मंचाचे निर्णयान्वये - श्री. विजयसिंह राणे, अध्यक्ष. //- आदेश -// (पारित दिनांक – 30/03/2011) 1. तक्रारकर्त्यांनी ग्रा.सं.का.चे कलम 12 अन्वये सदर तक्रार दाखल केलेली असून तक्रारकर्त्यांची तक्रार अशी आहे की, तक्रारकर्ती क्र. 1 व त्यांचे पती यांनी गैरअर्जदारांकडे मासिक आय योजनेंतर्गत संयुक्त खात्यामध्ये रु.6,00,000/- जमा केले होते. योजनेप्रमाणे या रकमेवर दरमहा व्याज मिळणार होते व योजनेच्या शेवटी 10 टक्के बोनसची रक्कम मिळणार होती. तक्रारकर्ती क्र. 1 चे पतीचे दि.16.04.2005 ला निधन झाल्यामुळे दि.16.11.2005 ला पतीचे नावाचे ठिकाणी मुलीचे नाव संयुक्त खात्यामध्ये एक खातेधारक म्हणून गैरअर्जदारांचे सहमतीने नोंदविण्यात आले. पुढे गैरअर्जदारांनी तक्रारकर्तीला या प्रकरणी रु.1,46,000/- इतकी रक्कम चुकीचे कारण सांगून कमी दिली. याबाबतची नोटीस गैरअर्जदारांना दिली. गैरअर्जदारांनी या नोटीसला कोणतेही समाधानकारक उत्तर दिले नाही, म्हणून ही तक्रार दाखल करण्यात आलेली आहे आणि तीद्वारे त्यांना कमी मिळालेली रक्कम रु.1,46,000/- ही 24 टक्के व्याजासह मिळावी, आर्थिक त्रासापोटी प्रत्येकी रु.24,000/- नुकसान भरपाई व व्याज मिळावे, तक्रारीचा खर्च मिळावा अशा मागण्या केलेल्या आहेत. आपले म्हणण्याचे पुष्टयर्थ तक्रारकर्तीने दस्तऐवज नि.क्र.3 नुसार दाखल केलेले आहेत. 2. गैरअर्जदारांना सदर तक्रारीची नोटीस पाठविली. त्यांनी हजर होऊन लेखी उत्तर दाखल केले. गैरअर्जदारांनी बहुतांश खात्यासंबंधी तक्रारीतील मुद्दे मान्य केले. मात्र त्यांचे असे म्हणणे आहे की, त्यांच्या नियमाप्रमाणे एका खातेधारकाचा मृत्यु झाल्यानंतर अशा खात्यात रक्कम ठेवावयाची मर्यादा ही रु.3,00,000/- इतकी असल्यामुळे दुस-या रु.3,00,000/- वर व्याज देय नसते आणि त्याप्रमाणे नियमानुसार योग्य रक्कम तक्रारकर्तीला दिलेली आहे. यासंबंधी त्यांनी नियम क्र. 169(8) यावर भीस्त ठेवली आणि तक्रारकर्तीची तक्रार चूकीची आहे, म्हणून खारीज करावी असा उजर घेतला. आपले म्हणण्याचे पुष्टयर्थ गैरअर्जदाराने दस्तऐवज नि.क्र.18 नुसार दाखल केलेले आहेत. 3. सदर प्रकरण मंचासमोर युक्तीवादाकरीता दि.17.03.2011 रोजी आले असता उभय पक्षांचा युक्तीवाद मंचाने ऐकला. तसेच दाखल दस्तऐवजांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्कर्षाप्रत आले. -निष्कर्ष- 4. ज्या नियमावर गैरअर्जदार भिस्त ठेवतात, तो नियम क्र.169(8) खालीलप्रमाणे आहे. “ (8) Status of joint MIS Account on the death of one of the depositors :- If one of the depositors of a MIS Account dies, the account will be treated as a single account in the name of the surviving depositor from the date of death of the said depositor when a report to this effect is received in the post office. The PM/SPM will ask the surviving depositor to withdraw the excess amount is excess of the limit prescribed for single depositor as this amount will not carry interest from the date of death of the joint depositor. The interest already paid on this excess amount will be recovered as adjusted. The account will be converted into a single account.” या नियमाप्रमाणे पोस्ट मास्टर यांचे कर्तव्य आहे की, त्यांनी संबंधितांना जास्तीची रक्कम परत घेण्याची सुचना द्यावी, कारण त्या रकमेवर व्याज देय नसते. अशी सुचना तक्रारकर्तीला दिली असल्याबाबत गैरअर्जदारांचे म्हणणे नाही. या नियमामध्ये असे कोठेही नमूद नाही की, मृतक खातेधारकाऐवजी अन्य व्यक्तीला संयुक्त खातेधारक म्हणून घेता येत नाही. गैरअर्जदारांनी दुसरे खातेधारक म्हणून तक्रारकर्तीच्या मुलीला या खात्यात समाविष्ट करुन घेतले आहे आणि तिचे नाव खातेधारक म्हणून दर्शविले आहे आणि संपूर्ण कालावधीकरीता गैरअर्जदाराकडे पूर्ण रक्कम ही जमा होती, त्यामुळे तक्रारकर्तीची रक्कम कपात करण्याचे कोणतेही प्रयोजन व संयुक्तीक कारण मंचास दिसत नाही व योग्य रक्कम न देणे, तीमध्ये कपात करणे ही गैरअर्जदारांच्या सेवेतील त्रुटी आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. यास्तव खालीलप्रमाणे आदेश पारित करण्यात येत आहे. -आदेश- 1) तक्रारकर्तींची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2) गैरअर्जदारांनी तक्रारकर्तीला, पूर्ण कालावधीची व्याजाची रक्कम आणि बोनसची रक्कम सर्वसामान्य परिस्थितीत जी मिळावयास पाहिजे होती, ती द्यावी. त्यातून यापूर्वी तक्रारकर्तीला दिलेली रक्कम वगळण्यात यावी. 3) तक्रारकर्तीला झालेल्या मानसिक त्रासापोटी रु.10,000/- भरपाई प्रत्येकी आणि तक्रारीचा खर्च रु.2,000/- गैरअर्जदारांनी द्यावा. 4) गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांनी सदर आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्यापासून एक महिन्याचे आत करावे, न पेक्षा गैरअर्जदार हे तक्रार दाखल दिनांक 27.09.2010 पासून रकमेचे अदायगीपावेतो उपरोक्त देय रक्कम द.सा.द.शे.12 टक्के व्याजासह देय राहील.
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |