ashish s. jagatap filed a consumer case on 16 Jan 2015 against gajanan aplayanses. pvt l. in the Satara Consumer Court. The case no is CC/14/60 and the judgment uploaded on 09 Sep 2015.
सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर
उपस्थिती - मा.सौ.सविता भोसले,अध्यक्षा
मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्य.
मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्या.
तक्रार क्र. 60/2014.
तक्रार दाखल दि.5-05-2014.
तक्रार निकाली दि.16-1-2015.
श्री.आशिष सुरेश जगताप,
रा.'पुण्याई', 14/ए, गोडोली जकातनाक्यासमोर,
गोडोली, सातारा. .... तक्रारदार
विरुध्द
1. गजानन अप्लायन्सेस प्रा.लि.तर्फे-
मॅनेजिंग डायरेक्टर,
गजानन गॅलेक्सी, राजवाडा चौक,
राजधानी टॉवर्स, सातारा 415001.
2. व्हर्लपूल ऑफ इंडिया लि.तर्फे-
मॅनेजिंग डायरेक्टर,
प्लॉट नं.ए-4, एम.आय.डी.सी.
रांजणगाव, ता.शिरुर, जि.पुणे 419 004. .... जाबदार
तक्रारदारातर्फे –अँड.व्ही.पी.जगदाळे.
जाबदार 1 – एकतर्फा.
जाबदार 2 तर्फे- अँड.टी.व्ही.कदम.
न्यायनिर्णय
सदर न्यायनिर्णय मा.सौ.सविता भोसले, अध्यक्षा यानी पारित केला
1. तक्रारदाराने सदरचा तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 नुसार दाखल केला आहे. तक्रारअर्जातील थोडक्यात कथन खालीलप्रमाणे-
तक्रारदार हे सातारा येथील रहिवासी असून त्यांनी जाबदार 1 यांचेकडून दि.20-9-2011 रोजी जाबदार क्र.2 यांनी उत्पादित केलेला मॉडेल क्र.340, आयएनई 113307307 हा प्रोटॉन व्हर्लपूल फ्रिज रक्कम रु.29,000/- किंमतीस खरेदी केला. त्याचा टॅक्स इन्व्हॉईस चलन क्र.20482 असा आहे. प्रस्तुत फ्रीजला जाबदार 2 यांनी 5 वर्षाची वॉरंटी दिली आहे. सदरचा फ्रीज हा डबलडोअर असून तो तक्रारदाराने घरी आणला असता त्याचे कार्यप्रणालीत दोष आढळून आला. हो दोष म्हणजे फ्रिजचे पाणी लिक होऊन दुस-या कप्प्यात येते आणि दुस-या कप्प्यात ठेवलेले साहित्य खराब होते. याबाबतची तक्रार जाबदार 1 यांचेकडे केली असता त्यांनी काही माणसे दुरुस्तीसाठी पाठवली व त्यांनी फ्रिजमध्ये गॅसकीट डॅमेज, अप्पर डोअर डॅमेज असे सांगून फ्रिज किंवा डोअर रिप्लेस करतो असे सांगितले व त्यांच्या अभिप्रायानुसार अधिकृत दुरुस्ती करणारे राज सर्व्हीसिंग सेंटर नगरपालिका शॉपिंग सेंटर, सातारा यांचेकडे तक्रार करणेत आली. त्यांनी फ्रीजची पहाणी करुन मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट आहे, तुम्हाला फ्रीज रिप्लेस करुन देतो असे सांगितले. मात्र केवळ आश्वासने देऊन फ्रीज रिप्लेस करुन दिलेला नाही. त्यामुळे तक्रारदारानी वकीलांतर्फे नोटीस पाठवली. नोटीस पोहोचूनही जाबदारांनी कोणताही प्रतिसाद दिलेला नाही त्यामुळे तक्रारदारानी सदरचा तक्रारअर्ज मे.मंचात दाखल केलेला आहे.
2. तक्रारदाराने सदर कामी जाबदार हे सेवतील त्रुटीबाबत दोषी आहेत असे घोषित होऊन मिळावे, जाबदाराकडून फ्रीज रिप्लेस करुन नवीन कार्यक्षम दर्जाचा फ्रीज तक्रारदारास देणेबाबत आदेश व्हावेत, दरम्यानच्या नुकसानीबाबत रक्कम रु.5,000/- जाबदाराने तक्रारदारास देणेबाबत आदेश व्हावेत, तक्रारदाराना जाबदाराकडून तक्रारअर्जाचा खर्च म्हणून रक्कम रु.10,000/- तसेच मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु.20,000/- मिळावेत अशी विनंती केली आहे.
3. तक्रारदाराने प्रस्तुत कामी नि.2 कडे प्रतिज्ञापत्र, नि.5 चे कागदयादीसोबत नि.5/1 कडे फ्रीजचे डिलिव्हरी चलन, नि.5/2 कडे फ्रीजचे मॅन्युअलची प्रत, नि.5/3 कडे तक्रारदाराने जाबदारास वकीलातर्फे पाठवलेली नोटीस व पोस्टाची पोहोचपावती, नि.9 कडे तक्रारदाराचे पुराव्याचे प्रतिज्ञापत्र, नि.10 कडे लेखी युक्तीवाद वगैरे कागदपत्रे मंचात दाखल केली आहेत.
4. प्रस्तुत कामी जाबदार क्र.1 याना नोटीस मिळूनही ते मंचात हजर राहिले नाहीत व म्हणणेही दाखल केले नाही त्यामुळे जाबदार 1 विरुध्द एकतर्फा आदेश नि.1 वर पारित करणेत आला आहे, तसेच जाबदार क्र.2 यांनी म्हणणे दाखल केलेले नसल्याने त्यांचेविरुध्द म्हणणे नाही असा आदेश पारित झाला आहे.
5. वर नमूद तक्रारदारांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे.मंचाने सदर तक्रारअर्जाचे निराकरणार्थ खालील मुद्दयांचा विचार केला-
अ.क्र. मुद्दा उत्तर
1. तक्रारदार हे जाबदाराचे ग्राहक आहेत काय? होय.
2. तक्रारदारास जाबदारानी सदोष सेवा पुरवली आहे काय? होय.
3. अंतिम आदेश काय? शेवटी नमूद केल्याप्रमाणे.
विवेचन मुद्दा क्र.1 व 2-
6. वर नमूद मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर आम्ही होकारार्थी देतो. कारण तक्रारदारांनी दि.20-9-2011 रोजी जाबदार क्र.1 यांचेकडून जाबदार क्र.2 ने उत्पादित केलेला फ्रीज मॉडेल क्र.340, आयएनई 113307307 हा प्रोटॉन व्हर्लपूल रक्कम रु.29,000/-ला खरेदी केला. त्याचा टॅक्स इन्व्हॉईस डिलीव्हरी चलन क्र.20482 असा आहे. ही बाब तक्रारदाराने नि.5 चे कागदयादीसोबत नि.5/1 कडील टॅक्स इन्व्हॉईस/ डिलिव्हरी चलन, नि.5/2 कडे दाखल केलेले मॅन्युअल व वॉरंटी कार्ड यावरुन सिध्द होते. म्हणजेच तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक असल्याचे निर्विवाद सत्य आहे. तसेच प्रस्तुतचा फ्रीज घरी नेल्यानंतर हा दोषपूर्ण असल्याचे तक्रारदाराचे लक्षात येताच वॉरंटी मुदतीत तक्रारदारानी जाबदाराला ही बाब सांगितलेवर जाबदाराने दुरुस्तीसाठी माणसे पाठवून दिली परंतु सदर फ्रीजमध्ये मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट असल्याने व वॉरंटी पिरियडमध्ये तो खराब झाल्याने कंपनीकडून तो बदलून देऊ असे जाबदार 1 ने सांगितले. परंतु जाबदारानी फ्रीज बदलून देणेची केवळ आश्वासने दिली. फ्रीज बदलून दिला नाही म्हणून तक्रारदाराने वकीलांतर्फे जाबदाराना नोटीस पाठवली. प्रस्तुत नोटीस जाबदार 1 व 2 यांना मिळूनही त्यांनी नोटीसीला कोणताही प्रतिसाद दिला नाही, तसेच वॉरंटी मुदत असूनही जाबदाराने फ्रीज बदलून दुसरा नवीन फ्रीज तक्रारदाराना दिलेला नाही. ही बाब तक्रारदाराने नि.5 चे कागदयादीसोबत नि.5/3 कडील वकीलामार्फत जाबदाराला पाठवलेली नोटीस, नि.5/4 व नि.5/5 कडे दाखल नोटीसच्या पोहोचपावत्यांवरुन सिध्द होते. तसेच प्रस्तुत तक्रारदाराचे तक्रारीतील कोणतेही कथन जाबदार क्र.1 व 2 यानी खोडून काढलेले नाही, त्यामुळे तक्रारअर्जातील तक्रारदाराने केलेले कथन हे निश्चितच सत्य व खरे असलेबाबतची मंचाची खात्री झाली आहे. म्हणजेच तक्रारदार हे जाबदाराचे ग्राहक असून जाबदार 1 व 2 यांनी तक्रारदाराना सदोष सेवा पुरवली असल्याचे निर्विवादरित्या सिध्द होते, सबब आम्ही मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी दिलेले आहे.
7. वर नमूद विवेचनानुसार तक्रारदाराना जाबदाराने सदोष सेवा दिली असल्याच्या निष्कर्षाप्रत मंच येत आहे. सबब जाबदार क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तीकपणे पूर्वीचा फ्रीज रिप्लेस करुन तक्रारदारानी अर्जात नमूद केलेप्रमाणे खरेदी केलेल्या कंपनीचा व त्याच मॉडेलचा, त्याच किंमतीचा कार्यक्षम व चांगल्या दर्जाचा नवीन फ्रीज ताबडतोब देणे न्यायोचित होणार आहे असे मे.मंचाचे स्पष्ट मत आहे.
8. सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करणेत येतात-
आदेश
1. तक्रारदारांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2. जाबदार क्र.1 व 2 यांनी तक्रारदारास दिलेला फ्रीज तक्रारदाराकडून परत घेऊन त्याबदली त्याच कंपनीचा, त्याच मॉडेलचा व त्याच किंमतीचा नवीन, कार्यक्षम व चांगल्या दर्जाचा फ्रीज रिप्लेस करुन तक्रारदारास दयावा.
3. तक्रारदारास झालेल्या मानसिक त्रासाबाबत व अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु.10,000/- जाबदार क्र.1 व 2 यानी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या तक्रारदारास अदा करावी.
4. वरील सर्व आदेशांचे पालन आदेश पारित तारखेपासून 45 दिवसाचे आत जाबदार 1 व 2 यानी करावे.
5. सदरचा न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
6. सदर न्यायनिर्णयाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य पाठवणेत याव्यात.
ठिकाण- सातारा.
दि.16-1-2015.
(सौ.सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ.सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.
Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes
Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.