श्रीमती कांचन एस.गंगाधरे, मा.सदस्या यांचेव्दारे
1) तक्रारदार यांनी सदरची तक्रार सामनेवाले यांनी दिलेल्या सेवेतील त्रुटी संदर्भात दाखल केलेली आहे. तक्रारदार हे तक्रारीत नमूद पत्त्यावर राहतात. तक्रारदाराने सामनेवाले गामा फिटनेस सेन्टर यांचेकडे रक्कम रु.12,000/- भरुन दिनांक 3 फेब्रुवारी 2020 रोजी व्यायामशाळेसाठी सभासदत्व घेतले होते. त्याचे देयक क्र.02475 व सभासदत्व ओळखपत्र क्र.1909 असा होता. तक्रारदाराने सदर व्यायामशाळेचे सभासदत्व घेतल्यानंतर महिन्याभराच्या आतच कोविड-19 साथीच्या आजारामुळे टाळेबंदी घोषित करण्यात आली होती. महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार महाराष्ट्रातील सर्व व्यायामशाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. टाळेबंदी उठल्यानंतर तक्रारदार यांनी सामनेवाले यांना फोन करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी सदरचा फोन उचलला नाही. म्हणून दिनांक 15 डिसेंबर, 2020 रोजी तक्रारदार स्वतः सामनेवाले यांच्या व्यायामशाळा येथे गेले असता सदर व्यायामशाळेचे नाव गोल्ड स्ट्रॉंग फिटेनस असे बदलल्याचे आढळून आले. त्याठिकाणी सामनेवाले यांची प्रतिनिधी सौ.शबाना कुरेशी यांचेकडे सभासदत्वाचा कालावधी वाढवून मिळण्याबाबत विचारणा केली असता त्यांनी व्यायामशाळा सभासदत्व घेण्यासाठी पून्हा पैसे भरावे लागतील त्याशिवाय तुम्हाला व्यायामशाळेचे सभासदत्व मिळणार नाही असे सांगितले. दिनांक 12 जानेवारी, 2021 रोजी तक्रारदार सामनेवाले यांचेकडे लेखी तक्रार देण्यास गेले होते, परंतु त्यांनी तक्रार घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे तक्रारदाराने स्पीड पोस्ट व्दारे तक्रार पाठविली होती. सदर तक्रार सामनेवाले यांनी नाकारल्याने ती परत आली होती.
2) तक्रारदाराने जवळपास फक्त एक महिनाभर व्यायामशाळेचा वापर केला होता. त्यामुळे तक्रारदाराने सभासदत्वाचा कालावधी वाढवून मिळावा किंवा सभासदत्वाचे पैसे परत मिळावे अशी विनंती सामनेवाले यांना केली होती. परंतु सामनेवालेनी तक्रारदारांच्या एकाही विनंतीस दाद दिली नाही. म्हणून तक्रारदाराने त्यांना मिळालेल्या त्रुटीच्या व निष्काळजीपणाच्या सेवेसाठी तसेच सभासदत्वासाठी भरलेली रक्कम रु.9,000/- परत मिळण्यासाठी सामनेवाले विरुद्ध सदरची तक्रार दाखल केलेली आहे.
3) तक्रारदार यांनी आपल्या तक्रारीत सामनेवाले यांचेकडून भरणा केलेली सभासदत्वाची रक्कम रु.9,000/- भरणा केल्याच्या तारखेपासून द.सा.द.शे.20% व्याजासह परत मिळावी तसेच तक्रारदारास झालेल्या मानसिक त्रासाबाबत नुकसान भरपाई म्हणून रु.2,00,000/, तक्रारीच्या खर्चापोटी रु.50,000/- मिळावेत अशी मागणी केलेली आहे.
4) याउलट सामनेवाले यांना नोटीसची बजावणी होऊन देखील ते या आयोगासमोर हजर झालेले नाहीत व त्यांनी त्यांचा लेखी जबाबही दाखल केलेला नाही म्हणून त्यांचेविरुध्द दिनांक 13 ऑक्टोबर, 2021 रोजी एकतर्फा आदेश पारीत करण्यात आलेला आहे.
5) तक्रारदारातर्फे दाखल करण्यात आलेली कागदपत्रे – पैसे भरल्याची पावती, सामनेवाले यांना पाठविलेली लेखी तक्रार, त्याची पावती व पोचपावती, तक्रारदाराचे पुरावा शपथपत्र ईत्यादी.
6) तक्रारदाराची तक्रार, त्यासोबतची कागदपत्रे, शपथपत्र व तक्रारदाराचा युक्तिवाद यावरुन आम्ही खालील निष्कर्षाप्रत येतो.
कारणमिमांसा
7) तक्रारदाराने रक्कम भरल्याची पावती (Tax Invoice) दाखल केली आहे. यावरुन हे स्पष्ट होते की, तक्रारदाराने दिनांक 3 फेब्रुवारी, 2020 रोजी रु.12,000/- भरुन सामनेवाले यांच्या व्यायामशाळेचे सभासदत्व घेतले होते. त्यांचा देयक (Tax Invoice) क्र.02475 व सभासदत्व ओळखपत्र क्र.1909 असा होता. सदरचे सभासदत्व तक्रारदाराने एक वर्षासाठी घेतले होते. सभासदत्वाची मुदत दिनांक 4 फेब्रुवारी, 2020 ते 3 फेब्रुवारी, 2021 होती.
8) तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार कोविड-19 साथीमध्ये एक महिन्याच्या आतच महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार व्यायामशाळा बंद करण्यात आल्या होत्या. महाराष्ट्र शासनाच्या सूचनांनुसार व्यायामशाळा पून्हा उघडल्यावर दि.15/12/2020 रोजी तक्रारदार सभासदत्वचा कालावधी वाढवून मिळण्यासाठी चौकशीसाठी गेले होते. त्यावेळी त्यांना सामनेवाले यांची प्रतिनिधी सौ.शबाना कुरेशी यांनी व्यायामशाळा सभासदत्व घेण्यासाठी पून्हा पैसे भरावे लागतील त्याशिवाय तुम्हाला व्यायामशाळेचे सभासदत्व मिळणार नाही असे सांगितले होते. परंतु तक्रारदाराने केवळ महिनाभरच व्यायामशाळेचा वापर केला होता. त्यामुळे दिनांक 12 जानेवारी, 2021 रोजी तक्रारदार सभासदत्वाचा कालावधी वाढवून मिळावा किंवा त्यांनी जिमसाठी भरलेले पैसे परत मिळावे यासाठी सामनेवले यांना लेखी तक्रार देण्यास गेले असता ती लेखी तक्रार घेण्यास त्यांनी नकार दिला होता. त्यामुळेच त्यांनी सदर लेखी तक्रार स्पीड पोस्टाव्दारे सामनेवाले यांना पाठविली होती. सदर तक्रार देखील ‘Unclaimed’ या शे-यासह परत आली होती. तक्रारदाराने परत आलेला लिफाफा, स्पीड पोस्टाची पावती व पोचपावती सदर तक्रारीबरोबर दाखल केल्या आहेत. सदरची तक्रार सामनेवाले यांचेविरुध्द एकतर्फा चालविण्यात आलेली असल्याने त्यांचेविरुध्द प्रतिकूल निष्कर्ष काढण्याशिवाय इतर कोणताही पर्याय या आयोगासमोर नाही. सामनेवाले तक्रारदारास त्यांनी घेतलेल्या सभासदत्वाचे पैसे परत देण्यास टाळाटाळ करीत आहेत तसेच सभासदत्वाचा कालावधी वाढवून देण्यास त्यांनी नकार दिलेला आहे तक्रारदाराच्या या कथानवर आम्ही विश्वास ठेवतो. वरील विवेचनावरुन आम्ही या निष्कर्षापत आलो आहोत की, सामनेवाले यांनी तक्रारदारास त्रुटी व निष्काळजीपणाची सेवा दिलेली आहे.
9) तक्रारदाराने व्यायामशाळेसाठी भरलेले रु.12,000/- परत मिळावे अशी विनंती केली आहे. परंतु, आमच्या मते तक्रारदाराने सभासदत्व घेतल्यापासून एक महिन्याच्या कालावधीसाठी व्यायामशाळेचा वापर केला होता. त्यामुळे बारा महिन्यांच्या कालावधीतून एक महिन्याची रक्कम वजा करुन राहिलेली रक्कम रु.11,000/- तक्रारदारास व्याजासह परत करण्याबाबत तसेच तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रु.3,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.2,000/- देण्याबाबत सामनेवाले यांना आदेश देणे संयुक्तिक होईल असे या आयोगाचे मत आहे. यावरुन खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
आदेश
- तक्रार क्र.CC/51/2021 अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
- सामनेवाले यांनी तक्रारदार यांना व्यायामशाळा सेवेबाबत सेवासुविधा पुरविण्यास कसूर केली असे जाहीर करण्यात येते.
- सामनेवाले यांनी रक्कम रु.11,000/- (अक्षरी रु.अकरा हजार फक्त) तक्रार दाखल केल्या तारखेपासून रक्कम अदा करेपर्यंत द.सा.द.शे. 9% व्याजासह तक्रारदार यांना अदा करावी.
- सामनेवाले यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रु.3,000/- (अक्षरी रु.तीन हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रु.2,000/- (अक्षरी रु.दोन हजार फक्त) रक्कम या आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून पंचेचाळीस दिवसांचे आंत अदा करावी.
- या आदेशाची प्रत उभय पक्षकारांना विनामूल्य पाठविण्यात यावी.