ग्राहक तक्रार क्र. 138/2013
अर्ज दाखल तारीख : 03/10/2013
अर्ज निकाल तारीख: 25/11/2014
कालावधी: 01 वर्षे 01 महिने 22 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. सुखदेव पि. गंगाराम शेळके,
वय-65 वर्षे, धंदा – शेती,
रा.सांगवी, (काटी) ता.तुळजापूर, जि.उस्मानाबाद.
2. इंदुबाई भ्र. सुखदेव शेळके,
वय-60 वर्षे, धंदा- घरकाम, रा.सदर. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. फयूचर जनरली इंडिया इन्शुरन्स कंपनी लि.
व्दारा- विभागीय कार्यालय,
श्री. प्रेम शिवदास,
मा. व्यवस्थापक तथा शाखाधिकारी,
फयुचर जनरली इंडिया इन्शुरन्स कंपनी लि.
डीजीपी हाऊस, पहिला मजला, 88 सी,
जुनी प्रभादेवी रोड, बेंगल केमिकल जवळ,
प्रभादेव, मुंबई-400025.
2. श्री. नंदकुमार प्रभाकर देशपांडे,
शाखाधिकारी डेक्कन इन्शुरन्स अड रि इन्शूरन्स ब्राकर्स प्रा. लि.
फरकाडे बिल्डींग, भानुदास नगर, बिग बझारच्या मागे,
जालना रोड, औरंगाबाद.
3. श्री. ज्ञानेश्वर रामराव जाधव,
तालुका कृषी अधिकारी,
तालुका कृषी अधिकारी कार्यालय, तुळजापूर. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2)मा.श्रीमती विदयुलता जे. दलभंजन सदस्य.
3) मा.श्री.एम.बी.सस्ते, सदस्य.
.
तक्रारदारातर्फे विधीज्ञ : श्री.बी.बी.देशमूख.
विरुध्द पक्षकार क्र.1 तर्फे विधीज्ञ : श्री.ए.ए.दानवे.
विरुध्द पक्षकार क्र.2 तर्फे विधीज्ञ : स्वत:.
विरुध्द पक्षकार क्र.3 तर्फे विधीज्ञ : स्वत:.
निकालपत्र
मा. अध्यक्ष श्री.एम.व्ही.कुलकर्णी यांचे व्दारा:
1) तक्रारदाराच्या तक्रारी अर्जाचे थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे :
तक्रारदार मौजे सांगवी (काटी) ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद येथील रहीवाशी असून अर्जदार क्र. 1 व 2 यांचा मुलगा आनंद सुखदेव शेळके यांचे मालकीचे जमीन गट नं. 866 एकूण क्षेत्र 00 हे. 52 आर जमीन त्यांचे नांवे 7/12 पत्रकामध्ये फेरफार क्र. 2955 नुसार मंजूरीचे अनुषंगाने दि.26/08/2012 पासून नोंदलेले आहे. अर्जदाराचा मुलगा आनंद सुखदेव शेळके याचे अपघाती घटनेदिवशी व आगोदर ते शेतकरी असल्याने शासनाने शेतकरी जनता अपघात विमा योजनेस पात्र आहेत. अर्जदार हे मयत आनंदसुखदेव शेळके यांचे आई व वडील आहेत. व्यवसायाने कुंभार आहेत. मातीचे साहित्य घडविणे व ते विक्री करणे हा तक्रार अर्जदाराचा एक व्यवसाय आहे. दि.05/03/2013 रोजी मोटार सायकलवरुन सांगवी गावाहुन तळजापुरकडे जात असतांना सकाळी 11.00 वा. चे सुमारास समोरुन येणा-या एस.टी.बस. क्र. एमएच-20/बीएल-2099 ने धडक दिल्याने आनंद सुखदेव शेळके हा जागीच मरण पावला. सदर घटननेची नोंद पो. स्टे. यांच्याकडे दिली. घटनास्थळाचा पंचनामा, इन्क्वेस्ट पंचनामा होवून पोस्टमार्टम करण्यात आले. तक्रारदाराने दि.24/05/2013 रोजी रितसर अर्ज करुन आवश्यक कागदपत्रासह क्लेम फॉर्म दिला व विमा रक्कमेची मागणी केली. दि.27/06/2013 रोजी विप क्र.1 यांनी अपघातग्रस्त शेतकरी हा वाहनाच्या आसन क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेवून जात होता त्यामुळे जी. आर. कराराप्रमाणे रस्ता अपघातात वाहन चालक शेतकरी समाविष्ठ नाही अशा प्रकारचे चुकीचे उत्तर देवून विमा दावा नाकारला. म्हणून सदरची तक्रार दाखल करणे तक्रारदारास भाग पडले. म्हणून विप यांनी विमा दावा रक्कम रु.1,00,000/- व त्यावर दि.05/03/2013 रोजी म्हणजेच अपघाती घटनेच्या तारखेपासून द.सा.द.शे. 12 टक्के व्याजासह, झालेल्य त्रासापोटी रु.3,000/- व प्रकरणाच्या खर्चापोटी रु.3,000/- मिळावे अशी विनंती केली आहे.
तक्रारदाराने तक्रारीसोबत कागदपत्रांची ता.कृषी अधिकारी, प्रस्ताव, क्लेम फॉर्म व भाग2, प्रतिज्ञापत्र, सातबारा उतारा, 6 (क) ची नक्कल, फेरफार, मयताचे प्रमाणपत्र, शिधापत्रिकेचे (झेरॉक्स प्रत), मयताचे मतदान ओळखपत्र, अर्जदारचे बँक पासबूक, एफ.आय.आर., घटनास्थळ पंचनामा, इन्क्वेस्ट पंचनामा, प्रेत तपासणी पत्र, ई. कागदपत्रांच्या प्रती दाखल केली आहेत.
2) सदर प्रकरणात मंचामार्फत विरुध्द पक्षकार क्र.1 यांना नोटीस मिळाल्यानंतर त्यांनी दि.05/12/2014 रोजी आपले म्हणणे दाखल केले ते संक्षीप्त स्वरुपात खालीलप्रमाणे
मयत आनंद शेळके चालवित असलेली मोटार सायकल आर.टी.ओ. यांचेकडे नोंदणी न करताच सार्वजनीक रत्यावर चालवित होते. सदर मोटार सायकलवर क्षमतेपेक्षा जास्त 1 व्यक्ती बसवून बेकायदेशीर प्रवास करीत होते. म्हणून सदर विमा दावा दि.27/06/2013 रोजी विमा दाव्याचे अटी व शर्तींचे उल्लंघन होत असल्याने दावा नाकारण्यात आला असल्याचे तक्रारदारास कळविण्यात आले. तसेच तक्रारदार विपचा ग्राहक नाही. तक्रारदाराने सदर अपघताबाबत दाखल झालेला फौजदारी दाव्याचे आरोपपत्र दाखल करण्याचे टाळले आहे. म्हणून तक्रारदाराची तक्रार चुकीची असून खर्चासह नामंजूर करण्यात यावी असे नमूद केले आहे.
3) सदर प्रकरणात मंचामार्फत विरुध्द पक्षकार क्र.2 यांना नोटीस मिळाल्यानंतर त्यांनी दि.11/11/2013 रोजी आपले म्हणणे दाखल केले ते संक्षीप्त स्वरुपात खालीलप्रमाणे
विमा सेवा पुरविणे आणि विमा कंपनी आणि क्लेमंट यांचेत मध्यस्थ म्हणुन काम करणे एव्हढेच मर्यादित काम संस्था करते. या नेमणूकीसाठी संस्थेने महाराष्ट्र शासनास कोणत्याही प्रकारची फी अथवा आर्थिक मदत मागितलेली नाही, लागू केलेली नाही अथवा स्विकारलेली नाही. म्हणून दाव्यापासून दावेदारास मिळणा-या अथवा न मिळणा-या आर्थिक लाभासाठी संस्थेस जबाबदार धरण्यात येवू शकत नाही. असे म्हणणे दिले आहे.
4) सदर प्रकरणात मंचामार्फत विरुध्द पक्षकार क्र.3 यांना नोटीस मिळाल्यानंतर त्यांनी दि.11/11/2013 रोजी आपले म्हणणे दाखल केले ते संक्षीप्त स्वरुपात खालीलप्रमाणे
सदर विमा प्रस्ताव दि.24/05/2013 रोजी सादर झालेला असून ता. कृषी अधिकारी कार्यालय तुळजापूर यांचे जा. पत्र क्र.शेविअ/206/दि.24.05.2013 रोजी मा. जि. अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयास प्रस्ताव सादर केलेला आहे. असे म्हणणे दिलेले आहे
5) तक्रारदाराची तक्रार, त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे, गैरतक्रारदार यांचे म्हणणे, त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे, उभयतांचा लेखी युक्तीवाद इत्यादींचा विचार करता आम्ही निष्कर्षासाठी खालील मुद्ये उपस्थित करीत आहोत. त्यांचे निष्कर्ष खाली दिलेल्या कारणांसाठी देतो.
मुद्ये निष्कर्ष
1) विरुध्द पक्षकारने अर्जदाराच्या सेवेत त्रुटी केली आहे का ? होय.
2) अर्जदार नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे काय ? होय.
3) काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे.
निष्कर्षाचे विवेचन
मुद्या क्र.1 व 2 चे विवेचन
6) विप क्र.1 यांनी आपल्या म्हणण्यामध्ये म्हंटलेले आहे की मयत आनंद बेकायदेशीररित्या मोटार सायकलवरुन सावंगी गावाहून तुळजापूर कडे जात होता. कारण मोटरसायकलची नोंदणी त्यांनी आर.टी.ओ.कडे केलेली नव्हती. त्याचप्रकारे मोटारसायकलवर चालकाशिवाय अधिकचा 1 असे 2 प्रवासी प्रवास करु शकत होते. परंतु अपघातावेळेस मयत आनंद यांच्याशिवाय आणखी दोन जण प्रवास करत होते. पोलिसांनी हेतुत: वरील स्वरुपाचा गुन्हा दाखल केलेला नाही. विप क्र.1 यांनी योग्य प्रकारे तक्रारदाराचा दावा नामंजूर केला आहे. विप क्र.1 चे पत्र दि.27/07/2013 नुसार अपघातग्रस्त शेतकरी वाहनाच्या आसन क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेवून जात असल्याने दावा फेटाळण्यात आला आहे. कारण करार कलम VI -1 नुसार तक्रारदार भरपाई मिळण्यास पात्र नाही.
7) विप क्र.1 यांनी FIR च्या प्रती वर भर दिलेला आहे. FIR मयत आनंद यांचे वडील म्हणजेच तक्रारदार क्र.1 यांनी दिलेली आहे त्याला तानाजी पवार यांनी दिलेल्या माहीतीवरुन FIR देण्यात आलेला आहे. त्याप्रमाणे मयत आनंद त्याचे मित्र प्रवीण व भौरवनाथ असे मोटार सायकलवर प्रवास करत होते. अपघातात आनंद मयत झाला तर दोन्ही मित्र गंभीर जखमी झाले. मोटार सायकलला एस.टी. बसने धडक दिली होती. पंचनाम्यासोबत नकाशा पाहीला तर एस.टी. बसने चुकीच्या बाजूने जावून मोटार सायकलाला घडक दिल्याचे दिसते.
8) तक्रारदाराने आनंद यांचे ड्रायव्हींग लायसेन्स हजर केले आहे. अपघात दि.05/03/2013 रोजी लायसेंन्स अस्तित्वात होते. विपने जे दोन अधिकचे प्रवासी मोटारसायकलवर प्रवास करत होते त्यांच्या जबाबाच्या प्रती अगर दवाखान्यातील उपचाराच्या प्रति हजर केलेल्या नाहीत. मयत आनंद हा शेतकरी होता हे दाखविण्यासाठी सातबाराचा उतारा तसेच दि.26/08/2012 रोजी झालेला फेरफारचा उतारा तक्रारदाराने हजर केलेले आहे.
9) विप तर्फे श्री.दानवे विधज्ञांनी नामदार सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय II (2013) C.P.J.1 SC Export credit guarantee corp. Of india ltd. Versus Garg Sons international वर भर दिलेला आहे. ना. सर्वौच्च न्यायालयाने म्हंटलेले आहे की कराराचा अर्थ काढतांना न्यायालयास स्वत: शब्द वाढवता येणार नाही तसेच कमी करता येणार नाही अगर बदल करता येणार नाही. विपने त्रिपक्षीय करार हजर केला असून कलम 6 प्रमाणे जर वाहनामध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असले तर फक्त चालक सोडून इतरांचा क्लेम मंजूर करता येईल.
10) ना. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय नितीन खंडेलवाल विरुध्द इंन्शूरन्स कंपनी 2008 C.P.J. मध्ये म्हंटलेले आहे की अटीचा भंग हा जर दाव्याच्या कारणाशी संबंधीत नसला तर त्यामुळे दावा नाकारता येणार नाही. तेथे वाहन चोरीला गेले होते परंतु खाजगी वाहनाचा उपयोग ट्रॅक्सी म्हणून करण्यात आला होता व इंन्शूरंन्स कंपनीच्या अटीचा व शर्तीचा भंग झाला होता. नितीन खंडेलवाल केस मधील तत्वाचा विचार करता विप हे दाखवू शकला नाही की मयत सदर वाहनाच्या क्षमतेपेक्षा अधिक जास्त प्रवासी घेवून गेला होता व करारातील अटींचा भंग केला. त्यामुळे विपने क्लेम नाकारुन सेवेत त्रुटी केली आहे व म्हणून तक्रारदार भरपाई मिळण्यास पात्र आहे असे आमचे मत आहे. म्हणून मुददा क्र.1 व 2 चे उत्तर आम्ही होकारार्थी देतो व खालीलप्रमाणे आदेश करतो.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते.
2) विप क्र.1 ने तक्रारदारांस रु.1,00,000/- (रुपये एक लाख फक्त) समप्रमाणात वाटून दयावे.
3) वरील रक्कमेवर विप क्र. 1 ने तक्रार दाखल तारखेपासून द.सा.द.शे. 6 दराने व्याज दयावे.
4) विरुध्द पक्षकार क्र.1 यांनी तक्रारदारांस तक्रारीच्या खर्चापोटी रु.2,000/- (रुपये दोन हजार फक्त) समप्रमाणात वाटून दयावे.
5) उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्ष यांनी आदेश दिल्या तारखेपासुन तीस
दिवसात करुन विप यांनी तसा अहवाल 45 दिवसात मा.मंचासमोर सादर करावा,
सदरकामी उभय पक्षकारांनी मंचात हजर रहावे. सदर आदेशाची पुर्तता विप यांनी न
केल्यास तक्रारदाराने तसा अर्ज दयावा.
6) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री.एम.व्ही.कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (मा.विदयुलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.