निकालपत्र
(घोषीत द्वारा- मा. श्री. आर.एच.बिलोलीकर, सदस्य)
1. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेविरुध्द सेवेत त्रुटीच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे.
अर्जदार यांचे तक्रारीतील कथन थोडक्यात खालील प्रमाणेः-
2. अर्जदार मोहनराव नागोराव नेरलकर, वय-59 वर्षे, हे स्नेहांकीत कॉलनी,तरोडा(खु,),नांदेड येथील रहिवासी आहे. अर्जदार यांनी दिनांक 18.02.2011 रोजी गैरअर्जदार क्र. 1 यांचेकडून 2 जैन सोलर हिटर मशीन(200 लिटर E.T.C.) प्रत्येकी रक्कम रु.30,346/- ला खरेदी केले,त्याची पावती क्रमांक 29 अशी आहे. गैरअर्जदार क्र. 1 यांनी गैरअर्जदार क्र. 2 यांचे कंपनीचे सदर सोलर हिटर खरेदी व्यवहारात 30 टक्के सबसिडी असल्याची हमी दिली. त्यानुसार अर्जदाराने सदर खरेदी व्यवहारातून म्हणजेच रक्कम रु.30,346/- यातून 30 टक्के सबसिडी म्हणजेच रक्कम रु.9103/- परत मिळेल असे आश्वासन व लिखित हमी गैरअर्जदार क्र. 1 यांनी अर्जदारास दिली. त्याबाबत पावतीच्या मागे स्वतःच्या स्वाक्षरीने एप्रील नंतर 30 टक्के सबसिडी मिळेल असे गैरअर्जदार क्र. 1 यांनी लिहिले. ठरल्याप्रमाणे दोन महिन्यानंतर अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र. 1 यांचेकडे सबसिडीची मागणी केली असता,गैरअर्जदार क्र. 1 यांनी कंपनीकडून सदरची रक्कम प्राप्त झाली नाही ती प्राप्त झाल्यावर रक्कम मिळेल असे सांगितले. परत 2-3 महिन्यानंतर पुन्हा गैरअर्जदार क्र. 1 कडे चौकशी केली व तेच उत्तर गैरअर्जदार क्र. 1 यांनी दिले. अर्जदार वेळोवेळी व आजपर्यंत गैरअर्जदार व त्यांनी सांगितलेल्या त्यांच्या प्रतिनिधींशी बोलले तरीपण अर्जदारास आजपर्यंत सबसिडीची रक्कम रु.9103/- प्राप्त झाली नाही. सबसिडीची रक्कम न देऊन अर्जदारावर गैरअर्जदार यांनी अन्याय केलेला आहे व त्यामुळे अर्जदारास मानसिक व शारिरिक त्रास झालेला आहे. म्हणून अर्जदार यांनी सदरील तक्रार दाखल करुन विनंती केली आहे की, अर्जदारास सबसिडीची रक्कम रु.9103/- दिनांक 18.02.2011 पासून द.सा.द.शे. 18 टक्के व्याजासह परत देण्याचा गैरअर्जदारास आदेश करण्यात यावा व मानसिक व शारिरिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रक्कम रु.25,000/- व दावा खर्च रु.5,000/- इत्यादी रक्कमेची मागणी गैरअर्जदार यांचेकडून तक्रारीव्दारे केलेली आहे.
3. गैरअर्जदार क्र. 1 यांना मंचाने पाठविलेली नोटीस ‘’नॉट क्लेम्ड’’ या शे-यासह परत आली. गैरअर्जदार क्र. 2 यांना नोटीस तामील झाल्यानंतर गैरअर्जदार यांनी वकीलमार्फत हजर होऊन लेखी जबाब व शपथपत्र दाखल केलेले आहे.
गैरअर्जदार क्र. 2 यांचा लेखी जबाब थोडक्यात पुढील प्रमाणेः-
4. गैरअर्जदार क्र. 2 ही कंपनी, कंपनी कायद्यांतर्गत नोंदणी झालेली कंपनी आहे. अनेक उपक्रमाव्यतिरिक्त ही कंपनी सोलर मशीनचे उत्पादन करते व अधिकृत विक्रेत्यामार्फत विक्री करते. गैरअर्जदार क्र. 1 हे गैरअर्जदार क्र. 2 यांचे अधिकृत डिलर आहेत हे अर्जदार यांचे म्हणणे गैरअर्जदार क्र. 2 यांना मान्य नाही. कारण गैरअर्जदार क्र. 1 गणराज एजंसी,नांदेड हे गैरअर्जदार क्र. 2 जैन इरीगेशन सिस्टीम लि. कंपनीचा नांदेड येथील अधिकृत विक्रेता नाही. अर्जदाराने सोलर मशीन गैरअर्जदार क्र. 2 जैन कंपनी यांचे अधिकृत विक्रेत्याकडून खरेदी केलेले नसल्याने त्याबाबतचा नमूद मजकूर गैरअर्जदार क्र. 2 यांना मान्य नाही. सोलर मशीन खरेदीवर सबसिडी केंद्र सरकारच्या मिनीस्ट्री ऑफ न्यु रिन्युवेबल एनर्जी या खात्यामार्फत गैरअर्जदार क्र. 2 यांना मिळते,त्यासाठी अधिकृत खातेदाराने विहित नमुन्यात खातेदाराची माहिती भरुन सोलर मशीन बसविल्याचा फोटो व इन्सपेक्शन रिपोर्ट आदि कागदपत्रांची पुर्तता करुन तसा प्रस्ताव MEDA पुणे यांचेकडे द्यावयाची असते व MEDA पुणे सबसिडीची रक्कम ग्राहकास देते. तक्रार अर्जात एप्रील नंतर 30 टक्के सबसिडी मिळेल असा जो उल्लेख बिलावर आहे तो अनधिकृत आहे. त्यामुळे गैरअर्जदार क्र. 2 यांना मान्य नाही. गैरअर्जदार क्र. 2 यांनी अर्जदाराच्या तक्रार अर्जातील परिच्छेद क्रमांक 4 ते 9 मधील कथन अमान्य केलेले आहे व मंचास विनंती केलेली आहे की, अर्जदाराची तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी.
5. अर्जदार व गैरअर्जदार यांनी पुराव्याकामी आपले शपथपत्र व कागदपत्रे दाखल केलेली आहेत. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकला. दोन्ही बाजूंनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता खालील गोष्टी स्पष्ट होतात.
6. अर्जदार यांनी श्री. गुरुप्रसाद एजंसी, कैलास नगर,नांदेड यांचेकडून जैन सोलर हिटर मशीन सनग्लो,क्लोजड लुप (200 लिटर E.T.C.) रक्कम रु.30,346/- देउुन खरेदी केलेले आहे. श्री. गुरुप्रसाद एजंसी, नांदेड हे गैरअर्जदार क्र. 2 जैन इरीगेशन सिस्टीम लि. जळगाव यांचे डिलर आहेत हे अर्जदार यांनी दाखल केलेल्या दिनांक 18.02.2011 रोजीच्या पावतीवरुन स्पष्ट आहे. गैरअर्जदार क्र. 2 हे सदर सोलर सिस्टीमचे उत्पादक आहेत. म्हणून अर्जदार हे गैरअर्जदार क्र. 2 यांचे ग्राहक आहेत. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांना तक्रार करुन सुध्दा त्यांना सबसीडीची रक्कम गैरअर्जदार यांनी मिळवून दिलेली नाही. गैरअर्जदार क्र. 2 उत्पादक कंपनी यांनी केवळ अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 1 हे नाव चुकीचे आहे हया तांत्रिक मुद्यावर अर्जदाराची तक्रार नामंजूर करावी असे म्हटले आहे. अर्जदाराने जरी श्री. गुरुप्रसाद एजंसी, नांदेडच्या ऐवजी गणराज एजंसीज असा उल्लेख केला असला तरी अर्जदाराने दाखल केलेले टॅक्स इनव्हाईस हे श्री. गुरुप्रसाद एजंसी, नांदेड यांचे आहे आणि त्यात स्पष्ट उल्लेख आहे की, ते गैरअर्जदार क्र. 2 यांचे डिलर(अधिकृत विक्रेते ) आहेत. असे असूनही तक्रार दाखल केल्यानंतरही गैरअर्जदार क्र. 2 यांनी अर्जदारास सबसीडीची रक्कम मिळवून देण्यासाठीची औपचारीकता किंवा आवश्यक त्या बाबींची पुर्तता त्यांच्या अधिकृत डिलरकडून करुन घेतलेली नाही. सदर पुर्ततेसंबंधीचा उल्लेख गैरअर्जदार क्र. 2 यांनी त्यांच्या म्हणणेच्या परिच्छेद क्रमांक 3 मध्ये केलेला आहे. त्यानुसार गैरअर्जदार क्र. 2,उत्पादक कंपनी यांनी अर्जदारास सबसीडीची रक्कम मिळणेसाठी आवश्यक त्या सर्व बाबींची पुर्तता अधिकृत डिलरकडून घेणे बंधनकारक असतांनाही गैरअर्जदार क्र. 2 यांनी तसे केलेले नाही. त्यामुळे गैरअर्जदार क्र. 2 यांनी सेवेत त्रुटी केलेली आहे असे मंचाचे मत आहे.
वरील विवेचनावरुन मंच पुढील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
1. अर्जदार यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. गैरअर्जदार क्र. 2 यांनी आदेश तारखेपासून 30 दिवसाचे आत अर्जदाराच्या सबसीडीबद्दलची कार्यवाही पुर्ण करुन ती संबंधीत विभागाकडे पाठवावी.
3. गैरअर्जदार यांनी अर्जदार यास झालेल्या मानसिक त्रासापोटी रक्कम रु.2000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.1000/- आदेश कळाल्यापासून तीस दिवसाचे आत द्यावेत.
4. दोन्ही पक्षकारास निकालाच्या प्रती मोफत पुरविण्यात याव्यात.
5. वरील आदेशाच्या पुर्ततेचा अहवाल दोन्ही पक्षकारांनी निकालाच्या तारखेपासून 45 दिवसांच्या आत मंचात दाखल करावा. प्रकरण 45 दिवसानंतर आदेशाच्या पुर्ततेसाठी ठेवण्यात यावे.