निकालपत्र
(घोषीत द्वारा- सौ. स्मिता बी.कुलकर्णी, अध्यक्ष)
1. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेविरुध्द सेवेत त्रुटीच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे.
अर्जदार यांचे तक्रारीतील कथन थोडक्यात खालील प्रमाणेः-
2. अर्जदार सुनिता कल्याण भवरे ही मयत शेतकरी कल्याण भवरे यांची पत्नी आहे. अर्जदाराचे पती कल्याण भवरे यांचा दिनांक 11.09.2013 रोजी मौजे मुरली तालुका माहुर येथील शेतामध्ये कापसाचे शेतात सडड डवर हाणत असते वेळी डवर ओढत असलेलया बैलाने छातीत लात मारल्याने ते कोसळले व त्यांना मुक्का मार लागून त्यांचे उपचार कामी माहुर येथील सरकारी ग्रामीण रुग्णालयामध्ये शरीक केले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. अर्जदार यांचे पतीचा मृत्यु हा अचानक बैलाने छातीत लात मारल्याने त्यांना गंभीर इजा झाल्याने झालेला आहे. सदरील घटनेचा पंचनामा पोलीस पाटील पडसा,उपसरपंच पडसा व ग्रामसेवक पडसा तालुका माहुर,जिल्हा नांदेड यांनी पंचासमक्ष केला आहे. अर्जदाराचे पती हे व्यवसायाने शेतकरी होते,त्यांचे नावाने मौजे मुरली,तालुका माहुर,जिल्हा नांदेड येथे गट क्रमांक 62 मध्ये त्यांची वडिलोपार्जित शेतजमीन 0 हेक्टर62 आर एवढी आहे. शेतकरी या नात्याने तो महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी वैयक्तीक अपघात योजनेचा लाभार्थी होता, ज्याची पॉलिसी गैरअर्जदार यांचेकडे महाराष्ट्र शासनाने घेतली होती. महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी वैयक्तीक अपघात योजनेंतर्गत अर्जदार यांनी त्यांचे पतीचे मृत्यु पश्चात तालुका कृषी अधिकारी यांचेकडे दिनांक 20.01.2014 रोजी विमा रक्कम मिळणेसाठी आवश्यक त्या कागदपत्रांसह विमा प्रस्ताव दाखल केला असता गैरअर्जदार क्र. 1 यांनी विमा प्रस्ताव जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी,नांदेड यांना पाठविला. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी,नांदेड यांनी सदरील प्रस्ताव गैरअर्जदार क्र. 3 यांना पाठविला व गैरअर्जदार क्र. 3 यांनी विमा कंपनीस अर्जदाराचा विमा प्रस्ताव पाठविला आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदाराचा विमा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर अर्जदारास त्रुटीची पुर्तता सादर करणे विषयी पत्र पाठविले. सदरील त्रुटीमध्ये साक्षांकित केलेला संपुर्ण प्रथम माहिती अहवाल व शवविच्छेदन अहवालाची पुर्तता करण्याचे कळविले होते. पोलीस पाटील पडसा यांनी केलेला पंचनामा व ग्रामसभेचा ठराव इत्यादी कागदपत्रे खुलाश्यासोबत दिनांक 15.05.2014 रोजी पाठविले. दिनांक 27.06.2014 रोजीच्या पत्राव्दारे गैरअर्जदार क्र. 2 यांनी अर्जदारास कळविले की, वरील दाव्यासंबंधी आपण पाठविलेली कागदपत्रे मिळाली, या कागदपत्रांची छाननी केल्यानंतर असे आढळून आले आहे की, खालील कारणास्तव दावा मंजूर करता येणे शक्य नाही.
‘’ शासन निर्णयानुसार शेतक-याचा मृत्यु अपघाती झाल्यास किंवा कायमस्वरुपी अपंगत्व शेतकरी वैयक्तीक अपघात योजनेंतर्गत दावा ग्राह्य होऊ शकतो. परंतु दावेदाराने सादर केलेल्या डॉक्टर रिपोर्टनुसार शेतक-याला मिर्गी,इपिलेप्सीचा जुना आजार होता असे निष्पन्न झालेले आहे. शेतकरी वैयक्तीक अपघात योजनेनुसार दाव्याबाबतची कागदपत्रे दाखल करावयाची मुदत दिनांक 27.01.2013 होती. परंतु तुमचा दावा आम्हाला दिनांक 13.11.2014 रोजी मिळालेला आहे. त्यामुळे वरील दावा कंपनी ग्राह्य धरु शकत नाही, तरी दावा फेटाळण्यात येत आहे.’’
अशाप्रकारे गैरअर्जदार यांनी अर्जदाराचा विमा प्रस्ताव बेकायदेशीररीत्या फेटाळलेला असून सेवेत त्रुटी दिलेली आहे. म्हणून अर्जदार यांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारीमध्ये अर्जदार यांनी विम्याची रक्कम रु.1,00,000/- द.सा.द.शे. 12 टक्के व्याजासह गैरअर्जदार यांचेकडून अर्जदारास देण्याचा आदेश करावा. तसेच मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम रु.25,000/- व दावा खर्च रु.5,000/- इत्यादी रक्कमेची मागणी गैरअर्जदार यांचेकडून तक्रारीव्दारे केलेली आहे.
3. गैरअर्जदार क्र. 1 यांना नोटीस प्राप्त होऊनही ते तक्रारीत हजर झालेले नाहीत. गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांना नोटीस तामील झाल्यानंतर तक्रारीत हजर झाले. गैरअर्जदार 2 यांनी तसेच गैरअर्जदार क्र. 3 यांनी स्वतंत्रपणे आपले लेखी जबाब व शपथपत्र दाखल केलेले आहे.
गैरअर्जदार क्र. 2 यांचा लेखी जबाब थोडक्यात पुढील प्रमाणेः-
4. महाराष्ट्र शासनाने गैरअर्जदार क्र. 2 यांचे सोबत शेतकरी वैयक्तीक अपघात योजनेंसंदर्भात करार केलेला असून सदर करारातील अटी व शर्ती दोन्ही पक्षावर बंधनकारक आहे. करारानुसार काही वाद निर्माण झाल्यास गैरअर्जदार ,महाराष्ट्र शासन व सल्लागार समिती यांचे प्रतिनिधी यांची जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आलेली आहे. सदरील समिती समोर सर्व पक्षाची बाजू एकून 15 दिवसाच्या आत समिती निर्णय घेईल असे ठरलेले आहे. त्यामुळे सदरील मंचास अर्जदाराची तक्रार चालविण्याचा अधिकार नाही. अर्जदार हा काही बाबी मंचापासून आणीत नसून लपवून ठेवीत आहे. गैरअर्जदार यांना अर्जदाराचा विमा प्रस्ताव कागदपत्रांच्या पुर्ततेसाठी विनंती पत्रे पाठवून देखील विहित कालावधीत कागदपत्रे मिळालेली नसल्याने अर्जदाराने दाखल केलेले वैद्यकीय प्रमाणपत्रानुसार मयत शेतक-याचा मृत्यु हा मिर्गी या रोगामुळे झाला आहे असे दिसते व या कारणामुळे गैरअर्जदार यांनी अर्जदाराचा विमा प्रस्ताव योग्यरीत्या नामंजूर केलेला आहे. अर्जदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रावरुन असे लक्षात येते की, गैरअर्जदार यानी दिनांक 27.06.2014 रोजी अर्जदाराचा प्रस्ताव फेटाळल्यानंतर अर्जदार यांनी दिनांक 31.07.2014 रोजी कागदपत्रे व त्रुटीची पुर्ततेसाठी खुलासा दाखल केला. सदर योजनेच्या अटी व शर्तीतील III Exclusion मधील क्र. 4 च्या अटीनुसार Pre-Existing Physical or Mental Defects, Infections व अट क्र. 9 Natural Death या प्रकारचा मृत्यु हा अपघाती योजनेत सामाविष्ठ होत नाही. योजनेप्रमाणे शेतक-याचा मृत्यु हा अपघातामुळे होणे आवश्यक आहे व हे दर्शविण्यासाठी शवविच्छेदन अहवाल अथवा वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक आहे. अर्जदाराने दाखल केलेल्या वैद्यकीय प्रमाणपत्रानुसार मयत शेतक-याचा मृत्यु हा मिर्गी या रोगाने झालेला असल्याने गैरअर्जदार यांनी अर्जदाराचा विमा प्रस्ताव योग्य कारणावरुन नाकारलेला आहे.
गैरअर्जदार क्र. 3 यांचा लेखी जबाब थोडक्यात पुढील प्रमाणेः-
5. गैरअर्जदार क्र. 3 डेक्कन इंशुरन्स कंपनी यांना सदर दाव्याची कागदपत्रे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी,नांदेड यांचेकडून दिनांक 10.03.2014 रोजी मिळाली.
दिनांक 11.03.2014 रोजी त्यांनी सदरील कागदपत्रे विमा कंपनीस पुढील कारवाईसाठी पाठवून दिली. सदर दाव्यावर कारवाई करुन फ्युचर जनरल इंडिया इंशुरन्स कंपनी लिमिटेड यांनी दिनांक 27.06.2014 रोजीच्या पत्राव्दारे अर्जदाराचा विमा प्रस्ताव नाकारलेला आहे दाव्याची रक्कम देणे किंवा दावा नाकारणे हा निर्णय फक्त विमा कंपनीचे हाती असतो. त्यामुळे दावेदाराने केलेल्या कोणत्याही प्रकारच्या दाव्यापासून मिळणारी अथवा न मिळणा-या आर्थिक लाभासाठी गैरअर्जदार क्र. 3 डेक्कन इंशुरन्स कंपनीस जबाबदार धरण्यात येऊ नये.
6. अर्जदार व गैरअर्जदार यांनी पुराव्याकामी आपले शपथपत्र व कागदपत्रे दाखल केलेली आहेत. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकला. दोन्ही बाजूंनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता खालील गोष्टी स्पष्ट होतात.
7. अर्जदार यांचे पती मयत कल्याण भवरे हा व्यवसायाने शेतकरी होता हे अर्जदाराने दाखल सातबारा उता-यावरुन स्पष्ट आहे. अर्जदाराने आपल्या अर्जामध्ये मयत शेतकरी कल्याण भवरे यांचा मृत्यु अपघाती झालेला आहे असे नमुद केलेले आहे व त्या संदर्भात पोलीस पाटील,उपसरपंच व ग्रामसेवक पडसा तालुका माहूर यांनी केलेल्या पंचनाम्याची प्रत तक्रारीसोबत दाखल केलेली आहे. अर्जदार यांनी महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी वैयक्तीक अपघात योजनेंतर्गत गैरअर्जदार यांचेकडे विमा प्रस्ताव दाखल केल्यानंतर गैरअर्जदार क्र. 2 विमा कंपनीने अर्जदाराचा विमा प्रस्ताव नामंजूर केलेला आहे. सदरील दावा नामंजूर करतांना विमा कंपनीने अर्जदाराचे पतीचा मृत्यु हा मिर्गी या आजाराने झाल्याचे निष्पन्न झाल्यामुळे दावा नामंजूर केलेला आहे. विमा कंपनीने दावा नामंजूर करतांना ग्रामीण रुग्णालय,माहूर यांचेकडील वैद्यकीय अधिका-यांनी दिलेले वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधार घेतलेला आहे. सदर वैद्यकीय प्रमाणपत्र तक्रारीसोबत दाखल केलेले आहे. गैरअर्जदार विमा कंपनीने जेव्हा अर्जदाराच्या पतीचा मृत्यु हा अपघाती झाले असल्याबद्दलचे कागदपत्रे म्हणजेच एफ.आय.आर. व शवविच्छेदन अहवालाची पुर्तता करणेस सांगितले. त्यानंतर अर्जदाराने पोलीस पाटील,उपसरपंच व ग्रामसेवक यांनी केलेला पंचनामाची प्रत गैरअर्जदार यांना पाठविली व शवविच्छेदन अहवाल व एफ.आय.आर.ची प्रत नसल्याबद्दलचा खुलासा विमा कंपनीकडे कळविला आहे. परंतु त्या पुर्वीच विमा कंपनीने अर्जदाराचा विमा प्रस्ताव नाकारलेला असल्याचे दिसून येते. विमा कंपनीने आपल्या लेखी जबाबामध्ये पोलीस पाटील यांचा पंचनामा व अर्जदाराचे खुलाश्याचे पत्र हे दिनांक 31.07.2014 रोजी विमा कंपनीस मिळालेले असल्याचे नमुद केलेले आहे. त्यामुळे अर्जदाराने विमाधारकाच्या अपघाती मृत्यु संदर्भातील पाठविलेल्या कागदपत्रे, पोलीस पाटील,उपसरपंच व ग्रामसेवक यांनी केलेल्या पंचनाम्याचे अवलोकन करुन विमा कंपनीने अर्जदाराचा विमा प्रस्ताव फेरविचार करणे गरजेचे आहे असे मंचाचे मत आहे. वरील विवेचनावरुन मंच खालील आदेश देत आहे.
आ दे श
1. अर्जदार यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. अर्जदार यांनी तक्रारीसोबत दाखल केलेली कागदपत्रांवर गैरअर्जदार क्र. 2 विमा कंपनीने अर्जदाराचा विमा प्रस्ताव 30 दिवसाच्या आत गुणवत्तेवर निर्णय घ्यावा.
3. खर्चाबाबत आदेश नाही.
4. दोन्ही पक्षकारास निकालाच्या प्रती मोफत पुरविण्यात याव्यात.
5. वरील आदेशाच्या पुर्ततेचा अहवाल दोन्ही पक्षकारांनी निकालाच्या तारखेपासून 45 दिवसांच्या आत मंचात दाखल करावा. प्रकरण 45 दिवसानंतर आदेशाच्या पुर्ततेसाठी ठेवण्यात यावे.