(मंचाचे निर्णयान्वये, श्री.सादिक मो.जव्हेरी, मा.सदस्य) (पारीत दिनांक : 03.09.2011) 1. सर्व अर्जदारांनी, सदर तक्रार, गैरअर्जदारांविरुध्द ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केलेल्या आहेत. सदर तक्रारीं सारख्याच स्वरुपाच्या व प्रकरणांतील गैरअर्जदार ही सारखेच असल्यामुळे, सदर प्रकरणांत एकञित आदेश (Common Order) पारीत करण्यांत येत आहे. तक्रारींचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे. 2. गैरअर्जदार क्र.1 व 2 हे यशोदा बिल्डर्स अण्ड डेव्हलपर्स, वरोराचे भागीदार आहेव ते भुखंड विक्रीचा व्यवसाय करतात. सन 2005 मध्ये गैरअर्जदार हे अर्जदाराला भेटले व त्यांच्या प्रस्तावीत निवासी वापराकरीता उपलबध असलेल्या लेआऊट मधील नियोजीत भुखंडाविषयी सांगितले. अर्जदारास भुखंडविक्रीकरीता माहिती पुस्तिका देवून भुखंड खरेदी करीता आमंञित केले. गैरअर्जदारांचे मालकी हक्कात असलेले शेत मौजा बोर्डा येथील शेत भुमापन क्र.45 गैरअर्जदारांनी विकत घेतले व त्याचे 45/1 व 45/2 असे दोन भाग पाडून त्यामध्ये यशोदा नगर या नावाने लेआऊट टाकले. अर्जदाराने भाग दोन मधील भुखंड क्र.40, आराजी 1697.05 चौ.फुट हा भुखंड रुपये 65/- प्रती चौरस फूट प्रमाणे एकूण किंमत रुपये 1,10,308/- मध्ये विकत घेण्याचे मान्य केले. त्यावरुन, अर्जदार व गैरअर्जदार यांचेमध्ये दि.1.4.2005 रोजी सदर भुखंड खरेदीचा सौदा केला व इसारादाखल अर्जदाराने रुपये 30,000/- गैरअर्जदारास दिले. अर्जदारांनी पूर्ण रक्कम भरण्याची तयार दर्शवून मालमत्तेसंबंधी विक्रीपञ नोंदवून मागीतले, तेंव्हा गैरअर्जदारांनी विक्री नंतर करुन देऊ असे अश्वासन दिले. अर्जदाराने, गैरअर्जदारांस वारंवार भेटून विक्री संबंधात विचारणा व विनंती केली असता, गैरअर्जदारांनी विक्री करुन देण्याचे वारंवार आश्वासन दिले. त्यामुळे अर्जदाराने उर्वरीत रकमेचा भरणा थांबविले व गैरअर्जदारांनी विक्रीसंबंधी आवश्यक कागदपञांसंबंधी विचारले असता दि.5.5.07 रोजी गैरअर्जदारांनी अर्जदारास अकृषक परवानगी मिळाली नसल्याचे सांगितले. यामुळे, अर्जदारास मानसिक, शारीरीक ञास, तसेच आर्थिक भुर्दंड सोसावा लागला. अर्जदाराने, गैरअर्जदारांना दि.10.2.11 ला वकीलामार्फत कायदेशीर नोटीस पाठविली व सदर अभिन्यासामध्ये कराराप्रमाणे सर्व विकासकामे पूर्ण झाल्याचे कळवून दि.28.2.11 ला विक्री करुन देण्याची विनंती केली. परंतु, सदर नोटीस गैरअर्जदारांनी घेण्यास नकार दिला. त्यामुळे, अर्जदारांनी, गैरअर्जदारांना दिलेल्या ञुटीपूर्ण सेवेकरीता दोषी ठरवून निर्दिष्ट निवासी भुखंडाचे विक्रीपञ अर्जदारास करुन देण्याचे आदेश द्यावेत. तसेच, विक्रीपञ पंजीबध्द करण्यास काही कायदेशीर अडचण असल्यास अर्जदारांनी भरलेली रक्कम द.सा.द.शे.24 टक्के दराने परत करण्याचे आदेश देण्यात यावेत. अर्जदारास झालेल्या मानसिक ञासापोटी, झालेल्या खर्चापोटी रुपये 10,000/- व प्रकरणाचा खर्च रुपये 10,000/- नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश गैरअर्जदारांना द्यावेत, अशी प्रार्थना केली आहे. 3. अर्जदारांनी तक्रार क्र.69/2011 व तक्रार क्र.70/11 सोबत दस्ताऐवज दाखल केले. अर्जदाराची तक्रार नोंदणी करुन गैरअर्जदारांना नोटीस काढण्यात आल्या. गैरअर्जदार हजर होऊन तक्रार क्र.69/11 व तक्रार क्र.70/11 मध्ये लेखी उत्तर दाखल केले. 4. गैरअर्जदारांनी दोन्ही प्रकरणांत लेखी उत्तर, मागणी व प्रार्थना खोटे असल्यामुळे नाकबूल केले आहे. गैरअर्जदारांनी लेखी बयानातील विशेष कथनात नमूद केले आहे की, अर्जदारांनी दाखल केली तक्रार मुदतबाह्य असल्यामुळे खारीज होण्यास पाञ आहे. अर्जदार व गै.अ. यांच्या मध्ये दिनांक 1.4.2005 ला भुखंड खरेदीबाबतचा इसारपञ झालेला होता. परंतु, अर्जदारांनी केलेल्या कराराप्रमाणे त्यामध्ये असलेल्या अटींची पुर्तता न करता तब्बल पाच वर्ष स्वस्थ बसून राहिला व पाच वर्षानंतर सदर तक्रार दाखल करण्यास कोणतेही कारण घडले नसतांना दाखल केलेली आहे. वास्तविक, लेआऊट इसारपञाचे वेळीच रहिवासी प्रयोजनाकरीता विकसीत करुन मंजुर करुन घेतले होते. करारात नमूद केल्याप्रमाणे लेआऊट नगर रचनाकार चंद्रपूर व उपविभागीय अधिकारी, वरोरा यांच्या दि.8.2.2005 च्या आदेशाप्रमाणे भुमापन क्र.45/9 व भुमापन क्र.45/2 ला दि.20.2.2005 च्या आदेशाप्रमाणे मंजुर करण्यात आलेले होते. अर्जदाराने, गैरअर्जदारांना अकृषक परवानगीबाबत वारंवार विचारले असता, त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही व विक्री करुन देण्यास टाळाटाळ केले, हे कथन पूर्णतः खोटे व बनावटी आहे. अर्जदाराने सदर केसमध्ये स्वतः दाखल केलेला दस्ताऐवज नं.2 लेआऊट नकाशाचे प्रत इसारपञाचेवेळी पुरविण्यात आलेली होती. 5. अर्जदारांनी स्वतः इसाराप्रमाणे सहा महिन्यानंतर दि.31.7.2005 ला रुपये 30,000/- द्यायचे होते. त्यानंतर, इसारापासून बारा महिन्यानंतर दि.31.1.2006 ला रुपये 30,000/- द्यावयास पाहिजे होते व नंतर रजिस्ट्रीचे वेळी म्हणजे दि.31.3.2006 ला बाकी रक्कम 20,308/- द्यावयाचे होते. परंतु, अर्जदाराने इसारपञ केल्यानंतर ठरल्याप्रमाणे विक्रीची किंमत देण्याकरीता कधीही आलेला नाही व गैरअर्जदारांना भेटला नाही. अर्जदार यांना वगळल्यानंतर बाकी सर्व लोकांनी इसाराप्रमाणे आपआपल्या प्लॉटची विक्री करुन घेतली व गैरअर्जदारांनी त्यांना विक्री करुन दिली. अर्जदारांची विक्री स्वतःच्या चुकीने व कराराची पुर्तता न केल्यामुळे झालेली नाही, त्यात गैरअर्जदारांची काहीही चुक नाही व सेवेत न्युनता नाही. अर्जदार सदर रक्कम इसाराप्रमाणे व कराराप्रमाणे मागण्याचा अधिकार अर्जदाराला नाही. सदर भुखंडामधील अर्जदार यांचे प्लॉट अर्जदार न आल्यामुळे व विक्री करुन न घेतल्यामुळे दिलेल्या मुदतीनुतर विकलेले आहे. सदर लेआऊट मध्ये एकही प्लॉट शिल्लक नाही. सदर केस खोटी, बनावटी व मुदतबाह्य असल्या कारणाने खर्चासह खारीज करण्यात यावी. 6. अर्जदारांना पुरेपूर संधी देवूनही पुरावा शपथपञ दाखल केले नाही. त्यामुळे, नि.क्र.1 वर अर्जदाराचे शपथपञाशिवाय तक्रार पुढे चालविण्यात यावे, असा आदेश दि.10.8.11 ला पारीत करण्यात आला. गैरअर्जदाराने नि.14 नुसार पुरावा शपथपञ व नि.क्र.16 नुसार 3 दस्ताऐवज दाखल केले. गैरअर्जदाराने नि.क्र.18 नुसार लेखी युक्तीवाद दाखल केला. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले दस्ताऐवज, शपथपञ व उभय पक्षाच्या वकीलांनी केलेल्या युक्तीवादावरुन खालील कारणे व निष्कर्ष निघतात. // कारणे व निष्कर्ष // 7. अर्जदारांनी, गैरअर्जदार क्र.1 व 2 कडून, त्यांचे यशोदा नगर मधील भुखंड 45/1 व 45/2 मधील प्लॉट क्र.40 आराजी 1697.05 चौ.फूट व भुखंड क्र.9 आराजी 1786.68 चौ.फूट घेण्याचे मान्य केले व इसारा दाखल रुपये 30,000/- प्रत्येकी गैरअर्जदारास दिले, ही बाब गैरअर्जदारानी सुध्दा मान्य केलेली आहे.
8. अर्जदारांनी, सदर प्लॉट खरेदी करुन दस्ताऐवज क्र.अ-3 इसारपञानुसार वेळोवेळी रक्कम देऊन, गैरअर्जदाराकडून सदर भुखंडाचा विक्रीपञ करुन द्यायचा होता. परंतु, अर्जदाराने तसे केले नाही, तसेच इसारपञानुसार दिलेल्या तारखावर अर्जदाराने गैरअर्जदारांना पञ लिहून किंवा डी.डी. अथवा चेक व्दारे रक्कम देण्याचे किंवा दिल्याचे कुठलेही पुरावे, दस्ताऐवज दाखल केलेले नाही. अर्जदाराने इसारपञानुसार दिलेल्या तारखांवर कुठलेही व्यवहार न करता 2005 मध्ये झालेल्या इसारपञाचा व्यवहार पूर्ण करवून घेण्यासाठी तब्बल सहा वर्षानंतर गैरअर्जदारांना दि.10.2.2011 ला वकीला मार्फत नोटीस देवून विक्रीपञ करुन देण्याची मागणी करणे, हे उचीत नाही.
9. अर्जदाराने जसे दि.28.2.2011 गैरअर्जदारांना विक्री करुन देण्यासाठी रजिस्टर पञाने मागणी करुन व गैरअर्जदारांनी विक्रीसाठी हजर नसल्यावर रजिस्टर ऑफीसमध्ये अर्जदार स्वतः हजर असल्याबाबत शपथपञ पुरावा म्हणून करुन घेतले, असे पुरावे अर्जदाराला 2005 पासून 2011 पर्यंत ही करु शकला असता. गैरअर्जदारांनी दैनीक पेपर मध्ये नोटीस देऊन त्यात स्पष्ट भुखंडाचा उल्लेख केलेला आहे. (45/1 व 45/2 लेआऊट मधील प्लॉट) व त्यासोबत, फोन नंबर सुध्दा दिला असून, अर्जदाराने गैरअर्जदारांना न भेटता व याबाबत विचारणा न करता, आता हे म्हणणे की, त्या नोटीस मध्ये आमच्या प्लॉटचा उल्लेख नाही, हे उचीत नाही. जेंव्हा की, अर्जदाराने, गैरअर्जदारांसोबत केलेल्या इसार पञात भुखंड 45/1 व 45/2 चे प्लॉट लिहिले आहे. एकंदरीत, अर्जदाराने सदर प्लॉटचा इसार करुन गैरअर्जदारांना वेळेवर इसाराप्रमाणे रक्कम न देऊन स्वतः कसूर केलेला आहे व आता सहा वर्षानंतर आपल्या फायद्यासाठी गैरअर्जदारांना ञास देण्यासाठी तक्रार दाखल केली आहे.
10. अर्जदारांनी आपल्या तक्रारीत असेही म्हटले आहे की, गैरअर्जदारांनी उपरोक्त भुखंडामध्ये कसल्याही प्रकारे विकसीत केले नसल्यामुळे व सदर भुखंड अकृषक परवानगी न मिळाल्यामुळे व करारनाम्यामध्ये नमूद अटीची पुर्तता करण्यास कसूर करुन आंमची फसवणूक झालेली आहे. परंतु, अर्जदारांनी उपरोक्त भुखंड विकसीत न झाल्याचे व अकृषक परवानगी न मिळाल्याबाबतचे कुठलेही पुरावे, दस्ताऐवज दाखल केलेले नाही. उलट, गैरअर्जदारांनी, आपल्या उत्तरासोबत सदर भुखंड अकृषक झाले असल्याचे आदेशाची प्रत दाखल केलेली आहे. तसेच, सदर भुखंड लेआऊट मधील इतर कोणतेही प्लॉट धारकाचे विकसीत न झाल्याबाबत पुरावे नसल्यामुळेही, अर्जदारांची फसवणूक झाल्याचे कथन ग्राह्य धरता येत नाही. वरील कारणे व निष्कर्षावरुन अर्जदाराची तक्रार खारीज होण्यास पाञ आहे, आदेश खालील प्रमाणे पारीत करण्यात येत आहे. // अंतिम आदेश //
(1) अर्जदारांची तक्रार खारीज. (2) अर्जदारांनी व गैरअर्जदारांनी आपआपला खर्च सहन करावा. (3) आदेशाची मुळ प्रत तक्रार क्र.69/2011 सोबत ठेवण्यात यावी, आणि प्रमाणीत प्रत तक्रार क्र.70/2011 सोबत ठेवण्यांत यावी. (4) उभय पक्षांना आदेशाची प्रत देण्यात यावी.
| [HONORABLE Shri Sadik M. Zaweri] Member[HONORABLE Shri Anil. N.Kamble] PRESIDENT | |