सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर
उपस्थिती - मा.सौ.सविता भोसले,अध्यक्षा
मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्य.
तक्रार अर्ज क्र. 214/2014
तक्रार दाखल दि.29-12-2014.
तक्रार निकाली दि.17-08-2015.
श्री. ज्ञानदेव कृष्णा वणवे
रा. लिंब, ता.जि.सातारा. .... तक्रारदार.
विरुध्द
श्री. जनार्दन चव्हाण,
प्रोप्रायटर, गॅलेक्सी इलेक्ट्रॉनिक्स,
19,महसूल भवन, एस.टी.स्टँन्डसमोर,
सातारा. .... जाबदार.
तक्रारदारातर्फे –अँड.सी.आर.घाडगे.
जाबदार तर्फे – एकतर्फा.
न्यायनिर्णय
(सदर न्यायनिर्णय मा.सौ.सविता भोसले, अध्यक्षा यानी पारित केला)
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 नुसार दाखल केला आहे. तक्रारअर्जातील थोडक्यात मजकूर पुढीलप्रमाणे-
तक्रारदार हे लिंब, ता.जि.सातारा येथील रहिवासी आहेत. तक्रारदार हे सेवानिवृत्त असून त्यांनी जाबदार यांचेकडून डिश टी.व्ही व त्याचे अनुषंगाने असणारे एल.एन.बी. रिसीव्हर वायर वगैरे साहित्य रक्कम रु.1,550/- ला खरेदी केले. त्याचा पावती क्र. 12597 असा आहे. प्रस्तुत डिश टी.व्ही.खरेदी केलेनंतर जाबदार यांनी सांगीतले माहीतगार इसमाकडून सदर साहित्य टी.व्ही सेटला जोडून घेतले. परंतु जाबदारकडून घेतलेले इलेक्ट्रीक साहित्य हे खराब व निकृष्ठ प्रतीचे असलेने सदर डिश टी.व्ही जोडलेनंतर टी.व्ही. वर चित्र दिसले नाही. उलट विनाकारण जाबदार यांनी सूचविलेल्या कामगारास रक्कम रु.250/- मजूरी देणे भाग पडले. तक्रारदाराने प्रस्तुत बाबतीत जाबदार यांचेकडे जाऊन वारंवार कल्पना दिली असता जाबदाराने तक्रारदारास उडवाउडवीची उत्तरे देवून टाळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तक्रारदाराने दि.6/11/2014 रोजी जाबदाराला फोन केला व नादुरुस्त साहित्य परत घेऊन दुसरे चांगल्या दर्जाचे साहित्य देण्याची विनंती केली. त्यावर जाबदार यांनी माझे काम फक्त विक्री करण्याचे आहे. बाकी जबाबदारी माझी नाही असे म्हणून नादुरुस्त साहित्य बदलून देण्यास नकार दिला. त्यामळे तक्रारदार यांना जाबदार यांनी सदोष सेवा पुरविली आहे. त्यामुळे तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज या मे. मंचात दाखल केला आहे. प्रस्तुत कामी तक्रारदाराने जाबदाराकडून नवीन चांगल्या दर्जाचे डिश टी.व्ही साहित्य बदलून मिळावे, मानसिकत्रास व अर्जाचा खर्च मिळावी अशी मागणी केली आहे.
2. प्रस्तुत कामी तक्रारदाराने नि. 2 कडे अँफीडेव्हीट, नि.3 चे कागदयादीसोबत नि. 3/1 ते नि.3/4 कडे अनुक्रमे डिश टी.व्ही.चे साहित्य खरेदी केलेची गॅलेक्सी इलेक्ट्रॉनिक्स ची पावती, जाबदाराला तक्रारदाराने पाठवलेल्या नोटीसची प्रत, जाबदाराने डीश टी.व्ही.जोडणा-या कामगाराची मोबाईल नंबरची चिठ्ठी, जाबदाराला नोटीस पोहोचलेची पोहोचपावती, नि. 9 कडे तक्रारअर्जाचे अँफीडेव्हीट व दाखल कागदपत्रे हाच पुरावा समजवणेत यावा म्हणून दिलेली पुरसिस वगैरे कागदपत्रे तक्रारदाराने याकामी दाखल केली आहेत.
3. प्रस्तुत कामी जाबदार यांना पाठवलेली नोटीस लागू होवूनही जाबदार मे. मंचात उपस्थित राहीलेले नाहीत. प्रस्तुत नोटीस ‘अनक्लेम्ड’ या पोष्टाचे शे-याने परत आली आहे. तो नोटीसचा लखोटा नि. 7 कडे दाखल आहे. म्हणजेच जाबदाराला नोटीस लागू झालेली असतानाही जाबदार हे मे. मंचात हजर राहीले नाहीत व तक्रार अर्जास कोणतेही म्हणणे/कैफीयत दाखल केलेली नाही. सबब जाबदार यांचेविरुध्द नि. 1 वर ‘एकतर्फा आदेश’ पारीत झालेला आहे. जाबदाराने तक्रार अर्जातील कोणतेही कथन खोडून काढलेले नाही.
4. प्रस्तुत कामी वर नमूद तक्रारदाराने दाखल केले सर्व कागदपत्रांचे अवलोकन करुन मे. मंचाने प्रस्तुत तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दयांचा विचार केला.
अ.नं. मुद्दा निष्कर्ष
1. तक्रारदार हे जाबदाराचे ग्राहक आहेत काय ? होय
2. जाबदाराने तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय ? होय
3. अंतिम आदेश काय ? खालील नमूद
आदेशाप्रमाणे
विवेचन-
5. वर नमूद मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत. कारण- तक्रारदाराने जाबदार यांचेकडून डिश टी.व्ही चे साहित्य खरेदी केले आहे. सदरची खरेदीची पावती नि.3/1 कडे दाखल आहे. नि. 3/2 कडे तक्रारदाराने जाबदाराला पाठवलेली नोटीस दाखल आहे. नि. 3/3 कडे प्रस्तुत नोटीस जाबदाराला मिळालेची पोहोचपावती या झेरॉक्स प्रती तसेच नि. 8 चे कागदयादीसोबत खरेदीचे मूळ बील, नोटीसची मूळ प्रत, नोटीय पोहोचलेची पोहोचपावती, कामगाराचा फोननंबर, नि. 9 कडे पुराव्याची पुरसिस वगैरे कागदपत्रांवरुन स्पष्ट होते की, तक्रारदार हे जाबदाराचे ग्राहक आहेत. तसेच जाबदाराने तक्रारदारास निकृष्ठ दर्जाचे डिश टी.व्ही चे साहित्य परत नवीन साहीत्य दिलेले नाही किंवा त्याची रक्कमही परत अदा केलेली नाही. म्हणजेच तक्रारदार हे जाबदाराचे ग्राहक आहेत. जाबदार यांनी प्रस्तुत कामी हजर घेवून म्हणणे/कैफियत दाखल केलेली नाही. जाबदारविरुध्द नि. 1 वर एकतर्फा आदेश पारीत झालेला आहे. जाबदाराने तक्रार अर्जातील कोणतेही कथन खोडून काढलेले नाही,फेटाळलेले नाही म्हणजेच तक्रारदाराने तक्रार अर्जात केलेली कथन योग्य व बरोबर आहेत असे गृहीत धरणे न्यायोचित होणार आहे. सबब वर नमूद मुद्दा क्र. 1 व 2 ची उत्तरे आम्ही होकारार्थी दिले आहे.
वरील सर्व बाबींचा विचार करता तक्रारदार यांना जाबदार यांचेकडून खरेदी केले साहित्य परत घेवून त्याबदली नवीन चांगल्या दर्जाचे डिश टीव्हीचे साहित्य अदा करणे न्यायोचीत होणार आहे.
6. सबब आम्ही खालीलप्रमाणे अंतीम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1. तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2. जाबदार यांनी तक्रारदार यांना डिश टी.व्ही.चे साहीत्य तक्रारदारास बदलून
द्यावे/अदा करावे.
3. जाबदाराने तक्रारदार यांना मानसिकत्रास व अर्जाचे खर्चापोटी रक्कम
रु.3,000/- (रुपये तीन हजार फक्त) अदा करावेत.
4. वरील सर्व आदेशाचे पालन आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांचे आत
करावे.
5. विहीत मुदतीत आदेशाचे पालन न केल्यास तक्रारदार यांना ग्राहक संरक्षण
कायदा कलम 25 व 27 नुसार जाबदारांविरुध्द कारवाई करणेची मुभा राहील.
6. सदर न्यायनिर्णयाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य पाठवणेत याव्यात.
7. सदर न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
ठिकाण- सातारा.
दि. 17-08-2015.
(श्री.श्रीकांत कुंभार) (सौ.सविता भोसले)
सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.