Dated the 17 May 2016
न्यायनिर्णय
द्वारा- सौ.माधुरी विश्वरुपे...................मा.प्र.अध्यक्षा.
1. तक्रारदार यांनी बजाज प्लसर वाहन ता.14.06.2011 रोजी सामनेवाले नं.2 यांचेकडून विकत घेतले. सदर वाहन विकत घेतल्यानंतर दोन दिवसातच वाहनाच्या हेडमधुन इंजिन ऑईैलच्या गळतीला सुरुवात झाली. तक्रारदार यांनी सदर वाहन आकार मोटर्स यांच्याकडे दुरुस्त केले. आकार मोटर्स यांनी हेडचे स्क्रु, नट फीट करुन दिले. तथापि, सदर प्रॉब्लेम सातत्याने होत असल्याने ता.30.07.2011 रोजी गाडीची दुरुस्ती केली, तसेच इंजिनचे काम केले.
2. तक्रारदार यांनी बजाज ऑटो कंपनीला ऑईल लिकेजची समस्या वाहनामध्ये असल्याबाबत कळविले, कायदेशीर नोटीस पाठवली, बजाज ऑटो कंपनीने तक्रारीची दखल घेऊन सामनेवाले नं.2 यांचेकडे हेड बदलीसाठी बोलावले. परंतु सामनेवाले नं.2 हे वाहनास जुना व दोषयुक्त हेड बसवून फसवणूक करण्याच्या प्रयत्नात होते, तक्रारदार यांच्या गाडीचे फोर्कपाईप मधुन गळती चालू झाल्यामुळे फोर्कपाईप, फोर्क ऑईल बदली केले व सिल केले. तक्रारदार यांच्या वाहनाची वॉरंटी दोन वर्षे किंवा 300000 किलोमिटर पर्यंत आहे. तक्रारदार यांचे वाहन 19820 किलो मिटर चाललेले असल्याने वॉरंटी कालावधीत नादुरुस्त झाले आहे.
3. सामनेवाले नं.1 व 2 यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदार यांनी ता.14.06.2011 रोजी बजाज प्लसर विकत घेतली असुन ता.25.02.2012 रोजी (आठ महिन्यांत) 18362 किलो मिटर रिडिंग दर्शविण्यात आले आहे. यावरुन तक्रारदार यांचा दरदिवस वापर सुमारे 75 ते 77 किलो मिटर आहे.
4. तक्रारदार यांनी आकार मोटर्स व वासन मोटर्स यांच्याकडून वाहनाची दुरुस्ती केली, परंतु त्यांना प्रस्तुत प्रकरणात समाविष्ट केलेले नाही. तक्रारदार यांनी ता.19.02.2011 रोजीची ओनर मॅन्युअल प्रमाणे पहिली सर्व्हीस वाहना करीता घेतली नाही. सबब तक्रारदार यांच्या वाहनास ब्रिच ऑफ वारंटी ची बाधा प्रस्तुत प्रकरणात लागु होते.
5. तक्रारदार यांची तक्रार, दाखल कागदपत्रे, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद तसेच सामनेवाले नं.1 व 2 यांची लेखी कैफीयत, पुरावा शपथपत्र व लेखी युक्तीवाद यांचे सखोल वाचन केले. उभयपक्षांनी लेखी युक्तीवाद हाच तोंडी युक्तीवाद समजण्यात यावा अशी पुरसिस दाखल केली. सबब उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे मंच खालील प्रमाणे निष्कर्ष काढीत आहे.
6.कारण मिमांसा
अ. तक्रारदार यांनी सामनेवाले नं.1 बजाज कंपनीचे “ बजाज प्लसर ” हे वाहन विकत घेतले असुन ता.14.06.2011 रोजी आर.टी.ओ. कार्यालयात नोंदणी केल्याबाबतची पावती मंचात दाखल आहे.
ब. तक्रारदार यांनी सामनेवाले नं.1 यांच्याकडे ता.26.09.2011 रोजी पाठवलेल्या वाहनाच्या इंजिन ऑईल गळतीबाबतची कायदेशीर नोटीसची प्रत मंचात दाखल आहे. त्यानंतर ता.02.09.2011 रोजी पुन्हा सामनेवाले नं.1 यांचेकडे यासंदर्भातील तक्रार पाठविली आहे.
क. तक्रारदार यांनी ता.04.02.2012 रोजी सामनेवाले नं.1 यांना पाठवलेल्या पत्रात इंजिन ऑईलची पातळी कमी झाल्याने इंजिन ऑईलची बदली करावे लागते, त्यामुळे पुर्ण इंजिन (ब्लॉक फीस्टन) बदली करुन दयावे असे नमुद केले आहे. परंतु सामनेवाले नं.1 यांनी सदर दुरुस्ती केली नाही. सबब सदर स्पेअरपार्ट (हेड) व इंजिन नविन बसवून मिळण्यासाठी तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार दाखल केल्याचे स्पष्ट होते असे मंचाचे मत आहे.
ड. तक्रारदार यांनी नाशिक येथे ता.17.02.2011 रोजी रु.330/- इतकी रक्कम इंजिन ऑईल करीता खर्च केल्याबाबतचे वर्कशॉपचे बील (टॅक्स इनव्हाईस) मंचात दाखल आहे.
ई. तक्रारदार यांनी सामनेवाले नं.2 यांचेकडे ता.08.09.2011 व ता.05.11.2011 रोजीच्या प्रत्येकी रक्कम रु.295/- ऑईल बदलीसाठी भरणा केल्याबाबतच्या पावत्या मंचात दाखल आहे. तसेच सामनेवाले नं.2 यांच्याकडे स्पेअरपार्ट, फोर्क ऑईल, इंजिन ऑईल करीता रक्कम रु.792/- भरणा केल्याबाबतची ता.25.02.2012 रोजीची पावती मंचात दाखल आहे. त्यानंतर ता.21.03.2012 रोजीची रक्कम रु.522/- ची पावती मंचात दाखल आहे. तसेच तक्रारदार यांनी आकार मोटर्स यांच्याकडे ता.19.02.2011 व ता.23.05.2011 आणि ता.30.07.2011 रोजी इंजिन ऑईल व ऑईल बॅग वगैरे विकत घेतल्याच्या पावत्या मंचात दाखल आहेत. यावरुन तक्रारदार यांनी वादग्रस्त वाहन विकत घेतल्यापासुन इंजिन ऑईलची गळती होत असल्याचे स्पष्ट होते.
उ. सामनेवाले यांचे म्हणण्यानुसार तक्रारदार गाडीचा प्रतिदिवस 75 किलो मिटर प्रमाणे वापर करतात. तक्रारदार यांना सदर वाहनाची दोन वर्षाची अथवा 30 किलो मिटर वापराचा वॉरंटी कालावधी दिला आहे. तक्रारदार यांच्या वाहनाने ता.25.02.2012 पर्यंत 18362 किलो मिटर प्रवास केला असुन ता.13.06.2013 पर्यंत वाहनास वॉरंटी कालावधी उपलब्ध आहे. तसेच तक्रारदार यांनी ओनर्स मॅन्युअल प्रमाणे गाडीचे पहिले सर्व्हिसिंग केली नाही. यामुळे वॉरंटी कालावधी संपुष्ठात येतो याबाबतचा कोणताही पुरावा मंचासमोर नाही. तक्रारदार यांचे वाहन विकत घेतल्यापासुन सातत्याने गाडीचे हेड व इंजिन नादुरुस्त असल्याचे तक्रारीतील दाखल कागदपत्रांवरुन स्पष्ट होते. तक्रारदार यांचे वाहन वॉरंटी कालावधीत अनेकवेळा नादुरुस्त होऊन त्यासाठी तक्रारदार यांना बराच खर्च झाल्याबाबतच्या पावत्या मंचात दाखल आहे. अशा परिस्थितीत तक्रारदार यांनी वाहना बाबतचा तज्ञ अहवाल दाखल केलेला नसला तरी तक्रारदार यांच्या वाहनामध्ये उत्पादकीय दोष असल्याची बाब स्पष्ट होते असे मंचाचे मत आहे.
वरील परिस्थितीचे अवलोकन केले असता, सामनेवाले नं.1 यांनी तक्रारदार यांच्या वाहनातील दोषातील दुरुस्ती करुन देणे योग्य आहे. सबब सामनेवाले नं.1 यांनी तक्रारदार यांच्या वाहनाचा स्पेअरपार्ट-हेड व इंजिन बदलून देऊन नविन हेड व नविन इंजिन वॉरंटीसहित तक्रारदार यांना देणे योग्य आहे.
उपरोक्त चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन खालील प्रमाणे आदेश पारित करण्यात येतो.
“ या मंचातील कार्यभार पाहता व इतर प्रशासकीय कारणांमुळे यापुर्वी ही तक्रार निकाली काढता येऊ शकली नाही ”.
- आदेश -
1. तक्रार क्रमांक-166/2012 अंशतः मंजुर करण्यात येते.
2. सामनेवाले नं.1 यांनी सदोष वाहनाची विक्री करुन त्रुटीची सेवा दिल्याचे जाहिर करण्यात
येते.
3. सामनेवाले नं.2 यांच्या विरुध्दची तक्रार फेटाळण्यात येते.
4. सामनेवाले नं.1 यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदार यांच्या बजाज प्लसर वाहनाचा
स्पेअरपार्ट-हेड व इंजिन बदलून देऊन नविन हेड व नविन इंजिन वॉरंटीसहित
ता.30.07.2016 पर्यंत तक्रारदार यांना दयावे. तसेच न केल्यास सामनेवाले नं.1 यांनी
ता.01.08.2016 पासुन आदेशाच्या पुर्ततेपर्यंत प्रतिमहिना रु.1,000/- (अक्षरी रुपये एक
हजार) तक्रारदार यांना दयावे.
5. सामनेवाले नं.1 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारदार यांना नुकसानभरपाई
म्हणून रक्कम रु.5,000/- ( अक्षरी रुपये पाच हजार) तसेच तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम
रु.5,000/- ( अक्षरी रुपये पाच हजार) ता.30.07.2016 पर्यंत दयावेत.
6. आदेशाच्या प्रती उभयपक्षकारांना विनामुल्य व विनाविलंब पोस्टाने पाठविण्यात याव्यात.
7. तक्रारीचे अतिरिक्त संच असल्यास तक्रारदार यांना परत करण्यात यावे.
ता.17.05.2016
जरवा/