गैरहजर राहिले व नि.16 चे म्हणणे देणेचे मुदत मागणी अर्जावरील कॉस्ट रु.500/- जाबदाराने भरली नाही, त्यामुळे जाबदार क्र.2 विरुध्द नि.1 वर नो से आदेश पारित केला त्यामुळे तक्रारदारांची तक्रार एकतर्फा न्यायनिर्णयासाठी घेणेत आली.
5. यातील तक्रारदारांची तक्रार व प्रकरणी दाखल पुरावे यांचा विचार करता आमचेपुढे प्रस्तुत प्रकरण न्यायनिर्गत करणेसाठी खालील मुद्दे उपस्थित होतात-
अ.क्र. मुद्दा निष्कर्ष
1. तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक आहेत काय? होय.
2. प्रस्तुत जाबदारानी यातील तक्रारदाराना भगवती कॉम्प्लेक्स
अपार्टमेंट, दुस-या मजल्यावरील सदनिका क्र.4 ही मे.दुय्यम
निबंधक वाई यांचेकडील रजि.साठेखत करारनाम्याप्रमाणे ठरलेली
संपूर्ण रक्कम स्विकारुनही व ठरले रकमेपेक्षा जादा पैसे घेऊनही
प्रस्तुत तक्रारदाराना कराराप्रमाणे ठरलेवेळी सदनिका न देऊन
तक्रारदाराना सदोष सेवा दिली आहे काय? होय.
3. प्रस्तुत जाबदाराने विषयांकित सदनिका क्र.4 तक्रारदाराना
रजि.कराराने दिली असतानाही त्याची पूर्ण किंमत वसूल करुनही
विषयांकित सदनिका अन्य व्यक्तीस हस्तांतरीत/विक्री केलेचे
तक्रारदार शाबित करतो काय? होय.
4. प्रस्तुत तक्रारदार हे विषयांकित सदनिकेचे खरेदीपत्र करुन
ताब्यात मिळणेस व सदनिकेच्या ठरलेल्या किंमतीशिवाय
जाबदाराने घेतलेले रु.1,50,000/- सव्याज परत मिळणेस पात्र
आहे काय? होय.
5. प्रस्तुत जाबदारानी तक्रारदाराना रजि.कराराने दिलेली सदनिका
जाबदारानी विक्री केली असलेस त्यापोटी तक्रारदारांची झालेली
फसवणूक घरजागेअभावी झालेली नुकसानी, हेळसांडीपोटी
रु.5,00,000/- मिळोस तक्रारदार पात्र आहेत काय व ही
बाब तक्रारदार शाबित करतो का? होय.
(निकालपत्रात दिलेप्रमाणे)
6. अंतिम आदेश काय? तक्रार अंशतः मंजूर.
7. कारणमीमांसा- मुद्दा क्र.1 ते 6-
प्रस्तुत प्रकरणातील तक्रारदारांचा तक्रारअर्ज व त्यासोबतचे नि.2 चे प्रतिज्ञापत्र व नि.5 कडील पुराव्याचे एकूण 11 दस्तऐवज यांची पडताळणी करता असे दिसते की तक्रारदारांचे मौजे.ओझर्डे, ता.वाई, जि.सातारा येथे वडिलोपार्जित रहाते घर असून त्याचे क्षेत्र 355.91 चौ.फू.इतके आहे, त्यावर कच्च्या पक्क्या विटा मातीमध्ये बांधलेले घर असून 11 × 11 फुटाच्या दोन खोल्या असून त्यामध्ये तक्रारदारांचे आईवडिल व तक्रारदार, त्यांची चार मुले, तक्रारदारांचे भाऊ व त्यांचे कुटुंबिय रहातात. इतक्या सर्व लोकांना रहाणेसाठी ही जागा अत्यंत अपुरी पडते त्यामुळे प्रत्येकाचे दैनंदिन जीवन जगणे व महत्वाच्या बाबीमध्ये खाजगीपण जपणे त्याना अशक्य होते हे नि.5/8 ते 5/10 कडील ओझर्डे ग्रामपंचायतीकडील तक्रारदारांचे घरमिळकतीचा उतारा अभ्यासला असता स्पष्ट होते त्यामुळे भविष्यकालीन वाढत्या कुटुंबियांचे दृष्टीने प्रस्तुत तक्रारदारानी गरजेपोटी नवीन घराचा शोध घेणे चालू केले, त्याप्रमाणे त्याना प्रस्तुत जाबदार हे वाई, ता.वाई जि.सातारा येथील वाई नगरपालिका हद्दीतील सोनगिरवाडी येथील मिळकत सि.स.नं.2369 यांचे क्षेत्र 175.6 चौ.मी.वरती प्रस्तुत जाबदार क्र.1 यानी गणेश डेव्हलपर्स या नावाने बिल्डिंग कॉंट्रॅक्टरचा व्यवसाय करणारे व जाबदार क्र.2 हे त्यांच्या मालकीची वरील घरमिळकत विकसित करणेसाठी जाबदार क्र.2 यानी नि.5/3 च्या दस्तऐवजाने जाबदार क्र.1 याना मे.दुय्यम निबंधक वाई, ता.वाई, जि.सातारा यांचेकडील रजि.दस्त क्र.3394/2011 दि.13-8-2009 रोजी रजि.विकसन करारनामा करुन दिला. हे नि.5/3 च्या करारासोबत जोडलेल्या दस्तऐवजावरुन स्पष्ट होते, त्याप्रमाणे प्रस्तुत जादार क्र.1 यानी आवश्यक ते परवाने वगैरे घेऊन विषयांकित मिळकतीवर भगवती कॉम्प्लेक्स या नावाने अपार्टमेंट बांधणेचे ठरविले. त्याप्रमाणे जाबदार क्र.2 यानी वाई येथील मे.दुय्यम निबंधकसो. यांचे कार्यालयात रजि.द.क्र.3394/2011, दि.13-8-2009 रोजी यातील जाबदार क्र.1 याना सदनिका निर्माण, त्याची विक्री व या अनुषंगाने सर्व व्यवहार करणेसाठी कुलमुखत्यारपत्र नि.5/3 ब लिहून दिले आहे व त्यास अनुसरुन जाबदार क्र.1 यानी यातील तक्रारदारास प्रकरणी नि.5/3 कडे दाखल असलेल्य दस्तऐवजाने दि.22-9-2011 रोजी वाई येथील मे.दुय्यम निबंधकसो.यांचे कार्यालयात रजि.दस्त क्र.3394/2011 ने जाबदार भगवती कॉम्प्लेक्स या नावाने बांधकाम करीत असलेल्या सदनिका समुहामधील दुस-या मजल्यावरील सदनिका क्र.4 याचे क्षेत्र 340.00 चौ.फूट बिल्टअप क्षेत्र 31.59 चौ.मी.ही सदनिका याची एकूण व अंतिम किंमत रु.4,00,000/-(रु.चार लाख मात्र)ला खरेदी देणेचे ठरवून त्याप्रमाणे तक्रारदाराकडून जाबदार क्र.1 यानी खालीलप्रमाणे रकमा स्विकारल्या आहेत-
अ.क्र. दिनांक रक्कम रु.
1. नि.5/1 कडील नोटरीसमोरील रजिस्टर साठेखत करतेवेळी
नि.5/2 प्रमाणे दिलेली पावती क्र.332 प्रकरणी दाखल आहे,
दिलेली रु.50,000/-ची रक्कम तक्रारदारानी जाबदाराना दिली. 50,000/-
2. नि.5/3 प्रमाणे प्रस्तुत जाबदारानी या तक्रारदारास मे.दुय्यम
निबंधकसो.वाई यांचेकडे करुन दिलेल्या रजि.खरेदी करारनामा
सदनिका क्र.4 साठी रजि.द.क्र.3394/2011 दि.22-9-11 रोजी
दस्तावेळी जाबदारास
दिलेली रक्कम 1,50,000/-
3. नि.5/4 प्रमाणे पावती क्र.334 प्रमाणे दि.10-10-2011
रोजी प्रस्तुत तक्रारदाराने जाबदाराना दिलेल्या सदनिका क्र.4
साठी रु.दोन लाख मात्र
अदा केले. 2,00,000/-
4. नि.5/5 प्रमाणे तक्रारदारानी (संयुक्त पावती) जाबदाराना
दिलेल्या पावती क्र.352 प्रमाणे सदनिका क्र.3 व 4 साठी
रु.तीन लाख मात्र दिले. पैकी तक्रारदाराचे त्यातील सदनिका
क्र.4 साठी रु.1,50,000/- दिले. 1,50,000/-
याप्रमाणे तक्रारदारानी जाबदाराना सदनिका क्र.4 साठी दिलेली रक्कम रु. 5,50,000/-
वरील रकमा या विषयांकित अपार्टमेंटमधील दुस-या मजल्यावरील सदनिका क्र. 4 यांचेपोटी यातील तक्रारदारानी जाबदाराना दिल्या असून त्याच्या रोखीच्या पावत्या जाबदारानी दिलेल्या आहेत.
याठिकाणी नि.5/2, 5/4, 5/5 या प्रकरणी दाखल असलेल्या पावत्यांचे अवलोकन केले असता रमेश पांडुरंग जाधव व उमेश पांडुरंग जाधव या दोन सख्ख्या भावांनी जाबदाराकडे त्यांच्या भगवती कॉम्प्लेक्स मधील दुस-या मजल्यावरील सदनिका क्र. 3 व 4 ही बुक केली होती. दोन्ही सदनिकांचे स्वतंत्र रजिस्टर खरेदी करारनामे आहेत. त्यांचे सदनिकांचे प्रत्यक्ष प्रत्येकी क्षेत्र 340.00 चौ.फू. बिल्टअप क्षेत्र 31.59 चौ.मी असे आहे व दोन्ही सदनिकांची किंमतही प्रत्येकी रक्कम रु.4,00,000/- इतकी ठरली होती परंतु जाबदारानी तक्रारदाराकडून रोखीने पैसे स्विकारताना रोखीची पावती मात्र सदनिका क्र.3 व 4 साठी दिली आहे, परंतु यातील सदनिका क्र.4 बाबत खरेदी करारदार श्री.उमेश जाधव याने मे.मंचात स्वतंत्रपणे तक्रार क्र.205/14 दाखल केली आहे त्यामुळे पावत्यांबाबतचा हा खुलासा येथे केला आहे. वरील जमा पावत्यांपैकी नि.5/4 कडील पावती क्र.334, दि.10-10-2011च्या पावतीवर जरी जाबदाराने सदनिका क्र. 3 व 4 चे खरेदीपोटी असे नमूद केले असले तरी सदर रक्कम रु.2,00,000/-(रु.दोन लाख मात्र) तक्रादारानी त्यांच्या विषयांकित सदनिका क्र.4 साठी भरले आहेत त्यामुळे तक्रारदाराचे एकटयाचे नावे सदर रोखीची पावती दिली आहे, त्याचप्रमाणे नि.5/5 कडील पा.क्र.352 ही सदनिका क्र.4 साठी असून ती प्रस्तुत तक्रारदार रमेश जाधव यांचे संयुक्त नावे असून त्याद्वारे एकूण भरणा रक्कम रु.3,00,000/-(रु.तीन लाख मात्र) पैकी तक्रारदाराने रु.1,50,000/-(रु.एक लाख पन्नास हजार मात्र) भरले आहेत त्याचप्रमाणे नि.5/2 कडे जाबदारानी तक्रारदार व त्यांचे भाऊ यांचे संयुक्त नावे रोखीची पावती दिली असून या निशाणी 5/1 कडील नोटराईज्ड दस्तऐवजावर (साठेखत) सोबत रोखीची रु.1,00,000/-ची पावती असून नोटराईज्ड दस्तावर रु.50,000/- भरणा सदनिका क्र.4 साठी मिळाल्याचे नमूद आहे. त्यामुळे तक्रारदाराचे या पावतीमध्ये रु.50,000/-चे योगदान असल्याचे स्पष्ट होते व तक्रारदारानी दि.22-9-2011 रोजी दुय्यम निबंधकसो. यांचेकडील करारपत्राप्रमाणे रु.1,50,000/-दिलेले आहेत म्हणजेच तक्रारदाराचे जाबदाराकडे विषयांकित सदनिकेचे खरेदीपोटी रु.5,50,000/-(रु.पाच लाख पन्नास हजार मात्र)रोख भरणा केलेले आहेत हे स्पष्ट होते म्हणजेच रजि.खरेदीकरारामध्ये सदनिकेच्या ठरलेच्या किंमतीपेक्षा रु.1,50,000/- या जाबदारानी तक्रारदाराकडून जादा घेतलेचे दिसून येते. कराराबाहेर जाऊन अशी जाबदारांची कृती ही त्यांनी त्यांच्या व्यवसायामध्ये अनुचित व्यापारी प्रथेचा केलेला अवलंब असल्याचे आमचे स्पष्ट मत आहे. वरीलप्रमाणे जाबदाराकडे जादा झालेल्या पैशाचा हिशोब पहाता दि.7-1-2012 अखेर संपूर्ण रक्कम रु.4,00,000/- कराराप्रमाणे जाबदाराला मिळालेले असल्याचे स्पष्ट होते. उभयतामधील दि.22-9-2011 रोजीच्या करारनाम्याप्रमाणे करार झालेपासून 18 महिन्याचे आत दि.22-4-2013 पूर्वी सदनिकेचा कब्जा जाबदारानी तक्रारदारास देणे आवश्यक होते. परंतु त्यानी तो मुदतीत दिला नाही. वरील सर्व व्यवहारावरुन जाबदार हे सेवापुरवठादार व तक्रारदार हे त्यांचे ग्राहक असलेचे निर्विवादरित्या शाबित होते त्यामुळे मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देतो.
7.2- प्रस्तुत प्रकरणातील जाबदारानी नि.5/1 व 5/3 कडील उभयतामधील विषयांकित सदनिका क्र.4 च्या खरेदी करारनाम्याप्रमाणे दि.22-9-2011 पासून 18 महिन्याचे आत म्हणजे दि.22-4-2013 अखेर पर्यंत विषयांकित सदनिकेचा कब्जा देणे आवश्यक असताना तो तक्रारदाराना दिला नाही. त्यासाठी तक्रारदारानी जाबदाराकडे वारंवार विनंत्या करुनही आजअखेर दिला नाही. तक्रारदारास त्यांच्या सदनिका प्राप्तीच्या हक्कापासून वंचित ठेवले. कराराबाहेर जाऊन त्यातील अटी व शर्तीचा भंग करुन जाबदारानी तक्रारदारांकडून रक्कम रु.1,50,000/- जास्त घेतली तरीही विषयांकित सदनिकेचा ताबा जाबदारानी तक्रारदाराना कराराप्रमाणे 18 महिन्याचे मुदतीत व मुदतीनंतर आजपर्यंतही दिला नाही, एवढेच नव्हे तर आमचेसमोर हे सुध्दा स्पष्ट झाले की, प्रस्तुत जाबदारानी तक्रारदाराना रजि.खरेदी कराराने त्यांची ठरलेली संपूर्ण किंमत रु.4,00,000/- स्विकारुनही तक्रारदारांची विषयांकित सदनिका जाबदारानी मे.वाई येथील दुय्यम निबंधकसो. यांचे कार्यालयात नोंदणीकृत दस्त क्र.2786/2012 ने दि.12-9-2012 रोजी रक्कम रु.9,80,000/-(रु.नऊ लाख ऐंशी हजार मात्र) स्विकारुन तक्रारदारांची सदनिका क्र.4 व त्यांच्या भावाची सदनिका क्र.3 ही रामानंद किसन कचरे, रा.बावधन, ता.वाई याना विक्री केलेचे दिसून आले व या व्यवहाराची कोणतीही माहिती जाबदारानी तक्रारदाराना दिली नाही. एवढेच नव्हे तर श्री.कचरे याना तक्रारदारांची विषयांकित सदनिका क्र.4 ही विक्री केलेवर वरील व्यवहारानंतर याच विषयांकित सदनिका क्र.4 चे डीड ऑफ अपार्टमेंट जाबदारानी दि.28-3-2013 रोजी रजि.द.क्र.1590/2013 ने तक्रारदाराना करुन दिले आहे ते विषयांकित सदनिकेची विक्री केलेवर सदरचे डीड प्रकरणी नि.5/11 कडे दाखल आहे. प्रस्तुत जाबदारानी तक्रारदाराना करुन दिलेल्या रजि.खरेदी करारनाम्यातील अटी व शर्तीचा स्वतःच भंग करुन हे कृत्य केले आहे ही बाब प्रकरणी तक्रारदारानी दाखल केलेल्या नि.5/6 कडील मे.दुय्यम निबंधकसो. वाई यांच्या इंडेक्स उता-यावरुन स्पष्टपणे दिसून येते व या व्यवहारानंतर तक्रारदारानी जाबदाराकडून घेतलेले सर्व पैसे करारातील अटीप्रमाणे द.सा.द.शे.18% व्याजाने देणेची मागणी करुनही त्या या तक्रारदाराना परत दिलेल्या नाहीत व सदनिकाही दिली नाही. वरील कायदेशीर वस्तुस्थिती पहाता प्रस्तुत जाबदारानी वरीलप्रमाणे विविध प्रकारे प्रस्तुत तक्रारदाराना अत्यंत गंभीर स्वरुपाच्या सदोष सेवा दिलेल्या असल्याचे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट होते. तक्रारदारानी त्यांची तक्रार पुराव्यानिशी शाबित केलेली आहे त्यामुळे मुद्दा क्र.2 चे उत्तर आम्ही होकारार्थी देतो.
7.3- प्रस्तुत प्रकरणी यातील जाबदारानी तक्रारदारास प्रथम विषयांकित भगवती कॉम्प्लेक्समधील दुसरे मजल्यावरील सदनिका क्र.4 याचा नोटरी रजि. खरेदी करार दि.3-8-2011 रोजी करुन दिला व त्यानंतर दि.22-9-2011 रोजी मे.दुय्यम निबंधक कार्यालयाकडे नोंदणीकृत रजि.दस्ताने वरील सदनिकेबाबत खरेदी करार करुन दिला. सर्व ठरलेली रक्कम घेतली. ठरलेल्या रकमेपेक्षा रु.दीड लाख जास्त घेतले व शेवटी तक्रारदार ग्राहकास विषयांकित सदनिका ही दुस-या व्यक्तीला नि.5/6 च्या दस्तऐवजाच्या पुराव्यावरुन पुनर्विक्री केली व तक्रारदार ग्राहकाचे पैसेही परत केले नाहीत या सर्व बाबी पहाता जाबदारानी जाणीवपूर्वक तक्रारदारांची फसवणूक केली, त्यांचे सदनिकेच्या हक्कापासून त्यांना वंचित ठेवले. जाबदारांच्या या कृत्यामुळे तक्रारदाराना ग्राहक या नात्याने अत्यंत मानसिक, शारिरीक आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले व त्यांच्या हक्कासाठी त्याना न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागले. जाबदारानी मोफा अँक्ट (MOFA) तरतुदींचा उघडउघड भंग केला आहे. त्यामुळे प्रस्तुत तक्रारदार ग्राहक या त्यांची तक्रार अंशतः मंजूर करणेस पात्र आहे या निष्कर्षाप्रत मंच आला आहे. त्यामुळे तक्रारदार हा जाबदारांकडून सदनिका क्र.4 चा मालकी हक्कासह ताबा मिळणेस पात्र आहे. त्यामुळे प्रस्तुत जाबदारानी तक्रारदारांकडून कराराबाहेर जाऊन घेतलेली जादाची रक्कम रु.1,50,000/- त्यावर दि.22-9-2011 पासून द.सा.द.शे.18% व्याजाने मिळणेस तक्रारदार पात्र आहे त्यावर जाबदारानी वरीलप्रमाणे तक्रारदाराना दिलेल्या सदोष सेवेबाबत त्यांना झालेल्या आत्यंतिक टोकाच्या गंभीर मानसिक, शारिरीक त्रासापोटी रु.2,00,000/-(रु.दोन लाख मात्र)व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रु.5,000/- जाबदाराकडून तक्रारदार मिळणेस पात्र आहेत. ग्राहकाला सेवापुरवठादाराकडून होणा-या सेवा त्रुटीबाबत संबधित ग्राहकास किती शारिरीक, मानसिक त्रास सोसावा लागतो त्याचे मोजमाप करणेचे मापनयंत्र अदयाप उपलब्ध नाही परंतु प्रकरणतील परिस्थिती पाहून व त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याची भरपाई मंच/न्यायालये ठरवू शकतात त्यामुळे आमचे मते आम्ही वर ठरवलेली मानसिक त्रासाची रक्कम ही या प्रकरणानुरुप योग्य असल्याचे आमचे स्पष्ट मत आहे. वरीलप्रमाणे जाबदारानी तक्रारदाराना आदेशित केलेप्रमाणे विषयांकित सदनिका क्र.4 चा कब्जा पत्रासह ताबा न दिलेस प्रस्तुत जाबदारानी तक्रारदाराना विषयांकित सदनिकेपोटी घेतलेली एकूण रक्कम रु.5,50,000/- (रु.पाच लाख पन्नास हजार मात्र)त्यावर प्रथम नोटरी करार दि.3-8-2011 पासून द.सा.द.शे.18% दराने करारातील नमूद व्याजदर मिळणेस व जाबदारांचे बेकायदेशीर कृत्यामुळे रजि.कराराचे उल्लंघनामुळे व विषयांकित सदनिका दुस-यास विनापरवाना बेकायदेशीरपणे हस्तांतर केलेपासून 'तक्रारदारांचे स्वतःचे घर असावे' हे स्वप्न भंगले व त्यांच्या आयुष्यातील मोलाची चार वर्षे वाया गेली त्यामुळे ग्राहकाच्या सर्वोच्च कल्याणाच्या व त्यांच्या हक्काचे संरक्षणाचे तत्वातून कारण ग्राहक संरक्षण कायदयाचे हेच मूळ तत्व आहे याची नुकसानभरपाई म्हणून रक्कम रु.1,50,000/- रु.एक लाख पन्नास हजार मात्र जाबदाराकडून मिळणेस तक्रारदार पात्र असलेचे निष्कर्षाप्रत मंच आला आहे.
8. सदर प्रकरणी यातील जाबदार क्र.1 हे त्यांना नोटीस मिळून मंचात हजर झाले परंतु त्यांनी शेवटपर्यंत त्यांचे म्हणणे दाखल केले नाही व सदर तक्रारीस कोणतेही आक्षेप नोंदलेले नाहीत व जाबदार क्र.2 त्याना नोटीस मिळूनही त्या मंचात हजर झाल्या नाहीत त्यामुळे जाबदार क.1 विरुध्द नो से व जाबदार क्र.2 विरुध्द एकतर्फा आदेश मंचाने नि.1 व 2 वर पारित केला आहे. जाबदारास संधी देऊनही ते हजर नाहीत त्यामुळे त्यांचे तक्रारदाराचे अर्जास आक्षेप नाहीत हेच शाबित होते. यातील जाबदार क्र.2 चे जाबदार क्र.1 हे कुलमुखत्यार आहेत त्यामुळे या कामी होणा-या आदेशांची पूर्ततेची जबाबदारी जाबदार क्र.1 व 2 यांची वैयक्तिक व संयुक्तीकरित्या आहे.
त्यामुळे वरील सर्व कारणमीमांसा व विवेचन यास अधीन राहून खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करणेत येत आहेत
आदेश
1. तक्रारदारांची तक्रार अंशतः मंजूर करणेत येते.
2. जाबदारानी तक्रारदाराकडून रजि.खरेदी कराराने सदनिका खरेदी करारापोटी संपूर्ण रक्कम स्विकारुनही त्या ठरलेल्या किंमतीपेक्षा जादा रक्कम घेऊनही त्याना दिले मुदतीत सदनिका दिली नाही. विषयांकित सदनिकेची दुस-यास अनाधिकाराने विक्री केली व तक्रारदारांची रक्कम परत केली नाही व फसवणूक केली या पध्दतीने तक्रारदाराना अत्यंत गंभीर स्वरुपाची सदोष सेवा दिल्याचे घोषित करणेत येते.
3. जाबदार क्र.1 व 2 यानी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या तक्रारदाराना सदर मिळकतीवरील भगवती कॉम्प्लेक्स या अपार्टमेंटमधील दुस-या मजल्यावरील सदनिका क्र.4 चा शांततामय कब्जा कायदेशीर लेखी कब्जेपट्टीसह देऊन त्याचे रजि.खरेदीपत्र सदर आदेश प्राप्त झालेपासून चार आठवडयाचे आत तक्रारदाराना करुन दयावे.
4. प्रस्तुत जाबदारानी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या तक्रारदारांकडून करारापोटी करारापेक्षा जादा घेतलेली रक्कम रु.1,50,000/- त्यावर दि.3-8-2011 पासून द.सा.द.शे.18% व्याजाने संपूर्ण रक्कम फिटेपर्यंतच्या होणा-या संपूर्ण व्याजासह सदर आदेश प्राप्त झालेपासून चारआठवडयाचे आत तक्रारदाराना अदा करावी.
5. प्रस्तुत जाबदारानी आदेश कलम 3 प्रमाणे पूर्तता न केलेस यातील जाबदार क्र.1 व 2 यानी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या रजि.कराराप्रमाणे ठरलेली विषयांकित सदनिकेची किंमत रु.4,00,000/-(रु.चार लाख मात्र) व जादाची घेतलेली रक्कम रु.1,50,000/- (रु.एक लाख पन्नास हजार मात्र) अशी एकूण रक्कम रु.5,50,000/-(रु.पाच लाख पन्नास हजार मात्र) व त्यावर दि.3-8-2011 पासून करारात नमूद केलेप्रमाणे द.सा.द.शे.18% व्याजाने होणारी संपूर्ण रक्कम फिटेपर्यंतच्या व्याजासह आदेश प्राप्त झालेपासून चार आठवडयाचे आत तक्रारदाराना अदा करावी.
6. जाबदार क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या तक्रारदाराना दिलेल्या गंभीर स्वरुपाच्या मानसिक, शारिरीक त्रासाबाबत रु.2,00,000/-(रु.दोन लाख मात्र) व अर्जाचे खर्चापोटी रु.5,000/-(रु.पाच हजार मात्र) आदेश प्राप्त झालेपासून चार आठवडयाचे आत तक्रारदाराना अदा करावी.
7. प्रस्तुत जाबदार क्र.1 व 2 यानी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या जाबदारानी तक्रारदारांची रजिस्टर खरेदी कराराची सदनिका त्यांचेकडून संपूर्ण पैसे घेऊनही ती कायद्याचे सर्व नियम धाब्यावर बसवून ति-हाईत व्यक्तीला विकल्याने प्रस्तुत तक्रारदारांची फसवणूक होऊन त्यांच्या झालेल्या नुकसानीपोटी रु.1,50,000/-(रु.एक लाख पन्नास हजार मात्र) आदेश प्राप्त झालेपासून चार आठवडयाचे आत तक्रारदाराना अदा करावी.
8. यातील जाबदारानी वरील न्यायनिर्णयाची अंमलबजावणी मुदतीत न केलेस प्रस्तुत तक्रारदार हे जाबदाराविरुध्द ग्राहक संरक्षण कायदा कलम 25 व 27 अन्वये दाद मागू शकतील.
9. सदर न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
10. सदर न्यायनिर्णयाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य पाठविण्यात याव्यात.
ठिकाण- सातारा.
दि. 6-7-2015.
(सौ.सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ.सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.
Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes
Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.